मनोरंजन

बालपणीचा उन्हाळा… एक आठवण – डॉ अभिजीत देशपांडे.

बालपणीचा उन्हाळा… एक आठवण

– डॉ अभिजीत देशपांडे.

आज सहज फोनवर बोलताना आमच्या सहस्त्रबुद्धे काकूंनी सांडग्याचं वाळवण घातल्याचं सांगितलं, आणि मला एकदम माझ्या बालपणीचा उन्हाळा आणि आमची वाळवणाची कसरत यांची आठवण झाली.
माझ्या लहानपणी, परीक्षा संपून आम्हाला उन्हाळी सुट्टी लागली की आम्ही गावी जात असू. मी, माझा भाऊ, बहीण, आत्या, आत्यांची मुलं, चुलत भावंडं अशी सगळी फौज एकत्र जमत असू. त्यावेळी अनेक प्रकारची वाळवणं आमच्या घरी होत असत, आणि आम्हा भावंडांचा त्यात खारीचा वाटा असे. ही वाळवणाची शिदोरी अगदी आवडीने आम्ही फस्त करत असू. दर वर्षी उन्हाळ्यात पापड, विविध प्रकारची लोणची इथपासून ते खरोड्या, कुरडया, पापड्या, वळवट, शेवया, खारवलेल्या मिरच्या, उपासाचे बटाट्याचे काप (चिप्स), साबुदाण्याच्या पापड्या, बटाटा कीस, उपासाच्या साबुदाण्याच्या वाळवलेल्या चकल्या असे नाना तऱ्हेचे जिन्नस आमची आई करत असे. आम्ही ते वाळवण भर उन्हात गच्चीत वाळवण्यासाठी मदत करत असू. आमच्या मराठवाडा प्रांतातील उन्हं म्हणजे तर काय सांगावं…?
अगदी फेब्रुवारी महिन्यापासूनच लागणाऱ्या उष्ण हवेच्या झळा, उन्हाळा सुरू झाल्याची नांदी देत अंगावर येत असत. मार्च महिन्यातच सूर्यदेवाची “मराठवाडा”भट्टी चांगलीच पेटत असे.
भगवान सूर्य नारायणाला बहुधा वार्षिक सुट्टी नाकारल्यामुळे कदाचित राग आला असावा, आणि कोपभवनात (बहुधा मराठवाडा – विदर्भ हे सूर्य नारायणाचे जणू “कोप भवन” असावेत) आगमन झालेल्या, रुष्ट झालेल्या सूर्य नारायणाचे किरण त्यामुळे अधिकच प्रखरतेने आपल्यापर्यंत पोचत असावेत अशी एक बाळबोध कल्पना माझ्या बालमनाला त्यावेळी चाटून गेली. म्हणजे, आमचे घर हे एक प्रचंड मोठी वीट भट्टी आहे, आणि आतील माणसे बहुधा “ओल्या मातीची” असल्याने त्यांना अक्षरशः भट्टीत भाजून काढण्याचे जणू आदेश काढल्याप्रमाणे उन्हाचे भयंकर चटके खात आमचा उन्हाळा सुरू होत असे. आता ऐकायला गंमत वाटेल, पण, खरं म्हणजे त्याकाळी आम्ही हा उन्हाळा देखील enjoy करत असू. भयंकर उन्हाचीही काहीली चालू असतानादेखील आम्हाला त्यातही मजाच यायची.
एकूणात काय, तर डोक्यावर “मराठवाडा स्पेशल” आग ओकणारे ऊन, आणि पायात स्लीपर, फारतर डोक्याला एखादा टॉवेल किंवा ओढणी असा जामानिमा करून आम्ही भावंडे गच्चीत वाळवण घेऊन येत असू. ते वाळवण वाळवताना गच्चीची तप्त फरशी, आम्ही “हॉट सीट” वर आहोत याची वारंवार जाणीव ‘पटायला नको’ त्या जागी करून देत असे. त्यामुळे मग कोणाचीच खाली बूड टेकवण्याची पत्रास नसायची. मग दोन पायांवर उकीडवे बसून आमचा वाळवणाचा कार्यक्रम चालत असे.
खरोड्या वाळत घालणे यात तर आमची जणू PhD झाली होती. कोण लवकर लवकर आणि एकाच आकाराच्या खरोड्या करून वाळू घालेल याची आमची competition लागलेली असायची. विशेषतः आई किंवा आत्या ज्या गतीने आणि अगदी गोलाकार, पातळ अशी पापडी करून घालत असत, ते पाहून वाटायचं की आपल्याला देखील अशीच गोल, सुबक आणि समसमान पातळ अशी एकसारखी पापडी घालता आली पाहिजे, पण ती कधी जमलीच नाही. बहुधा, आमच्या पापड्या ह्या “बाळसेदार” आणि बेढब व्हायच्या. या पापड्या दोन – तीन तासात वरून वाळायच्या, पण खालच्या बाजूने मात्र ओल्याच असायच्या. आम्हाला या अर्धवट वाळलेल्या पापड्या खायला फार आवडत असत, त्यासाठी आम्ही आईचा ओरडा देखील खात असू. कारण बऱ्याच पापड्या ह्या पूर्ण वाळायच्या आतच आमच्या उदरात विसर्जित झालेल्या असायच्या.
