
मदतीचा हात — मनाली पेंडसे १७ / ४ / २०२५
कुठल्या वळणावर कशी माणसं भेटतील हे आपल्याला माहीत नसतं. येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, नेहमीप्रमाणे गजर वाजला आणि स्मिताला जाग आली. स्मिताला रोजच लवकर उठायची सवय होती ;पण आज तिला उठायचा कंटाळा आला होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा पाऊस पडत होता. तिला उबेत पडून राहायचं होतं पण ते शक्य नव्हतं. ऑफिसची कामं समोर दिसत होती आणि तिला आईकडे जेवायला जायचं होतं कारण आज श्रावणी शुक्रवार होता.
स्मिता आळस झटकून उठली. नित्यनियमाने देवासमोर दिवा लावला, नमस्कार केला आणि ओट्याकडे वळली एकीकडे चहा ठेवला, दूध तापायला ठेवले, भाजी चिरली, कणिक मळून ठेवली, तितक्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, “अगं, स्मिता ! बाहेर पाऊस किती पडतोय, हवेत थंडावा पण जाणवतोय. तू आज ऑफिसला नाही गेलीस तर चालणार नाही का ? ”
“अहो आई, आज खूप काम आहे ऑफिसमध्ये आणि मला आज जेवायला आईकडे जायचं आहे. त्यामुळे जावं तर लागणारं आहेच. कदाचित मी निघेपर्यंत पाऊस थांबेलही.” स्मिता म्हणाली.
गप्पा मारता मारता दोघींचा चहा पिऊन झाला आणि स्मिता कामाला लागली पोळी भाजी तयार झाली. ओटा आवरून चकचकीत करून ठेवला. स्मिताचं नुकतंच लग्नं झालं होतं. जेमतेम दोन महिने झाले होते. स्मिता दिसायला जरी सावळी असली तरी मनाने खूप चांगली होती. देव भक्त होती, स्वभाव निर्मळ आणि शांत होता. सगळ्यांना समजून घेणारी होती. उंच आणि मध्यम बांध्याची होती. घरात सासू, सासरे आणि नवरा अस चौकोनी आणि सुखी कुटुंब होते.
सगळे जण एकमेकांना धरून होते, नवीनच लग्न आणि घरात मुलगी नसल्याने सासू सासऱ्यांची लाडकी होती. स्मिता घरची आणि बाहेरची कामं करण्यात पटाईत होती. घरच्यांना तिचं खूप कौतुक वाटायचं. सासरे आणि सासूबाई नोकरीमधून निवृत्त झाले होते. स्मिताचा नवरा दिलीप एका कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. स्मिता पण एका कंपनीत मॅनेजर पदावर होती. आज दिलीप घरूनच काम करणार होता पण स्मिताला मात्र ऑफिसला जावं लागणार होतं. घरातल्यांचा निरोप घेउन आणि येताना आईकडे जाऊन मगच घरी येईन असं सांगून ती निघाली.
पावसामुळे ट्रेन धीम्या गतीने धावत होत्या. काही ठिकाणी पाणी तुंबले होतं. स्मिताला ऑफिसमध्ये पोचायला थोडा उशीर झाला होता. तिचे इतर सहकारी पण उशिराच येत होते. स्मिता ऑफिसमध्ये पोचली, सकाळपासुन थोडा थोडा पाऊस पडतच होता. पण पाणी तुंबेल असं काही वाटत नव्हतं.
दुपारनंतर मात्र पावसाने जोर पकडला, पावसाचा मूड काहीसा वेगळाच होता. जणू आज त्याला त्याची आई ओरडली असावी इतक्या जोरात पडत होता. ढगांचा गडगडाट, मधूनच विजा चमकत होत्या हवेत गारवा असला तरी वातावरण भीतीदायक झालं होतं. शिपायांची कुजबुज कानावर पडत होती. ट्रेन बंद झाल्या आहेत, ट्रॅफिक जॅम झालंय, पाणी तुंबलंय हे ऐकून स्मिताच्या अंगावर काटा येत होता. स्मिताच्या मनात विचार आला की आईला फोन करून सांगावं की आज मी काही येत नाही, घरीच जाते.
