मंथन (विचार)

ll जाळे ll लेखक : रविकिरण संत ©️

ll जाळे ll

लेखक : रविकिरण संत ©️

” आई, तू माझं फक्त लग्न लावण्यासाठीच VRS घेतली आहेस का?” निरंजनने विचारले.
“तस समज हवंतर,” कंप्यूटर स्क्रीन वरून नजर न काढता विभावरीने ऊत्तर दिले.” जो अनर्थ तुझ्या बाबांचे न ऐकण्याने झाला, तेवढा पुरेसा आहे.” तिच्या आवाजात खंत होती.

विभावरीचा हो रोजचा शिरस्ताच झाला होता. सकाळी दहा पर्यंत स्वयंपाक-पाणी आटोपून त्या PC वर ‘अनुरूप विवाह संस्थेची’ साईट ऊघडून ऊपवर वधू शोधायला लागत.

विभावरी फडके ह्या गिरगावातल्या चिकित्सक समुह हायस्कूल मध्ये २५ वर्षे गणिताच्या शिक्षिका होत्या. निरंजन हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात हुशार. त्याने हैदराबाद आय.आय.टी.मधून इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीची डिग्री घेतली. पुढे लगेच त्याची कॅम्पस् प्लेसमेंटही IBM सारख्या ख्यातनाम कंपनीत झाली.

निरंजनचे बाबा वसंत फडके हे स्टेट बॅंकेत ऑफिसर होते. नाना चौकातील इंद्रजित सोसायटीत तिसर्या मजल्यावर त्यांचा दोन बेडरूम्सचा फ्लॅट होता.

निरंजनला मोजकेच मित्र होते आणि विशेष म्हणजे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षीसूद्धा एकही मैत्रीण नव्हती. विभावरीला या गोष्टीचे आश्चर्य वाटे. कारण अगदी ज्यूनिअर काॅलेजची मुलेही मिश्र जोड्यांत पहाण्याची सवय त्याना लागली होती. लग्नासाठीही तो फारसा इंटरेस्ट दाखवत नव्हता. आपला मुलगा लाजरा आहे की हल्ली ऐकू येतं तसा ‘गे’….अशी संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकायची.

शेवटी न रहावून त्यांनी आपल्याच एका मैत्रीणीच्या मुलीचे स्थळ आणले. नेहलमधे खोड काढायला जागाच नव्हती. सडपातळ, सुंदर, ग्रॅज्यूएट आणि महाराष्ट्र सरकारच्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला नोकरी. निरंजन नकार देऊच शकला नाही.

थाटामाटात लग्न झाले. मुले हनिमूनला गेली असताना वसंतराव म्हणाले, ” विभावरी मला वाटतय तू आता VRS घ्यावीस. खूप कष्ट केलेस आजवर, पण आता आपण स्टेबल आहोत.”

“का? अजून माझी चांगली दहा वर्षे सर्व्हीस बाकी आहे. ”
” आता आपल्या घरात नविन मुलगी आलीय. मला निरंजनचं काही कळत नाही. त्यांचा संसार मार्गी लागेपर्यंत आपण सुटकेचा निश्वास टाकू शकत नाही.” वसंतरावांच्या आवाजात काळजी होती.

खरंतर लौकिक दृष्ट्या एक आदर्श चौकोनी कुटुंब बनले होते ते. कुणाचीही दृष्ट लागावी असं. शेवटी दृष्ट लागलीच.

नक्की काय झाले ते कळले नाही.पण काहितरी इश्यू धुमसत होता. दोघांपैकी कोणीच काही सांगत नव्हते. इकडे वसंतरावांनी एकच धोशा लावला होता की VRS घे आणि पूर्ण वेळ मुलांना दे. नेहलला विश्वासात घे. पण विभावरीला वाटे की मुले आता लहान नाहीत, आणि फक्त संवाद साधण्यासाठी नोकरी सोडण्याची आवश्यकता नाही.

असेच सहा महिने गेले. अखेर तो दिवस उजाडला. एके रविवारी सकाळी मुलांनी एकत्रितपणे जाहीर केले की,”आम्ही वेगळं व्हायचं ठरवलयं.”
” कारण सांगाल का?” वसंतरावांच्या आवाजात दुःख दाटून आले.

