★★सिद्धी”★★( भाग ४) सौ मधुर कुलकर्णी,

★★सिद्धी”★★( भाग ४)
जेवण झाल्यावर विनीतने मालतीताईंना त्याच्या खोलीत बोलावलं. “आई,माझी ही ट्रिप महत्वाच्या कामासाठी आहे.”
” कसलं महत्वाचं काम?”
“आई,माझ्याच कंपनीत काम करणारी सिद्धी गोडबोले मला आवडते. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे. सिद्धी अतिशय बुद्धिमान,संस्कारी मुलगी आहे. मी तिच्या आईवडिलांना देखील भेटून आलोय. खूप चांगली माणसं आहेत. त्यांना मी पसंत आहे. आता तुम्हा दोघांची परवानगी हवी आहे. ह्यासाठी मी मुद्दाम आलो आहे.” विनीतने सिद्धीचा फोटो दाखवला.
“गोड आहे रे मुलगी!पण विनीत तुम्ही सगळं परस्पर ठरवलंच आहे तर आमची परवानगी कशासाठी?” मालतीताईंनी फोटो परत बघितला.
“आई,तू पण आता आबासाहेबांसारखं तिरकस बोलू नको. तुमच्या परवानगीशिवाय आम्ही लग्न करणार नाही. सिद्धीनेच तसं ठरवलं आहे. लग्न म्हणजे दोन कुटुंब एकमेकांशी जोडली जातात,फक्त नवरा आणि बायको नाही,असं तिचं म्हणणं आहे.
“छान वाटलं रे तिचे विचार ऐकून! पण आबासाहेबांशी तुलाच बोलायला हवं. तुझं मन तिच्यावर जडलं आहे ना? मग मी तुझ्या पाठीशी आहे.”त्यांनी विनितचा हात हातात घेतला.
” लव्ह यु आई!” विनीतचा चेहरा खुलला.
“हं पुरे! हे वाक्य आता सिद्धीसाठी राखून ठेव. आराम कर आता दोन दिवस! छान झोप काढून घे. तिकडे तुमची कामाची वेळ कुठे नक्की असते?” मालतीताई हसत विनीतच्या गालावर थोपटत म्हणाल्या.
दुपारचा चहा झाल्यावर मालतीताई म्हणाल्या,”विनीत रात्रीची जेवण झाली की आबासाहेबांशी बोल.तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे.नाही पटलं तर लागेल असं बोलतील आणि त्याचा तुझ्या जेवणावर परिणाम होईल.”
“आई,त्यांना पटलं नाही तर ते बोलणारच! दडपण आलय ग पण सांगावं तर लागेलच ना!”
आबासाहेबांची पूजा झाली आणि ते वाड्याच्या चौकात तुळशीवृंदावनाजवळ येऊन बसले. तिथे खुर्ची घेऊन मग रोज तासभर ते पेपर वाचत असत.शेतीविषयी कामांची सगळी चौकशी करणे, शिवाय गावात त्यांच्या मालकीची दुकान होती,त्याचा हिशोब बघणे ही सगळी कामं त्यावेळी ते करत. वयोमानानुसार त्यांनी शेतावर जाणं कमी केलं होतं.दिवाणजी सगळा व्यवहार बघत.
विनीत त्यांच्याजवळ गेला.
“आबासाहेब, बोलायचं होतं.”
“बोला की!ती खुर्ची घ्या इकडे!”
“आबासाहेब,माझ्या कंपनीत सिद्धी गोडबोले नावाची मुलगी आहे. अतिशय हुशार आणि संस्कारी आहे.”
” मुद्द्याचं बोला!”आबासाहेब पेपरची घडी करत म्हणाले.
“मला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे. तुम्ही आणि आईने तिला एकदा भेटावं असं मला वाटतं, मगच आम्ही पुढे जाऊ.”विनीतला आता बराच धीर आला.
“चिरंजीव, प्रत्येक निर्णय तुम्ही घेता आणि नंतर आम्हाला सांगता. पुण्याला शिकायला जायचं,हे देखील तुम्ही आधीच ठरवलं होतं.आता लग्नाचा निर्णय पण घेतला आहे मग आमच्या परवानगीचा देखावा कशाला?”
“आबासाहेब,सिद्धीचीच तशी इच्छा आहे की आईवडिलांची परवानगी, त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण लग्न करायचं नाही.”
मालतीताई आणि मीना लांबूनच त्या दोघांचं बोलणं ऐकत होत्या.
“अहो,एकदा बघू तरी मुलगी कशी आहे.”मालतीताई अजिजीने म्हणाल्या.
“तुम्ही मधे नाही बोललात तर उत्तम!”,आबासाहेब धारदार आवाजात बोलले.
मीना आतल्याआत धुमसत होती. दादा मुलगा असून त्याची ही अवस्था! मी तर कैदेत असल्यासारखीच राहतेय. तिला संताप आवरेना. ती आत निघून गेली.
आबासाहेबांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, “पण आमची एक अट आहे. मुलीने व तिच्या आईवडिलांनी इथे येऊन आपला वाडा, आपली इभ्रत काय आहे हे प्रत्यक्ष बघावं.सणासुदीला मुलीला इथे यावं लागेल. इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. त्यांना आधी ही कल्पना दिलेली बरी! शहरातल्या मुलींना घरकामाची सवय नसते,त्यातून ही नोकरी करणारी! आमच्यापासून तुम्ही तसेही लांब गेलाच आहात, आता तुटू नये इतकीच इच्छा आहे.”आबासाहेब खुर्चीतून उठत म्हणाले.
“हो आबासाहेब,मी बोलतो तिच्या आईवडिलांशी!”
आबासाहेब खोलीकडे जायला वळले.मालतीताईंना उद्देशून म्हणाले,
“आमचं बोलणं कठोर असतं. तुम्हाला तिघांनाही आवडत नाही हे ठाऊक आहे,पण नाईलाज आहे.”
आबासाहेब खोलीत गेल्यावर विनीत म्हणाला, “कठीण आहे आई सगळं! मी आणि सिद्धी एकत्र येऊ की नाही अशीच शंका वाटतेय मला आता!”
“अजिबात शंका घेऊ नकोस. का कुणास ठाऊक,माझं मन मला सांगतंय, सिद्धीच ह्या वाड्याची सून होणार.”….
जेवण झाल्यावर मीनाने विनीतला विचारले, “दादा,झोपतो आहेस का लगेच?”
“नाही,का ग? जरा मेल चेक करतो. ये न माझ्या खोलीत!तुझ्याशी बोलणं झालंच नाहीय.”
“आलेच!आईला जरा मदत करून येते.”
खोलीत आल्यावर विनीतला आबासाहेबांचं बोलणं आठवलं.त्यांनी अट घातली होती पण सिद्धी इथलं वातावरण बघून नकार देईल का? आपल्या घरी सणवार देखील सगळेच असतात. ते नीट करणं ही पुढच्या पिढीची जबाबदारी असते. सिद्धी एकुलती एक!तिला सोवळं ओवळं याची सवय पण नसेल.विनीतला टेन्शन आलं.सिद्धी आपल्यापासून दुरावेल का काय अशी भीती वाटायला लागली.
इतक्यात मीना खोलीत आली.
” दादा,अरे किती दिवस हे सहन करायचं? आबासाहेबांच्या स्वभावात जराही बदल होत नाही.
वयोमानाप्रमाणे माणूस थोडा निवळतो पण ह्यांचा हेका कमीच होत नाही.”
” मीना,आता सबुरीनेच घ्यायला हवं,नाहीतर हाती काहीच लागणार नाही.ते जाऊ दे.तुझं कॉलेज कसं सुरू आहे?”
“कसं सुरू असणार?रोज शोफर ड्रीव्हन कारने कोल्हापूरला जाते. कॉलेज संपेपर्यंत ड्रायव्हर थांबतो.कॉलेज संपलं की परत कामेरी! रग्गड पैसा आहे म्हणून हे सगळं जमतंय.सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी अवस्था आहे माझी! तू सुटलास ह्या सगळ्यातून!”
“असं नको बोलूस.तुझी काळजी वाटते आबासाहेबांना!” विनीत म्हणाला.
“अरे,कळतंय ना मला! पण मलाही कधीतरी स्वच्छंदी वागावसं वाटतं. कॉलेजमधल्या मैत्रिणींकडे सुद्धा जायची सोय नाही. कॉलेजच्या गेट समोर गाडी उभीच असते.कधी कुठली फॅशन नाही. तू त्यांना समजावलं म्हणून निदान पुढचं शिक्षण तरी घेतेय.नाहीतर बारावी झाल्यावर ह्यांनी माझं लग्न करून टाकलं असतं.”
“मीना, मी समजू शकतो ग!तुझी फार घुसमट होतेय पण करू काहीच शकत नाही. तुला कोल्हापूरला शिकायला पाठवतात हेही नसे थोडके!” विनीतने सुस्कारा सोडला.
मालतीताई खोलीत आलेल्या बघून विनीतने विचारले, “आई,झोपली नाहीस का अजून?”
“विनीत,मला वाटतं तू दोन दिवस रजा वाढवून घे आणि सिद्धीला आणि तिच्या आईवडिलांना आत्ताच बोलावून घे.”
“ठीक आहे आई,सिद्धीला फोन करून विचारतो.”
“ओके दादा,गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स.”मीना डोळे मिचकावत म्हणली.