स्मिताचं घर अंधेरीला होतं आणि आई दादरला राहत होती. तितक्यात आईचा फोन आला, “अगं, बातम्यांमध्ये दाखवत आहेत ट्रेन बंद झाल्या आहेत, रस्त्यांवर पाणी तुंबलय. कशी येणार आहेस? तू बघं जमत असेल तरच ये नाहीतर सरळ घरीच जा.” ती म्हणाली, “हो, काम संपलं की निघणारच आहे. नको काळजी करू ” असं म्हणून तिने फोन ठेवला.
पुढच्या पाचव्या मिनिटाला तिच्या घरून फोन आला, “अगं, स्मिता पाणी तुंबलय, ट्रेन बंद झाल्या आहेत तू ऑफिसमधून निघ आणि दादरला आईकडे जा. कारण दादरच्या पुढे गाड्या बंद आहेत.”
ती हो म्हणाली आणि फोन ठेवला
स्मिताने घरच्यांना सांगितलं खरं की काळजी करू नका, पण स्मिता स्वतः आतून घाबरली होती. ऑफिसमधून सगळेच निघायच्या तयारीत होते. सगळ्यांबरोबर स्मिताही निघाली. पण तेवढ्यात नारायण शिपाई म्हणाला, “मॅडम ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे ट्रेन बंद झाल्या आहेत, ट्रॅफिक भरपूर आहे, सगळीकडे पाणी तुंबल आहे तुम्हाला घरी चालत जावं लागेल.”
बापरे! स्मिताच्या डोळ्यासमोर काजवे चमकावेत असं काहीसं झालं. मनात क्षणभर विचित्र विचार येऊ लागले, मेंदू काम करेनासा झाला तेवढ्यात नारायण म्हणाला, “मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे? ती म्हणाली, ” मला दादरला आईकडे जायचं आहे. ”
नारायण म्हणाला, “ठीक आहे. मी लालबागपर्यंत तुमच्याबरोबर आहे, आपण चालायला सुरुवात करूया बघू कुठपर्यंत जाता येतं ते.”
आम्ही चालायला सुरुवात केली खरी पण ते वातावरण बघून अजूनच भीती वाटली.
आज अख्खी मुंबई रस्त्यावर होती अस म्हटलं तरी चालेल. प्रत्येक जण एकमेकांना माणुसकीच्या नात्याने मदत करत होता. खरंच, साध्या रस्त्यावर चालणं सोप असतं पण तुंबलेल्या पाण्यातून चालणं महाकठीण. चालताना स्मिताचे पाय भरून येत होते. पण चालणं तर आवश्यक होतं.
ठिकठिकाणी गटारं उघडी ठेवली होती पाण्याचा निचरा होण्यासाठी पण पाणी कमी होत नव्हतं. उलट माणसं वाहून जाण्याची भीती होती त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना सांगत, आधार देत मदत करत होते. स्मिताने टेलिफोन बूथवरून घरी फोन लावायचा प्रयत्न केला पण लागत नव्हता. नारायण स्मिताबरोबरच चालत होता तो मधेच सांगत होता मॅडम सावकाश चला.”
