Classified
31 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३१ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ३१
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
कार्यारंभ-पर्व.
१३. गुप्त मंडळाची स्थापना.
१४. मित्रमेळ्याची स्थापना.
१५. शिवजन्मोत्सव आणि गणेशोत्सव.
१६. व्यक्तिगत जीवन.
१७. आर्थिक अडचणी.
१८. पब्लिक सर्विसची परीक्षा.
१९. मित्रमेळ्याचा विस्तार.
२०. इंग्रजांचा राजा म्हणजे हिंदुस्थानचा लुटेरा.
२१. तात्यारावांची ज्ञानार्जनाची पद्धत.
२२. मित्रमेळ्याचा पहिला मोठा गणेशोत्सव.
२३. म्हसकरांचे निधन.
२४. त्रिंबकेश्वरची शाखा.
२५. राहणीमान, व्यायाम आणि मित्रमेळा.
२६. तात्यारावांचे उच्च शिक्षण आणि विवाह.
२७. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात.
२८. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरती आणि इतर काव्ये.
२९. पुण्याच्या वृत्तपत्रात लेख येऊ लागले.
३०. तात्यारावांची या काळातील व्याख्याने.
३१. मित्रमेळाचे ‘अभिनव भारत’ असे नामकरण.
३२. विदेशी कापडांची होळी.
३३. बी.ए.ची परीक्षा आणि निकाल.
३४. शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी.
कार्यारंभ-पर्व.
१३. गुप्त मंडळाची स्थापना.
तात्यारावांवर दुःखाचे डोंगरच्या डोंगर कोसळत असताना देखील त्यांच्या मनातली देशभक्ती अजिबात कमी झालेली नव्हती. वडील आणि चुलते दहा दिवसात प्लेगने गेले, दोन्ही भावांना प्लेगने गाठले, राहते घर सोडून मंदिरात राहावे लागले, मग अचानक नाशिकला यावे लागले, एवढ्या सगळ्या धावपळीच्या काळात आपले विचार लोकांना सांगावेत, त्यांच्या मनात देशभक्ती निर्माण करावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. सशस्त्र क्रांतीची शपथ घेतल्यापासून तात्यारावांना फक्त त्याचाच ध्यास लागला होता. त्यांच्या मनात दुसरे काहीच येत नव्हते.
तात्यारावांचे दोन्ही बंधू जेव्हा नाशिकच्या रुग्णालयात होते, तेव्हा त्यांना वस्तू आणि जेवण देण्यासाठी तात्यारावांना दिवसातून दोन वेळेस तिथे जावे लागत असे. त्या रुग्णालयात लेखनाच्या कामावर असणाऱ्या श्री. म्हसकर यांच्याशी आधी बाबारावांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्या माध्यमातून म्हसकरांची आणि तात्यारावांची भेट झाली. बाबारावांची त्यांच्याशी लवकरच घनिष्ट मैत्री झाली. ते बाबारावांना मदत करत. स्वराज्य आणि स्वधर्म हे दोघांचे आवडते विषय असल्याने यांची मैत्री लवकर जुळून आली. बाबा येता जाता तात्यारावांचे कौतुक म्हसकरांपाशी करत. त्यांचे विचार आणि राजकीय मते त्यांना सांगत. त्यामुळे भेट झाल्यावर म्हसकर आणि तात्यारावांचे राजकारणावर बोलणे होऊ लागले. तात्यारावांनी लिहिलेला चापेकर बंधुंवरील फटका त्यांनी म्हसकरांना दाखवला. तो त्यांना इतका आवडला की तो छापावा असे त्यांच्या मनात आले.
