निसर्ग तंत्र १ विभावरी कुलकर्णी. मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक
*निसर्ग तंत्र १*
*विरोध विरहित दिवस*
*आपल्याला राग का येतो?*
▪️आपल्या मनाविरुद्ध काही घडले.
▪️समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही.
▪️आपल्या हातात नसलेल्या गोष्टी घडल्या.
▪️गैरसमज झाले.
▪️चुकीच्या गोष्टी घडल्या.
या सारखी बरीच कारणे असतात.
अशा वेळी आपल्याला राग येतो. मग त्या वरची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.ती कशी असते?
राग,चिड,संताप,विरोध,
नैराश्य याचे परिणाम काय होतात हे आपण अनुभवतो.काही वेळेस बदला घेण्याची भावना तीव्र होते.त्यात आपलीच मानसिकता बिघडते.
आपले हास्य मावळते.
विचार शक्ती कमी होते.कधी कधी नात्यात दुरावा निर्माण होतो.
आपली प्रचंड ऊर्जा खर्च होते.आपले अंतस्त्राव बदलतात.कधी कधी खरे कारण समोर आल्यावर आपला राग व्यर्थ होता हे लक्षात येते.पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
हे सगळे थांबवणे आपल्याच हातात असते.आपण या गोष्टी निसर्गातून शिकू शकतो.राग,चिड,नैराश्य यावर *दीर्घ श्वसन,पाणी पिणे,अंक मोजणे* हे उपाय आहेतच.पण असे उपाय करण्याची वेळ येऊच नये म्हणून काही गोष्टी करु शकतो.काही *निसर्ग नियम* आचरणात आणू शकतो.
निसर्ग कधीही बदला घेत नाही. म्हणून तो नुकसान झाले तरी सर्व शक्तिनीशी पुन्हा बहरतो,फुलतो व आनंद देतो.
आपण पण आठवड्यातून एक दिवस असा ठरवून घेऊ.तो म्हणजे *विरोध विरहित दिवस* या दिवशी काही छोट्या छोट्या कृती करु या.
या दिवशी पुढील वाक्ये मनाशी ठरवून घ्यायची व त्या प्रमाणे वागायचे.
*१) मी विश्वाला व आजूबाजूच्या लोकांना स्वातंत्र्य प्रदान करते/करतो.*
प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते.त्यांची मते पण त्यांच्या दृष्टीने योग्य असतात.थोडक्यात म्हणजे त्या दिवशी इतरांना न रागावता त्यांची बाजू समजून घ्यायची.
*२) माझे मत मी व्यक्त करेन पण सिद्ध करणार नाही.*
माझे मत व्यक्त करायचे पण तेच कसे बरोबर आहे हे इतरांना समजावत बसायचे नाही.किंवा त्यांनी त्या मताशी सहमत व्हावे असा आग्रह धरायचा नाही.
*३) दुसऱ्याचे मत ऐकेन पण विरोध करणार नाही.*
दुसऱ्याचे मत जरी चुकीचे असेल तरी ऐकून घ्यायचे.पण ते कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा किंवा सिद्ध करण्याचा हट्ट करायचा नाही. एखादी व्यक्ती २+२=८ म्हणाली तरी फक्त ऐकायचे.
थोडक्यात *घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायचा.*
*४) आजचा दिवस सर्वोत्तम होता.*
*५) आजच्या दिवसा साठी खूप खूप आभार.*
यातील वरील पाच वाक्ये घोकायची.व मनापासून अमलात आणायची.आणि तो दिवस कसा गेला, त्या दिवसात काय काय घडले,मनस्थिती कशी झाली.हे सगळे अनुभव लिहून ठेवायचे.
✍️ विभावरी कुलकर्णी.
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
२९/१०/२०२३
८०८७८१०१९७