आणखी एक सांगायचं म्हणजे, कुणास ठाऊक का? पण आमच्या बालपणी आम्ही कधीही सांडगे किंवा मिरगुंड केल्याचं स्मरत नाही. आमच्या भागात बहुधा कोणीच सांडगे किंवा मिरगुंड करत नसत. त्यामुळे, पुण्यात येईपर्यंत “सांडगे” किंवा “मिरगुंड” हा काय प्रकार आहे, हे मला अजिबात माहित नव्हतं. आताशा आध्येमध्ये सांडग्यांची भाजी घरात होत असते.
त्याखेरीज, विशेष मजा यायची ती शेवया करण्यात. आजुबाजूच्या चार पाच घरात एकाकडेच शेवया करण्याचा सोऱ्या किंवा “दाबक” असायचा. तो हाताने जोर लावून पिळावा लागत असे, तेव्हा मग शेवया तयार होत असत. आम्ही भावंडं मग हे काम अगदी आनंदाने करत असू. त्या लांबच लांब शेवया बांबूवर पसरून वाळत घालाव्या लागायच्या. त्या नंतर खडखडीत वाळल्या, की मग त्या तुटू नं देता अलगद डब्यात ठेवणे याला विशेष प्राविण्य लागत असे. दुर्दैवाने, अशी नाजूक कामे आम्हाला काही जमायची नाहीत, मग त्या दिवशी झालेला शेवयांचा चुरा मग फोडणी घालून किंवा खीरीचे रूप घेऊन जेवणाच्या पानात पडत असे. फोडणीच्या शेवया किंवा शेवयांचा उपमा हा प्रकार मला आजही विकतच्या इन्स्टंट नूडल्स पेक्षा कितीतरी अधिक आवडतो.
या वाळवणाच्या कार्यक्रमानंतर “पन्हे” हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. कोण, किती पन्ह्याचे ग्लास रिते करतो याची आमच्यात अघोषित स्पर्धा लागत असे. शेवटी आत्या किंवा आई “आता बास हां” म्हणून आम्हाला थांबवत असे.
असा हा आमचा बालपणीचा “रम्य” उन्हाळा. त्याकाळी घरात पंखे असायचे, पण वीज २४ तास असेलच याची खात्री नसे. त्यामुळे मग दुपारी गर्मी व्हायला लागली की आम्ही आजीच्या किंवा आत्याच्या कुशीत जात असू. मग त्या दोघी पदराचा पंख्यासारखा उपयोग करून वारा घालत असत. उन्हामुळे कासावीस झालेलं मन त्यामुळे जरा निवत असे. त्या मायेच्या पदरच्या वाऱ्याची आणि त्यातील गारव्याची सर आजच्या कोणत्याही अद्ययावत तंत्रज्ञान असणाऱ्या AC च्या गारव्याला देखील नाही, या माझ्या मताविषयी कोणाच्याही मनात दुमत नसावे.
त्याकाळी, खेड्यात आजसारखे नळाने पाणी येत नसे. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी विहीर असायची त्यास “आड” असे म्हणतात. या आडाचे पाणी भर उन्हाळ्यातसुद्धा छान गार पडत असे. निसर्गानेच खळाळत्या झऱ्यांद्वारे आडात पाणीपुरवठा करण्याची सोय केलेली होती. त्यामुळे, हे पाणी अत्यंत चवदार लागत असे. आमचे काका संध्याकाळी शेतातून परत आले की ते आम्हा सर्व बच्चे मंडळीला घेऊन आडावर जात असत. तिथे आडातील ताज्या आणि थंडगार पाण्याने मनसोक्त आंघोळ केल्यानंतर दिवसभराचा सगळा घामटा आणि शीण कुठल्याकुठे पळून जात असे.
आमच्या बालपणी कितीही भाजून काढणारा उन्हाळा असला तरीही, आणि घरात AC, cooler काहीही सुविधा नसतानादेखील कधीही हा उन्हाळा “रखरखीत” वाटला नाही. उलट, घरचे मुबलक दूध, दही, ताक, आणि एखादी गाय व्याली तर घरचा पियूष (म्हणजे खरवस), तसेच, अगदी पोत्याने भरून घरी येणारा आंबा आणि रोजच रसाळी असल्याने हा उन्हाळा कायम जिवंत, रसरशीत वाटत असे.
