Story by ©® ज्योती रानडे
©® ज्योती रानडे
डिसेंबरच्या थंडीत सगळं पुणं लपेटलं होतं. त्या थंडीत निशाची सकाळची कामं उरकत नव्हती. गरम चहाचा कप घेऊन रजईत बसून रहावसं वाटत होतं. सान्वी ला शाळेत पोचवायचं होतं व पुढे कामाला जायचं होतं. आजचं तिचं कॅालेजमधलं पहिलं लेक्चर नऊ वाजता होतं म्हणून रजईतून कशीबशी बाहेर पडून ती तयार झाली.
“अग सानू, चल ना पटकन! आणि स्वेटर घाल ग. खूप थंडी आहे बरका!” निशा किचन मधे डबे भरत म्हणाली.
“आले ग! झालच! ” म्हणत सातवीतली सानू तयार होऊन आली.
सानूनं गुलाबी रंगांचा अनुमावशीने स्वत:च्या हाताने विणलेला सुंदर स्वेटर घातला होता. अनु पण निशाच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. स्वेटर विणावेत तर अनुनेच. सुरेख वीण, प्रेमाचे धागे आणि मास्टरपीस बनवणारे हात! अगदी जवळच्या व्यक्तीना स्वत:च्या हाताने सुंदर स्वेटर बनवून देणाऱ्या अनुमावशीची सान्वी फार लाडकी होती.
“अग शाळेत जाताना दुसरा स्वेटर घाल ना! रोज मावशीने दिलेला नवा स्वेटर घातलास तर तो खराब होईल ना!” निशा म्हणाली.
“काय ग! मला हाच स्वेटर सगळ्यात जास्त आवडतो ग आई. आणि यात थंडी नाही वाजतं” म्हणत सानू गाडीत बसली.
निशानं गाडी सुरू केली. पहिल्याच ट्रॅफिक लाईटला एवढी गर्दी कसली म्हणत तिने खिडकीतून डोकं बाहेर काढून दूरवर वाकून बघायचा प्रयत्न केला.
“सानू ती गाडी बंद पडली आहे बघ. त्यामुळे सगळा ट्रॅफिक अडला आहे” निशा कपाळाला हात लावून बसली.
सानू मजेत गाणं गुणगुणत आजूबाजूला बघत होती. बाहेर तिच्याच वयाची एक मुलगी गजरे विकत होती. ती सानूच्या गाडीजवळ आली. तिच्या अंगावर एक मळका व फाटलेला स्वेटर होता. तपकिरी रंगाची विटकी सलवार व पिवळट कमीज घातलेली ती मुलगी थंडीने कुडकुडत होती. ती सानूला म्हणाली, “ ताई गजरा देऊ?”
सानूने आईला विचारले. “आई गजरा घे ना तुला न अनुमावशीला.”
निशा म्हणाली, “ नको ग!” पण सानू ने परत परत विचारलं. “आई ग घे ना!” निशाने पैसे काढून दिले व म्हणाली, “बरं घे दोन गजरे!”
सानूने खिडकीची काच उतरवली. “दे दोन गजरे!” ती मुलगी खूप कुडकुडत होती. गजरे काढून देताना तिचा हात थंडीने थरथरत होता. अतिशय कृश बांधा असलेली ती मुलगी फाटक्या चपला घालून गजरे विकत होती. सानूने गजरे घेतले व पैसे दिले. जाईच्या फुलांचा हवाहवासा वास गाडीभर भरून राहिला.
“आई ग! तिला फार थंडी वाजतीय बघ. बिचारी! आई ही थंडीची लाट कधी जाईल ग?”
“आई एक आयडिया!! मी तिला माझा स्वेटर देऊ? हा खूप जाड आहे तिच्या स्वेटर पेक्षा!” सानु आईचा अंदाज घेत म्हणाली.
निशा म्हणाली, “ सानूऽऽऽ! हा स्वेटर तुला अनुमावशीनं तुझ्या वाढदिवसाठी स्वत: विणून दिलाय ना? काय वाटेल मावशीला तू असा देऊन टाकलास तर? आपण तुझा दुसरा स्वेटर उद्या घेऊन येऊ व तिला देऊ.”
सानु रागावून म्हणाली, “ आई ती आत्ता थंडीने कुडकुडत आहे. आणि उद्या ती काय इथंच दिसणार आहे का? मी हा स्वेटर तिला आत्ता देते. मला वाईट वाटतय ग तिच्याबद्दल. तू अनु मावशीला समजावून सांग.”
निशाने वळून लेकीकडे बघितलं. सानूच्या डोळ्यातील कणव बघून तिला भरून आलं. बरोबर बोलतेय सानु. ही कणव, दुसऱ्याबद्दलचं प्रेम कधी शिकवून येत नाही. ते जपलं पाहिजे..त्या विचारांचं कौतुक केलं पाहिजे.”
