-लघुकथा– –सचिन देशपांडे कथाविश्व – आपले कथांचे अनोखे विश्व
–लघुकथा– –सचिन देशपांडे
कथाविश्व – आपले कथांचे अनोखे विश्व 🎉
#कथाविश्व
रात्री तो लेकाच्या खोलीत गेला. वाटीतून आणलेलं खोबरेल तेल त्याने, लेकाच्या गालावर अगदी हलक्या हाताने चोळलं. अजूनही त्याची बोटं उमटलेली दिसत होती, गाढ झोपलेल्या लेकाच्या गालावर.
.
.
.
आॅफिसमधून येतच होता तो की… गेटवर त्याला कंप्लेट आली होती त्याच्या लेकाबद्दल, त्याने आज केलेल्या मारामारीची. बिल्डिंगमधल्याच एका मुलाचा, शर्ट फाटला होता त्यात. डोक्यात राग घेऊनच तो घरी आला. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा लेकाने पाणी आणलं त्याला, तेव्हा ते उडवत… दोन थोबाडीत दिल्या होत्या ठेऊन त्याने लेकाच्या. लेक काहीही न खाता पिताच, झोपी गेला होता मग.
“फक्त आठवीत आहे हा. इतक्या लहान वयात मारामारीची रग, येतेच कुठून अंगात मी म्हणतो. गुंड होणारेय का हा, मोठा झाल्यावर?”.
स्वगत सुरु होतं… अस्वस्थ होऊन चुळबूळ करत, सोफ्यावर बसलेल्या त्याचं. त्याची बायको येऊन बसली त्याच्या जवळ, आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाली त्याला…
“कोणा मुलाला इतका बेदम चोप द्यायची रग, कुठून बरं आली आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या लेकात? हा खरंच गंभिर प्रश्नच आहे. पण मग आणिक एक प्रश्न पडायला हवा होता अरे तुला. जो तुला पडलेलाच नाहीये कारण, पुर्णसत्य तुझ्या कानांवर आलेलंच नाही. आणि तो दुसरा प्रश्न म्हणजे… फक्त आठवीतल्या आपल्या लेकाला, एखाद्या मुलीच्या शीलाचं रक्षण करण्याची समज… नेमकी कुठून आली? एखाद्या कोणाला मारणं, हा उपाय शोधला होता त्याने अरे… त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्येचा. आणि तुला फक्त त्याने अवलंबलेला उपायच कळला… त्या आधी त्याने केलेलं, त्या समस्येचं निवारण नाही समजलं. त्याच्याच वर्गातली बाजूच्या विंगमध्ये रहाणारी एक मुलगी, सायकल चालवतांना चांगलीच पडली… आणि सरपटतच पुढे गेली. तिचा ड्रेस पुर्णपणे फाटला, आणि तिची अंडर गारमेंट्स दिसू लागली त्यातून. तेव्हा तिला उठून उभं रहाण्यासाठी दिलेला, तिच्याच विंगमध्ये रहाणार्या त्या दोघांचा मदतीचा हात… तिच्या अंगाच्या नको त्या भागांवरुन फिरु लागला. ती बावरुन प्रतिकार करु लागली, पण दहावीतल्या दोन मुलांपुढे… काय चालणार होतं तिचं एकटीचं? तेव्हा आपला हा लेक, एकटा त्यांना भिडला. अरे तू जाणतोसच हा इतका लाजाळू आहे की, घरीही उघडा बसत नाही आपल्यासमोर. पण ह्याच आपल्या लाजाळू लेकाने, स्वतःचा टी-शर्ट काढून त्या मुलीला घालायला देत… तिची लाज झाकली. आणि मग आधी बोला-चालीवरुन हमरी-तुमरीवर येत, झाली मारामारीला सुरुवात त्यांच्यात. सिक्युरीटी वाल्यांनी मध्ये पडत, सोडवली मग मारामारी कशीबशी. त्या दोन मुलांपैकी एकाचा शर्ट फाटला, ते तुला सांगितलं कोणीतरी. पण आपल्या लेकाच्या उघड्या अंगावर, उठलेल्या वळांबद्दल बोललं का कोणी तुला? तू यायच्या अगदी तासभर आधी, त्या मुलीचे आई – बाबा आले होते आपल्याकडे. फक्त हात जोडले दोघांनी मला दारातूनच, आणि निघून गेले ते वहाणार्या डोळ्यांनी. आपल्या लेकाचा तो टी-शर्ट, घट्ट धरला होता छातीशी त्या बाईंनी. पण त्यांनी तो दिला नाही मला, आणि मी मागितलाही नाही”.
.
.
.
हे सगळं डोक्यात घोळतंच होतं त्याच्या की, लेकाने कूस बदलली. सदरा वर झाल्यामुळे उघड्या पडलेल्या लेकाच्या पाठीवर, लाल – जांभळे वळ दिसले त्याला. त्याने दाटलेल्या गळ्यानेच बायकोला हाक मारत, वाटीत आणिक थोडं तेल घेऊन यायला सांगितलं.
—सचिन देशपांडे
फोटो सौजन्य – pinterest
कथाविश्व – आपले कथांचे अनोखे विश्व 🎉