मंथन (विचार)मनोरंजन
★★प्रीत तुझी माझी★★ सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★प्रीत तुझी माझी★★
कालिंदीने लॅच उघडलं आणि हुश्श म्हणत सोफ्यावर बसली. बाहेर वैशाख वणवा पेटला होता. कोणीतरी हातात गार पन्ह आणून द्यावं असं तिला वाटलं. पण कसलं काय! आपल्या नशिबी हे सुख नाही हे तिला माहिती होतं. आपला नवरा ए सी मध्ये डाराडूर झोपला असेल हे तिला चांगलंच ठाऊक होतं. जरा वेळाने ती उठून फ्रीजकडे जायला निघाली तर गेस्टरूममध्ये तिला कसलीतरी कुजबुज ऐकू आली. तिने दरवाजा ठोठावला.अरुणने दार उघडलं.
“ओह! कालिंदी,लवकर आलीस?”
कालिंदीला बघून तो चपापला.
“का? मी व्यत्यय आणला का?” कालिंदी डोळे वटारून बोलली.
“छे ग! तुझी ओळख करून देतो. हे आपल्या भागातले नगरसेवक पंचपात्रे.”
मग काय ह्यांना आता पंचारतीने ओवाळू अशी अपेक्षा आहे का काय माझ्या नवऱ्याची? कालिंदी मनात धुसफूसली.
“ह्यांना कोण ओळखत नाही? सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि शिवाय नगरसेवक!” कालिंदी पंचपात्रेकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली.
“ते जरा पाण्याच्या पाईप लाईनचं बघा की हो नगरसेवक! त्यासाठी ह्यांनी तुम्हाला बोलावलं का?”
“कालिंदी, काहीतरीच काय बोलते. असल्या कामासाठी आपण त्यांना भेटायचं असतं.” अरुण कसंनुसं हसत म्हणाला.
“अहो ताई,तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं भाग्य फळफळलं म्हणून समजा.” पंचपात्रे मिशी पिळत म्हणला.
“काय सांगताय? चोवीस तास पाणी येणार आमच्या घरी?”
“कालिंदी, जरा ऐकून घे. ते मला भेटायला आले आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटात भूमिका देणार आहेत.” अरुण खुशीत म्हणाला.
“काय हो नगरसेवक, वृद्धाश्रमातल्या म्हाताऱ्याच्या रोल आहे का?” कालिंदी चेष्टेने म्हणाली.
अरुणने रागाने कालिंदीकडे बघितलं. “चॅलेंजिंग रोल आहे माझा!”
“काय सांगता? कसला रोल आहे?तिरसट सासरा म्हणून घेणार का काय तुम्हाला सिनेमात?” कालिंदी अरुणला चिडवत म्हणाली.
“ताई,जरा दमानं घ्या. अहो साठीतल्या हिरोचा रोल घेऊन आलोय दादांसाठी. ‘प्रीत तुझी माझी’ चित्रपटाचं नाव आहे. मी सिनेमाचा निर्माता आहे. काकांना रातोरात कसा फेमस करतो बघाच तुम्ही!” पंचपात्रे परत मिशीला पीळ देत बोलला.
“खरं की काय?पण मानधन किती देणार काकांना?”
“ताई,मानधनाचं काय घेऊन बसलात! सिनेमा सॉलीड चालणार. मग तुमच्या दाराशी मर्सिडीज येते की नाही बघाच!
कालिंदी काहीवेळ खरंच स्वप्नात रमली. दाराशी मर्सिडीज, हाताशी नोकर, मोठ्ठा फ्लॅट!
“ताई,येतो! काकांना महिनाभर व्यायाम करून वजन कमी करावं लागेल,कारण रोलची डिमांड आहे. त्यानंतर शूटिंग सुरू होईल.”
पंचपात्रे गेला आणि कालिंदीचा प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
“सांगितलं कोणी तुम्हाला नसते उद्योग करायला? आता कितीही वजन कमी केलं तरी तुम्ही तरुण दिसणार आहात का? ती पोटाची घेरी आणि डोक्याचा चंद्र बघा. त्याचं काय करणार आहात?”
आपलेल्या वाढलेल्या ढेरीवरून हात फिरवत अरुण म्हणाला,”पंधरा दिवसात कमी करतो की नाही ते बघच! आणि डोक्यावर विग घालणार आहे.”
“म्हणजे ओढून ताणून आणलेलं सोंग! आणि तुम्हाला रोलचे किती पैसे देणार आहे तो?” कालिंदी जरा चिडलीच.