स्मिता आणि नारायण दुपारी चार वाजता वी. टी स्टेशन वरून निघाले होते. अडचणींना तोंड देत देत रात्री 1 वाजता ते लालबागला पोचले. स्मिताला आता पावलं टाकणं जड झालं होत तरी ती चालत होती. अजून परीक्षा काही संपली नव्हती. तिला पोचायचं होतं दादरला आणि नारायण राहणारा लालबागला. स्मिता विचारच करत होती की नारायण घरी गेला तर मी पुढे दादरपर्यंत कशी पोचणार. तितक्यात नारायण म्हणाला, “मॅडम माझं घर आलंय तुम्ही माझ्या घरी चला, थोडी विश्रांती घ्या मग मी तुम्हाला दादरला सोडतो. “नारायणने स्मिताप्रति दाखवलेली माणुसकी होती. स्मिता त्याला परोपरीने सांगत होती की तू घरी जा तुझी आई देखील वाट बघत असेल. त्यावर तो म्हणाला की मॅडम मी तुम्हाला असच सोडलं तर माझी आई माझ्यावर रागवेल, ओरडेल. शेवटी स्मिता त्याच्याबरोबर घरी गेली .
नारायणचं ते वाक्य ऐकून स्मिताला देव आपल्या पाठीशी आहे याची जाणीव झाली. नारायणच्या घरी गेल्यावर त्याने सगळ्यांशी ओळख करून दिली. नारायणची आई बोलायला छान होती. तिच्या बोलण्यातून आपलेपणा जाणवतं होता. नारायणचं घर छोटं असलं तरी मन मात्र मोठ होतं. घर टापटीप आणि स्वच्छ होतं, हे बघूनच स्मिताला प्रसन्न वाटलं. लगेच त्याच्या आईने गरम चहा आणून दिला आणि तिला खायला दिले.
स्मिता नको म्हणत होती पण नारायणची आई ऐकेनाच. ती म्हणाली, “पोरी ! इतक्या लांबून पाण्यातून चालत आलीस आणि अजून पुढे चालत जायचं आहे थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल आणि अंगात ताकद येईल. ” ते बोलणं ऐकून स्मिताच्या डोळ्यात पाणी तरळलं. नारायणची आई म्हणजे जणू सासूबाई आणि आईचं प्रतीकच होत्या. तिनेही त्यांचा आदर राखला आणि खाऊन घेतलं, थोडा आराम झाल्यावर नारायणच्या आईचा निरोप घेऊन स्मिता निघाली लगेच नारायण म्हणाला, “थांबा मॅडम मी येतो सोडायला.”
इतका वेळ नारायणच्या घरी आराम केला तरी तुंबलेलं पाणी काही कमी झाल नव्हतं. पुन्हा लालबाग ते दादर पाण्यातून चालत, वाट काढत एकदाची स्मिता पहाटे 5 वाजता दादरला तिच्या आईच्या घरी सुखरूप पोहोचली. तिचं घरापर्यंत सुखरूप पोचणं यात नारायणाचा हातभार होता हे नक्की. आई आणि स्मिताची भेट झाल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आलं.
आई म्हणाली, “रात्र भर तुझ्या काळजीने ग्रासले होते. तुला बघितलं आणि भांड्यात जीव पडला.” तिकडे तिच्या सासूबाई, सासरे, दिलीप पण वाट बघत होते. स्मिताच्या आईने दिलीपला फोन करून सांगितले स्मिता सुखरूप घरी आली आहे.
स्मिताने देवासमोर हात जोडले आणि प्रार्थना केली देवा आज जर मला मदतीचा हात मिळाला नसता तर अख्खी रात्र ऑफिसमध्ये घालवावी लागली असती. कोण कुठला नारायण माझी मदत करायला तयार झाला. काय होता त्याचा माझा संबंध! संबंध एकच होता तो म्हणजे माणुसकीचा. स्मिता आईला म्हणाली, “आई! परमेश्वरावर भरवसा असेल तर तो आपल्याला कोणत्याही रूपात येऊन मदत करतो. ”
@ सौ. मनाली पेंडसे … पुणे
टीप: ( आवडल्यास सामायिक करतांना मुळ कथेत कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासकट सामायिक करावी ही विनंती)
मदतीचा हात — मनाली पेंडसे १७ / ४ / २०२५



मस्त 👌
त्या दिवसाच्या आठवणी जाग्या झाल्या!!