मंथन (विचार)

नारळ …… सचिन मधुकर परांजपे सत्यघटनेवर आधारीत सूनंदा मधूकर चितळे पूणे

नारळ …… 🌴🌴

सचिन मधुकर परांजपे
सत्यघटनेवर आधारीत

सूनंदा मधूकर चितळे पूणे

हक्कसोडपत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदरानं डोळे पुसले. दोन एकराच्या तुकड्यातली चिमूटभर जमीन विकण्याशिवाय शांतारामला गत्यंतर नव्हते.

अंबीचं सासर खाऊन पिऊन सुखी होतं पण भाऊ अठरा विश्वे दारिद्र्यात. भाऊ दांडेकराला जमीन विकणं क्रमप्राप्त होतं. हक्कसोडपत्रावर सही हवी अंबीची, त्याशिवाय जमीन खरिदणार नाही असा भाऊचा कडक नियम होता.

आता जेमतेम दोन एकराचा विश्वंभराच्या घाटीजवळचा तुकडा शांतारामकडे उरलेला होता. हक्कसोडपत्रावर सही करताना प्रॉपर्टीतला वाटा गेल्याचं दुःखं अंबीला अजिबात नव्हतं पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा झालं होतं.

शांतारामची बायको पुढे आली, अंबीवन्सं हक्कसोड झाली म्हणून नाती तुटली नाहीत हो. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी बोलले यांना. पाटील मास्तरांच्या हद्दीजवळची म्हणजे तलावा शेजारची दोन नारळाची झाडं आजपासून तुमची हो. जे काही नारळ येतील वर्षाचे ते हक्काने घेत चला. आम्ही पूजेला ही त्यातला नारळ घेणार नाही बघा.

शिवाय वाडी शेती तुमच्या भावाचीच आहे. कधी ही या, पिकेल त्यातली मुठभर सुपारी आणि पायली दोन पायली भात मला जड नाही हो. अंबीने डोळे पुसले आणि पुढची बरीच वर्षे अंबी त्या दोन नारळांचे नारळ घेत गेली.

परिस्थिती पालटली. अंबीच्या भरल्या घराला दृष्ट लागली. सासरी ही टिचभर जमीन उरली. भक्कम सासऱ्यापाठोपाठ कर्तासरवता नवराही गेला. पदरी दोन मुली घेऊन अंबी खटपटीनं संसार करत होती. शांतारामानं त्या दोन नारळाच्या नारळांना कधी हात ही लावला नाही.

वाडीतून मारत्या आला आणि हातात चारपाच नारळ दिसले की शांताराम विचारायचा कुठले रे ? मारत्या म्हणायचा, दादा, तलावा जवळचे जुळे भाऊ नारळ बाणवली. पाटील मास्तरच्या वईजवळचे. खाली पडलेले.

मग शांताराम म्हणे, रांडेच्या, ते बहिणीला दिलेत मी. असाच उलटपावली अंबीकडे जा. तिला नारळ दे आणि म्हणावं कोती तयार झालीयेत. पाडून घे म्हणावं मग मारत्या तसाच दोन मैलावर अंबीकडे जाई.

काळ पुढे सरकत होता. अंबी गेली. जाण्याआधी शांतारामच्या संमतीने नारळांचे हक्क तिच्या मुलींकडे दिलेन. मोठी माई आणि धाकटी ताई. मग दोघी वहिवाटीचे नारळ घेत होत्या. शांताराम भाच्यांसाठी आनंदी होता. ताई गेली तरी ऋणानुबंध घट्ट होते. नारळांचं निमित्त होतं.

मधे बरीच घटनांची मांदियाळी घडली. ताई आणि माई शहरात गेल्या. शांताराम गेला. मुलगा वाडी बघू लागला आणि वादळात उरलेल्या पंचवीसेक नारळांसोबत हे दोघे नारळ ही गेले. ऋणानुबंध विसविशीत झाले. रक्ताच्या नात्यांना पुढच्या पिढीत अनोळखी गंध आले. चेहरे अपरिचित झाले. जुने करारमदार त्या माणसांसोबतच गेले.

ताई आणि माई आता मुंबईत पेन्शनीत आल्या. दोघींच्या सासुरवाड्या जवळच होत्या. एकदा एकेक चेक आणि एक पत्र दोघींच्या पत्त्यावर आलं. चेकवर पाच पाच हजाराचे आकडे होते आणि पत्रातला मजकूर होता.

नमस्कार,
मी निलेश. शांताराम जोश्यांचा नातू. म्हणजे तुमचा लांबचा भाचा. बाबांना आजोबांच्या पश्चात वाडीशेती जमली नाही. ती आता मी करतो आहे. आपली जुनी वाडी आता मी गेली काही वर्षे नव्याने डेव्हलप केली आहे. एकदा जुन्या कागदपत्रांची तपासणी करताना. आजोबांनी वहिवाटीने अंबीआजीला दोन नारळाची झाडे उत्पन्नासह दिल्याचा उल्लेख आढळला.

काही वर्षे ती वहिवाट सुरु होती. आज अंबीने नारळ उतरवले. अप्पा पाटलांनी नारळांचे रोख चौतिस रुपये दिले वगैरे उल्लेख आजोबांच्या जुन्या वहीत होते. नंतर वादळाने झाडं भुईसपाट झाली आणि परंपरा बंद झाली. नातीगोती दुरावली. आपलाही परिचय नाही. म्हणून मीच माझ्या बुद्धीने नवीन वाडीतील दोन खास कलमी नारळाची झाडे उत्पन्नासह तुम्हाला देत आहे.

तुम्हाला इथे येऊन उस्तवार करणं शक्य नसल्याने मीच त्या दोन्ही झाडांचे नारळ उतरवून पैसे वार्षिक पाठवत जाईन. आज ही मी हेच म्हणेन की तुम्हाला दोन्ही आत्यांना माहेरची कमतरता भासली तर कधीही इथे या. कितीही दिवस माहेरपणाला रहा. तुमची झाडं बघा. त्यांना खतपाणी घालायला तरी या असं मला मनापासून वाटते. खाली नंबर दिला आहे. पत्र आणि चेक मिळाल्यावर अवश्य फोन करा.

निलेश

दोघींनी साश्रू अंतःकरणानी ते पत्र उराशी कवटाळून धरलं. ज्यांनी करारमदार केले आणि ज्यांना ऋणानुबंधाचे धागे शेवटपर्यंत घट्ट ठेवायचे होते ती सगळी मंडळी आज निजधामाला गेली असली तरी ही परंपरांचे प्रवाह मात्र आज ही अखंडीत होते

सचिन मधुकर परांजपे
सत्यघटनेवर आधारीत

सूनंदा मधूकर चितळे पूणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}