सांगावं का नाही करत शेवटी अरुण घाबरतच बोलला,”त्याने माझ्याकडून पाच लाख घेतले आहेत. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर पंचवीस लाख देणार.”
“हाय रे देवा! कर्म माझं! अहो,कुठलातरी निर्माता असा कलाकारांकडून पैसे घेतो का? फार फार तर नवीन माणसांना मानधन देणार नाही. आणि पंचवीस लाख द्यायला तुम्ही काय नावाजलेले कलाकार आहात का? मूर्खांचा बाजार सगळा!”
“कालिंदी, आपल्या नवऱ्याला प्रोत्साहन द्यायचं सोडून हे काय बोलते आहेस?”
“डोंबल प्रोत्साहन!” कालिंदी रागातच तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवसापासून अरुणचा व्यायाम सुरू झाला. रोज आठ वाजता उठणारा अरुण पहाटे पाच वाजता उठला. अलार्म वाजताच कालिंदी वैतागली,” काय मेली कटकट!” ती पांघरूण ओढून परत घोरायला लागली. तिचं ते घोरणं ऐकून अरुणला वाटलं,परत अंथरुणात जाऊन मस्त झोपावं पण त्याला डोळ्यांसमोर पंचवीस लाख दिसायला लागले आणि त्याने मोह आवरला.
पार्कमध्ये गेल्यावर अरुणला अगदी ताजेतवाने वाटायला लागले. त्याने जॉगिंग करायला सुरुवात केली. दोन राऊंड झाले आणि त्याला धाप लागली. दमून तो बाकड्यावर बसला इतक्यात एक सुंदर तरुणी त्याच्याजवळ आली,”आजोबा,ठीक आहात ना? आता ह्या वयात जॉगिंग नाही करायचं. फक्त वॉक घ्यायचा.”
अरुणने टकलावरून हात फिरवला. त्याला वाटलं खरंच आपलं वय झालंय, हे कसलं खूळ घेऊन बसलोय मी! पण दुसऱ्याच क्षणी डोळ्यासमोर नोटांच्या गड्ड्या आल्या आणि तो ताडकन उठला आणि त्या मुलीला म्हणाला,” छे छे,मी दमलो अजिबात नाही. आज हवा खूप कुंद आहे ना, म्हणून थोडा घाम आला. मला काका म्हणून हाक मारलीस तरी चालेल.”
“काका,माझं नाव प्रीती साने. मी योगासनाचे क्लासेस घेते. समोरच ‘दीप’ नावाची बिल्डिंग आहे तिथे दुसऱ्या मजल्यावर मी राहते. मी ज्येष्ठ नागरिकांना पण योगासने शिकवते. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर उद्या सकाळी आठ वाजता या.”
अरुणने हळूच तिला निरखून बघितलं. गुलाबी गोरा रंग,कमनीय बांधा, ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या!जावं का हिच्या क्लासला? मला तरुण झाल्यासारखे वाटेल आणि माझ्या रोलची ती डिमांड आहे.
“ठीक आहे,उद्या मी येतो.” अरुण म्हणाला.
घरी परत आल्यावर दारात पाऊल ठेवल्याबरोबर अरुणला कांदेपोह्यांचा सुगंध आला. त्याने कसेबसे हातपाय धुतले. पोह्यांवर यथेच्छ ताव मारला आणि त्याला प्रचंड गुंगी आली. पोहे संपवून तो बेडरूममध्ये जाऊन झोपला.
कालिंदीने कपाळावर हात मारला.
दुसऱ्या दिवशी अलार्म वाजल्यावर कालिंदी चिडली,”एकतर वयामुळे रात्री मेली लवकर झोप लागत नाही,त्यात तुमचा हा अलार्म! आजपासून मी दुसऱ्या बेडरूममध्ये झोपणार.” कालिंदीने पांघरूण घेतलं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन धाडकन दार लावून घेतलं.
सिनेमा पूर्ण होईपर्यंत कालिंदीचा हा राग आपल्याला सहन करणं भाग आहे हे अरुणला कळून चुकलं. आत्ता चिडतेय माझ्यावर,पण पैसे आले की मग गोड गोड बोलेल. अरुण तयार होऊन बाहेर पडणार इतक्यात त्याला आठवलं आज प्रीतीला भेटायचं आहे. त्याने भरपूर परफ्युम अंगावर शिपडलं
आणि बाहेर पडला. पार्कमध्ये जरा वेळ चालून त्याने प्रीतीचं घर शोधलं. लिफ्टने न जाता जिन्याने चढू लागला. दोनच जिने चढून त्याला इतकी धाप लागली की बेल वाजवल्यावर प्रीतीने दार उघडल्यावर त्याला बोलताच येईना.