आमच्याबद्दल इतकच सांगू शकतो,” We are not compatible to each other. No more discussion please.” इतके बोलून निरंजनने विषय संपवला. त्याच दिवशी आपली बॅग भरून नेहल माहेरी निघून गेली.

काही दिवसांनी तिच्या वकिलांकडून डिव्होर्सची नोटीस आली. एकुलत्या एका मुलाच्या भविष्याच्या काळजीने वसंतराव खचले. त्यांनी बॅंकेतही जाणे सोडले. हाय ब्लड प्रेशर आधिपासून होतेच. तशात त्यांनी औषधे घेतली नसावीत. चार दिवसांनी त्यांना सिव्हीअर हार्ट ॲटॅक आला आणि त्याच दिवशी त्यांचा इहलोकीचा प्रवास संपला!

शोकसभेला नेहल तिच्या आई- बाबां बरोबर आली होती. एक शब्दही न बोलता मान खाली घालून बसली होती. विभावरीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला,”मी तुला दोष देत नाही गं पोरी, माझंच चुकलं.”

. ….स्क्रीनवर स्थळांची माहीती सर्फ करताना सगळा इपिसोड विभावरीच्या मनासमोरून गेला. त्यांनी निरंजनचे नाव आता अनुरूप विवाहच्या ‘ डिव्होर्सी ‘ सेक्शन मधे नोंदविले होते.

**

” ही मुलगी तुला कशी वाटते निरंजन?”
“आई मी काही रजेवर नाही, वर्क फ्राॅम होम करतोय,” निरंजन त्रासून म्हणाला आणि पून्हा आपल्या लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेला.
” आजची ही लास्ट…प्लीsज. ”

” कोणती?” त्याने अनिच्छेनेच स्क्रीनवर नजर टाकली.
” ही, गौतमी आचरेकर. मुलगी तरतरीत दिसते, बी.कॉम, खाजगी कंपनीत नोकरी, वय सत्तावीस, पगार बावीस हजार, गिरगावात दोन खोल्यांची जागा. आई नाही. फक्त वडील हयात. एक वर्षापूर्वी पतीचे निधन. नो इशूज.

” व्वाव, म्हणजे लोअर मिडलक्लास, त्यातून आई नाही, म्हणजे पटलं नाही तरी माहेरी परत जाऊ शकत नाही. काय सही कॅलक्यूलेशन्स आहेत तुझी आई! ” निरंजन तिरकसपणाने म्हणाला.

” निरंजन, आधी तुला दहा मुलींचे जे फोटो दाखवले, त्यांना फोटोवरूनच तू फेल केले होतेस, म्हणजे ही पहिलीच मुलगी जी दिसण्यात पास झाली असं म्हणू का मी?” विभावरीच्या युक्तिवादाने तो निरुत्तर झाला.

ही मुलगी खरच नाकी-डोळी रेखीव वाटत होती. तरीपण आई असा धोबीपछाड देईल अस वाटल नाही त्याला.

” तर आता मी हिला आपला ‘इंटरेस्ट सेंड’ करू?” विभावरीने माऊसशी चाळा करत विचारले.
त्याला निरंजनने थोड्या अनिच्छेनेच संमती दिली. “आता मला ओव्हरसीज काॅल आहे जरा काम करू देशील का आई ?”

विभावरीने होकारार्थी स्मिंत करून PC शटडाऊन केला. ” दिड वाजता आपण जेवायला बसू.” इतके बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली.

**

दुसर्‍या दिवशी विभावरीने उत्सुकतेने ‘अनुरूप’ ची साईट उघडली.
” निरंजन आपली इंटरेस्ट रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झालीये!” विभावरी हर्षाने उद्गारली.
” कोणाकडून? ”
” गौतमी आचरेकर.”

निरंजनच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
च्यायला,आता आई हात धुवून पिच्छा पुरवणार, निरंजनच्या मनात आले.
” तिचा फोन नंबर आणि पत्ता आलाय.”
” आई मी कुणाच्याही घरी जाणार नाही.” निरंजनने निक्षून सांगितले.

