बोलक्याभिंती… ©स्वप्ना…
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
🔸बोलक्याभिंती…🔸
©स्वप्ना…
“हो उद्या नक्की येते… तुम्ही घर स्वच्छ करून घ्या… तसं नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाईने आवरलं असेलच,.. “तिने फोन ठेवला, आणि चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसली.
तो म्हणाला, “गेलंच पाहिजे का,..?”
ती उदास हसत म्हणाली…
“काकांनी आई गेल्यापासून हजारदा फोन केलाय,.. घराकडे चक्कर मार,.. कोणीतरी चांगली किंमत द्यायला तयार आहे,… जाऊन येते एकदा..”
गाव जवळ आलं, तसं मन जुन्या आठवणींनी उजळलं,..
बसथांब्याजवळ नदीकडे जाणारी पायवाट तशीच होती,.. पुढे मात्र बरेच बदल जाणवायला लागले… एके ठिकाणी तर ड्रायव्हर म्हणाला, “कुठे घेऊ,..? दोन फाटे आहेत,..”
ती देखिल गडबडली, पण रस्त्यावरच्या लिंबोळ्या बघून चटकन आठवलं… लहानपणी आईने घोकून हि खुण सांगितली होती. चुकून हरवली, तर ह्या लिंबोळ्याकडे बघुन वळायचं,.. तिने तशीच गाडी वळवायला सांगितली,..
ओट्यावर कमळाकाकु वाटच बघत बसल्या होत्या. गेल्याबरोबर कपाळावर बोटं मोडत म्हणाल्या “जवळपास 25 एक वर्षांनी गाव बघितलं ना… खरंच 25 वर्ष काळ मध्ये निघुन गेला होता,.. काकु थकली होती,.. तिच्या सुनेने चहा आणला,.. चुलीचा खमंग वास चहाला जाणवत होता,…
तिने पटकन चहा घेतला, आणि काकांना म्हणाली, “मी घरीच जाते मला खुप बघावं वाटतंय घर,..
काकांनी चावी दिली. म्हणाले, “आवरून ठेवलंय… तू पैसे पाठवत असतेस म्हणून ती तुमच्याकडे यायची ती लक्ष्मीबाई अजुनही वाकत वाकत येते, सडा सारवण करून जाते,.. रात्री दिवा देखील लावते,..
काकु म्हणाल्या, ” जेवायला इकडेच ये,..
“ती म्हणाली, “रात्रभर प्रवास झालाय… आता जरा आराम करेल थोडाफार सोबत आणलंय ते खाईल वाटल्यास रात्री येते चुलीवरची भाकरी खायला,..”तिने काकुला नमस्कार केला, तसे खरखरीत, सुरकुतलेले कष्टाचे हात तिच्या चेहेऱ्यावर आणि पाठीवरून फिरले…
तिने ड्रायव्हरला दाट सावलीचं झाड दाखवलं, आणि ती चाळीशीच्या घरातली बाई टूणकुण उडी मारत मागच्या परसातून घराकडे गेली. लक्ष्मीबाईने घरचं घर जपलं होतं, अंगणातली तुळस हिरवीगार होती, तो जुना जमिनीत खोचलेला रांजण, ती पडवी, ते कुडुमुडु दार अजुनही टिकून होतं…
कुलूप उघडताना तिला आठवलं… आई म्हणायची, “आहो दार बदलून घ्या… चोर यायची भीती वाटते…
“तेंव्हा अण्णा म्हणायचे, “चोर आले तरी आपल्या कपाळाचं भाग्य नेणार नाहीत. उगाच काळजी नका करू,..
“तिने दार उघडलं,.. समोरच्या भिंतींवर रामाचा तो जीर्ण झालेला फोटो,… एका कॅलेंडरवर छापून आला होता, अण्णांनी तो कापुन पुठ्ठ्यावर चिटकवला होता,.. त्याला रोज आपण उदबत्ती फिरवत होतो,.. अण्णा म्हणायचे, “काही दुःख झालं, कि रामाला सांगत जा… तोच मार्ग दाखवतो,..”
