#अति_लोभ_घातक उदय पिंगळे अर्थ अभ्यासक
#वृत्तपत्र_मासिक_लेख
“ग्राहक तितुका मेळवावा” या मुंबई ग्राहक पंचायतीच्या फेब्रुवारी 2025 च्या मुखपत्रात पान 8 आणि 9 वर, “अति लोभ घातक” हा टोरेस ज्वेलरी घोटाळ्यावरील लेख प्रकाशित झाला आहे.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
#अति_लोभ_घातक
गेल्या काही दिवसात मुंबईतील टोरेस ज्वेलरीने लोकांची आर्थिक फसवणुक केल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये सुमारे सव्वा लाख गुंतवणूकदारांची अंदाजे 1000 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे सोनारांच्या पेढीने हमी दिलेल्या योजना अधिक धोकादायक असल्याचे लक्ष्यात आले आहे. गेले अनेक वर्षे लोक आपल्या जवळच्या सोनारांकडे उपलब्ध असलेल्या योजनांत पैसे गुंतवत आहेत. लोकांचा सोनारावरील आणि सोन्याच्या गुंतवणुकीवरील पारंपरिक विश्वास हाच या योजनांचा मुख्य आधार आहे. अशी गुंतवणूक करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आणि सुरक्षित पर्याय समजले जाते. लोकांच्या याच मानसिकतेचा घेऊन प्लॅटिनम हर्न कंपनीने “टोरेस” या त्याच्या मालकीच्या व्यापार चिन्हाच्या नावे दागिन्यांची दुकाने सुरू केली. ही दुकाने दादर, ग्रॅंट रोड, कांदिवली, कल्याण, सानपाडा आणि मिरारोड येथे मोक्याची गेल्या वर्षभरात उघडली. अतिशय अल्प गुंतवणुकीत उच्च परतावा देऊन त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
आपले ग्राहक आणि त्याचे स्नेही यांची अधिकाधिक गुंतवणूक आपल्याकडे यावी अशी या योजनांची रचना होती. अगदी ₹4000/- इतक्या कमी पैशांत योजनेची सुरुवात होत होती. साप्ताहिक 3 ते 12% असा अविश्वसनीय परतावा त्यातून मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. दागिने खरेदी करून अमेरिकन हिऱ्यात (मॉइसॅनइट स्टोन) गुंतवणूक केल्यास अधिक फायदेशीर ठरेल असे त्यांनी गुंतवणूकदारांना सुचवले.
याप्रमाणे सुरुवातीचे काही महिने असा उच्च परतावा दिला गेला. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक या योजनांकडे आकर्षीत होऊ लागले. हा परतावा नफ्यातून न देता नव्या गुंतवणूकदारांच्या जमा निधीतून देण्यात आला. त्यांनी आणलेल्या सर्व योजना या सोन्याच्या दागिन्यांबरोबर पोन्झी आणि मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनांशी जोडलेल्या अशा स्वरूपाच्या होत्या. या योजना कोणत्याही दृष्टीने आर्थिकदृष्ट्या टिकाव धरू शकत नसल्याने अखेर पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.
ग्राहकांसाठी सोनारांच्या पेढ्याकडे गुंतवणूकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात थोडाफार फरक असू शकतो, त्याना वेगवेगळी आकर्षक नावे आहेत. यातील काही योजना अशा-
● सुवर्ण बचत योजना (गोल्ड सेव्हिंग स्कीम्स):
ग्राहक एका निश्चित कालावधीसाठी आवर्ती योजनेप्रमाणे (साधारणतः 9 ते 11 महिने) दरमहा ठराविक रक्कम जमा करतात. कालावधी संपल्यावर बोनस म्हणून सोनारकडून एक वाढीव हफ्ता दिला जातो. त्यासह एकूण जमा रक्कमेएवढे सोने, चांदी रत्ने चालू बाजारभावाने ग्राहक खरेदी करू शकतात. त्यांनी दागिने बनवून घेतल्यास त्यावरील मजुरीत थोडी सूट मिळते. ग्राहकांच्या दृष्टीने एकदम मोठी रक्कम देण्याऐवजी थोडेथोडे पैसे जमा करून त्यावर व्याज मिळवून दागिने घेणे अधिक सोयीचे असते.
●सुवर्ण भाव संरक्षण योजना (गोल्ड रेट प्रोटेक्शन स्कीम): या योजनांद्वारे ग्राहकांना सोन्याच्या बाजारभावातील चढ-उतारापासून संरक्षण दिले जाते. अशा योजनेत सहभागी होऊन ग्राहक चालू बाजारभावाने काही रक्कम देऊन दागिन्यांची मागणी नोंदवतो. वर्षभरात विशिष्ट दिवशी उरलेली रक्कम देऊन दागिने जुन्या भावाने खरेदी करू शकतो. यामुळे पुढे होऊ शकणाऱ्या भाववाढीपासून संरक्षण मिळते. सोन्याच्या बाजारभावातील वाढीवर मात करण्यासाठी ही योजना ग्राहकांना उपयोगी पडते.
