आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★ही वाट वळणाची (5)★

युनिटी एक्स्प्रेशन ची अत्यंत प्रसिद्ध आणि आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★ही वाट वळणाची (५)★
★श्रुती★
स्वप्नाला दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं. काकूंना मी अजूनतरी काही सांगितलं नव्हतं. दवाखान्यात मी त्यांना येऊच दिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी स्वप्नाला शुद्ध आल्यावर तिलाच सगळं ठीक आहे असं काकूंना सांगायला लावलं. त्यांनीही मला अनेक प्रश्न विचारले. पोटदुखीसाठी ऍडमिट का? आणि इतके दिवस का? हे सगळं होणार ही माझ्या मनाची मी तयारी केलीच होती.
स्वप्नाला घरी आणलं. महिन्यासाठी एक दिवसभराची बाई लावून दिली. शुद्ध आल्यापासून स्वप्ना फक्त माझ्या प्रश्नांना हो किंवा नाही इतकंच उत्तर देत होती. तिचं हसणं संपलंच होतं. हिने रडून मोकळं व्हावं असं मला वाटत होतं पण तिच्या डोळ्यात टिपूस नव्हता. मी काकूंना औषध कशी द्यायची हे समजावलं आणि घरी निघाले.
“स्वप्ना,निघतेय मी! ऑफिस सुटल्यावर रोज येईन. तुझी रजा मंजूर करून घेते. मेडिकल लिव्ह तुला मिळेल पण फार दिवस नाही. विदाऊट पे रजा घ्यावी लागेल. पैशांची काळजी करू नकोस,मी आणि प्रयाग आहोत. आणि तुझा मोबाईल मी घेऊन जातेय. गरज पडली तर काकूंचा आहे.”
“नको नेऊस मोबाईल! विश्वास ठेव माझ्यावर!” ह्या तीन दिवसात पहिल्यांदा स्वप्ना बोलली. तिचे ते भकास,निर्जीव डोळे मला बघवेना! मी तिच्या हातावर थोपटलं आणि बाहेर पडले. घरी आल्यावर माझंही थकलेलं मन,शरीर लगेच निद्राधीन झालं.
रोज ऑफिस सुटल्यावर स्वप्नाकडे जात होते. तिचं विश्वच उध्वस्त झालं होतं. गेले काही दिवस रितेशच तिचं विश्व होतं. मी गेल्यावर तिला गाणी ऐकवत होते, ऑफीसमधलं सगळं सांगत होते पण तिचा चेहरा निर्विकार असायचा. एक दिवस तिच्याजवळ सफरचंद कापत बसले होते. ती सूरी बघून का काय अचानक स्वप्ना हुंदके देऊन रडायलाच लागली. मी तिला जवळ घेतलं. मला बिलगत रडत रडत म्हणाली, “श्रुती,कसा आहे ग तो? मला तो हवाय! मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय!”
“स्वप्ना,जे काही झालं ते पुरेसं नाहीय का? तू त्याची नाही होऊ शकत!”
“मी लग्न न करता राहीन पण मला रितेश हवाय!” तिच्या डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या. मी तिला थोपटलं,”स्वप्ना,आपण उद्या डॉक्टरकडे जातोय. तुझं डिप्रेशन वाढत चाललंय. आता तुला एकटं ठेवायची पण मला भीती वाटतेय.”
“मला रितेशकडे ने! मी बरी होईन.”
“स्वप्ना,बास!” मी ओरडले.
“तुझ्यासाठी,तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मी रात्रंदिवस झटते आहे. काकू बिचाऱ्या ह्या वयात खोटं धैर्य दाखवून जगताहेत. त्याचं तुला काहीच नाही? तुम्ही दोघी मुली आईला फक्त त्रास द्यायला जन्माला आला आहात. चल,सोडते मी तुला रितेशकडे पण एका अटीवर! उचललेलं पाऊल मागे घ्यायचं नाही. इकडे कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत. तू उचललेलं पाऊल,तूच निस्तरायचं.”
स्वप्नाचं हुंदके वाढले,”श्रुती, इतकी का कठोर होतेय ग?”