तिला आज प्रकर्षाने जाणवलं, पालक किती सहजतेने संकटांना स्वीकारायला आणि त्या शक्तीवर श्रद्धा ठेवायला सांगत होते,…
ती मध्ये शिरली,.. देवघर असलेला कोनाडा,.. आईच्या दिव्याच्या वातीचा कोपरा काळा झालेला,.. तो तेलकट, मातकट वास,.. तिला गहिवरून आलं,.. आपण सतरा वर्षाचे असु… अण्णा गेले, आणि मामाने आईला आणि आपल्याला त्याच्या गावी नेलं,.. तसं परत इकडे येताच आलं नाही,.. आईने ह्या शेवटच्या दोन वर्षात तर किती हट्ट केला होता… पण तिला येण्यासारखी तिची परिस्थिती नव्हती,.. पण आज वाटतं… काहीही करून आणायला पाहिजे होतं,.. कारण इथे माझ्यापेक्षाही तिच्याशी जास्त बोलणाऱ्या ह्या भिंती होत्या,.. आता मलाच तर किती आठवणी दाटून आल्या आहेत,.. हि मोठ्या खिळ्याची भिंत किती रागावली असेल माझ्यावर… तेंव्हा इथेच मला दप्तर अडकवायला आवडायचं म्हणून हा खिळा हिच्या पोटात खुपसला होता,.. अण्णा, आई भिंतीवर प्रेमाने हात फिरवायचे,.. आपल्या संसाराची खरी सुख, दुःख, धुसफूस, आनंद बघणाऱ्या ह्या खऱ्या साक्षीदार…
मला कळायला लागल्यावर मी चिडून म्हणत होते, “त्यांना काय कळतं… त्या निर्जीव आहेत,.. पण आज वाटतं, त्यांना कळतंय ना माझं दुःख… आयुष्यात आई वडील गमावल्यावर त्यांच्या आठवणी ह्या भिंतींनी तर जपल्या आहेत … “तिने डोळे पुसले,.. आज आपल्या बंगल्याच्या भिंतीपेक्षा तिला ह्या मळकट, मातकट, खुज्या, टोकरलेल्या भिंती जास्त श्रीमंत वाटू लागल्या,..
तिने प्रेमाने त्यावर हात फिरवला,.. ती कोपऱ्यातील भिंत… इथे तर आई बाबाच्या कुशीत शिरून झोपता यायचं,.. कोणी रागावलं, तर भिंतीकडे तोंड करून माणसांशी अबोला आणि भिंतीशी बोलणं, धुसफूस चालायची,.. आजकाल वेडं म्हणतील मुलं… पण आपल्या काळात ह्या भिंतींनी घडवलं,.. काही ठिकाणी पुसट झालेली चित्रंही तिला दिसली,.. तिचं तिलाच हसु आलं,..
तेवढ्यात लक्ष्मीबाई आली,.. डोळ्यात पाणी साचलेलं… तिने प्रेमानं हात फिरवला पाठीवर,.. हिलाही भरून आलं,.. काकांच्या मुलाने मध्ये सगळयांचे फोटो पाठवले होते,.. त्यामुळे चटकन ओळखु शकली ती त्यांना,..
“कशी आहेस लक्ष्मीमावशी?? तिने विचारलं. त्याबरोबर तिचे डोळे गच्च भरून आले. तिने हात धरून मागच्या चुलीकडे नेलं. तिथे आता चूल नव्हती, पण तिने त्या भिंतीवर हात फिरवला,.. आईने तिला बरंच तारलं होतं, बालविधवा.. आई बाहेर पाण्यासाठी केलेल्या चुलीवर गरम भाकरी टाकून द्यायची तिला. गावात तेंव्हा जात पात फार पाळत होते,.. मागच्या भिंतीला खेटून चोरून ती खायची,….
त्या आठवणीने दोघी डबडबलेल्या डोळयांनी भिंतीशी बोलल्या….
तेवढ्यात काका एका माणसाला घेऊन आला,.. “तू म्हणशील ती किंमत दयायला तयार आहेत हे,..”
तिने लक्ष्मीकडे बघितलं… तिचे डोळे ती पुसत होती,.. हि म्हणाली, “काका, सध्या नाही घर विकायचं कळवेल तुम्हाला नंतर..”
तो माणुस आणि काका नाराज होऊन गेले,.. मावशीला आनंद झाला…
ती म्हणाली, “मावशी… जो पर्यंत ह्या बोलक्या भिंतीवर प्रेमाने हात फिरवायला तू आहेस, तो पर्यंत तरी राहू देते हे घर.. तू इथेच येऊन राहा,.. तुझे पाटलाकडे दारामागे झोपणं बंद कर… कामही फक्त ह्या बोलक्या भिंती सांभाळण्याचं कर…
लक्ष्मीने भरल्या डोळयांनी हातच जोडले,.. दोघीही बोलल्या नाही, पण भिंती मात्र आज जुन्या आठवणी सांगताना उजळून निघाल्या होत्या…
वाचकहो कथा कशी वाटली नक्की सांगा,.. शुद्धलेखन चुका माफी असावी,.. असेच blogs वाचण्यासाठी स्वप्ना blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.. धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी) छ. संभाजीनगर