वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा करायची संधी© सदानंद देशपांडे 6 जानेवारी 2026
हल्ली, म्हणजे नोकरीतून कायमस्वरूपी रजा घेतल्यानंतर वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा करायची मला संधी मिळतेय. मागच्या वर्षी वृद्धांच्या एका डे केअर मध्ये जाऊन तिथल्या वृद्धांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.
त्यांच्यासमवेत जेवण करून त्यांना काही विनोद ऐकवले होते. गाणी म्हटली होती. मग त्यांचा प्रेमभराने निरोप घेऊन पावले दिनानाथ रुग्णालयात वळली होती. तेथे रक्तदान करून घरी आलो. आणि थोडी विश्रांती घेऊन मग सोसायटीतल्या वृद्धांना भेटलो होतो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे वृद्ध घराबाहेर पडू शकत नव्हते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची विचारपूस केली होती. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद टिपकागदासारखा टिपला नि घरी पत्नीने केलेल्या स्वादिष्ट जेवणावर ताव मारून कुटुंबियांबरोबर गपाष्टक केलं होतं.
यावेळीही काही साध्या सोप्या संकल्पना मनात होत्याच. संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे हॉटेलात जाऊन जेवण करणं किंवा
घरातही काही भोजनाचे संकल्प करू शकत नव्हतो. मग काय करू शकणार होतो?
रक्तदान तर जवळजवळ दरवेळीचा पायंडा होताच पण मग त्या व्यतिरिक्त काय करावं.. बरं?
रक्तदान केल्यावर रुग्णालयाने छोटंसं खानपान दिलं. पण उपवास असल्याने त्याचं करावं असा विचार केला व तो एका पिशवीत गोळा केला नि बाहेर पडलो.
पौड रस्त्यावरून घरी जाताना ए.आर.ए.आय. च्या प्रवेशासमोर एक कळकट झोपडपट्टी लागते. रा. स्व. संघात खरं तर झोपडपट्टी न संबोधता सेवावस्ती म्हणतात. या झोपडपट्टीत कचरा वेचणारे, भंगारवाले असे लोक राहतात. त्यांच्याकरता काही गोड पदार्थ एका स्वीटमार्टमधून विकत घेतले. काही दिवसांपूर्वी याच झोपडपट्टीत जुने कपडे नि काही वस्तू जाऊन वाटल्या होत्या. समवेत माझ्या धाकट्या मुलीलाही नेले होते.. कपडे घ्यायला आलेली झुंबड पाहून नि त्या शांतपणे वाटताना मला पाहून तीही अचंबित झाली होती.
आज मात्र दुपारी गेलो. गोड खाऊ वाटत असताना नेहमीची झुंबड नव्हती. एक दोन मुलं नि काही बायका आणि काही वयस्कर लोक लगाबगा आली. काही छोट्या मुलीही आल्या. मी विचारले आज एवढी कमी मुले कशी तर त्यातला एकजण म्हणाला, अहो काका, शाळा आहे आज, तिकडं गेली आहेत. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद मनाच्या खिशात ठेवला व तिथून बाहेर पडलो.
थोडं पुढं गेल्यावर लक्षात आलं की रूग्णालयाचे खाद्यपदार्थ दुचाकीच्या डिकीत तसेच राहिले आहेत. कुणाला द्यावेत असा विचार करत असताना रस्त्याच्या कडेला बसलेला एक चर्मकार दिसला. तो जेवणच करत होता. कुतुहलाने त्याला पाहात उभा राहिलो. त्याच्या डब्यात एक कोरडी पोळी नि एक रस्सा भाजी असावी. त्या पोळीचे तुकडे तो मधूनच थोड्या अंतरावरच्या कावळ्यांना टाकत जेवत होता. तो मी दिलेला पदार्थ घेईल का या शंकेतच त्याला विचारण्याचे धाडस केलं. दादा, पावाचं सँडवीच हवं का असं विचारताच त्यानं कोरड्या नजरेनं माझ्याकडं बघीतलं. मी त्याला म्हणलं, दादा शिळं नाही, ताजं आहे. असं म्हटल्यावर त्यानं मान डोलावली.
त्याला ते दिलं, त्याबरोबरच त्यानं ते पाकीट उघडलं नि लगेच खायला सुरूवात केली… चला, दुसरं समाधान घेऊन घरी आलो, नि दिवस चांगला गेल्याचं समाधान उराशी ठेवून राहिलेला दिवस शुभेच्छांचा फोन नि मेसेज घेऊन संपवला.
© सदानंद देशपांडे
6 जानेवारी 2026