●हप्त्यांवर दागिने खरेदी योजना (ज्वेलरी इंस्टॉलमेंट स्कीम): काही सुवर्ण पेढ्या अशी योजना देतात जिथे ग्राहक दागिन्याची किंमत हप्त्यांमध्ये भरू शकतात. हे हप्ते भरण्यासाठी ग्राहकांना बँकेकडून कर्जही उपलब्ध केले जाते. त्यासाठी संबंधित दागिन्यांचे तारण ठेवण्यात येते. व्याजासह संपूर्ण रक्कम भरल्यानंतर ग्राहकांना दागिने मिळतात. काही ग्राहकांना महाग दागिने खरेदी करणे या पद्धतीने अधिक सोपे होते.
●सुवर्ण संचय योजना (गोल्ड डिपॉझिट स्कीम): या योजनेत ग्राहकाकडे वळे अथवा नाणे स्वरूपात असलेले सोने जमा करून ते व्यवसायासाठी वापरले जाते. त्या दिवशी असलेल्या बाजारभावाने ग्राहकाने गुंतवणूक केली असे समजण्यात येते. त्यानंतर ठरलेल्या मुदतीनंतर तेवढेच सोने परत करून त्यावरील परतावा हा विशिष्ट दराने सोन्याच्या अथवा पैशांच्या स्वरूपात दिला जातो. सोनाराला व्यवसाय वृद्धीसाठी सोने मिळते तर ग्राहकास धातूस्वरूपात पडून असलेल्या सोन्यावर पैसे किंवा सोन्याच्या स्वरूपात परतावा मिळतो.
या योजनांमुळे सुवर्ण गुंतवणुकीचे अधिकचे पर्याय गुंतवणूकदारांना मिळतात, मात्र त्यांची सुरक्षिततेची खात्री काय?
●नियमावली आणि पारदर्शकता: सध्या सोनारांकडे असलेल्या गुंतवणूक योजना कोणत्याही नियमकांच्याद्वारे नियंत्रित नाहीत, त्यामुळे अशी गुंतवणुक पूर्णपणे असुरक्षित आहे. जर सोनाराने फसवणूक केली किंवा किंवा त्याने दिवाळखोरी जाहीर केली तर वसुलीसाठी ग्राहकाकडे मर्यादित पर्याय उपलब्ध राहतात.
●सोनारांची विश्वासार्हता: सुवर्ण गुंतवणुकीच्या योजनांची सुरक्षितता प्रामुख्याने सोनाराच्या पेढीच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. अनेक वर्षे बाजारात असलेले प्रतिष्ठित दुकानदार साधारणतः अधिक विश्वासार्ह मानले जातात. मात्र, टोरेस ज्वेलरी घोटाळ्यातून आता असं दिसून येतंय की, प्रतिष्ठित व्यवसायीकही अनेक संरक्षण यंत्रणांना चकवून ग्राहकांची फसवणूक करू शकतात.
●गुंतवणूकदारांना संरक्षण नाही: भांडवल बाजार आणि वस्तूबाजार यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. तेथे केलेले सर्व व्यवहार खात्रीने पूर्ण होतील याची हमी संबंधित बाजाराने घेतलेली असते. याउलट जर सोनाराने दिवाळखोरी जाहीर केली तर ग्राहकांची गुंतवणूक गमावली जाऊ शकते. विमा किंवा हमीचा अभाव यामुळे धोका अधिकच वाढतो.
यामुळेच,
टोरेस ज्वेलरी घोटाळ्यामुळे ज्वेलर्सद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उपयोग होईल अशा काही सूचना-
●सोनारांच्या पेढीबद्दल संशोधन:
सोनाराची बाजारातील प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती आणि ग्राहकांचे पुनरावलोकन याचा अभ्यास करा. त्यांच्यावर पूर्वी फसवणुक केल्याचे आरोप आहेत का? ते तपासा.
●योजना समजून घ्या: अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि योजनेची कार्यपद्धती, परताव्याच्या हमी आणि सोनाराची जबाबदारी याबद्दल स्पष्टता मिळवा. गुंतवणूक मधेच काढून घेतल्यास त्याचे काय होणार ते समजून घ्या. अवास्तव परतावा हा अधिक धोक्याचा इशारा आहे असे समजा.
●व्यावसायिक सल्ला घ्या: गुंतवणुकीची वैधता आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी वित्तीय सल्लागारांचा मदत घ्या. योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य आहे का? ते जाणून घ्या. अशा योजनांशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक सुरक्षित पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत त्यांची माहिती करून घ्या. आपल्या जोखीम क्षमतेनुसार सुरक्षित पर्याय निवडून गुंतवणुकीबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेता येतील.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक