दुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

★★सिद्धी★★( भाग ६ ) ©®सौ मधुर कुलकर्णी

★★सिद्धी★★( भाग ६ )

शेतापाशी गाडी थांबली तशी सिद्धी जीपमधून उतरली. इतकं मोठं आवार बघून ती मुग्ध झाली. शेताची राखण करायला गणू नावाचा गडी होता. तो,त्याची बायको,आणि छोटी दोन मुलं तिथेच एका झोपडीत राहत होते. धाकटी मालकीण आली म्हटल्यावर लगबगीने गणू जीपजवळ आला. “या वहिनीसा, तुम्ही येनार हे ठाव नव्हतं. लई आनंद झाला बगा. ए पार्वती,धाकल्या मालकीनबाई आल्यात ग! चहा टाक.” तो धावतच झोपडीकडे गेला.

सिद्धीला हे सगळंच नवीन होतं. लग्न झाल्यापासून तिला जो मान मिळत होता,त्याने कधीतरी तिला लाजल्यासारखं होई. कधी सवयच नव्हती आणि असं कधी बघितलं पण नव्हतं.

“सुनबाई,बघितलं का आपलं शेत? इकडे ऊसच जास्त असतो पण भाजी देखील लावली आहे आपण शेतात!आपल्या घरी बरीचशी भाजी इथलीच येते.” आबासाहेब म्हणाले. त्यांनी गणूला हाक मारली,”गणू,ए गणू,अरे भरताची वांगी आहेत का ताजी?”

” जी मालक,आज सकाळीच काढली.” गणू उत्तरला.

“पार्वतीला सांग निघायच्या आधी तिच्या हातचं भरीत आणि भाकरी खाऊनच जाऊ. तोवर जरा सूनबाईंना शेत दाखवतो.”

“जी मालक,आत्ता सांगतो.”

आबासाहेब,विनीत आणि सिद्धी चालत चालत कितीतरी लांब आले. सिध्दी तिथली मोकळी हवा भरभरून श्वासात घेत होती.

“चला,माघारी फिरू.”आबासाहेब म्हणाले.

तिथे एक मोठं झाड होतं आणि त्याखाली पार होतं. सिध्दीला त्यावर बसण्याचा मोह आवरला नाही.

“आबासाहेब,मी इथे बसू थोडा वेळ शांत?” तिने विचारले.

“हो बसा की! हा पार मुद्दामच बांधून घेतला. शेतात काम करणारी माणसं दुपारची भाजी भाकरी इथेच खातात.तुम्ही दोघे या निवांत! मी पुढं होतो. विनीत,सूनबाईंना घेऊन ये.”आबासाहेब चालायला लागले.

“विनीत,किती छान,शांत वाटतं ना इथे! कुठलंही पोल्यूशन नाही.मला काय तो पुण्याचा शनिपार आणि नागनाथ पार फक्त माहिती आहे. आणि तिथेही पार असून निवांत कुठे बसता येतं?”ती डोळे मिटून त्या पारावर बसली.

“हो खरंय सिद्धी,पण आपण फार दिवस अशा वातावरणात राहू शकत नाही. आपल्याला शहरातल्या धावपळीची,ग्लॅमरची इतकी सवय झालीय की दोन दिवसांच्या वर आपण इथे राहू शकत नाही.”

इतक्यात मोबाईल वाजला म्हणून सिद्धीने बघितलं.फोन मीनाचा होता.
” वहिनी,आई काय सांगतेय हे मला, की तुम्ही निघताना इनामदारांचा फोन आला होता आणि आबासाहेबांनी त्यांच्या मुलासाठी माझं नाव सुचवलं?” मीनाचा आवाज थरथरत होता.

“मीना,शांत हो!फक्त बोलणं झालं आबासाहेबांचं!अजून पुढचं काहीच ठरलं नाहीय.”सिद्धीने तिला समजावलं.

“तुला माहित नाही वहिनी,त्यांच्या मनात येईल तेच ते करतात.अग मी ग्रॅज्युएट सुद्धा व्हायची आहे अजून!कोण तो मुलगा? मला नाही करायचं त्याच्याशी लग्न! तू सांग आबासाहेबांना!तुझं ऐकतील ते!”

“मीना रिलॅक्स! तुझ्या मर्जीविरुद्ध काहीही होणार नाही.घरी आल्यावर बोलू. चल ठेवते फोन! विनीत, मीनाला कळलंय सकाळच्या इनामदारांच्या फोनबद्दल!”सिद्धी पर्समधे मोबाईल ठेवत म्हणाली.

“तिचं चिडणं साहजिकच आहे. हे इनामदार आम्ही लहान असताना बरेचदा यायचे कामेरीला! इचलकरंजीचं बडं प्रस्थ आहे. त्यांचे देखील उसाचे मळे आहेत.” विनीत सिद्धीला म्हणाला.

“इतकी ओळख असेल तर आबासाहेब विचार करूनच बोलले असतील. किती मुलं आहेत त्यांना?”सिद्धीने विचारलं.

“दोन्ही मुलंच आहेत.आता लग्नाचा कुठला आहे हे मला ठाऊक नाही.चल निघुया,आबासाहेब वाट बघतील.”

सिद्धी पारावरून उतरली आणि शेतातल्या बायका,त्यांची लहान पोरं तिच्याभोवती गोळा झाली.लहान मुलं शेतावर असणार म्हणून तिने घरून निघतानाच सुकामेव्याची पाकिटं करून आणली होती.त्या सगळ्या मुलांना तिने एक एक पाकीट दिलं.

पार्वतीने भाकरी,भरीत तयार ठेवलं होतं.ते तिखट भरीत खाताना सिद्धीच्या डोळ्यातून,नाकातून पाणी येत होतं. पण ती आवडीने खात होती. विनीतला तिच्याकडे बघून हसू आवरेना.

निघताना पार्वतीने सिद्धीची नारळाने ओटी भरली.आणि स्वतः विणलेला क्रोशीयाचा टेबलक्लॉथ दिला आणि म्हणाली,
“धाकल्या वहिनीसा, आधी ठाव असतं तर साधीसुधी का असेना,ओटीत साडी घातली असती. पर तुम्ही अचानकच आला.”

“तुम्ही जे मला दिलंय ते माझ्यासाठी अनमोल आहे.मी हे जपून वापरणार.मायेची ऊब आहे ह्यात.”
सिद्धीने पार्वतीचा हात हातात घेतला आणि हातावर एक पाकीट ठेवलं. “ही धाकट्या बहिणीची भेट समजा. नाही म्हणू नका.अहो,तुम्ही सगळे आमचं शेत राखताय म्हणून आबासाहेब आणि आई निर्धास्त आहेत तिकडे आणि हा मुलांसाठी खाऊ.” तिने सुकामेव्याची पाकिटं पार्वतीच्या हातावर ठेवली.

“मालक,नशीब काढलं बगा तुम्ही! अहो अशी सोन्यासारखी सून मिळालीय.” गणू आबासाहेबांना म्हणाला.

आबासाहेब हसले,”गणू, आता निघतो आम्ही! पुढच्या वेळेस मालतीला घेऊन येतो. तिला पार्वतीला आणि मुलांना भेटायचं आहे.

“जी मालक! ”

जीपने वेग घेतला आणि पार्वतीच्या हाताची बोटं कानाजवळ गेली, सिद्धीची दृष्ट काढायला….!

——–

मालतीताई सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होत्या,इतक्यात सिद्धी स्वयंपाकघरात आली. नुकतीच न्हाऊन आलेली सिद्धी मोगऱ्याच्या फुलासारखी सतेज दिसत होती.नववधुची तृप्ती,समाधान चेहऱ्यावर दिसत होतं.

“सिद्धी,एक विचारू का ग तुला?” मालतीताईंनी सिध्दीकडे बघितलं.

“विचारा ना आई,त्यात काय!”

“अग, नवपरिणीत जोडपं लग्नानंतर कुठेतरी फिरायला जातं आणि तुम्ही दोघेही इथेच!”

“आई,मला तुमचा,आबासाहेबांचा,मीनाचा सहवास हवा होता. तुम्ही काही इतक्यात कामेरी सोडणार नाही. आपण कधी इतकं एकत्र राहणार?आम्ही ह्यापुढे आलो तरी चार दिवसांच्या वर कुठे राहणार?नोकरीत बैलासारखं स्वतःला जुंपणार आणि पुण्यात तर आम्ही दोघेच असणार आहोत. कशाला हवाय हनीमून?” सिद्धी हसली.

सिद्धीचा समजूतदारपणा मालतीताईंना चकित करून गेला. असंच प्रेम,जिव्हाळा राहू दे रे देवा आमच्यात!त्यांनी मनात हात जोडले.

“आई,आज काय केलंस ग नाश्त्याला?” विनीत आत येत म्हणाला.

“भाजणीचं थालीपीठ आणि लोणी,तुझा आवडता मेनू!”

“आई,इनामदारांचा नंतर काही फोन आला होता का?”विनीतने विचारलं.

“माझ्यासमोर तरी काही आला नाही. ह्यांच्याशी मोबाईलवर बोलणं झालं असावं.” मालतीताईंनी सगळ्यांच्या डिशेस भरायला घेतल्या.

“आई,मला ते काका,काकू,त्यांची दोन मुलं आठवताहेत.पण आम्ही मोठे झाल्यावर त्यांचं येणं कमी झालं आपल्याकडे! अर्थात,आबासाहेबांशी संपर्क असेलच. सिद्धी,मीनाशी बोललीस का तू?” विनीतने सिद्धीला विचारलं.

“आबासाहेबांशी बोलते मी आज! तिचं अजून शिक्षण पण व्हायचं आहे. इतकी घाई कशासाठी?” सिद्धी म्हणाली.

“आय होप, तुझं ऐकून घेतील ते! मी ह्यावर काहीही बोलणार नाही कारण आमचे दोघांचे वाद होतील. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते कुणाचंही ऐकून घेत नाहीत.तुला पसंत केलं,आपलं लग्न झालं,नशीब माझं!” विनीत चिडलाच होता.

“विनीत,वडील आहेत ते तुझे!आहे थोडे हेकेखोर, तापट! पण तुम्हा मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही त्यांनी!”,मालतीताई विनीतवर नाराज झाल्या.

“अरे काय तुम्ही दोघे!अजून कशाचा काही पत्ता नाही आणि उगाच अपसेट होताय. विनीत,तो विषय बंद कर. हे घे थालीपीठ.” सिद्धीने त्याच्या हातात डिश दिली.

दुपारी मीना कॉलेजमधून आली आणि तिने सिद्धीला तिच्या खोलीत बोलावलं.
“काय ग मीना? कशासाठी बोलावलं मला?” सिद्धीने विचारलं.

“वहिनी,तुला माहितीय मी का बोलावलं ते! मला नाही करायचं ग इतक्यात लग्न!मला लॉ करायचं आहे,प्रॅक्टिस करायची आहे. कामेरीपासून दूर जायचं आहे. गुदमरल्यासारखं होत मला हल्ली! लहान होती तोपर्यंत विशेष काही वाटत नव्हतं पण आता ह्या वयात इतकी बंधनं, कोंडमारा नको वाटतो ग!” मीनाच्या डोळ्यात पाणी आलं.

“मीना,खरं सांग,तू कुठे गुंतली नाहीस ना? तसं असेल तर स्पष्टच सांग. अग,आबासाहेबांनी आम्हाला परवानगी दिली तशी तुलाही देतीलच.”

“माझी काय हिम्मत वहिनी,कुणामधे गुंतण्याची! जे अशक्य आहे त्या वाटेवर मी कधी जायचा विचारही केला नाही. पण मला इतक्यात लग्न करायचं नाही.आबासाहेबांना सुनेने नोकरी केलेली चालते आणि मुलीला सगळी बंधनं!”मीना चिडून बोलली.

सिद्धीने एकदम मीनाकडे बघितलं. खरंच तिचं काय चुकलं होतं?माझ्या बाबतीत आबासाहेब खूप मवाळ आहेत हे तिने ह्या आठ दिवसात बघितलं होतं. तिचा राग अगदी रास्त होता.

“मीना,मी बोलते आबासाहेबांशी,ओके? आता शांत हो आणि फार विचार करू नकोस.”

रात्री जेवण झाल्यावर सिद्धीने भीतभीतच विषय काढला.
“आबासाहेब,मीनाला पुढे शिकायची इच्छा आहे.तिला इतक्यात लग्न करायचं नाही म्हणतेय ती!”

“मीनाची वकिली तुम्ही करायची गरज नाही सुनबाई! तुमच्या बाबतीत आम्ही मऊ धोरण ठेवलं,ह्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आम्हाला शिकवावं.” आबासाहेब जरबेने बोलले.

“आबासाहेब,पण माझं ऐकून..”
मालतीताईंनी सिद्धीचा हात दाबला आणि तिला गप्प राहण्याची खूण केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आबासाहेबांनी सांगितलं,
“आज दुपारी चार वाजता इनामदार साहेब,वहिनी आणि त्यांचे धाकटे चिरंजीव येताहेत.पाहुणचार चांगला करा. मुलगा योग्य वाटला तर पुढच्या गोष्टी आम्ही ठरवणार आहोत.मीनाचं कॉलेजचं शेवटलं वर्ष लग्नानंतर त्या पूर्ण करू शकतात.मुलगा कोल्हापुरातच असतो.ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्यांना पैशाची कसलीही कमतरता नाही पण आपल्या चिरंजीवांसारखं शेतीत रस नाही. ती एजन्सी नावापुरती आहे. गडगंज इस्टेट आहे त्यांची! आज भेटालच त्यांना!पण उगाच खोट काढायची ह्या दृष्टीने त्या मुलाकडे बघू नका.घराणं चांगलं आहे. मीना सुखात राहिल.” आबासाहेब जरा रागातच होते.सिद्धी जे बोलली ते त्यांना आवडलं नव्हतं.

आबासाहेब त्यांच्या खोलीत गेल्यावर मीना हमसून रडायला लागली. सिद्धीला कळेना तिला कसं आवरावं.

“मीना,अग नको रडूस. लग्नानंतर शिक ना!चांगलं स्थळ हातचं जायला नको म्हणून हे म्हणताहेत ग,आधी रडणं थांबव बघू. ” मालतीताई मीनाला थोपटत म्हणाल्या.

मीनाने त्यांचा हात जोरात झिडकारला आणि धावतच तिच्या खोलीत जाऊन दार लावून घेतलं.

हे सगळं बघून सिध्दीला धडधडायला लागलं,आता पुढे काय होणार? घरात इतका तणाव वाढला होता.

मोबाईलची रिंग वाजली म्हणून सिद्धीने फोन घेतला.उमाचा फोन होता.
“सिद्धी,कशी आहेस बेटा?लग्नानंतर मुद्दामच लगेच फोन केला नाही.आणि तू देखील चांगलीच रमलेली दिसतेय सासरी! तुझाही काही फोन नाही.”उमा हसत बोलली.

आईचा आवाज ऐकून सिद्धीचा गळा दाटून आला.तिच्या चेहऱ्यावरचा कामेरीकरांच्या सुनेचा मुखवटा एकदम गळून पडला आणि ती आई,पपांची लाडकी सिद्धी होऊन फोनवर बोलायला लागली…..

——–

आईशी फोनवर मनसोक्त बोलल्यावर सिद्धीच्या मनावरचा ताण जरा हलका झाला. ती मीनाच्या खोलीत गेली. तिची समजूत काढायला हवी होती. आज इनामदार येणार म्हटल्यावर,निदान त्यांच्यासमोर तरी मीनाने नॉर्मल रहायला हवं. पुढचं पुढे!
मीना नोट्स काढत होती.सिद्धीने दारावर टकटक केलं.

“ये ना वहिनी,तुला कशाला परमिशन हवी? आणि तू कशासाठी आलीस ते देखील मला माहितीय.मी कुठलाही विरोध करणार नाही.आबासाहेब जे म्हणतील तसंच करेन.” मीना नोट्स काढतच बोलली.

तिचे ते कोरडे शब्द ऐकून सिद्धीला कसंतरीच झालं. तिला सकाळच्या प्रसंगावरून जाणवलं की आबासाहेबांपुढे शरणागती पत्करण्याशिवाय निदान ह्या घडीला तरी पर्याय नव्हता.

“मीना,अग फक्त बघायला येणार आहेत.अजून लग्न ठरायचं आहे. तू पण उगाच टेन्शन घेतेस.” सिद्धीने जरा वातावरण बदलायचा प्रयत्न केला.

“वहिनी,मी सांगितलं ना,आबासाहेब जे म्हणतील ते! घरात तू नवी नवरी असताना मला कुठलाही वादंग नको. आईलादेखील आबासाहेबांचंच बरोबर वाटतंय,दादाला ह्या विषयात काही बोलायचं नाही,आणि तू नवीन आलेली मुलगी! तुझ्या मताला आबासाहेबांच्या लेखी महत्व नाही आणि मी तर काय!..मला काहीच कळत नाही. त्यामुळे ह्यावर आता नकोच बोलायला.मी चार वाजता तयार राहते.”

मीनाने विषयच संपवला त्यामुळे सिद्धीचा नाईलाज झाला. ती खोलीच्या बाहेर जायला निघाली. इतक्यात मीना येऊन तिच्या गळ्यात पडली,तिने आलेला हुंदका दाबला आणि म्हणाली, “वहिनी,प्लिज डोन्ट मिसअंडरस्टँड मी! मला समजून घेणारी फक्त तूच आहेस.”

“मीना,एव्हरी थिंग विल बी ऑल राईट!ते लोकं येऊन जाऊ देत,मग बोलू.” सिद्धी तिला थोपटत म्हणाली.

संध्याकाळी चार वाजता इनामदार कुटुंब आलं.माधव इनामदार,सौ रजनी इनामदार आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन इनामदार. रजनीताईंच्या अंगावरचे ते भरमसाठ दागिने बघून सिद्धीच्या मनात आलं,आई आणि आबासाहेब कित्ती साधे आहेत. कधीही श्रीमंतीचे प्रदर्शन करत नाहीत. तिने मुलाकडे बघितलं. दिसायला चांगला होता पण डोळे खरे वाटत नव्हते.त्यात प्रामाणिकपणा दिसत नव्हता.काहीतरी लपवतोय असे वाटत होते.”

” या या इनामदारसाहेब,बसा.”
हा विनीत,तुम्ही बऱ्याच दिवसांनी बघताय आणि ह्या आमच्या सुनबाई!”
सिद्धीने दोघांना वाकून नमस्कार केला. विनीत त्या मुलाला शेकहॅन्ड करायला गेला तर तो उठून उभा सुद्धा राहिला नाही.बसल्या बसल्या शेकहॅन्ड केलं.
सिद्धी मनात चिडलीच,”मॅनरलेस!”

“सिद्धी,काही बोललीस का तू?” विनीतने विचारलं.

“कुठे काय? काहीच नाही.मी चहाचं बघते.” सिद्धी आत गेली.

सिद्धी आणि मालतीताई स्वयंपाकघरात आल्या. मीना तिथेच बसली होती.

“मीना,मुलगा दिसायला छानच आहे ग!” सिद्धीने तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न केला.

“मीना,हा ट्रे घेऊन तू आणि सिद्धी बाहेर जा.मी चहा ठेवते.” मालतीताईंनी ट्रे मीनाच्या हातात दिला.

“नको आई,तुम्हीच तिला घेऊन जा. मी चहा करते आणि विनितला जरा आत पाठवा.” सिद्धीने चहासाठी फ्रिजमधलं आलं काढलं.

“सिद्धी,काय ग?आई म्हणाली तू बोलावलं आहे ” विनीत आत आला.

“कसा वाटला मुलगा विनीत?” सिद्धीने विचारलं

“चांगला आहे. गुड लुकिंग!”

“मला तो खरा नाही वाटत!त्याचे डोळे बघितले का तू?काहीतरी लपवतोय असं वाटतं.”

“सिद्धी,धिस इज टू मच! डोळ्यांवरून काय कळतं?”

“कळतं ना!तुझ्या डोळ्यावरूनच तर मला कळलं तू सच्चा आहेस,संस्कारी आहेस.”

“आणि काय कळलं?” सिद्धीच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या डोळ्यात बघत विनीत म्हणाला.

“चिरंजीव,आपण स्वयंपाकघरात आहात, लक्षात आहे ना?” सिद्धी त्याचे हात बाजूला करत म्हणाली.

“सिद्धी,पण ह्या मुलाला नाही म्हणण्यासारखं काही नाहीच ग!आणि मीनाला शोभून दिसेल.”

“मीनाला आवडला तर काही प्रश्नच नाही.पण ती कालपासून अबोल झालीय.आबासाहेब जे म्हणतील ते,असं म्हणाली मला!”

“सिद्धी,झाला का ग चहा?” मालतीताईंनी बाहेरून हाक मारली.

” हो आई,आलेच चहा घेऊन!”

“माधवराव,सुनबाई नोकरी करतात आमच्या!पुण्यात मोठया कंपनीत काम करतात. मीनाला पण पुढे शिकायची इच्छा आहे. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे. कोल्हापूरच्या कॉलेजमधेच तिने प्रवेश घेतला आहे.या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आम्हाला निर्णय कळवावा.”आबासाहेबांनी इनामदारांना स्पष्ट सांगितलं.

यथोचित बोलणी झाल्यावर इनामदार कुटुंब निर्णय कळवतो असं सांगून गेले.

दोन दिवसांनी इनामदारांचा मीना पसंत आहे म्हणून फोन आला आणि पुढची बोलणी करायला इचलकरंजीला बोलावलं.

आबासाहेबांनी मीनाला बोलावलं.
“मीना,त्यांना तू पसंत आहेस. तुझा निर्णय सांग. मुलगा देखणा आहे,श्रीमंत आहे,इचलकरंजीत मान आहे. तुला पुढे शिकण्याची परवानगी सुध्दा आहे. असं स्थळ शोधूनही सापडणार नाही.”

“आबासाहेब,तुम्ही म्हणाल तसं!”मीना खाली मान घालून बोलली.

“ठीक आहे, तसं त्यांना कळवतो.”

सिद्धीने मीनाला बागेत बोलावलं.
“काय ग वहिनी?इकडे का बोलावलं?’

“मीना,अग तुला नाही म्हणायचा चान्स होता,का होकार दिलास? तुझी इच्छा नसताना?” सिद्धीने विचारलं.

“कुठल्या कारणासाठी नकार देणार होती वहिनी?त्यांनी मला पुढे शिकायची इच्छा आहे ही अट सुद्धा मान्य केली.”

“तुझी मनातून इच्छा नसताना ही जबरदस्ती झाली ग!”

“व्यक्तिस्वातंत्र्य आणि ते देखील एका बाईला, कामेरीकरांच्या घरात नसतं. अपवाद फक्त तू आहेस.”
मीना इतकं बोलून आत निघून गेली.

सिद्धी उदास झाली.नकळत का होईना,मीनाने तिला टोमणा मारला होता. हे काय झालं?ह्या सगळ्यांची मन जिंकण्यासाठी मी इथे राहिले आणि मीनाच्या मनात माझ्याबद्दल अढी? छे छे,असं व्हायला नको. आता आम्हाला पुण्यात परत जायला चार दिवस उरलेत.जायच्या आधी मीनाशी बोलायला हवं.

मीनासाठी लावलेल्या चमेलीच्या वेलावरून सिद्धीने मायेने हात फिरवला……

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}