तिला कुरवाळत मी म्हणाले,”स्वप्ना,आत्ता माझे हे कठोर शब्द तुझ्या जिव्हारी लागले पण तू जो अविचार केलास तेव्हा एकदा तरी काकू किंवा मी तुझ्या डोळ्यासमोर आलो नाही का ग? दवाखान्यात त्या क्षणी माझी काय अवस्था झाली असेल ह्याचा विचार केलास कधी? अग, किती कठीण परिस्थितीत मी ते सगळं निभावलं. मला प्रयागची साथ होती. आम्ही कोणीच तुझ्यासाठी महत्वाचे नाही का ग? मग तुझ्यात आणि स्वरात फरकच काय?स्वप्ना,ते एक वाईट स्वप्न होतं असं समज आणि विसरून जा!”
स्वप्नाचे हुंदके वाढत होते पण मी तिला रडू दिलं. रडून मोकळं होणं हेच तिच्यासाठी योग्य होतं.
केतनची अपॉइंटमेंट घेतली. केबिनमध्ये काही प्रश्न विचारून केतनने मला बाहेर बसायला सांगितले. पेशंटला विश्वासात घेऊन त्याच्याकडून हळुवार सगळं माहिती करून घेणं हेच तर मानसोपचारतज्ञांचं वैशिष्ट्य असतं. केतनला मी थोडक्यात सगळं सांगितलं होतं तरीही स्वप्नाकडून त्याला ते ऐकायचं होतं आणि अर्थातच तिची भूमिका वेगळी होती. तिच्या नजरेतून हे सगळं फक्त तिच्या उत्कट प्रेमापायी घडलं होतं. बाकीचा विचार करण्याची तिची मनस्थितीच नव्हती. जवळपास पाऊण तास केतन स्वप्नाशी बोलला.
केतनने मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाला,”श्रुती, स्वप्ना इज परफेक्टली ऑल राईट! तिच्याकडून एक छोटीशी चूक झालीय पण ती आता आपण सगळेच विसरू. आत्ता माझ्याशी स्वप्ना किती छान बोलली. शी इज अ वाईज गर्ल! आणि ती रोज सकाळी माझ्याकडे थेरपीसाठी येणार आहे. राईट स्वप्ना?”
स्वप्नाने अगदी लगेच होकार दिला. मी सुस्कारा सोडला. स्वप्नाला तिच्या घरी सोडलं आणि घरी आल्यावर मी केतनला फोन केला.
“केतन,ती एकटी येऊ शकणार नाही. आत्ता सुद्धा ती घरात एकटी आहे तर मला भीती वाटतेय. परत काहीतरी आक्रस्ताळेपणा केला तर?”
“थोडे दिवस तुला शक्य होईल तेव्हा तिच्याबरोबर ये पण आता ती तसं काही करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर! त्या क्षणी तिने ते रागाच्या भरात केलं पण नंतर ती इतके दिवस घरात एकटी असताना,तिने काहीही केलं नाही. तशी ती समंजस आहे ग! पण हे वय,प्रेमाची तीव्रता,एखादी व्यक्ती जिवापलीकडे आवडणं,त्याच्याशिवाय आयुष्य व्यर्थ आहे…हेच सगळं ह्या व्यक्तींमध्ये असतं. त्यातून त्यांना बाहेर काढणं हे एक स्किल आहे, अवघड आहे पण अशक्य नाही. सो,बिलिव्ह मी अँड डोन्ट वरी!”
केतनच्या शब्दांनी मला खूप धीर आला. स्वप्नाच्या आयुष्यात आता ह्यापुढे खूप चांगलं होणार असंच माझं मन मला सांगतंय…….!
***
आठ दिवस मी स्वप्नाबरोबर केतनकडे सिटिंगला गेले. तिचं नैराश्य कमी होत नव्हतं. केतनचा मला एकदा फोन आला.
“श्रुती,स्वप्ना रितेशला विसरायला तयारच नाही. अनेक तऱ्हेने तिला मी समजावलं. पण फार जास्त गुंतली होती रितेशमध्ये! वेळ लागेल जरा!
आणि तुला आई-पप्पांनी घरी बोलावलं आहे. मी त्यांना सांगितल्यावर त्यांना तुझं नाव लगेच लक्षात आलं. नाटकाची प्रॅक्टिस दोन तीन वेळा माझ्याच घरी झाली होती ना!”
“काय प्रशस्त फ्लॅट आहे तुमचा!”
“होता,तो विकून मी आता बावधनला रो हाऊस घेतलंय.कधी येतेस तू? आणि तुझ्या मिस्टरांना पण घेऊन ये. काय नाव त्यांचं?”
“प्रयाग त्याच नाव! येईन मी नक्की! काका-काकूंना नमस्कार सांग.” केतनविषयी मी त्याला इतर काही विचारलंच नाही. भेटीतच बोलू असं ठरवलं.
