Classifiedजाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
उगवतीचे रंग अनंत — अमुची ध्येयासक्ती……. विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
उगवतीचे रंग
अनंत अमुची ध्येयासक्ती…
आजच्या लेखातून मी तुमच्यासमोर उलगडणार आहे एका अथक जिद्दीचा प्रवास. आजच्या या लेखाची नायिका आहे सेब्री टेंबरकेन ( Sebria Tenberken ). ही एक जर्मन मुलगी. १९७० मध्ये जन्मलेली. आज पन्नाशीत आहे. पण या पन्नास वर्षांचा तिचा प्रवास तुम्हा आम्हाला थक्क करणारा आहे. अक्षरशः डोंगराएवढी कामगिरी केली या मुलीने. त्याचे झाले असे. लहानपणी सेब्री एकदा बर्फावर स्केटिंग करत असताना तिला एक अपघात झाला. या अपघातात तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. तिच्या आईवडिलांनी तिची दृष्टी जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. विविध डॉक्टर्सना दाखवले. पण त्या सगळ्यांनी त्यांची निराशाच केली. तिची दृष्टी हळूहळू जाईल आणि बारा वर्षांची होईपर्यंत ती पूर्णपणे अंध होईल असे सांगितले. या काळात सेब्री शाळेत जात होती. लिहावाचायाला शिकली होती. तिला ही गोष्ट कशी सांगायची ? आईवडिलांची हिम्मत होत नव्हती. म्हणून तिच्या आईवडिलांनी काही दिवस याबाबत तिला सांगितलेच नाही. पण हळूहळू तिची दृष्टी जाऊ लागली आणि एक दिवस तिच्या आईवडिलांना तिला ही गोष्ट सांगावीच लागली. ती बारा वर्षांची झाली तोपर्यंत तिची दृष्टी पूर्णपणे गेली होती. आणि आतापर्यंत लिहिणारी, वाचणारी, रंगरूप पाहू शकणारी सेब्री अचानक अंधारात ढकलली गेली होती. खरं म्हणजे अंधांच्या जीवनात अंधार असतो असं तुम्ही आम्ही म्हणतो. सेब्रीने या गोष्टीला छेद दिला आहे. इंग्रजीत एक छान वाक्य आहे. ‘ When God closes one door , he opens another . ‘
सेब्रीच्या बाबतीत असंच काहीसं झालं. आता तिचा कान हा तिचा ‘गेटवे टू लाईफ ‘ बनला. तिचे डोळे गेले होते पण मेंदूतील दृष्टिकेंद्र अधिक सक्रिय झालं होतं . त्यामुळे माझं जीवन अधिक ‘ कलरफुल ‘ झालं होतं असं सेब्री म्हणते. आता सेब्रीचे वडील तिला पुस्तकं वाचून दाखवायचे. असंच एकदा त्यांनी एका कृष्णवर्णीय लेखकाने लिहिलेले ‘ Black Is Beautiful ‘ हे पुस्तक वाचून दाखवलं. काळ्या रंगात सुद्धा सौंदर्य असतं याची जाणीव त्यातून तिला झाली. आणि आपल्या अंधपणात सुद्धा असंच काहीसं सौंदर्य दडलेलं असेल. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ती करू लागली. आता तिच्या संवेदना जास्त सूक्ष्म आणि तरल झाल्या होत्या. अंधपणाचा तिला झालेला एक फायदा म्हणजे आता ती समोरच्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत होती. आपण डोळस असलेली माणसे जेव्हा एखादी गोष्ट पाहतो, किंवा ऐकतो तेव्हा आपली नजर समोरच्या दृश्यामुळे विचलित होऊन एकाग्रता कमी होऊ शकते. तिच्या बाबतीत हा प्रश्न आता राहिला नव्हता. आता तिचे कान आणि तिच्या स्पर्शाच्या संवेदना या गोष्टी तिचे डोळे झाल्या होत्या. त्यामुळे मनाच्या नजरेने पाहण्यासाठी ‘ कसं ऐकायचं ‘,
संवाद कसा साधायचा, समोरची गोष्ट कशी जाणून घ्यायची हे ती शिकली. तिची दृष्टी गेल्याचे तेवढे तिला वाईट वाटले नाही की जेवढे लोकांच्या अंध लोकांबद्दल असलेल्या दृष्टिकोनाचे वाटले. अंधांसाठी असलेल्या एका सर्वोत्तम शाळेत तिने प्रवेश घेतला. तेथील शिक्षक अंध मुलांना शिकवण्यासाठी विशेष प्रयत्नशील होते. अभ्यासाच्या विषयांसोबतच साहसी खेळ सुद्धा मुलांना शिकवले जात. असे खेळ की जे विशेषतः अंध मुलांना दृष्टी नसल्याने खेळू दिले जात नाहीत, ते खेळ या शाळेत शिक्षकांनी शिकवले. पुढे इंग्रजी शिकण्यासाठी ती एक