दुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

 ★सिद्धी★( भाग ३ ) ©®सौ मधुर कुलकर्णी

★सिद्धी★( भाग ३ )

रविवारची सुट्टी असल्यामुळे सिद्धी लोळत पडली होती.तिच्या मनात आलं,आज आई-पपांजवळ विनीतबद्दल बोलायला हवं. असं सारखं चोरून भेटणं मनाला पटत नव्हतं. विनीत आवडण्यासारखाच आहे.आई-पपांना नक्कीच आवडेल. सिद्धी उठली, फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसली. अनिल पेपर वाचत होते. उमाची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. सिद्धीने जरा अंदाज घेतला आणि सांगायचं असं ठरवलं.

“आई,पपा..मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.” सिद्धीने सुरवात तर केली.

“बोल की मग!”अनिलनी पेपर बाजूला केला.उमा खुर्ची घेऊन बसली.

“पपा,माझ्या कंपनीत विनीत कामेरीकर नावाचा एक मुलगा आहे. आम्ही दोघेही एकमेकांना पसंत करतो आणि लग्न करायची इच्छा आहे.” सिद्धीने एका दमात बोलून टाकलं.

उमाने चमकून अनिलकडे बघितलं. अनिलने डोळ्यांनीच “शांत रहा”,अशी उमाला खूण केली.

“बातमी छानच आहे सिद्धी पण विनीतला आधी आपल्या घरी घेऊन ये. त्याची फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे ह्याची माहिती करून घ्यायला हवी.”अनिल शांतपणे म्हणाले.

“पपा,ते सगळं मी त्याला विचारलं आहे. तो घरचा प्रचंड श्रीमंत आहे पण माणसं साधी आहेत. कोल्हापूर जवळ कामेरी नावाचं छोटं गाव आहे तिथे त्यांचा वडिलोपार्जित मोठा वाडा आहे,शेती आहे. घरी आईवडील आणि एक लहान बहीण आहे.” सिद्धीने उमाकडे बघितलं. उमा काहीच बोलत नव्हती.

“मी आजच संध्याकाळी त्याला घरी बोलावते.आई,चालेल ना?”

उमा एकदम भानावर आली.
“हो,बोलाव की!”

“मी आलेच,विनीतला फोन करून येते.” सिद्धी खुष होऊन विनीतला फोन लावायला गेली.

सिद्धी तिच्या खोलीत गेल्यावर उमा बोलली, “अनिल,काय हे?बातमी चांगली आहे वगैरे! आपण त्या मुलाला अजून बघितलं सुद्धा नाहीय.”

“अग, तिला एकदम असं नाराज करणं योग्य नाही आणि सिद्धी उथळ नाहीय. कुठलाही निर्णय पूर्ण विचार करूनच घेते हे तुला माहिती आहे.”

“तरी पण!..” उमाला ते पटत नव्हतं.

“त्याला येऊ तर दे आपल्या घरी! मग पुढचं ठरवू! आज नाश्त्याला मस्त पोहे कर.”
अनिलने विषय बदलला.

सिद्धीने विनीतला फोन लावला. “विनीत,मी आई-पपांजवळ आपल्या दोघांबद्दल बोलले. पपांनी तुला संध्याकाळी भेटायला बोलावलं आहे.”

“माय गॉड सिद्धी! मला वाटलं थोडे दिवस छान एकमेकांबरोबर फिरू, एकमेकांचे स्वभाव जाणून घेऊ. तू डायरेक्ट लग्नापर्यंत पोहोचलीस.” विनीत हसत म्हणाला.

“विनीत,समजा माझ्या स्वभावात तुला काही त्रुटी दिसल्या किंवा मला तुझ्यात दिसल्या तर आपण नातं संपवणार आहोत का?”

“काय बोलतेस हे सिद्धी? आय लव्ह यु!”

“मग जसे आहोत तसेच एकमेकांना स्वीकारू आणि एकमेकांचे होऊ. मला ते चोरून भेटणं पटत नाही रे!” सिद्धी म्हणाली.

