4 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ४ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ४
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
विनायकाच्या वडिलांस म्हणजेच दामोदरपंतास घरातील सगळे अण्णा म्हणत. मुलांनी त्यांना अहो-जाहो केल्यास त्यांना अवघडल्यासारखे वाटत असे. तसे मुलांना कुणी शिकवले तरी त्यांस अवघड वाटत असे. त्यामुळे सगळी मुले त्यांना ‘ए अण्णा’ अशीच हाक मारत असत. अण्णा मुलांना अनेक काव्ये वाचून दाखवीत. मोरोपंतांच्या आर्या शिकवीत. मुलांची सुरेख आख्याने आणि वेचे पाठ व्हावेत म्हणून अण्णा अनेक वेळेस ते मोठ्यांदा वाचत असत. विनायकाची आई राधाबाई, यांचे माहेर कोठुर असे. विनायकाची आईवर खूप श्रद्धा असे. आईची देखील विनायकावर खूप माया असे.
विनायक सात आठ वर्षांचा असताना एकदा असे घडले की, दुपारच्या सुट्टीत विनायक शाळेतून घरी आला. आईसोबत त्याच काही बिनसलं म्हणून तो आईशी काही न बोलताच शाळेत परत निघून गेला. लहान मुलांचे तर आईशी असे रुसवे फुगवे चालतच असतात. पण शाळेत जाताना त्याच्या मनात येऊ लागले की, ‘या आपल्या रुसव्यामुळे सुट्टीचा वेळ वाया जाऊन आईशी गोड बोलणे झालेच नाही. आई बरोबर हसण्या-खेळण्याचे राहूनच गेले.’ याची रुखरुख लहानश्या विनायकाच्या मनाला चांगलीच टोचू लागली. आपण तो आनंदाचा क्षण गमावला असे त्यास वाटू लागले.
मग त्यांच्या मनात विचार येऊ लागले की, अनेक ओवीबद्ध ग्रंथांचे वाचन करताना वडिलांनी सांगितले होते की, अनेक कल्प घडत असतात. प्रत्येक कल्प अगदी मागच्या कल्पासारखाच असतो. आयुष्यात घडणाऱ्या घटना जश्यास तश्या प्रत्येक कल्पात घडत असतात. हे आठवून विनायकास आधी थोडे हायसे वाटले आणि आपण पुढच्या कल्पात आपली चूक सुधारून आईवर रुसयाचे नाही, असे तो ठरवणार पण इतक्यात त्याच्या लक्षात आले की जसे घडले तसेच पुढच्या कल्पात घडत असते. त्यामुळे आज जसे घडले तसेच पुढच्या कल्पात देखील आज आपण आईवर रुसणार, म्हणजे जो क्षण गेला तो गेला. तो पुन्हा कधी सुधारता यायचा नाही. आईचे गोड शब्द अंतरले ते अंतरलेच. त्यामुळे पुन्हा आईवर रुसायचे नाही. अबोला धरायचा नाही. असे विनायकाने मनाशी पक्के ठरवून टाकले.
सन १८९२ साली भगूरला महामारीची मोठी लाट आली. गावातील अनेक लोक त्यात दगावू लागले. सावरकरांच्या घरात देखील या महामारीने शिरकाव केला. विनायकाच्या आईला महामारीने गाठले. त्या दिवशी घरात काही कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच आई धावपळ करत कामे करत होती. तिला त्रास होत असल्याचे तिने कुणालाही कळू दिले नाही. सकाळपासूनच तिला रेच होत होते. ते झाले की स्नान करून पुन्हा ती काम करत होती. दुपारी भोजनाची वेळ झाल्यावर सर्वांना वाढताना तिला एकदम भोवळ आली आणि ती तशीच जाऊन देवघरापाशी जाऊन निजली. ते परत उठलीच नाही.
घरातील मंडळींना तेव्हाच कळले की राधाबाई आजारी आहे, आणि त्यांना महामारीची लागण झालेली आहे. मग वडिलांनी आईस उचलून खोलीत आणून निजवले. तिच्या माहेरी तार करून कळवले. उपचार तर लग्गेच सुरु केले होते. पण अजिबात उतार पडत नव्हता. शके शुद्ध आषाढ प्रतिपदेच्या पहाटे आईच्या नाड्या अखाडल्या. पुढे काय घडणार आहे याची एव्हाना सर्वाना अंदाज आलेला होता. सर्व मुलांना आळीपाळीने आईस भेटवून आणण्यात आले.
थोड्याच अवधीत विनायकाची आई त्यास सोडून कायमची निघून गेली. दुपारी दोनच्या दरम्यान प्रेत दहन करून सगळी मंडळी परतली. दारात उभा असलेला विनायक या सगळ्या मंडळींमध्ये फक्त आईला शोधत होता. पण त्याची आई काही परत आली नाही. ती कायमचीच निघून गेली होती. विनायक त्यावेळी केवळ नऊ वर्षांचा तर धाकटा भाऊ तर केवळ पाचच वर्षांचा होता.
त्यानंतर विनायकाच्या वडिलांनी अनेकांनी सुचवले तरी दुसरे लग्न केले नाही. अशी लग्ने त्याकाळी होत असूनही चारही मुलांवरच्या मायेखातर वडिलांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात नाही आणला. त्यांनी बाहेरचा कामांचा सारा व्याप सांभाळून सर्व मुलांचे लालनपालन अतिशय प्रेमाने केले. त्यांनी मुलांना रात्री गाणी म्हणत झोपवावे. कुणाला झोप येत नसेल तर थोपटवून झोपवावे. सकाळी उठवून तयार करावे. शाळेत पाठवावे, स्वयंपाक स्वतः करावा. घरात गडी माणसे होती, पण आईने जे जे स्वतः केले असते ते ते वडिलांनी तितक्याच मायेने सगळ्या मुलांचे केले. सगळी मुल झोपल्यावर मायेने सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आईसारखा मायेने हात फिरवीत. आईची मुलांना कमतरता भासू नये म्हणून वडील सदैव जागरूक असत.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

