लेख- पुणेकर होणे ” एक अनुभूती लेखक- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342
लेखक-अरुण वि.देशपांडे-पुणे
लेख- पुणेकर होणे ” एक अनुभूती
———————————-
आयुष्याच्या प्रवासात, वाटचालीत आपण अनेक चढउतार करीत गाठीशी अनुभव गोळा करीत प्रवास करीत असतो.
आपल्या मनात स्वप्नवत अशा ईच्छा असतात, व्यवहारी जगण्यात या स्वप्नांना प्रत्यक्षात आलेले पहायला मिळणे”
हे वाटणे देखीक एक दुर्मिळ स्वप्न असते.
मित्र हो- आज मी प्लस सत्तर “श्रेणीतील जेष्ठ नागरिक आहे.
पण वयाची 55 वर्षापर्यंत होईस्तोवर मी “मराठवाडी माणूस होतो”,एक परभणीकर होतो.
माझा जन्म मराठवाड्यातला, संपूर्ण शिक्षण मराठवाड्यात,
नोकरी मराठवाड्यात केली, या संपूर्ण कालखंडात आमचा पुणे, मुंबई या दोन महानगरांशी कधीच संबंध आला नव्हता.
माझी नोकरी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये होती.
आमचे हेड ऑफिस हैद्राबादला, रिजनल ऑफिस छ.संभाजीनगर(औरंगाबाद) ला होते. ऑफिस कामानिमिताने देखील आमचे पुण्यास येणे व्हायचे काही कारण नव्हते.
निजामशाहीतल्या मराठवाड्यातले “प्रशस्त जीवनमान” आमच्या अंगात पक्के मुरलेले होते.
१९८३-८४ सालची गोष्ट ,परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी असतांना तेथील मित्र-मंडळींना ,”आपण साहित्यिक होऊ शकतो, कथा लेखन करू शकतो ” हा विश्वास देणारे साहित्यगुरू भेटले. ते संत जनाबाई महाविद्यालयातील दोन प्राध्यापक , प्रा.दीनानाथ फुलवाडकर सर, आणि प्रा.मधुकर देशपांडे सर.
हे देशपांडेसर नोकरिनिमिताने पुण्याहून तिकडे आले होते. कसबा पेठेत रहणारे हे मधुकर गोपाळ देशपांडे ” मला भेटलेले पाहिले अस्सल पुणेकर.
रसिक मनाचे, बहुश्रुत व्यक्तिमत्व, सर उत्तम कथालेखक” हे विशेष आम्हाला खूप भावले.
“पुण्यात सुट्टी घालवून परत आले की त्यांच्याकडून पुणे सांस्कृतिक वार्तापत्र ऐकण्यात आमचे भान हरपत असे.
सरांच्या “लेखन कार्यशाळेत “आम्ही तयार झालो.
यामुळेच ८०-९०च्या दशकात पुण्याच्या ” स्मिता, उत्तम कथा, पैंजण,अशा अनेक मासिकातून “अरुण वि.देशपांडे “या नवोदित लेखकाचे कथासाहित्य प्रकाशित होऊ लागले.
पुण्याचा हा पहिला “अनुभूती स्पर्श “होता. याला आता ४० वर्ष होत आहेत.
पुढे १९८६ पासून थेट २००६ पर्यंत पुणे, मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांचा, दिवाळी अंकांचा मराठवाड्यातील परभणीचा लेखक-कवी म्हणून मी ओळखला जाऊ लागलो. पुणे ” या नावाचे महात्म्य,म्हणजे काय हे कळून येते.
१९९३ मध्ये नोकरीच्या निमित्ताने माझे धाकटे भाऊ मोहन, औरंगाबादहून पुणे येथे “विश्रांतवाडी “भागात आले, आम्ही सारे मोहरून गेलो. पुण्यात हक्काने मुक्काम करण्याची सोय आमच्यासाठी झाली होती. आणि इथून मुलांची सुट्टी आली की किमान आठवडाभर आम्ही परभणी-पुणे नियमित येणे सुरू झाले.
१९९३-९४ च्या दरम्यान विश्रांतवाडी ते मनपा येण्यासाठी शेअर ऑटो- टमटम ” पर सीट रु.६/ असे भाडे घेतले जाई.
सकाळीच जेवण करून भावाच्या घरून ..आम्ही मनपाला येत असू..आणि दिवसभर पाय-पायी फिरून पेठामधील पुण्याचे सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक वास्तू डोळे भरून पाहायचो, इमारतीवरचे नील फलक ”
वाचायचं मगच पुढे जायचे.
हे सगळं करीत असतांना
डेक्कन, सदाशिव पेठ, एस.पी.कॉलेज, साहित्य परिषद
समोरून जाताना मनात विचार यायचे..
गेल्या शतकात याच रस्त्यांवरून किती मोठमोठे, थोर व्यक्तिमत्वे सहजतेने वावरत होती. त्यांचा पदस्पर्षच जणू आम्ही इथून जातांना अनुभवत असायचो.
