Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
11 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ११ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ११
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
विनायकाच्या या तर्कट बुद्धीच्या संशयी लहरीची साडेसाती लवकरच अनेक ग्रंथांकडे वळली. त्यातील व्रते, नियम आधी विनायक मन:पूर्वक पाळून पाही. पण नंतर त्यास त्यातील जटिलता पाळण्यास अशक्य वाटू लागली. काही बाबतीत तर हे परस्पर विरुद्ध भासू लागली. त्यातील वर्तमान काळातील निरर्थकता जाणवू लागली.
शेंडी मोकळी सोडून जितकी पावले जाल तितक्या ब्रह्महत्येचे पातक लागते, अस वडीलधारी मंडळी म्हणत. विनायकाचे वडील बंधू विनायक शेंडीस गाठ देण्याचे विसरला की असेच भय त्यास घालत. त्यावर विनायक उत्तर देई, “चिंता नाही. संध्याकाळी शिवाचे नाव घेतले की सात जन्माची पापे भस्म होतील.”
विनायकाच्या धार्मिक विचारात उडत चाललेल्या या खळबळीमुळे अर्थातच त्याची पूजाअर्चा पूर्वीच्या अल्लड उत्कटतेने होईना. ज्या शुल्लक चमत्कारांनी ती भक्तीची उत्कटता इतकी तीव्र झाली होती, तसल्याच शुल्लक चमत्कारांच्या अभावी ती तशीच बोथटही होऊ लागली. पण विनायकाच्या मनातून या उत्कटतेचा अतिरेक जरी ओसरत चाललेला होता, तरी त्याच्या मनातील देवी विषयीची भक्ती मात्र नाहीशी झाली नव्हती. देवीवरची भक्ती मात्र पूर्वी इतकीच सुकोमल प्रेमाने ओथंबलेली होती. तर्कट बुद्धी ती भक्ती मात्र संपवू शकली नव्हती.
विनायकाचे वडील बंधू त्यांच्या वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षीपासूनच वेदांताचे ग्रंथ वाचत, योगादिकांचा अभ्यास करत. त्यांना याची फारच आवड असे. ते विनायकास असे ग्रंथ देऊन ते वाचण्यास सतत आग्रह करीत. ग्वालेरच्या श्री. जठार यांनी लिहिलेल्या “स्वानंदसाम्राज्य” हा वेदांतावरील ग्रंथ विनायकास त्यांनी वाचायला दिला. आग्रह करून वाचायला लावला. विनायकास त्या ग्रंथाच्या नावात असलेले ‘साम्राज्य’ विशेष भावले. विनायकाच्या आवडत्या राजकीय कल्पनांच्या जवळ पोहोचणारा हा शब्द असल्याने त्याने तो ग्रंथ वाचून काढला. पण त्या ग्रंथात ‘माया’ आणि ‘ब्रह्म’ अशा शब्दांच्या घोटाळ्यांनी विनायकास त्या विषयापासून अधिकच दूर लोटले. तो ग्रंथ वाचण्याचा उलट परिणाम विनायकावर झाला. प्रबळ जिज्ञासा त्याच्या मनात कायमची निर्माण झाली. ही जिज्ञासा त्यास प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करे.
विनायक आता या विषयांच्या अनेक अंगांवर, अद्भुत चमत्कारांवर, सत्य की असत्य यावर बडेजाव मिरवणाऱ्या तथाकथित साधूंवर, सोवळेओवळे यावर, पदोपदी धर्म धर्म म्हणून बोकाळलेल्या रूढींवर, त्या त्याज्य की अत्याज्य यावर, केवळ आचार कोणते आणि खरा धर्म कोणता यावर, देवाचे अस्तित्व की नास्तित्व यावर त्याचा आणि वडील बंधूंशी आणि या विषयातील जाणकार मंडळींशी वादविवाद होऊ लागले.
विनायकाच्या जेष्ठ बंधूस साधूंच्या संगतीची फार आवड असे. कोणीही राख फासलेला, जटा वाढविलेला पाहिला की ते त्याच्या नादी लागत. घरी आर्थिक अडचण असली तरी ते अशा साधूंना शेर शेर दुध प्यायला देत, फळे खायला देत. त्यांची सेवा करत. त्यात काही सत्पुरुष असत तर काही भोंदू असत.
त्यातील अनेकांनी त्यांच्या भोळ्या आणि सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना साफ फसवले होते. विनायक त्यांच्या बंधूंच्या या भोळ्या स्वभावावर अनेक वेळा टीका करून असे पुन्हा करू नये म्हणून सांगत. पण पुन्हा राख किंवा जटा दिसली की ते त्याच्या मागे जातच. विनायकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की ते म्हणत, ‘आधीच सगळ सोड, हे मात्र सिद्ध पुरुष आहेत. तू एकदा त्यांच्याकडे चल म्हणजे तुलाही प्रचीती येईल.’
बंधूंच्या अशा आग्रहामुळे विनायकास इच्छा नसूनही अनेक वेळेस अशा साधूंना भेटायला जावे लागे. विनायकाच्या काव्यातील प्रगतीची वगैरे महती त्या साधुंपर्यंत पोहोचलेलीच असे.
अशा साधूंकडे विनायकाला देण्यासारखे काहीच नसे. कारण विनायक त्यांच्याशी देशाच्या स्वातंत्र्याच्या चर्चा करू इच्छित असे. इंग्रजांच्या जाचातून भारतास मुक्त करण्यासाठी सशस्त्र युद्धावाचून दुसरा उपाय नाही, हे विनायकाचे विचार तो बोलून दाखवे. अशा विषयात विनायक त्यांच्याशी बोलून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करी.
पण अशातील काही भोंदू लोक, ‘तू यात पडू नकोस.’ असा सल्ला देऊन विषयाला बगल देत. काही जण म्हणत, “आधी ईश्वराचे अधिष्ठान संपादन करावे.”
याचा अर्थ असा असे की त्यांच्या मठीत काम करावे, त्यांची सेवा करावी. मग आपणहून सगळ व्यवस्थित होईल. विनायकास हे विचार काही पटत नसत. त्यास देशाच्या स्वातंत्र्यावाचून दुसरा कोणताही ध्यास नसे.
कोणी म्हणत, “देवाची ती इच्छा! घडा भरेल तेव्हा घडेल.”
त्यावर विनायक उसळून म्हणे की, “या इंग्रज चोरांचे राज्य ती देवाची इच्छा, आणि आम्हा सर्वांची त्यांचे राज्य उलथवून टाकण्याची ही प्रवृत्ती काय कोण राक्षसाची इच्छा? जर सर्व कर्ताकरविता देव, तर ही देखील देवाचीच इच्छा! किंबहुना ही इच्छा आम्हात उदय पावली, हीच गोष्ट तो घडा भरल्याचीच साक्ष का समजू नये? देवाची आता इच्छा झाली असे का मानू नये?”
इतक्या लहान वयात देखील विनायकाचे जीवन उद्दिष्ठ निश्चित होते. त्यास देश स्वतंत्र करायचा होता. मग त्यासाठी सशस्त्र क्रांती करावी लागली तरी त्यास तो सिद्ध होता.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

