दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

*किंमत*… © दीपक तांबोळी* 9503011250

*किंमत*

दीपक तांबोळी

“दुकानात सफाई कामासाठी त्वरीत मुलगा पाहिजे”
अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं
“काय पाहिजे?”
त्याने शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं.गार्ड समजला.आत हात दाखवून म्हणाला
” राजू शेठ समोरच बसलेत त्यांना भेटून घे”
अस्वस्थ मनाने तो आत शिरला.समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते.कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली.
“बोला”
” ते…तुम्हांला सफाईकामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?”
” हो.तू करणार आहेस का?”
त्याने मान डोलावली.राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं.पंधरासोळा वर्षाचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा.कपडे मात्र साधारण होते.दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना पण तीन दिवसापासून सफाईसाठी माणूस नव्हता.त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे त्यांना योग्य वाटत नव्हतं.
“तुझं नांव?”
“प्रदीप”
“वडील काय करतात?”
“रिक्षा चालवतात”
“कुठे रहातोस?”
“समता नगर”
“ठिक आहे .तीन हजार देऊ तुला महिन्याला.खाडे करायचे नाहीत.खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो”
” हो चालेल” तो म्हणाला
तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले “अरे भास्कर. याला दुकान दाखवून दे.काम समजावून सांग”
भास्कर आला.त्याने प्रदीपला ते तीन मजली भव्य दुकान दाखवलं
” तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल.फ्लोरींग,काचेची कपाटं,काऊंटर्स,वाँशरुम सगळं साफ करावं लागेल.हे कपड्याचं दुकान आहे.इथे थोडीही धुळ चालत नाही. ग्राहक येतांना धुळ घेऊन येतात.त्यामुळे वारंवार झाडू मारणं,कपड्याने पुसणं करावं लागतं.रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल”
प्रदीपने मान डोलावली.
“जा आता.सकाळी आठ वाजताच ये”
प्रदीप गेला.त्याला जातांना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही असंच वाटून गेलं.
“ठिक आहे.पाहू दोनचार दिवस.नाही पटला तर हाकलून देऊ” ते मनाशीच बोलले.

प्रदीप दुसऱ्या दिवशी आला.त्याने काम करायला सुरुवात केली पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं.ते त्याला वारंवार सुचना देऊ लागले.दहा वाजले.दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती.ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे.नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं.दुकान सुरु झालं.साडेअकराला भास्कर वाँशरुमकडे जायला निघाला तर वाँशरुमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.
“काय रे काय झालं?का रडतोय?”
“नाही.काही नाही” प्रदीपने डोळे पुसले
” तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता.कधी काम केलं नाही वाटतं?”
“नाही”
“गरीबी वाईट असते बाबा.काहीही कामं करायला लावते.जमेल जमेल.तीन चार दिवस हाल होतील.मग सवय होऊन जाईल.काही रडू नको.घरी कोण काम करतं?”
” आई आणि बहिण”
” तरीच.कळलं ना कसा त्रास होतो ते?”
प्रदीपने मान डोलावली.

दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.
” काय रे जेवायचं नाही का?”
प्रदीपने नकारार्थी मान हलवली.
“का?डबा नाही आणला का?”
” नाही”
” ये मग इकडे.आपण दोघंही जेवू”
” नको.मला भुक नाहिये”
“अशी कशी भुक नाही.सकाळपासून काम करतोय.चल मुकाट्याने ये खायला”
तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले.प्रदिपचा डबा नाही हे पाहून त्यांनी भाजी आणि दोन दोन पोळ्या प्रदिपला एका ताटलीत काढून दिल्या.भुक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.
“उद्यापासून डबा आणत जा.काय!” भास्करने दम भरला.
“ते…आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही”
तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं.एक जण म्हणाला
” काळजी करु नको.आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण”
प्रदीप काही बोलला नाही.पण त्याचे डोळे भरुन आल्याचं भास्करच्या लक्षात आलं.

चारपाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली .कुणी काऊंटर पुसून घेतले ,कुणी काचेची कपाटं साफ केली,तर कुणी पंखे,लाईटस.आठवडाभरात प्रदिपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजूशेठला ही गोष्ट माहित नव्हती त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते.भास्करला त्यांनी दोनतीनदा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा भास्कर म्हणाला “चांगला आहे पोरगा कामाला.मेहनती आहे.”
लग्नाचा सिझन होता.ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली.प्रदीपचं कामही वाढलं.वारंवार दुकान झाडणं,पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही.पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला.आता तो मोकळेपणाने बोलत होता.फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा.ढिगाने पडलेल्या साड्या,बेडशीट्सच्या घड्या करुन ठेवायचा.ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बाँक्सेसमध्ये व्यवस्थित पँक करुन ठेवायचा.त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खुष होते.

महिना झाला.राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले तेव्हा प्रदिपचे डोळे भरुन आल्याचं त्यांना जाणवलं.
” काय रे काय झालं?”
” काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून..
.”
त्याने डोळे पुसले.शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदिपने एकही दिवस खाडा केला नव्हता.उलट सिझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरु असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा.त्याच्या कामावर खुष होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.

सोमवार उजाडला.राजूशेठ दुकानात आले.देवांच्या फोटोंची पुजा करुन ते कँशकाऊंटरवर बसत नाही तोच प्रदीप त्यांच्याकडे आला.नमस्कार करुन म्हणाला
“शेठजी माझे बारावीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरु होताहेत तर मी हा आठवडाच काम करु शकणार आहे”
शेठजींना धक्का बसला.
“अरे पण तू दुकानात काम करुनही क्लासेस करु शकतो.संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला”
“नाही शेठजी.क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात”
आता मात्र शेठजी रागावले.आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं.याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता.पैसा देऊनही माणसं टिकायची नाही.काही तर अँडवान्स घेऊन पळून जायची.दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याचीच चिंता शेठजींना लागून रहायची.प्रदिप टिकेल असं त्यांना वाटत होतं.शिवाय त्याचं कामंही त्यांना आवडलं होतं.
“तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस.आता या आठदहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावन लागेल”ते रागावून म्हणाले
प्रदीप हसला
“काही हरकत नाही शेठजी.तुम्हांला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही”
शेठजींना आश्चर्य वाटलं.एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी,खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती.या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं.तरुण पोरांना अशीही पैशांची किंमत असते कुठे?

नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.