एक दिवस वेळ काढून केतनकडे गेले. काका-काकूंनी छान स्वागत केलं. जुन्या नाटकाच्या तालमींच्या आठवणीत मी आणि केतन रंगून गेलो. काका-काकू आत गेल्यावर मी केतनला विचारलं,”केतन,लग्न केलंस ना?”
“हो केलं ना! पाच वर्षांचा मुलगा आहे मला! पाचगणीला हॉस्टेलमध्ये असतो.”
“होस्टेलमध्ये? का? आणि तुझी पत्नी?”
“डीव्होर्स झालाय माझा श्रुती! पण मी दुःखी वगैरे अजिबात नाही हं! इट हॅप्पन्स! ओढून ताणून संसार करण्यापेक्षा, वेगळं होऊन दोघांनीही आनंदी रहावं!” केतन हसत बोलला.
“तुझ्यासारखा इतका हुशार,स्वभावाने इतका चांगला, नावाजलेल्या डॉक्टरशी जुळवून नाही घेता आलं तिला?”
“श्रुती,तुला जे चांगलं वाटलं ते तिला नसेल वाटलं कदाचित! प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत वेगळी असते. हजारो केसेस मी हाताळल्या आहेत. ब्रेकअप, डिव्होर्स, जॉब स्ट्रेस! तुला माहितीय हल्ली उगाचच नैराश्य पण येतं. ते सुख बोचतं म्हणतात ना,तसलं काहीसं! शिरीनची विचार करण्याची पद्धत सर्व सामान्य मुलींसारखी नव्हतीच. शिरीन…माय एक्स वाईफ! शिरीन सुद्धा मानसोपचारतज्ञ आहे. एका सेमिनारमध्ये आमची ओळख झाली होती. ती पारशी होती पण धर्म आमच्या नात्यात कधीच आला नाही. सुरवातीची दोन वर्षे छान गेली. मग छोट्या गोष्टींवरून मतभेद! शिरीन खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. तिच्या स्वभावाविरुद्ध तिला काही गोष्टी जुळवून घेता आल्या नाही. आम्ही दोघेही मानसोपचार तज्ञ त्यामुळे कोण कोणाला समजवणार? वी ट्राईड अवर बेस्ट! खूप ताणून धरण्यात अर्थ नसतो. म्युच्युअली वेगळे झालो. मुलगा तिच्याजवळ आहे. भेटतो मी अधून मधून! मानसोपचार तज्ञ शेवटी माणूसच आहे. त्याच्या आयुष्यात पण प्रोब्लेम्स असतातच. फरगेट इट! मस्त कॉफी घेऊया परत!”
“केतन,स्वप्ना कशी आहे? थोडीतरी त्यातून बाहेर पडलीय का?”
“तिला थेरपीज सुरू केल्या आहेत. करेल ती मूव्ह ऑन! नकारात्मक विचार बाजूला करणे, इतर पर्सनल समस्यांवर लक्ष केंद्रित करणे हे करण्यासाठी प्रवृत्त करावं लागतं.
‘सोशल सपोर्ट’ ही एक थेरपी असते. त्यात कुटुंबाच्या व्यक्तींबरोबर संवाद साधणे,एकटं न राहता,
मित्र-मैत्रिणींच्या सहवासात सतत राहणे.
‘अलॉइंग इमोशन्स’ ह्या थेरपीत स्वतःच्या भावना प्रकट करून मोकळं व्हायचं पण त्यात अडकून राहायचं नाही.
‘सपोर्ट गृप्स’ मध्ये सामील होऊन तिथे तुमच्यासारख्या अनुभवातून काही लोक गेले असतात, त्यांच्याशी संवाद साधून आपलं दुःख हलकं करणे.
‘फोकस ऑन ग्रोथ’ म्हणजे त्या वाईट अनुभवातून बाहेर पडून स्वतःचा विकास कसा होईल ह्यावर भर द्यायचा,ज्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्वतःला दोष न देता,ब्रेकअप ही शिकण्याची एक संधी म्हणून बघायचं. ह्याशिवाय ध्यान-धारणा, एखादा पाळीव प्राणी घरात आणणे, ज्यात तुम्ही गुंतून राहता. तरी एक गोष्ट चांगली आहे स्वप्ना जॉब करतेय.
त्या व्यक्तीविषयी कुठलंही कलुषित मत न ठेवता,तिच्यापासून दूर जाणं हे कठीण आहे पण पुढचं आयुष्य छान जाण्यासाठी ते साध्य करावं लागतं. अँड आय एम शुअर,स्वप्ना विल डू इट”!