“अग चेष्टा केली,तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहे.पण लग्नानंतर टिपिकल बायको नको होऊस हं!” विनीत हसत म्हणाला

“आणि तू टीपीकल नवरा नको होऊ हं!” सिद्धी खळखळून हसली.

———

संध्याकाळी दारावरची बेल वाजली तशी सिद्धी धावतच दाराकडे गेली. विनीत आला होता. पांढरा शर्ट आणि जीन्स मधे विनीत अतिशय देखणा दिसत होता.

“ये ना आत! आई,पपा..विनीत आलाय.” सिद्धीचा चेहरा आनंदाने फुलला होता.

“सिध्दी,मार्व्हलस दिसते आहेस. साडीत तुला पहिल्यांदा बघतो आहे. आई आणि आबासाहेब ह्या सुनेला नाही म्हणणं शक्यच नाही.” विनीत तिला डोळ्यात साठवत म्हणाला.

“कौतुक पुरे.चल आत!”

विनीतचं देखणं रूप बघून अनिल आणि उमा हरखूनच गेले.

“काका,काकू,नमस्कार करतो. विनीतने दोघांनाही वाकून नमस्कार केला.

“औक्षवन्त व्हा!”अनिल म्हणाले.

“सिद्धी,विनीतना घर दाखव तोपर्यंत मी छान गरम उपमा करते. विनीत, तुम्हाला आवडतो ना उपमा?” उमाने विचारलं.

“काकू,मला एकेरी हाक मारा. संकोच वाटतो.”

“हरकत नाही!” अनिल विनीतच्या पाठीवर थोपटत म्हणाले.

“आई, आम्ही गॅलरीत बसतो,तू तिकडेच डिश आणि चहा घेऊन ये.” सिद्धीने विनीतला आत नेलं.

“पोरगा तर फारच देखणा आहे.”अनिल म्हणाले.

“नुसतं रुपडं काय कामाचं?आपल्या सिद्धीला सांभाळून घेणारा, सदैव साथ देणारा हवा.”उमा मनातलं बोलली.

“तुझं काहीतरीच! अग,अरेंज मॅरेज मधे तरी मुलगा कसा आहे हे कुठे माहिती असतं? सिद्धी निदान विनीतला ओळखते तरी!आणि हुशार तर तो आहेच.”

“तेही खरंच आहे. शेवटी संसार सुखाचा कसा होईल हे दोघांवरही अवलंबून असतं.” उमा डिशची तयारी करायला लागली.

सिद्धी आणि विनीत दोघेही गॅलरीत कितीतरी वेळ काही न बोलता दूरवर बघत उभे होते. विनीतने सिद्धीकडे नजर टाकली. त्या क्षणी त्याला ती सात जन्माची साथ देणारी सखी भासली. “सिद्धी,आज खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडणार असं वाटतंय,नवरा होतोय ना तुझा!” विनीत हसत म्हणाला.

” नवरोबा व्हायचा आहेस अजून!आई पपांचा ग्रीन सिग्नल यायचा आहे.” सिद्धी त्याला चिडवत म्हणाली.

“ते नकार देतील,असं वाटतंय तुला?”

“ते दोघेही होकार देतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि आता सिद्धी फक्त विनीतचीच! हा हात आता सात जन्म सुटणार नाही.” सिद्धीने विनीतचा हात हातात घेतला.

दोघांचेही डोळे प्रेमाची भाषा बोलत होते……
———-

घरी आल्यावर विनीतच्या डोक्यात विचार सुरू झाले. सिद्धीच्या आईवडिलांना मी आवडलो आहे असं त्यांच्या बोलण्यावरून तरी वाटलं. पण आबासाहेबांचं काय? ते देतील होकार? विनीतच्या मनाची चलबिचल सुरू झाली.तो झोपायला जाणार इतक्यात सिद्धीचा फोन आला.
“विनीत,आई-पपांना तू आवडला आहेस पण आता तू तुझ्या घरी पण लवकर बोलावसं अशी त्यांची इच्छा आहे. लग्न लांबणीवर नको असं त्यांना वाटतंय. माझी देखील तीच इच्छा आहे. तू तुझ्या आईवडिलांशी लवकरात लवकर याबाबतीत बोलावं. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन आपल्याला काय आनंद मिळणार?आईवडिलांचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात. तू टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं नीट! बाय,उद्या भेटू! गुड नाईट.”

