भाषावाद! एक बिनकामाचा विषय! – सुनील कानडे
भाषावाद!
एक बिनकामाचा विषय!
रिकामा न्हावी अन् भिंतीला तुंबड्या लावी!!
भाषा हा अस्मितेचा विषय आहे! नक्कीच!!
पण आज दोन मराठी भाषिक हिंदीत संभाषण सुरू करतात. व्यावसायिक क्षेत्रात, इंग्रजीने सुरूवात होते.
भाषा हे एक माध्यम आहे, एकमेकांचे विचार समजून घेण्याचे. ज्या भाषेत एकमेकांना समजेल त्या भाषेत संवाद साधायला काय हरकत आहे?
आणि राष्ट्रभाषा असो वा नसो, भारतात ७०-७५% शहरी लोकांना हिंदी समजतेच!! त्यामुळे नवीन प्रदेशात गेल्यावर आपसूकच हिंदीत संवाद साधला जातोच!
अर्थात, एखाद्या दुसऱ्या राज्यात तुम्ही जर खूप कालावधीसाठी रहाणार असाल, तर तिथली भाषा शिकणे तुमच्यासाठी चांगलेच आहे. त्या समाजात मिसळणे तुम्हालाच सोपे होईल.
दक्षिण भारतात हा वाद जसा ताणला जातोय, तसाच तो सध्या महाराष्ट्रात (विशेषतः मुंबईत) ताणला जातोय! निरर्थक आहे हा प्रकार आणि उबग आणणारा!!
मराठी चा जाज्वल्य अभिमान असणा-यांपैकी किती जण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालतात? किती जण घरी मराठीत बोलतात?
विनाकारण वातावरण दुषित करण्यात काय विकृत आनंद मिळतोय या लोकांना?
एखादा तामिळनाडूचा माणूस महाराष्ट्रात आला तर (तिकडे तो कितीही कट्टर असला तरीही!) तो मोडक्या तोडक्या का होईना, पण हिंदीत संवाद साधतो… शेवटी टिकून रहाणे (survival) महत्वाचे. असंख्य भाषा असणाऱ्या देशात प्रांतवार एखाद्या भाषेचा दुराग्रह हास्यास्पदच आहे!
राजकीय, प्रांतीय अभिनिवेश बाजूला ठेवून या प्रश्नाकडे डोळसपणे, व्यावहारिक दृष्टीने पाहायला हवे ही काळाची गरज आहे!
.. सुनील कानडे.