24/ 6 /2025 आनंदनगर सोसायटी चा बॅडमिंटन हॉल, पौड रोड मेट्रो स्टेशन जवळ, पुणे ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रदर्शन
ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन , सारेगम MPL - स्पंदन ग्रुप २०२५

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रदर्शन
ऐका हो ऐका… 🥁🥁
इवल्या इवल्याशा छोटुल्या मुलांनी त्यांच्या वस्तू विक्रीसाठी प्रदर्शन भरवले आहे… सगळ्यांनी नक्की यायचं हं….
हा मेसेज वाचला आणि मला आश्चर्यच वाटलं… हा काय नवीन उपक्रम….मग मी या उपक्रमाच्या आयोजिकेशी म्हणजेच आपल्या सौ. अनघा वैद्य हिच्याशी बोलले… आणि मला आपल्या ब्राह्मण युनिटीच्या अजुन एका नवीन उपक्रमाची माहिती मिळाली..
गेल्या तीन वर्षांपासून ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रदर्शन भरविण्यात येते… हे या प्रदर्शनाचे चौथे वर्ष आहे.
यामध्ये ८ ते १५ वयोगटातील मुले स्वतः बनवलेल्या वस्तू किंवा आईवडील बनवत असलेल्या वस्तू स्टॉलवर विक्री साठी मांडतात.
सौ. अनघा वैद्य यांच्या सुपिक डोक्यातून ही संकल्पना साकार झाली. आणि अतिशय उत्तम प्रतिसाद सर्वांकडून मिळत गेला.
आपले मूल चार माणसात वावरताना किती छान वागते, विक्री करते, समोरच्या माणसाला पटवून देते, नवीन काहीतरी शिकतेय याचा नव्याने सुंदर अनुभव सर्वच सहभागी मुलांच्या पालकांना होत गेला..
एक मुलगा सतत आईला चिकटून असायचा मात्र प्रदर्शनात सहभागी झाल्यावर तो खूप मोकळा झाला इतरात सहज वावरायला लागला…
आणि येणाऱ्या ग्राहकांचा प्रतिसाद तर अफलातून होता.. गंमत म्हणजे मोठ्या माणसांच्या प्रदर्शनापेक्षा लहान मुलांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..
एका मुलाने स्वत: बनवलेल्या ४०/५० वस्तू ठेवल्या होत्या ज्या एका तासात संपल्या सुद्धा.. दुसऱ्या दोन गोड जुळ्या मुली होत्या.. त्यांनी भाजी ठेवली होती. ती देखील दिड तासात संपली.
एक-दोन पालकांचा उत्साह म्हणजे अगदी छत्रपती संभाजी नगर वरुन दोन वर्षे आपल्या मुलीला प्रदर्शनात सहभागासाठी ते घेऊन येत होते..
प्रॅक्टीकली एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण म्हणजे हे बाल व्यावसायिकांचे प्रदर्शन आहे.