“काका,आत या ना! तुम्हाला चांगलाच दम लागलाय. लिफ्टने यायचं की!
अरुण मनातच हसला.. ढेरी कमी करायची आहे ना! मला स्लिम का व्हायचंय त्याचं खरं कारण प्रीतीला सांगावं का? सांगूनच टाकतो. म्हणजे ती मला पंधरा दिवसात बारीक करेल.
“काका, तुम्ही योगा मॅट आणलीय का?”
“नाही.”
“ठीक आहे,आज मी तुम्हाला देते. उद्या घेऊन या.”
“प्रीती..” अरुण चुळबूळ करत म्हणाला.
“बोला की काका!”
“मला एका मराठी सिनेमात काम मिळालं आहे. चार पाच वयस्कर मित्रांना एका तरुण मुलीचं आकर्षण वाटतं. आणि मग तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी त्यांच्यात चांगलं दिसण्याची,चांगलं राहण्याची चढाओढ सुरू होते. तू ‘शौकीन’ चित्रपट बघितला आहेस का? जवळपास तशीच कथा!”
“कुठला ‘शौकीन’? मी नाव पण पहिल्यांदा ऐकतेय. काका, तो तुमच्या तरुण वयातला सिनेमा आहे.”
प्रीती असं बोलल्यावर अरुण खजील झाला. लगेच सावरून म्हणाला,”मला पंधरा दिवसात बारीक कर. शूटिंग सुरू व्हायच्या आधी! माझं पोट पूर्ण आत जायला हवं.”
“अभिनंदन काका,पण त्यासाठी योगासनांबरोबर योग्य आहाराची पण गरज असते. मी आज तुम्हाला डाएट लिहून देते.”
योगासने करून अरुण घरी जायला निघाला. प्रीतीने काय डाएट सांगितलंय हे बघण्यासाठी त्याने सहज कागद बघितला आणि त्याला गरगरायला लागलं. दिवसातून फक्त दोन भाकरी आणि ती पण अगदी लहान! बाकी पूर्ण दिवस फळं, ज्यूस,नारळ पाणी, कच्च्या भाज्यांची सॅलड हेच लिहिलं होतं. एका वेळी दोन मोठ्या भाकरी किंवा चार फुलके खाणाऱ्या अरुणसाठी ही उपासमारच होती. पण नाही,आता करूनच दाखवायचं असं त्याने ठरवलं. सगळ्या भाज्या,फळं, शहाळी घेऊन तो घरी आला. आज थालिपीठाचा सुगंध येत होता. क्षणभर अरुण डाएट विसरला. भाजीची पिशवी खाली टाकली आणि किचनमध्ये आला. कालिंदी थालिपीठावर लोण्याचा गोळा घेऊन लसणाच्या चटणीबरोबर खात होती. “आलात? देऊ का तुम्हाला डिश?” कालिंदीने विचारलं.
अरुण भानावर आला,”छे,आजपासून माझं डाएट आहे. आता मी फक्त नारळपाणी पिणार. जेवणात आजपासून माझी दोन्ही वेळ फक्त एक भाकरी!”
“बाई बाई,चांगलंच मनावर घेतलंय हो भूमिकेचं! आता हे दुसरं थालीपीठ मी संपवून टाकते. जेवणात आज फक्त चायनिज फ्राईड राईस करते.”
अरुणचा संताप संताप झाला. मला डिवचण्यासाठी ही मुद्दाम करतेय पण मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही.
अरुणचं जॉगिंग,योगासने आणि डाएट ह्याचा शरीरावर खरंच परिणाम झाला आणि तो बारीक,फिट दिसू लागला. सिनेमाच्या शूटिंगला सुरवात झाली. महिनाभर तर अरुण नुसताच सेटवर जाऊन बसायचा. त्याच्यासारखे अजून चार म्हातारे होते. पाचही जण रोज आपला सीन येईल म्हणून वाट बघत बसायचे. हिरॉईन प्राजक्ता आणि हिरो सुमंत, दोघेही फारच देखणे होते. इतक्या देखण्या मुलीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार म्हणून अरुणला मनातून गुदगुल्या होत होत्या.
अखेर तो दिवस आला. अरुणचा आणि प्राजक्ताचा सीन घेणार होते. अरुणने आपल्या चेहऱ्याला शोभेल असा विग आणलाच होता. पांढरा टी-शर्ट, जीन्स, डोळ्यावर गॉगल,स्पोर्ट्स शूज…जय्यत तयार होऊन अरुण सेटवर आला. प्राजक्ता त्याला म्हणाली,”हाय अंकल! यू लूक सो हँडसम!”