दुसऱ्या दिवशी विनीतने सिध्दीला फोन लावला.
“हाय! कशी आहेस सिद्धी?”
“वाट बघतेय तुझ्या फोनची! काय झालं विनीत तिकडे?सांग ना सविस्तर! काय म्हणाले आबासाहेब?”
“सिद्धी,आबासाहेबांशी मी बोललो. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही तिघांनी कामेरीला येऊन त्यांना आणि आईला भेटावं. आमचा वाडा बघावा. मी रजा वाढवून घेतो आहे. तुम्ही तिघे उद्या सकाळी निघू शकाल का?
“विनीत, मी बॉसना रजेबद्दल विचारते आणि आई-पपांशी पण बोलते. विल कॉल यु लेटर.”
——-
सिद्धीने अनिलना फोन लावला.
“पपा,विनीतचा फोन आला होता.आबासाहेबांनी आपल्या तिघांना कामेरीला बोलावलं आहे. काय ठरवायचं?”
“सिद्धी,आता तुम्ही दोघांनी निर्णय घेतला म्हटल्यावर पुढच्या गोष्टी आपसूक आल्याच ग!जायलाच हवं.”
“ओके पपा,मी तसं कळवते विनितला!”
सिद्धीने विनीतला फोन लावला. “विनीत,आम्ही उद्या सकाळी लवकर निघू म्हणजे तिकडून निघाल्यावर पुण्यात वेळेत पोहोचू.”
“गुड सिद्धी! तुला पत्ता एसएमएस करतो.”
सिद्धीने मोबाईल बंद केला. विनीतकडून तिने बरेचदा आबासाहेबांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल ऐकले होते. आईबद्दल मात्र तो फार हळवा आहे. पण आता त्या घरची मला सून व्हायचं आहे आणि सून ही दुसरी मुलगीच तर असते. जितकं प्रेम मी त्यांना देईन,तितकंच मलाही मिळेल.
ती उठली आणि बॉसना अर्ज द्यायला गेली.
सिध्दीला सलवार कमीजमधे बघून उमा म्हणाली, “सिद्धी,साडी नेस! त्यांच्या घरचं वातावरण जुन्या पद्धतीचं आहे,माहिती आहे ना तुला?”
“आई अग, प्रवासात साडी? तरी मी जीन्स टी शर्ट घातला नाही.”
“आता सवय करून घे सिद्धी! त्या घरच्या रिती तुला आता पाळायला हव्या. तू निवडलं ना विनीतला? मग त्याचे आईवडील नाराज होतील असं शक्यतोवर वागू नकोस.”
“हो हो,नेसते साडी! तू आता लेक्चर देऊ नकोस.”
सिद्धीला वाटलं,आपण निर्णय तर घेतलाय पण हे सगळं अवघडच वाटतंय. लहान गावातली माणसं देखील आता पुढारली आहेत.पण विनीतचे वडील जरा वेगळेच वाटतात.पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या मिशा असणारे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात असायचे तसे सासरे!सिध्दीला खुदकन हसू आलं…..
———
पुण्याहून साडेचार तासात सिद्धी,अनिल आणि उमा कामेरीला पोहोचले.ठरलेल्या ठिकाणी विनीत त्यांना घ्यायला आला.
गाडीतून उतरताच सिध्दीला भव्य वाडा दिसला. इतका भक्कम,चौसोपी वाडा बघून सिध्दीला कुतूहल वाटलं. ती प्रथमच इतका मोठा वाडा बघत होती. वाड्यात आत शिरायच्या आधी बाहेर पाणी ठेवलं होतं,तिथे पाय धुवून मगच आत जायचं. मालतीताई आणि मीना त्यांच्या स्वागताला उभ्याच होत्या. मालतीताईंनी पुढे होऊन उमाचे हात धरले आणि म्हणाल्या, ” या वहिनी,आम्ही वाटच बघतोय. सिद्धी फोटोत तुला बघितली होती, त्यापेक्षा देखणी आहेस ग!”
सिध्दीने त्यांना वाकून नमस्कार केला.
“आबासाहेब आत आहेत का?”अनिलने विचारलं.
“हो ते देखील वाट बघतच होते. विनीत पाहुण्यांना बैठकीच्या खोलीत घेऊन जा. मी पाणी आणते.”
मीना सिद्धीजवळ गेली. तिचा हात धरून म्हणाली, “का कुणास ठाऊक पण तूच माझी वहिनी व्हावं असं वाटतंय. तुझ्याकडे बघताच असं वाटलं की आपले खूप जुने ऋणानुबंध आहेत.”
सिद्धीने तिच्या हातावर थोपटलं आणि म्हणाली, “डोन्ट वरी! मीच तुझी वहिनी होणार.”