वर्ष अमेरिकेला गेली. तिच्या अथक प्रयत्नानंतर तीनचार महिन्यात ती इतर मुलांच्या बरोबरीने इंग्रजीमध्ये तयार झाली. पुढे बॉन विद्यापीठात तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आणि समाजशास्त्र, तत्वज्ञान या विषयांसोबतच तिबेटबद्दल अधिक अभ्यास केला. याच काळात ती मंगोलियन, चिनी भाषा शिकली. तिबेटबद्दलचा तिचा अभ्यास तिला तिबेटची ओढ लावत होता. म्हणून १९९७ मध्ये ती एकटीच तिबेटला आली . तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत विमान प्रवास केला. आणि पुढे दोन आठवडे घोड्यावरून तिबेटमध्ये रपेट मारली आणि तिबेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
१९९८ मध्ये ती तिबेटमध्ये परत आली ते काही एक मनाशी ठरवूनच. इथे तिने अंध मुलांसाठी काम करायचे ठरवले. याच दरम्यान तिची भेट पॉल क्रोनेनबर्ग याच्याशी झाली. दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं. आणि पाच मुलांसह सेब्रीची शाळा सुरु झाली. त्यावेळी तिबेटमध्ये अंधांची शाळा सुरु करणे सोपे नव्हतं. कारण तिबेटी लोक अंधत्व हा एक शाप असून ते मागील जन्मी केलेल्या पापकर्माचं फळ आहे असं मानत होते. त्यामुळे अंध मुलांना शाळेत पाठवण्याचेच काय परंतु जीवन जगण्याचे सारे रस्तेच जणू त्यांनी बंद केले होते. आपल्या मुलांना ते घरात दडवून ठेवत. प्रसंगी पलंगाला बांधून ठेवत. या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत, अंध माणसे पण आयुष्यात काही करून दाखवू शकतात हे सेब्रीने या लोकांना पटवून दिले. हे काम सोपे नव्हते. शिवाय तेथील अधिकारी तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. पण म्हणतात ना की ज्याच्या डोळ्यासमोर ध्येय असते काही करून दाखवण्याचे त्याला माणसेच काय पण निसर्ग, दैव सुद्धा साथ देते.
तिच्या या अथक प्रयत्नांना यश आले. आणि आजपर्यंत तिबेटमध्ये अंधांना शिक्षण देणारी पाच केंद्रे सुरु झाली. या दरम्यान पॉलसोबत तिने तिबेटन अंधांसाठी ब्रेल लिपी विकसित केली. आणि अंधांच्या शैक्षणिक जगतात एक मोठी क्रांती घडवून आणली. पण इथे थांबेल ती सेब्री कसली ? आपल्या कार्याच्या दृष्टीने तिला आणि पॉलला तिबेटमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी त्यांना दुसरी जागा शोधणे भाग होते. आणि अशी जागा त्यांना भारतात आढळली. ती केरळची राजधानी असलेल्या त्रिवेंद्रम किंवा थिरुअनंतपूरममध्ये. हे ठिकाण मध्यवर्ती आणि सर्व दृष्टींनी सोयीचे त्यांना वाटले. या ठिकाणी त्यांनी ‘ कंथारी इंटरनॅशनल ‘ ही संस्था सुरु केली. कंथारी हे नाव कसं सुचलं यामागेही एक मजेशीर कथा आहे. केरळमधील लोकांच्या अंगणात कंथारी या नावाचं एक छोटं रोपटं लावलेलं असतं . त्याला छोट्या मिरच्या लागतात. ही मिरची अतिशय तिखट असते. ही मिरची केवळ मसाल्याचा पदार्थ नसून एक औषधी वनस्पती देखील आहे. की जी अनेक आजारात उपयोगी पडते. आपली संस्था ही अशीच समाजाच्या उपयोगी पडावी या हेतूने या संस्थेचे नाव ‘ कंथारी ‘ असे ठेवले. या ठिकाणी सगळ्या जगातून विद्यार्थी येऊ लागले. पण इथली प्रवेश पद्धती कडक होती. अंध, अपंग अशा विद्यार्थ्यांसाठीच ही संस्था होती पण सेब्री आणि पॉल अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश देत होते की ज्यांची समाजासाठी काही करण्याची इच्छा होती. या ठिकाणाहून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या देशात जाऊन स्वतःचे प्रकल्प सुरु केले. या लोकांना सेब्रीने आपल्या पायावर उभे केले एवढेच नव्हे तर स्वतः अंध अपंग असलेल्या व्यक्ती इतरांच्या आधार बनल्या. हे सेब्रीच्या कार्याचे मोठेच यश म्हणावे लागेल.