म्हसकारांबरोबर त्यांचे अजून एक स्नेही होते, श्री पागे. हे देखील सरकारी नोकरच होते. पाग्यांचे वयही तिशीच्या आसपासचे होते. या दोघांच्या स्वभावात जो फरक असे तो बहुतांशी एकमेकांना पूरक असल्याने या दोघांचा स्नेह अखंड टिकला होता. म्हसकरांचा स्वभाव संकोची, मागे राहून काम करण्याचा असे तर पागेंचा स्वभाव हा पुढे राहण्याचा असे. लेख म्हसकर लिहित तर त्यासाठी पागे त्यांना माहिती पुरवीत. या पागेंनी देखील तात्यारावांचा तो फटका वाचला आणि म्हसकारांच्या छापण्याच्या इच्छेला पाठींबा दिला. त्यांनी त्यादृष्टीने काम सुरु केले पण त्या फटक्यातील काही मजकूर, जो अत्यंत जहाल होता, तो वाचून कोणताही छापखाना ते छापायला तयार होईना.
मग बाबाराव, म्हसकर आणि पागे यांनी सदर फटक्यातील जहाल वाक्ये गाळून त्याऐवजी सौम्य पण त्याच अर्थाची भाषा वापरून एक प्रत तयार करायचे ठरवले. अर्थात तात्यारावांना सौम्य भाषा वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी शब्दांची फिरवाफिरवी केली. कितीही जहाल भाषा गाळली तरी जे उरे ते छापण्याचे धैर्य कोणताही छापखाना करेना. चापेकरांचे नाव ऐकल्यावरच काहींना घाम फुटे, असा तो काळ होता. त्यात त्यांनी केलेल्या कृत्याला हौतात्म्य म्हणणे आणि असे कृत्य आम्ही करू असे ठामपणे त्यात सांगणे, हे बहुतेकांच्या पचनी पडणारे नव्हते. शेवटी जहाल भाषा गाळलेली ती प्रत वर्तमानपत्रात छापून यावी म्हणून देखील प्रयत्न करण्यात आला. तरी सौम्य केलेली प्रत इतरांसाठी अतिशय जहालच होती. त्यामुळे चापेकर बंधुंवरील तो फटका त्यावेळी वर्तमानपत्रातून देखील छापून आला नाही.
तात्यारावांना आता आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघटन उभारावे असे वाटू लागले होते. व्यक्तिगत दुःखाकडे दुर्लक्ष करून आपण ज्या ध्येयासाठी शपथबद्ध झालो आहोत, ते ध्येय त्यांना अधिक महत्वाचे वाटत होते. हिंदुस्थानातून इंग्रजांची सत्ता हद्दपार करण्याच्या आपल्या संकल्पाची त्यांना दिवस रात्र जाणीव असे. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तात्याराव याच विषयावर बोलत. आणि आपली मते त्यांना सांगत, त्यांची मते जाणून घेत. म्हसकर आणि पागे यांच्या सोबत त्यांची अनेक वेळेस चर्चा होत असे. त्यावेळी असलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलणे होत असे.
तात्याराव त्यांना सांगत की, ‘आपण एक गुप्त मंडळ काढून आपले कार्य सुरु करूया. त्यांनी भगूरला देवीपुढे घेतलेली शपथेबद्दल या दोघांना सांगून त्यांनी देखील अशी शपथ घ्यावी म्हणून सांगत. प्रथम दोघेही या गोष्टीला एकदम तयार झाले नाहीत. ते काही कारण काढून हा विषय टाळत असत. ते दोघेही सरकारी नोकर होते. शिवाय त्यांना तात्यारावांनी या लहान वयात अशी काही पावले उचलू नये, असे वाटत असे. त्यांना तात्यारावांची काळजी वाटत असे. पण तात्याराव मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम असत. शपथ घेऊन गुप्त मंडळाची स्थापना करावी व प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करावी. हे जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर करावे, याबाबत तात्याराव आग्रही असत.
तात्याराव म्हणत,
“विषवृक्षाच्या मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात. तेव्हा पूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच ध्येय पुढे ठेवून त्याचीच निर्भयपणे घोषणा करीत राहिले पाहिजे. सर्व उघड चळवळीत ते वारे संचारविले पाहिजे.”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