” ठिक आहे, आधी फोनवर तर बोल. हा घे .” म्हणत विभावरीने नंबर पंच करून, स्पिकर मोडवर टाकून मोबाईल त्याच्याकडे दिला.

” हॅलो, हु इज धिस ?” पलीकडून मुलीचा आवाज आला.
” मी निरंजन फडके. ॲम आय स्पिकींज टू गौतमी आचरेकर? ”
” येस्.”
” मला अनुरूप विवाह….”
” इंटरेस्ट रिक्वेस्ट बद्दल ना? ” त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत तिने विचारले.
” हो!”
” कधी भेटू शकाल? ”
अचानक आलेल्या प्रश्नाने निरंजन थोडा गांगरला. त्याने विभावरीकडे पाहीले. तिने खुणेनेच ‘आज’ असे सांगितले.

” आज सहा वाजता चालेल ?” निरंजनने विचारले.
” कुठे?” गौतमीने विचारले.
” चौपाटी समोरच्या क्रिम सेंटरला ?”
” डन्! तुमचा कम्युनिकेशनसाठी हाच नंबर असेल ना?”
” नाही, हा माझ्या आईचा नंबर आहे.” म्हणून निरंजनने आपला नंबर सांगितला.

**

” सांग काय घेणार?” मेन्यूकार्ड समोर बसलेल्या गौतमीकडे सरकवत निरंजनने विचारले.
” मी काॅफी घेईन.”
निरंजनने वेटरला बोलावून दोन कॅपॅचीनो विथ मिल्कची ऑर्डर दिली.

” नाऊ कम टु द बिझनेस. हे बघ मला लग्न वगैरे काही करायचे नाही.” निरंजन गौतमीकडे रोखून पहात म्हणाला, ” तू तुझा नकार कळव.”
” मग इथे आपण का आलोत? अच्छाss, म्हणजे तू आईच्या सांगण्यावरून आलास का?” गौतमी खळखळून हंसली. ” मग तर तुझ्या आईला भेटलंच पाहिजे.”

” कशाला? त्याने काय होणार ?” निरंजनने अस्वस्थ होऊन विचारले.
” माहीत नाही, पण जो मुलगा वयाच्या तिसाव्या वर्षीसुद्धा आईपुढे आपल्या मनातलं बोलू शकत नाही, तिला मी भेटूनच नकार सांगेन! कबूल ?”
थोडा विचार करून निरंजन म्हणाला, ” कबूल !”

**

” आई मला आज लवकर ऑफिसला जायचय. ब्रेकफास्ट ऑफिसात करीन. इम्पाॅर्टंट मिटींग आहे, मी वाॅश घेऊन येतो. माझा फोन वाजला तर घे.” एवढे बोलून निरंजन लगबगीने बाथरूम मधे गेला.

त्यानंतर पाचच मिनिटानी फोन वाजला. विभावरी त्याच्या खोलीत जाऊन उचलेपर्यंत तो बंद झाला.
” आई कुणाचा फोन होता गं?” निरंजनने बाथरूम मधून विचारले.
” कुणास ठाउक, घेईपर्यंत बंद झाला.”

” प्लीज चेक कर ना. अर्जंट असू शकतो. माझा अनलाॅक पॅटर्न उलटा एन आहे.”
विभावरीने फोन अनलाॅक करून काॅल चेक केला. “तुझ्या ऑफिसचा दिसतोय.”
” आई जरा मेसेजेस मधे जाऊन चेक कर.” निरंजनने आतून सूचना केली.

” हो करते.” विभावरी म्हणाली.
” तुझी मिटींग रिशेड्यूल झालीये. पंचेचाळीस मिनीटे उशिराने सूरू होइल.” आता तूला ब्रेकफास्ट करून जाता येईल.” एवढे बोलून विभावरी लगबगीने किचनमधे गेली.

**

” निरंजन, आज सकाळी तू ऑफिसला गेला असताना गौतमी येऊन गेली.” घरात आल्या-आल्या विभावरीने निरंजनला सांगितले.
” काय म्हणाली?”
” काय म्हणणार? ती काही म्हणायच्या आतच तू तिला नकार दिलास म्हणे.”