स्वप्नाला एका योग्य डॉक्टरच्या हाती मी सोपवलंय ह्याचं मानसिक समाधान मला होतंच. महिन्याने स्वप्ना ऑफिसमध्ये आली. खूप शांत,प्रगल्भ वाटत होती. अजून काही महिने तिला औषधं घ्यायची होती. हळूहळू कामात व्यवस्थित लक्ष घालायला लागली. तिच्या बोलण्यात कधीतरी रितेश यायचाच. तो परत येईल, काहीतरी अचानक घडून दोघे परत येतील हे अजूनही तिच्या मनात होतंच. पण मला केतनने सांगितलं होतं,तिने तो विषय काढला की तो वाढवायचा नाही. तिला अलगद त्यातून बाहेर काढून दुसऱ्या विषयावर बोलायचं.
बदलत होती स्वप्ना…एकेक नकारात्मकतेची पायरी मागे टाकत आत्तापर्यंत कधी न पाहिलेली स्वप्ना मी अनुभवत होते. तिची काळजी घेणारा, तिला समजून घेणारा लाईफ पार्टनर आता तिच्या आयुष्यात यायला हवा होता. आणि तो नक्की येईल ह्याची मला खात्री होती…!
★केतन★
समीराने इन्टरकॉमवर सांगितलं,”सर, मिस राही आज येऊ शकत नाही. शी इज नॉट फीलिंग वेल!”
“ओके,पुढचा पेशंट पाठव.”
माझा डॉक्टरी व्यवसाय सांभाळून मी कॉन्सल्लिंग करत होतो. मानवी स्वभाव,मानवी मन वाचायची मला लहानपणापासूनच आवड होती. शाळेत असताना कित्येकदा मी मित्रांना,कोणी अपसेट झालं की छान समजावून सांगायचो. ती क्वालिटी माझ्यात तेव्हापासूनच होती.
राही शर्मा…दोन वर्ष अफेअर होतं आणि मुलाने अचानक ब्रेकअप केलं. डीप फ्रस्ट्रेशनमध्ये गेली होती.फक्त भकास नजरेने माझ्याकडे बघायची. प्रत्येक सिटिंगला तिची आई रडायची. राही अतिशय बुद्धीमान होती आणि म्हणूनच जास्त सेन्सिटिव्ह होती.
स्वप्ना आठवली! दोन वर्षांपूर्वी अशीच हताश चेहऱ्याने माझ्या क्लिनिकमध्ये आलेली! मोबाईल रिंग वाजली आणि बघितलं,घरून फोन होता.
“केतन,किती वाजतील घरी यायला? लक्षात आहे ना आज काय आहे ते! आज तरी लवकर घरी ये. आम्ही वाट बघतोय.”
घरी परत जाताना वाटेत एक फुलांचा गुच्छ घेतला. टवटवीत लाल गुलाब! आईस्क्रीमचा पॅक घेतला. गाडी पार्क केली आणि बघितलं तर दार उघडं होतं. मी आत आलो.
“केतन,सरप्राईज आहे तुझ्यासाठी!”
मी बघितलं तर आतून राहुल धावत आला आणि मला मिठी मारत म्हणाला,”पपा, लव्ह यू!”
“लव्ह यू बेटा, पण तू कधी आलास?”
“सकाळी, तू क्लिनिकमध्ये गेल्यावर!”
मी हातातला बुके माझ्या अर्धांगिनीला दिला आणि तिला जवळ घेत म्हणालो,”हॅपी बर्थडे स्वप्ना!”
स्वप्नाला मला बिलगली,तशीच जशी एक वर्षापूर्वी मला रडत एकदा बिलगली होती. तेव्हाच मनात आलं,हिला आधार हवाय आणि तो द्यावा. अनेक लेडी पेशंट्स मी बरे केले होते पण स्वप्नाबद्दल एक जिव्हाळा निर्माण झाला होता. मी हात पुढे केला. तिनेही विचार करून होकार दिला. राहुलवर मनापासून प्रेम करणारी त्याची दुसरी आई झाली.
आम्ही दोघेही एकमेकांचे जीवनसाथी होतो हे विधिलिखित होतं. स्वप्नाच्या आयुष्याची वळणं घेत असलेली वाट आता स्थिरावली होती आणि त्या वाटेवरचे अडथळे ह्यापुढे बाजूला करणं हे माझं कर्तव्य होतं…….!
★समाप्त★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