बैठकीच्या खोलीत आल्यावर सिद्धीने आबासाहेबांना वाकून नमस्कार केला.
“सुखी व्हा.” तिच्या डोक्यावर हात ठेवत आबासाहेब म्हणाले.
अनिलना हात जोडून नमस्कार करत आबासाहेब म्हणाले, “बसा ना!खरं तर मुलाकडली मंडळी मुलीला बघायला जातात पण आम्ही असा विचार केला,तुमच्या डोळ्याखालून हे सगळं गेलेलं बरं! हा वाडा, आमचं राहणीमान,आमचे विचार हे सगळं तुम्हाला दिसायला हवं. लग्नानंतर ही तक्रार नको की आम्हाला माहीतीच नव्हतं.”
“छे छे आबासाहेब!अहो असं काहीही झालं नसतं. पण त्या निमित्ताने तुमचा हा सुंदर वाडा बघता आला. नाहीतर हल्ली फक्त सिरिअल नाहीतर सिनेमात दिसतो.” अनिल हसून म्हणाले.
“अनिलराव,मुलांनी लग्न करायचं असं ठरवलंच आहे तर आता पुढचं बोलू. तुमच्या मुलीला ह्या घरातल्या रितीभाती पाळाव्या लागतील.सणवार सगळे करावे लागतील. घरात नोकर चाकर आहेत पण काही गोष्टी घरच्या स्त्रीलाच कराव्या लागतात. तुमच्या मुलीची ह्या सगळ्या गोष्टींना तयारी असेल तरच पुढचं बोलू.”
“माझी तयारी आहे आबासाहेब! मी एकदा स्वीकारलं की ते आपलं मानते. सवय नाही मला,पण शिकायचा नक्कीच प्रयत्न करेन.” सिद्धीने आबासाहेबांना उत्तर दिलं.
आबासाहेबांनी सिद्धीकडे बघितलं. मुलगी विचारांची पक्की, खंबीर दिसतेय. ह्या वाड्याला अशीच सून हवी. कणखर,वेळ पडल्यास सगळ्यांचा आधार होणारी!
“अनिलराव,आम्हाला सोनंनाणं काहीही नको. देवदयेने भरपूर आहे आमच्याकडे! तुमच्या इच्छेनुसार तिला हवं ते द्या.आमच्या मुलाला आणि आम्हाला सांभाळून घेणारी सून हवी.”
“त्याची काळजी नसावी आबासाहेब! सिद्धी माणसं जपणारी आहे.” अनिल म्हणाले.
“मी साखर आणते.तोंड गोड करूया. विनीत,पाहुण्यांना वाडा दाखव.”मालतीताई म्हणाल्या.
विनीत आणि सिद्धीने एकमेकांकडे बघितलं. दोघांचेही चेहरे आनंदाने फुलले होते.
विनीत आणि मीना सिद्धीला वाडा दाखवत होते इतक्यात महादू बागेतली गुलाबाची फुलं घेऊन आला.
” वहिनीसाहेब,ही तुमच्यासाठी आणली बगा! लई फुलं येतात रोज! आता ह्या घराची धाकली मालकीन येनार तवा ते झाड बी खुष झालं बघा.”
“धन्यवाद काका! आणि मला फक्त वहिनीच म्हणा.ते साहेब वगैरे नको. अहो,मी तुमच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान आहे.”सिद्धी फुलं हातात घेत म्हणली.
“अहो,ती वाड्याची पद्धत असती बगा!” महादू म्हणाला.
“ठीक आहे महादूकाका.”
“काका?अहो महादू म्हणा की!”
“वयाचा मान असतोच ना काका! तो द्यायलाच हवा. मी तुम्हाला काका म्हणूनच हाक मारेन.”
“देव तुमच्या पदरात सुखच सुख घालू दे वहिनीसाहेब.” महादू गहिवरून म्हणाला.
तो गेल्यावर सिद्धी विनीतला म्हणाली, “कसलं भारी वाटतं ना,वहिनीसाहेब!”
“चला वहिनीसाहेब,अजून अर्धाच वाडा बघून झालाय.” मीना हसत म्हणाली.
“सिद्धी,आबासाहेब जरा बोलायला कठोर आहेत.”
“विनीत, त्यांच्या वागण्या बोलण्यात कर्तृत्वाची झाक आहे. वडिलोपार्जित इस्टेट सांभाळणं,ती वाढवणं सोपी गोष्ट नाहीय. ते त्यांनी करून दाखवलंय. खरं सांगू का,मला ते फणसासारखे वाटतात. वरून काटेरी,पण आतून मऊ,गोड!”
सिद्धीचं हे बोलणं ऐकून विनीत अजूनच तिच्या प्रेमात पडला……
क्रमशः
सौ मधुर कुलकर्णी, पुणे