एव्हरेस्टवरती गेलेल्या पहिल्या अंध व्यक्तीच्या मदतीने सेब्री आपल्या शाळेतील सहा मुले एव्हरेस्ट मोहिमेवर घेऊन गेली. हे आव्हान कसं वाटलं ? हिमालय तुमच्या नजरेतून कसा वाटला ? यावर ती म्हणते, ‘ जेव्हा एखादे आव्हान माझ्यासमोर असते, तेव्हा मी मनाने कमकुवत असण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या सगळ्या संवेदना सजग असतात. आणि हिमालय पाहण्याचेच म्हणाल तर आय कॅन फील. आय कॅन टच . आय कॅन सेन्स. ती बर्फाच्छादित शिखरे जणू मी मनात साठवली. ‘ सेब्रीवर आजपर्यंत अनेक मानाच्या पुरस्कारांचा वर्षाव झालाय. आपल्या पुरस्कारांबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. पण त्यांना ती व्यक्तिगत समजत नाही. हे श्रेय माझे एकट्याचं नाही असं नम्रपणे ती सांगते. आपल्या भारतातील लोक तिला विशेष मनमोकळे वाटले. पण संबंधित अधिकारी व्यक्तींनी अधिक मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे तिला वाटते. या पुढे अफ्रिकेतही आपले सेंटर्स सुरु करण्याचा तिचा मानस आहे. पालकांसाठी ती म्हणते, ‘ आपल्या पाल्यांवर प्रेम जरूर करा. पण त्या प्रेमात त्यांना अति संरक्षण देण्यापेक्षा काही करण्याचा त्यांना विश्वास द्या. कोणत्याही परिस्थितीची उकल करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करा. सेब्री आपल्याला जे सांगते त्यातील शब्द न शब्द खरा आहे कारण तो प्रत्येक शब्द ती जगली आहे. सेब्रीच राष्ट्रीयत्व कोणतं ? ती कोणत्या एका देशाची नाही. ती सगळ्या जगाची आहे. जिच्यावर तुम्ही आम्ही दृष्टिहीन असा शिक्का मारला तिच्या शब्दात दुसऱ्यांना दृष्टी देण्याचं सामर्थ्य आहे. ती सांगते की प्रत्येकानं स्वप्न पाहावं. पण त्या स्वप्नाला जेव्हा सामाजिक परिवर्तनाची जोड मिळते तेव्हा त्या स्वप्नाचं ‘ व्हिजन ‘ होतं . अशी स्वप्न पहा की ज्यामुळे माझा देश, माझा समाज पुढे जाईल. प्रकाश कुठे आहे ? शोधाल तिथे आहे. तो आपण शोधत नाही म्हणून आपल्याला अंधार दिसतो. प्रकाश शोधला की अंधाराचं अस्तित्व आपोआप नाहीसं होतं . कुसुमाग्रजांची ‘ कोलंबसाचे गर्वगीत ‘ म्हणून एक सुंदर कविता आहे. कोलंबस भारताच्या शोधात निघालेला असतो. मार्गात अनंत अडचणी येतात. पण त्या त्याला आपल्या ध्येयापासून विचलीत करू शकत नाहीत अशा अर्थाची ही कविता आहे. त्या कवितेच्या ओळींनी या लेखाचा शेवट करू या. मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” (
प्रिय रसिक वाचकहो, हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी यु ट्यूब वरचा जवळपास एक तासाचा एक व्हिडिओ पाहिला . तीन दिवस टप्याटप्याने ऐकला. तो ऑफलाईन ऐकता यावा म्हणून मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्ड केला. इंटरनेटवरून माहिती घेतली. नोट्सने चार पाने भरली. ही माहिती विस्कळीत स्वरूपात होती. चारपाच दिवस त्यावर विचारमंथन झाले. ‘ कंथारी ‘ या शब्दाची माहिती घेण्यासाठी कर्नाटकातील माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीची मदत घेतली. सेब्री टेंबरकेन हे जर्मन नाव आहे. या नावाचा मराठी उच्चार जाणून घेण्यासाठी एका मित्राला विचारले. दोन अडीच तास टाईप करण्यासाठी लागले. एवढ्या सगळ्या परिश्रमानंतर हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. माझे यामागील परिश्रम सांगणे हा उद्देश नाही. तर आपल्यापर्यंत अचूक, अधिकृत आणि चांगली माहिती पोहोचावी या एकमेव उद्देशाने केलेला हा प्रपंच. )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ ( लेख नावासाहित शेअर )