कोणत्याही सिनेमा, व्हिडिओ गेम, मोबाईल, वेब सीरिज, AC, cooler, वीज आदी सुविधा नसल्या तरीही आमच्या आनंदात कोणतीही उणीव राहत नसे. दिवसभराचा वेळ घरात लपंडाव, पत्ते, कट (सारीपाट) खेळण्यात अथवा गोष्टींची किंवा इतर अवांतर पुस्तकं वाचण्यात निघून जात असे, दिमतीला आम्ही वाळू घातलेल्या खरोड्या, पापड्या, कुरडया, वळवट असे कैक पदार्थ असायचे. दुपारचे चार वाजले की आमची स्वारी मैदानावर विटीदांडू किंवा आट्यापाट्या किंवा लगोरी किंवा कबड्डी किंवा खो खो खेळण्यास कूच करीत असे. कोणतीही विशेष साधनसामुग्री नसतानासुद्धा हे देशी खेळ पुरेपूर मनोरंजन करीत असत, पुरेपूर घामटा काढून आरोग्य चांगले राखायला मदत करत असत. तेव्हा, त्या बालवयात ते समजत नव्हतं, पण आज मात्र या खेळांचं महत्व समजायला लागलं आहे. मनसोक्त खेळून, सगळी धूळ अंगावर चिकटवून घरी आलो की संध्याकाळची अंघोळ, मग देवापुढे बसून शुभंकरोती, पर्वच्या म्हटल्याखेरीज आजी उठू देत नसे. त्यानंतर, गोठ्यात जाऊन दूध काढणे आणि धारोष्ण दुधाचे गडू घटाघटा एका दमात संपवणे हा ठरलेला शिरस्ता असायचा. घरचे रायवळ आंबे असल्याने “श्रीमंत आंबाजीपंतांचा” पाहुणचार येता जाता असंख्य वेळा चालतच असे.
त्याकाळी, अगदी संध्याकाळी साडेसात आठ पर्यंत छान जेवणे होत असत (आताच्या काळातील काही तरुणांना आवडणारी “night life” वैगेरे त्याकाळी “अंधश्रद्धा” मानली जात असे!!). मग गच्चीत “natural AC” ची गार गार हवा खात आणि आजीच्या गोष्टी ऐकत आम्ही “भालचंद्र” निद्रादेवीच्या आधीन होऊन जात असू, आणि सकाळी माथ्यावर सूर्य घेऊनच उठत असू. असा आमचा उन्हाळी सुट्टीचा दिवस मोठ्या मजेत जात असे. आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो, कारण खूप सकस वातावरणात आणि निसर्गसंनिध्यांत बालपण घालवण्याची संधी आम्हाला लाभली. आमच्याकडे लहानपणी पुरेसा मोकळेपणा होता आणि आमच्यावर तशी कोणती बंधने कोणती नसली, तरी त्यामुळे आम्ही स्वैर – स्वच्छंद झालो नव्हतो. कारण, ते बोलून दाखवत नसले तरी घरातील वडिलधाऱ्यांचे सतत आमच्यावर लक्ष असायचे. आजही, आजी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे ही भावना मनात असते. आम्हाला आणि आमच्या आयुष्याला आमच्या नकळत त्यांनी वळण लावलं.
आज खंत याची वाटते की, आनंदाचा तोटा नसणारा असा हा उन्हाळा आता आपल्यालासुद्धा पुन्हा अनुभवण्यास मिळणे अशक्यच आहे; पण सध्याच्या पिढीला देखील हे भाग्य मिळणे अवघडच दिसत आहे…!!!
दरवर्षी मुलांच्या परीक्षा झाल्या आणि त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पान्हा फुटल्यासारख्या लहानपणीच्या आठवणी प्रस्त्रवित व्हायला लागतात. “लहानपण देगा देवा..” म्हणत मन आतल्या आत देवाला आर्जवं करू लागतं.

✍🏻 डॉ अभिजीत देशपांडे.
पुणे, महाराष्ट्र.

Related Articles

4 Comments

  1. Atishay marmik shabdat varnan kele aahe Lahan pan agadi Jase chya tase ubhe rahile dolyasamor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}