ते ऐकून अरुण पाघळलाच. तिच्याकडे बघून उगाचच हसला. कधीही नाटकात सुद्धा काम न केलेल्या अरुणला सीन करताना संवाद विसरायला होत होतं, तारांबळ उडत होती. दिग्दर्शक सारखा कट म्हणत होता. अचानक पंचपात्रे सेटवर आला. “काय अरुणकाका,मजा येतेय ना?” त्याने असं विचारताच डायरेक्टर म्हणाला,”पंचपात्रे, अभिनय कशाशी खातात हे माहिती सुद्धा नसलेली माणसं तुम्ही सिनेमात घेतली.”
“चालतं हो साहेब! शिकतील ते!”
“व्हॉट चालतं? मला हा सिनेमा दोन महिन्यात पूर्ण करून प्रदर्शित करायचा आहे.” दिग्दर्शक चिडूनच बोलला.
दिग्दर्शकाचं ते बोलणं ऐकून अरुणचा पारा चढला.”पंचपात्रे, आत्ताच्या आत्ता माझे पाच लाख परत करा. मला काम करायचं नाही.”
“काका, रिलॅक्स! असं कुठे असतं होय? अहो, जमेल तुम्हाला हळूहळू. पंचवीस लाख लक्षात आहेत ना?” पंचपात्रे डोळा मारून म्हणाला.
पंचवीस लाख ऐकल्याबरोबर अरुण सगळं विसरला. त्याच्या परीने काम चांगलं करण्याचा प्रयत्न करू लागला. बाकीच्या चार म्हाताऱ्यांपुढे मीच तरुण दिसतोय,म्हणजे मलाच प्राजक्ताबरोबरचे सीन्स करायला जास्त वाव आहे. अरुण एकदम खुलला.
अरुण आता घरी आरशात बघून अभिनय करू लागला,संवाद म्हणू लागला. रोजचा व्यायाम सुरूच होता. आज प्राजक्ताबरोबर सीन द्यायचा होता. सकाळपासून अरुणला हुरहूर वाटत होती. सेटवर गेल्यावर पाचही म्हाताऱ्यांना प्राजक्ताबरोबर एकच सीन करायला दिला. तेच संवाद! सीन संपल्यावर अरुण दिग्दर्शकाकडे गेला.
“दिग्दर्शक महाशय! आम्हा पाचही जणांना सारखेच डायलॉग असलेला सीन कसा?”
“काका! हा तुमचा कितवा चित्रपट हो? दिग्दर्शक तुम्ही आहात का मी? नसेल करायचं काम तर तुम्ही चित्रपट सोडू शकता.” दिग्दर्शक अरुणकडे तुच्छतेने बघत म्हणाला.
सगळा अपमान पचवून अरुणने सीन केला.
“उद्यापासून येऊ नका. तुमचं काम झालं.” स्पॉटबॉय अरुणवर खेकसत म्हणाला.
मनातला संताप कालिंदीला कळायला नको म्हणून अरुण हसऱ्या चेहऱ्याने घरी आला.
“कालिंदी, आज छोले,भटुरे, दही घालून कांदा कोशिंबीर, तळलेले पापड आणि टोमॅटो सूप कर.”
“आणि तुमचं डाएट हो?”
“माझं काम आज संपलं. आता मला डाएटची गरज नाही.”
“असं काय बोलताय तुम्ही? अजून सिनेमाचं प्रीमिअर व्हायचं आहे. अहो,तिथे तुम्हाला बघून,तुमचं काम बघून दिग्दर्शकांची लाईन लागेल आपल्या घरासमोर!” कालिंदी अरुणकडे तिरप्या नजरेने बघत म्हणाली.
तिचं ते वाक्य ऐकून अरुण हुरळून गेला. हवेत तरंगू लागला. डोळ्यांपुढे पैसाच पैसा दिसू लागला.
प्रीमिअरचा दिवस उजाडला. कालिंदी पैठणी नेसून,गजरा माळून तयार झाली. अरुण देखील सूटबूट घालून तयार झाला. प्रीमिअरला मोठे मोठे मराठी नट,नट्या आले होते. कालिंदीला हिला बघू का तिला बघू असं व्हायला लागलं. इतक्यात पंचपात्रे त्यांच्याजवळ आला.
“अभिनंदन वहिनी! आज मोठा दिवस तुमच्यासाठी!” पंचपात्रे नाटकीपणे म्हणाला.