सोमवार उजाडला.शेठजी दुकानात आले.अजून ग्राहकांची वर्दळ सुरु व्हायची होती.प्रदीपला आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं
“काय रे विचार बदलला की काय तुझा?”
प्रदीप हसून म्हणाला
“नाही शेठजी.या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय”
” बरं बरं”
प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला.शेठजी खुर्चीवर बसत नाही तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली.आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरु होणार याचा शेठजींना आनंद झाला.
” बोला साहेब ”
ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले
” प्रदीपला घ्यायला आलोय”
शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं.एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा.या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?
“प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय?”त्यांनी साशंक मनाने विचारलं
” नाही नाही.प्रदीप मुलगा आहे माझा”
“काय्यsssप्रदीप तुमचा मुलगा आहे?”
तेवढ्यात प्रदीप बाहेर आला.आल्याआल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली
” पप्पाsss”
त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला.सगळे सेल्समन,नोकर जमा झाले.प्रदीपही रडत होता.हे काय गौडबंगाल आहे हे कुणाला कळेना.थोडा वेळाने प्रदीप जरा बाजुला झाला तसा तो माणूस म्हणाला.
” शेठजी मी ओंकारनाथ.माझी धुळ्यात चटईची फँक्टरी आहे.दोन इंडस्ट्रीयल वर्कशाँप आहेत.अगोदर मीही एक कामगार होतो.मेहनतीने आणि देवक्रुपेने फँक्टरीचा मालक झालो.मी गरीबी पाहिली आहे.कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे.पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीत.त्यांना पैशाची,श्रमाची कसली आलीये किंमत?हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फँक्टरीत यायचा.तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.लहानमोठा बघायचा नाही.वाटेल ते बोलायचा.माझ्या कानावर आलं होतं पण एकूलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चुप बसायचो.एक दिवस त्याने मर्यादा सोडली.आमच्या सफाई कामगाराला वाँशरुम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या.साठी उलटलेला तो माणूस.त्याच्या मनाला ते लागलं.तो माझ्याकडे रडत आला आणि “माझा हिशोब करुन टाका.मला आता इथे रहायचं नाही “असं म्हणू लागला.माझं डोकं सरकलं.मी याला बोलावलं.म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत.सरळ माफी मागणार नाही म्हणाला.मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर तू मला महिनाभर सफाईचं काम करुनच दाखव.त्याने माझं चँलेंज स्विकारलं पण आपल्याच फँक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती.मला म्हणाला मी जळगांवला जातो आणि तिथे काम पहातो.मीही संतापात होतो म्हणालो “तू कुठेही जा.पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते.आणि हो,तुझं खाणं पिणं,रहाणं सगळं तू तुझं बघायचं.मी त्यासाठी एक पैसा तुला देणार नाही “त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र जळगांवच्या समता नगरात रहातो.त्याच्याकडे तो आला.तुमच्या दुकानात कामाला लागला.मला फ
ोन करुन त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं.शेवटी बापाचं मन ते.पण म्हंटलं उतरु द्या याची मस्ती.अशीही त्याला सुटीच होती.रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल.म्हणून मी काहीही चौकशी केली नाही.मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खुप रडला.म्हणाला ‘मी आता खुप सुधारलो आहे.मी आठवड्याने परत येतो घरी’ मी म्हंटलं ‘मीच येतो.बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होता ते’ म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय”
राजूशेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले
” तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहिये.पण हा काम तर छान करत होता”
प्रदीप हसला
“नाही शेठजी.मला सुरवातीला काम जमत नव्हतं पण या सगळ्या काकांनी मला खुप मदत केली.मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला.माझ्याकडून खुप चुका व्हायच्या पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत.मला त्यांनी सांभाळून घेतलं”
प्रदीप परत रडायला लागला तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.
“अरे बेटा आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना?मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?”
” हो काका.पण मला हे समजत नव्हतं.आता ते कळायला लागलं.पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची, श्रमांची किंमत नाही म्हणून.मला इथं आल्यावर मेहनतीची ,पैशांची,माणसांची,अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागली.पप्पा शेठजींचंच पहा ना!त्यांची तीन मोठी दुकानं आहेत जळगांवात. पण त्यांना कसलाही गर्व नाही.ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत.त्याच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे”
“बेटा हेच मला हवं होतं.तुला ते कळलं यातच मला समाधान वाटतंय”
” चला साहेब तुम्हांला दुकान दाखवतो” राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले “आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग.आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला याचा मलाही खुप आनंद होतोय”
“शेठजी एक विनंती आहे “भास्कर म्हणाला
” हं बोल”
“आमच्या सगळ्या सेल्समनकडून प्रदीपला पँटशर्टचं कापड द्यायचं म्हणतोय.त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या”
“अरे वा!चालेल.मग अजून एक काम कर,प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टि शर्ट काढून दे.माझ्याकडून प्रदीपला गिफ्ट”

ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली.मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले.
“चला मंडळी.आता निघायची वेळ आली.तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.आणि हो पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे.तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरुर यायचं आहे.गाडी करुनच या सगळे.खर्चाची काळजी करु नका.गाडीचा खर्च मी करेन.”
प्रदीप उठला .सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला.सगळ्यांनी मिळून त्याला पँटशर्टचं कापड दिलं.मग शेठजींच्या पाया पडायला आला तसं शेठजी त्याला जवळ घेऊन आणि त्याच्या हातात टि शर्ट देऊन म्हणाले
“बेटा तुझ्या वडिलांनी आणि तु ही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय.भावी आयुष्यासाठी तुला खुप खुप शुभेच्छा”
प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले.गाडी निघाली.निरोपाचे हात हलले.
प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला.शेठजींना काऊंटर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजीनियरींग करत होता.तो करत असलेले रंगढंग,त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती.त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले.

*© दीपक तांबोळी*
9503011250
(ही कथा काँपीराईट असून लेखकाच्या नावासहितच शेअर )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}