Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
22 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २२ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २२
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
११. दहिवली येथील वक्तृत्व स्पर्धेतील वाद.
पुणे बघून झाल्यावर सर्व मंडळी लग्नासाठी पुन्हा कर्जतला आली. त्यावेळी तात्यारावांना कळले की शेजारीच असलेल्या दहिवली गावात वक्तृत्वस्पर्धा भरवण्यात आलेली आहे.
तात्यारावांनी त्यात भाग घेण्याचे ठरवून आपले नाव नोंदविले आणि दोन चार दिवसात बोलण्याच्या विषयावर निबंध लिहून काढला. आणि त्या स्पर्धेत तात्याराव नेहमीप्रमाणे सर्वोत्तम बोलले. अमोघ वक्तृत्वाने त्यांनी परीक्षकांसह सर्वांची मने जिंकली. अर्थात त्यांचा पहिला क्रमांक आला.
बक्षिसे देऊन झाल्यावर समारंभाचे अध्यक्ष जाहीर बोलताना तात्यारावांबद्दल म्हणाले,
“ह्या इच्छुकांच्या वयात मुलगा असा निबंध आणि अशी भाषा लिहू शकेल असे मला वाटत नाही. तो निबंध कोणीतरी लिहून दिलेला आहे. पण तरीही पहिले पारितोषिक मात्र त्यालाच मिळणे योग्य आहे. कारण जरी लिहिले दुसऱ्याने, तरी ते उत्कृष्ट भाषण केले यानेच की नाही! या वयात असे वक्तृत्व निर्विवादपणे कौतुकावहच आहे!”
तात्यारावांना अध्यक्षांच्या या बोलण्याचे वाईट वाटले. कारण ते भाषण कुणाकडून लिहूनच काय पण लिहिण्यास कुणाची मदत सुद्धा त्यांनी घेतली नव्हती. त्यांना हा आरोप अजिबात सहन झाला नाही. ते ताडकन उठून उभे राहिले आणि अध्यक्षांना बोलण्याचे थांबवत त्यांना म्हणाले,
“तो निबंध मीच लिहिला आहे. मी तो लिहिला असताना बिऱ्हाडी पुष्कळांनी पाहिला आहे. आणि हे मी दहादा व्यवस्थापक मंडळास कळवीत असता तो माझा निबंध नाही असे हट्टाने म्हणण्यास पुरावा काय, तर म्हणे माझे वय लहान आहे. ही माझी यःकश्चित गोष्ट राहो. पण त्याच न्यायाने चालायचे झाले तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली; हे ही साफ खोटेच म्हणावे लागेल! गुणाः पुजास्थानम गुणिषु नाच लिंगम नाच वयः!”
असे म्हणत तात्याराव खाली बसले. संपूर्ण सभा थक्क होऊन तात्यारावांकडे बघत राहिली. कुणाला काय बोलावे हे सुचेना. पण अध्यक्षांना हा त्यांचा अपमान वाटला. ते रागारागाने म्हणाले,
“असा लहान तोंडी मोठा घास घेण्याने काही सिद्ध होत नाही. उलट त्यातून उर्मटपणाच दिसून येतो आहे.”
अध्यक्ष पुढे अजून काही बोलणार इतक्यात त्या संस्थेच्या इतर सभासदांनी आणि व्यवस्थापक मंडळींनी ते प्रकरण मिटते घेतले. अध्यक्षांनी उर्वरित भाषण केले आणि समारंभ संपला.
लगेच संस्थेच्या कार्यवाहांनी त्या रात्री तात्यारावांना घरी भोजनास येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यावेळी हा निबंध त्यांनीच लिहिला असल्याचे मान्य केल. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने त्याचे बक्षीस म्हणून तात्यारावांना पुण्याच्या ‘काळ’ या वर्तमानपत्राचे एक वर्ष अंक भेट म्हणून मिळाले.
पुढे तात्याराव याबाबत म्हणाले की,
“माझ्या मतावर नसला तरी माझ्या ज्ञानावर, भाषेवर, संस्कृतीवर आणि उत्साहावर ‘काळ’च्या अखंड परिशीलनाचा फारच मोठा परिणाम झाला. इतका की, जर मला माझ्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरुपद कोणास तरी देणेच असेल, तर ते ‘काळ’लाच देऊ शकेन. पण तेही फक्त केवळ क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे- कृतीचे नव्हे.”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