१९९५ साली परभणीला ६८ वे अ. भा.मराठी साहित्य
संमेलन कविवर्य नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
आणि पुढचे ६९ वे साहित्य सम्मेलन पुण्यात “श्री क्षेत्र
आळंदी येथे झाले.
परभणी साहित्य सम्मेलनाचे आयोजक म्हणून या संमेलनास आम्ही अनेक कार्यकारणी सदस्य आवर्जून हजार होतो.
परभणी साहित्य सम्मेलनाचे कार्याध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख कार्यवाह देविदास कुलकर्णी, सदस्य बी.के.धानोरकर, आणि मी,आळंदीस पुन्हा कविवर्य नारायण सुर्वे यांना निवांत भेटून चहा-गप्पा केल्या.
आळंदी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्ष जेष्ठ साहित्यिका शांता शेळके , आणि संमेलनाच्या उदघाटक होत्या
साक्षात स्वरकोकीळा लता मंगेशकर..
हा अपूर्व सोहोळा आम्ही सहकुटुंब सह-परिवार पहिला, अनुभवला. साहित्यिक झाल्याचा आनंद पूर्ण झाल्याचा अनुभव आळंदी साहित्य संमेलनात घेतला.
१९९३ ते २००४ पर्यंत परभणी- विश्रांतवाडी- पुणे”हा प्रवास आणि मुक्काम आनंद आम्ही मनोसक्त घेतला. या दहा-अकरा वर्षात आम्ही पुणे शहर आणि भवतलीचे सगळेच विशेष ठिकाणे कितीदा तरी पाहिली.
२००५मध्ये आमचे चिरंजीव पुण्यातल्या कंपनीत रुजू व्हायला आले. आणि आम्हाला परभणीत कमी, पुण्यात जास्त करमयला लागले.
२००६ मध्ये कन्येचे लग्न झाले..आणि औरंगाबादला असलेली जावाईबापूंची फॅमिली ..चक्क पुण्यास शिफ्ट झाली..
दोन्ही मुलांची लग्ने झाली.लौकिक अर्थाने मी जबाबदारीतून मुक्त झालो,हा विचार मनात आला..जून 2006 मध्ये व्हीआरएस मंजूर झाले..आणि जुलै 2006 पासून आम्ही
परभणी सोडून पुण्यात कायमचे आलोत.
कोथरूडमधील “डहाणूकर कॉलनीतल्या चंद्रलोक नगरीत”,
जी आमच्यासाठी सुंदर स्वप्नवत स्वप्न-नागरी होती.
२००५ ते -२०१० या पाच वर्षतल्या डहाणूकर कॉलनीतल्या दिवसांचे विस्मरण होणे शक्यच नाही.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व नाट्यगृह, गणेश क्रीडा मंच, सवाई गंधर्व महोत्सव…सार्वजनिक गणेश उत्सव,आणि ,इतर उपक्रम, एक ही आम्ही सोडले नाही.
यानंतरची पाच वर्षे मस्त गेली ती २०१० – ते २०१५ मधली.
कोथरूड डी.पी.रोडवरील बधाई चौकातील शिवातारा गार्डन सोसायटीतली 5 वर्ष आम्ही
“रसिक पुणेकर” होण्याच्या प्रोसेसमध्ये उत्तम श्रेणीत पास झालोत.
ज्या मासिकांसाठी परभणीहुन पोस्टाने मी साहित्य पाठवत असे..अशा मासिकाच्या, वर्तमान-पत्रांच्या कार्यालयात जाऊन संपादकांच्या समक्ष भेटी घेऊन साहित्य देऊ लागलो, हे सगळं माझ्यासाठी “आनंद-पर्व ” आहे.
२०१५ पासून मी वास्तव्यास कोथरूडचा विस्तारित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावधन (बु)-च्या
पाटील नगर मध्ये रहातो आहे.
कोरोना आपत्ती नंतर जे दुर्धर परिणाम झाले..त्याचा फटका सोसावा लागतोय, त्यात वयोमर्यादा लक्षात घेता फिरण्यावर
बंधने आलीत.. पण त्याची कसर ..2011 पासून इंटरनेट माध्यमातील ई-साहित्य विषयक संस्थांशी संपर्क आला आणि नामवंत वेबसाईटवर निमंत्रित साहित्यिक म्हणून मी सक्रिय झालो. साहित्यासाठी एक विशाल अवकाश उपलब्ध झालाय.
हजारो वाचक माझ्या साहित्याचे वाचक झाल्याचे समाधान देण्याचे श्रेय फक्त ” पुणे ” या दोन जादुई अक्षरांचे आहे.
साहित्य सोबतचे – अरुण वि.देशपांडे- पुणे ”
इतकी ओळख पुरेशी आहे.
म्हणून लेखाच्या आरंभीच म्हटले की..
पुणेकर” होणे ही अनुभूती आहे.. अनुभवाची पुढची आत्मिक पायरी.
_________
लेखक- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–