निरंजन दचकला. सालीने चुगली केलीच. तिला सांगितलं होत की तूच नकार कळव.
” मला नाही आवडली ती,” थोडे धैर्य गोळा करून निरंजन म्हणाला.
” अरे मग ठीक आहे ना, तुझी मर्जी !” विभावरी म्हणाली. ” पण मला तर बाई फार आवडली ती पोरगी.”

” काय आवडण्या सारखं वाटल तुला तिच्यात? ” निरंजनने विचारले.
” अगोदर तू सांग, तूला काय आवडलं नाही ते ?”
“अगदी काकूबाई वाटली. भेटायला येताना कोणी साडी नेसून येतं आणि ते सुद्धा विदाऊट मेक अप ?”

” फक्त येवढेच कारण? ”
” आई ती स्मार्ट नाही, अगदी टिपिकल लोअर मिडलक्लास आहे.”
” म्हणजे नक्की काय रे ?”
” शी डझन्ट हॅव् एटीकेटस्.”
” रिअली ?” विभावरीने विचारले.” मला जरा समजाऊन सांगशील? ”
” आम्ही कॅपॅचीनो मागवली होती. तर ती पिताना तिच्या वरच्या ओठाला फेस चिकटत होता, जे तिला कळतही नव्हते. सो डिसगस्टींग!” निरंजनने नाक मुरडले.

” आमच्या पिढीतील लोकांना हे मुद्दे गौण वाटतील, तरी तूझे मान्य ! पण मला ती मैत्रीण म्हणून आवडली.” विभावरीने सांगितले.
” मैत्रीण? ”

” हो. अरे गप्पा मारताना आमचे विषय आणि आवडी मिळत्या जुळत्या आहेत हे जाणवले. मी तिला म्हटल इथे येत जा वेळ असेल तेव्हा.” तर म्हणाली, ” मला मराठी नाटकं बघायला फार आवडतात पण कंपनी मिळत नाही म्हणून बघणे होत नाही.”

” यापुढे आम्ही दर आठवड्यात एक नाटक बघणार.” विभावरीने जाहीर केले.
आता आईचे बोट धरून ही बया कुठवर येणार आहे, निरंजनने आपल्याच मनाला प्रश्न केला.

**

“आई हे काय लावलय तू?” पूर्वी ती गौतमी आठवड्यातून एक-दोनदा घरी यायची. आता आज तिला बॅग घेऊन रहायला का बोलावलयं ?” निरंजनने चिडून विचारले.

“तू ऐकलस का माझं फोनवरच बोलणं ? तुला सांगणारच होते.अरे तिचे बाबा ऑफीसच्या कामासाठी उद्या टूरला जाणार आहेत. पुढे ३ दिवस ही घरी एकटी असणार. तर म्हटल इथे रहायला ये. आता आम्ही पुढचे तीन दिवस ‘ लेडीज डे आउट ‘ करणार आहोत.”

” म्हणजे काय करणार?” निरंजनने विचारले.
” रोज एक नाटक किंवा सिनेमा बघणार , बाहेर वेगवेगळ्या रेस्टॉरंटस् मधे जेवणार,शाॅपिंग करणार !” विभावरी म्हणाली.

“..आणि तिच ऑफिस?”
“तिने सुट्टी घेतलीये ३ दिवस.”
“आई कोणत्याही कारणाने ती मला माझ्या खोलीत आलेली चालणार नाही, अगोदर सांगून ठेवतोय.” निरंजनने निर्वाणीचा इशारा दिला.

” नाही येणार रे बाबा, ती माझी खोली शेअर करणार आहे,” विभावरीने आश्वासन दिले.

**

पुढचा दिवस दोघींनी फोर्टमधे घालवला. आधी ‘खैबर’ मधे जेवण मग एक्सेलसीयर मधे सिनेमा आणि नंतर किरकोळ शाॅपिंग.
तिथून सहा वाजता ‘ओला’ करून दोघी घरी आल्या.

विभावरीने कटाक्षाने गौतमीला कुठेही
खर्च करू दिला नाही.
” काकू, उद्याचा सर्व खर्च माझ्या अकाऊंटवर हं.” गौतमीने बजावले त्यावर विभावरीने हंसून मान हलवली.

रात्री डायनिंग टेबलवर निरंजन गौतमीच्या विरूध्ध बाजूला बसला आणि एक शब्दही न बोलता जेवू लागला. त्याने तिला ग्रिटही केले नाही, इन फॅक्ट इग्नोर केले.