क्षणभर थांबून ती सानूला म्हणाली, “बरोबर आहे तुझं सानू. तुला एवढे वाटतय ना तिच्या बद्दल मग दे तिला तुझा स्वेटर.” आणि अनुमावशीला सांगायलाच नको म्हणजे प्रश्न मिटला.”
सानूने खूष होऊन खिडकीची काच उतरवली. ती मुलगी शेजारच्या रिक्षामधील बाईला कुडकुडत गजरा विकत होती. सानूने तिला हाक मारली. ती उत्साहाने आली. “ताई अजून हवेत गजरे? सहा गजरे उरलेत. तेवडे विकून मी पण शाळेला जाणार!” ती म्हणाली.
सानू नं स्वत:चा स्वेटर काढला. “हा नवाच आहे बघ स्वेटर. खूप जाड आहे बघ. तो घाल म्हणजे अशी कुडकुडणार नाहीस. “
तिच्या डोळ्यात कमालीचा आनंद दिसला. तिनं तो स्वेटर पटकन घातला. त्याची डार्क ब्राऊन बटणे लावली. त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवला. चकचकीत बटणं त्यावर सूर्याचे किरण पडताच ती चमकू लागली. नवा कपडा घातल्याच आनंद त्या कोवळ्या जीवाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. “ताई लई गरम आहे हा स्वेटर. आता सहा गजरे विकेपरेंत नाई वाजणार थंडी”!
निशा म्हणाली,” ते साही गजरे दे मला. नाव काय तुझं?”
“सुमन.” ती म्हणाली,” ताई घ्या हे गजरे!” म्हणून तिनं साही गजरे निशाला दिले. निशाने पैसे दिले. त्या मुलीने हात जोडून दोनदोनदा नमस्कार केला आणि ती मुलगी हाताने टाटा करत वहानांच्या गर्दीतून वाट काढत नाहीशी झाली.
सानू कौतुकाने त्या दिशेत बघत राहिली. निशानं तिला ओढून जवळ घेतलं. एका अकाली प्रौढत्वाला बालसुलभ आनंद मिळावा म्हणून एक वहान रस्त्यात बंद पडलं असावं कारण ट्रॅफिक आता हलू लागला होता.
“आई, तू हे सगळं अनु मावशीला आजच सांग. आपण चांगली गोष्ट केलीय ना? मग का लपवायचं?” सानू अगदी विचारी चेहरा करून म्हणाली.
“हो ग बाळा! सांगूया आपण मावशीला.” अनुला उद्या सुमन नेमकी या स्वेटरमध्ये गजरे विकताना दिसायची आणि उगीच गैरसमज व्हायचा. पण आपला विचार सानूच्या प्रामाणिक विचारांपेक्षा खूप कनिष्ठ दर्जाचा आहे हे ही तिला जाणवलं.
तिनं सानूला शाळेजवळ सोडले. सानू कुडकुडत शाळेच्या दारातून आत गेली. सानुची मैत्रिण आर्या तिला म्हणाली, “ हे काय? स्वेटर नाही घातलास? किती थंडी आहे आज”!
सानु म्हणाली, “ सांगते..” त्या दोघी चालू लागल्या.
निशाचं मन सानू बद्दलच्या अभिमानाने भरून आलं. किती वेळा ही मुलं ट्रॅफिक लाईटला दिसतात पण मन असं बधीर झालं आहे ना की काही करावं हे मनात येत नाही आणि कधी मनात आलं तर रस्त्यात मधेच कुठे थांबणार म्हणून क्षणभर त्या लेकरांसाठी चुकचुकत सगळे आपल्या मार्गाला लागतात. सानुच्या संवेदनशील मनानं त्या परिस्थितीवर मार्ग काढला होता.
कॉलेजमधे अनुचं लेक्चर संपले की तिला ही हकीकत कशी सांगावी याचा विचार करत तिने गाडी स्टार्ट केली. कदाचित अनुला हे आवडणार नाही पण it is okay.
एका उदार मनाची आणि दयाळू अंतःकरणाची जोपासना केलीच पाहिजे हे अनुला नक्की पटेल. खरतर याचसाठी नाही का सगळा अट्टाहास? काय मिळवायचं असतं आपल्याला शिक्षणातून? आयुष्यात माणसानं डॅाक्टर इंजिनीअर बनलं नाही तरी चालेल पण एक उत्तम व्यक्ती नक्की बनावे. संवेदनशील, सुसंस्कृत आणि सुविचारी!
एक गोठवणारी सकाळ सुमन, सानु आणि निशासाठी बरीच उबदार झाली होती.
©® ज्योती रानडे