“सगळं तुमच्याचमुळे हो!” कालिंदी त्याला नमस्कार करत म्हणाली.
सिनेमा सुरू झाला. अरुण स्क्रीनवर कधी दिसतोय ह्याची कालिंदी वाट बघू लागली. तिने अरुणला तसं विचारलं देखील!
“अग थांब, धीर धर! माझा एकट्याचा हिरॉईनबरोबर सीन आहे.” अरुण खुशीत म्हणाला.
काही वेळाने पाचही म्हातारे हिरॉईनचा पाठलाग करताहेत असा सीन आला. त्यात अरुण सगळ्यात मागे होता. दिसत पण नव्हता.
“जरा थांब! ह्यानंतर आमचाच सीन आहे.” अरुण कालिंदीला म्हणाला.
तो सीन पडद्यावर आला पण त्यात अरुण नव्हताच. त्या उरलेल्या चार म्हाताऱ्यांपैकी एक होता. अख्ख्या चित्रपटात अरुण फक्त पाच मिनिटं दिसला आणि ते देखील ओझरता! कालिंदी चिडली, “ताबडतोब घरी चला.”
“अग, आता सिनेमा संपल्यावर पार्टी आहे.”
“तुम्ही येताय का मी जाऊ?” कालिंदी सीटवरून उठत म्हणाली.
अरुण मुकाट्याने तिच्या मागोमाग चालायला लागला.
घरी आल्यावर कालिंदी एक शब्दही न बोलता तशीच झोपली. दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिने पंचपात्रेला फोन लावला.
“नमस्कार वहिनी! आवडला का सिनेमा? आणि तुम्ही जेवायला नाही थांबलात?” पंचपात्रेचं ते बोलणं ऐकून संतापलेली कालिंदी म्हणाली,
“पंचपात्रे, आमचे पाच लाख ताबडतोब परत करा.”
“अहो असं कसं बोलताय वहिनी? काकांनी स्वखुशीने दिले होते. आणि सिनेमात काम दिलं की त्यांना!”
“काम? त्याला काम म्हणता तुम्ही? ठीक आहे,त्या पाच मिनिटांचे पंचवीस हजार तुम्हाला माझ्याकडून बक्षीस. उरलेले पावणे पाच लाख उद्याच्या उद्या मला मिळाले नाहीत तर तुमचं नगरसेवकाचं आसन डळमळीत करायला मला वेळ लागणार नाही.”
कालिंदीचा तो आवेश बघून पंचपात्रे हादरला. नवीनच नगरसेवक झाल्यामुळे तो राजकारणात मुरलेला नव्हता. “वहिनी,जरा मुदत द्या. आठ दिवसात देतो.”
“आमचे पैसे दोन दिवसात घरी येऊन द्यायचे नाहीतर माझे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत हे तुम्हाला कळेल.”
“उद्याच आणून देतो वहिनी.”
पंचपात्रे म्हणाला.
कालिंदीने मोबाईल बंद केला.
तिचा तो रुद्रावतार बघून अरुणने हळूच विचारलं,”तुझी कुठली वरपर्यंत ओळख आहे?”
“अहो कुठली ओळख आणि कुठलं काय! माझी कोणाशीही ओळख नाही.त्याला धमकी देण्यासाठी मी बोलले.” कालिंदी किचनकडे जाणार इतक्यात अरुणने तिचा हात धरला.
“तू इतकी डॅशिंग आहेस हे आज मला कळलं.”
“आपली बायको रोमँटिक आहे हे तरी तुम्हाला इतक्या वर्षात कुठे कळलं?” कालिंदी खट्याळपणे म्हणाली.
“आज लॉंग ड्राइव्हला जाऊ. बघू तरी तुझा रोमान्स!” अरुण हसत म्हणाला.
“नवरोजी,आता आपली साठी उलटली आहे. आता माझा रोमान्स हाच की जिथे चुकाल, जिथे पडाल तिथे तुम्हाला सावरायचं.” कालिंदी अरुणचा हात घट्ट धरत म्हणाली.
“मग आज इडली चटणी,मेदूवडा आणि सीताफळ रबडी हो जाय?आज ‘तुझी माझी प्रीत’ बहरु दे.” अरुण कालिंदीचं नाक चिमटीत धरत म्हणाला.
“हो जाय!” कालिंदी खळखळून हसत म्हणाली.
अरूणला कालिंदी आज जगातली सर्वात तरुण आणि सगळ्यात सुंदर स्त्री भासली!…….
★★समाप्त★★
सौ मधुर कुलकर्णी, पुणे