Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
30 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३० लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३०
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
अशातच एक दिवस जे अजिबात घडू नये असे तात्यारावांना वाटत होते, तेच घडले. ते डबा घेऊन रूग्णालयापाशी गेले. बाबाराव बाहेर आले नाहीत.
खूप वेळ वाट पाहिली पण त्यांची बाहेर येण्याची चिन्हे काही दिसेनात. बऱ्याच कालावधीनंतर रुग्णालयातील ओळखीचा एक कर्मचारी बाहेर आला आणि त्याने तात्यारावांना सांगितले की, ‘तुमच्या थोरल्या बंधूंना कालपासून ताप आल्याने ते आज बाहेर येऊ शकणार नाहीत.’
तात्यारावांच्या मनावर वज्राघात झाला. त्यांनी त्या कर्मचाऱ्यास खोदून-खोदून विचारल्यावर त्याने सांगिते की, ‘ताप प्लेगचाच आहे.’ ही बातमी देऊन तो निघून गेला. आता बाबारावांना देखील भेटता येणार नव्हते. अत्यंत विषण्ण मनाने तात्याराव घरी परतले.
त्यांना वाटत होते, मी आज खरा पोरका झालो. जगात आज एकटा उरलो. घरी येईपर्यंत त्यांनी मनाची तयारी केली. वहिनीस हा धक्का सहन होणार नाही, म्हणून तात्यारावांनी तीस काही सांगितले नाही. तो दिवस म्हणजे सावरकर कुटुंबावर कोसळलेल्या या प्लेगच्या मारक आघातांचा निर्वाणीचा वज्राघातच होता.
तात्याराव पुढे एकदा याबाबत म्हणतात, “या सर्व आघातांनी आणि क्लेशांनी माझी जीवनशक्ती खचून मलाही प्लेग कसा झाला नाही याचे आश्चर्य वाटते. पण प्रकृतीने टिकाव धरला.”
दुर्दैवाचा शेवटचा अंक दाखवल्यावर मात्र नियतीने कूस बदलली.
बाबारावांचा प्लेग अधिक न बळावता लवकर बरा झाला. आणि बाळही हळूहळू बरा होऊ लागला. आणि दोन तीन महिन्यांनी दोघेही सुखरूपपणे त्या रुग्णालयातून बरे होऊन बाहेर आले. प्लेगचा थैमान देखील हळूहळू ओसरू लागला होता.
सावरकर बंधुंपुढे आता प्रश्न होता की, ‘आता पुढे काय करायचे?’ त्यांनी विचारविनिमय करून नाशिकास स्थाईक व्हायचे निश्चित केले. पुढच्या शिक्षणासाठी ते गरजेचे होते.
रामभाऊंच्या बिऱ्हाडी राहण्याचे त्यांनी ठरवले. या तीन भावांनी आणि येसू वहिनीने आयुष्याची नवी सुरुवात करून जे जे वाईट झाल ते ते मागे सोडून पुढे जाण्याचा निश्चय केला. या सगळ्या भयंकर संकटाच्या काळात देखील तात्यारावांच्या मनात देशभक्ती आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती उभी करण्याची इच्छा मात्र आजीबात कमी झालेली नव्हती.
त्यांनी देवीपुढे घेतलेली शपथ ते विसरले नव्हते. त्याबाबत ते नुसते विचार करत नव्हते तर त्यांनी प्रत्यक्ष कृती देखील आरंभिली होती.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