सिद्धीने धीर दिल्यावर विनीतला एकदम रिलॅक्स वाटलं.त्याने कामेरीला फोन लावला. मालतीताईंनी फोन घेतला.

“हॅलो आई, कशी आहेस?”

“मी ठीक आहे रे राजा! इतक्या रात्री फोन केलास? तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना?कालच तर बोललो आपण!”

” मी मजेत आहे ग! आई,मी उद्या रजा घेऊन कामेरीला येतो आहे.”

“अरे वा,ये की मग! तुझ्या वाटेकडे मी डोळे लावूनच असते रे.”

“उद्या सकाळी निघतो. बारापर्यंत पोहोचतो.” विनीतने मोबाईल बंद केला. डोक्यात विचारांचं थैमान माजलं होतं. आता मी स्वतः कमावतो आहे तरी आबासाहेबांचा धाक अजून कमी होत नाहीय. त्यांचा विचार डोक्यात आला की अजूनही दडपण येतं. आबासाहेबांना सिद्धीच काय,शहरातली कुठलीच मुलगी पसंत पडणार नाही. त्यांचे विचार अजूनही तसेच जुनाट,बुरसटलेलेच आहे. त्यांना हे सगळं सांगणं म्हणजे एक प्रकारची परीक्षाच आहे.पण आज ना उद्या सांगणं भागच आहे. सिद्धीला मला गमवायचं नाही. नितांत प्रेम आहे माझं तिच्यावर!

——-

विनीत पहाटेच कामेरीला जायला निघाला. स्वतःची गाडी असून त्याने टॅक्सी बुक केली. डोक्यात विचार असताना ड्रायव्हिंग नकोच असं त्याला वाटलं.

कामेरीला वाड्याबाहेर गाडी थांबताच महादू लगबगीने बाहेर आला. “यावं छोटे मालक!किती दिसांनी येतासा.”

“अरे महादू,यावसं तर नेहमीच वाटतं पण सारखी रजा मिळत नाही.”

ड्रायव्हरला पैसे देऊन विनीत वाड्याच्या दाराशी आला. विनीत आत येणार इतक्यात मालतीताई तुकडा पाणी घेऊन आल्या.

“आई,दरवेळेस काय हे? मी असा किती लांबून येतो?” विनीत म्हणाला.

“असू दे रे,मी आपली जुन्या वळणाची! किती दिवसांनी आला आहेस.”

आत आल्या आल्या मीनाने त्याला चिडवलं, “यावं युवराज! कामेरीच्या भव्य वाड्याचे एकमेव वारसदार!”

“मीना,झालं का तुझं सुरू? कशी आहेस?” विनीत तिला जवळ घेत म्हणाला.

” मी मस्त दादू. तू कसा आहेस?आणि काय आणलंस माझ्यासाठी?ती पुणेरी बाकरवडी नको हं! खाऊन कंटाळा आलाय आता!”

“यावेळी जरा वेगळ्याच मिशनवर आलोय मीना! आबासाहेब कुठे आहेत?” विनीत हळूच तिच्या कानात कुजबुजला.

“आत खोलीत वाट बघताहेत तुझी!” मालतीताई म्हणाल्या.

विनीत हातपाय धुवून आबासाहेबांच्या खोलीत आला.
“आबासाहेब,नमस्कार करतो.”

“शतायुषी भव! कसं काय येणं केलं चिरंजीव,आमच्या खेडेगावात?” आबासाहेबांनी डोळ्यावरचा चष्मा काढत विचारलं.

आता दोन दिवस आबासाहेबांचं हे असं तिरकस बोलणं सहन करावं लागणार,त्याची तयारी विनीतने केलीच होती.
“सहजच आलो,रजा काढून!”

“बरं केलंत! जेवायला थांबलोय आम्ही! मीनाला तयारी करायला सांगा.

“हो,आबासाहेब!”

उद्या आबासाहेबांना काय आणि कसं सांगायचं याची विनीत मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागला…!

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}