Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
14 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १४ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १४
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
५. पहिली वक्तृत्व स्पर्धा
मागे नाशिक वैभव या वर्तमानपत्रात विनायकाचे लेख छापून आल्यावर त्याला नाशिकची काही प्रमुख मंडळी ओळखू लागली. त्यात प्रसिद्ध नाटककार श्री. बर्वे देखील असत. त्यावेळी नाशिकमध्ये वक्त्तृत्वोत्तेजकसभा वक्तृत्वाच्या स्पर्धा भरवत असे. या श्री. बर्वे यांनी विनायकास त्यात भाग घेण्यास प्रवृत्त केले. विनायकानेही त्या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. पण अर्ज करण्याची मुदत संपलेली होती. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजकांना श्री. बर्वे यांनी विनायकाचा अर्ज घेण्याविषयी सांगितले. आयोजकांनी तो अर्ज घेतला. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच विनायकाची बोलण्याची पाळी असल्याने त्यास कमी वेळेत अधिक तयारी करायची होती.
विनायकाच्या आधीच अनेक स्पर्धकांनी तेच तेच विषय मांडून त्यातील नाविण्य कमी झाले होते. त्या विषयातील बहुतांशी सगळे मुद्दे मांडून झाले होते. त्यामुळे श्रोतेही जाण्याची गडबड करत होते. परीक्षकही आता नवीन काय असणार म्हणून ऐकण्यास फार काही उत्सुक नव्हते. अशा वेळी विनायकाची बोलण्याची पाळी आली.
विनायक बोलण्यास उभा राहिला आणि अवघ्या पाच सात वाक्यातच त्याने सभेच्या मनाचा ठाव घेतला. श्रोत्यांची चाललेली कुजबुज क्षणात बंद झाली. परीक्षकांनाही वेगळेपण जाणवल्याने त्यांनी विनायकाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यास सुरुवात केली. विनायकाचे भाषण शेवटचे असल्याने ते पूर्ण झाल्यावर परीक्षकांनी निकालावर चर्चा सुरु केली.
एक परीक्षक म्हणाले, “आता शेवटी ज्याने भाषण केले. ते अतिशय उत्तम आणि मुद्देसूद झालेले आहे. विषयाची मांडणी देखील अप्रतिम होती.”
श्री बर्वे म्हणाले, “आता ज्याने शेवटी भाषण केले सर्व अर्जात त्याचा अर्ज सगळ्यात खाली होता. पण ‘खाली असोनी सकला वरी होय तो की’ या पंडितांच्या उक्तीप्रमाणे विनायक सावरकर सगळ्यांच्या वर आला आहे.”
पण दुसरे एक परीक्षक म्हणाले की, “पण हे भाषण त्याने लिहिले आहे, असे आम्हास आजीबात वाटत नाही. त्याच्या वयाच्या मानाने हे भाषण अधिकच परिपक्व होते. त्याने ते कोणा मोठ्या व्यक्तींकडून लिहून घेतले असणार.”
पहिले परीक्षक दुसऱ्या परीक्षकांना मध्येच थांबवत म्हणाले, “असे असले तरी त्याने कोणीतरी लिहून दिलेलं भाषण पाठ करून इतक्या उत्कृष्टपणे म्हणून दाखवले आहे. आणि ही स्पर्धा वक्तृत्वाची असल्याने त्याचा पहिला क्रमांक असावा असे आम्हास वाटते.”
श्री. बर्वे म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवा. या मुलानेच हे भाषण स्वतः कुणाची मदत न घेता लिहिले आहे. त्याचे या आधीचे अनेक लेख मी वाचले आहेत. त्यास शास्त्रशुद्ध आणि अलंकृत भाषेत लिहिण्याची सवय आहे. त्याच वय लहान असले तरी. तो अशाप्रकारे अति उत्तम लेखन करू शकतो. मागे वर्तमानपत्रातही त्याचे लेख अग्रलेखाच्या जागी छापून आलेले आहेत.
श्री. बर्वेंचे हे म्हणणे ऐकून सर्व परीक्षकांना अधिकच आनंद झाला. इतक्या लहान वयात हा मुलगा अलंकृत भाषा, शास्त्रशुद्ध निबंध पद्धती आणि अस्खलित वक्तृत्व याने परिपूर्ण आहे, याचे परीक्षकांना खूप कौतुक वाटले. आणि अर्थातच त्या स्पर्धेचा पहिला क्रमांक विनायकास मिळाला.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