” काकूs, तुमच्याकडे जेवताना बोलायला बंदी आहे का? ” गौतमीने डिवचले.
” जावू दे ग. ह्याचं नेहमीचच आहे. हा पहिल वाढलेल खाईल आणि मग ऊठून घुम्यासारखा खोलीत निघून जाईल. मी आता संवय करून घेतलीये.” विभावरीने सारवासारव केली.

**

दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलावर, ” निरंजन आम्ही आता दादरला चाललोय. आधी ‘ काॅपर चिमणी ‘ ला जेवू. मग शिवाजी मंदिरला नाटक आणि त्यानंतर शाॅपिंग, असा बेत ठरवलाय.” विभावरीने सांगितले. ” संध्याकाळी सात पर्यंत परत येवू.”

” तुझ वर्क फ्राॅम होम आहे की ऑफिसला जाणार आहेस?” विभावरीने विचारले.
” मी घरीच आहे.”
” बर तर मग तूझ्या जेवणाचे ताट वाढून मायक्रोवेव्हमधे ठेवते. दुपारी एक मिनीट देऊन गरम करून घे.” विभावरीने सांगितले.

***

दोघी बाहेर पडल्याची खात्री झाल्यावर निरंजन रिलॅक्स झाला. त्याने घड्याळ पाहिले, अकरा चाळीस झाले होते.
काल त्याला संधी होती पण दोघी मधेच परत येणार नाहीत याची खात्री नव्हती. आज त्याची खात्री पटली की संध्याकाळपर्यंत कोणी घरी येणार नाही.

स्टाॅक संपून दोन दिवस झाले होते. जोरदार तलफ आली होती.
त्याने फोन लावला,” हॅलो शौकत?”
“कौन?”
” टोकर नंबर एकसो- अठरा.” निरंजन म्हणाला.
” आगे बोल .” समोरून सुचना आली.
” आईस है क्या?”
” हां है. मेजर छे.”
” ज्यादा बोल रहा है तू.”
” आजकल कोइ म्यूल आ नही रहा है. सप्लाय बहोत टाईट है. ”
” चल पाचमें डन.” निरंजन म्हणाला.
” ओके. ढाई बजे गंगा-जमना गेट.”

**

घाईघाईने जेवण उरकून निरंजन बाहेरचे कपडे घालून तयार झाला तेव्हा दोन वाजून वीस मिनिटे झाली होती.

त्याला ठाऊक होते की नाना चौक ते गंगा-जमना जेमतेम पाच मिनिटाचा वाॅक होता. दरवाजा ओढून तो बिल्डिंग खाली आला. चार मिनिटातच तो गंगा-जमना टाॅकिजपाशी पोचला.

पोचल्यावर त्याने आजूबाजूला नजर टाकली.
सर्व काही नाॅर्मल वाटत होते. त्याने खिशातून पैशाचे खाकी कागदी पाकिट काढून हातात धरले. त्यावर लांबून दिसेल अशा मोठ्या अक्षरात ११८ आकडा लिहीलेला होता.

अचानक मागून येवून एका हिरव्या टिशर्ट मधल्या तरूणाने त्याला हलकासा धक्का दिला आणि त्याच्या हातातील पाकिट काढून घेतले व त्याच्या हातात “शौकत” असे पुटपुटत दूसरे पाकिट कोंबले.

वळूनही न बघता निरंजन नाना चौकाच्या दिशेने चालू लागला.
घरासमोर आल्यावर त्याने किल्लीने लॅच उघडले. आत शिरताच समोर सोफ्यावर बसलेल्या गौतमीला पाहून तो दचकलाच.
” हे काय तुम्ही इतक्यात आला पण?”
” आम्ही नाही, मी एकटीच आले.” गौतमी हळूवारपणे म्हणाली.
” आई कुठे आहे?”

त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करत ती म्हणाली ते “आईस पॅकेट मला दे.”
आता मात्र निरंजनला ४४० व्होल्टचा धक्का बसला.
“क..कसले पाकिट?”
“अरे ते शौकतने दिलेले पाकिट!”
” त त..तूला कोणी सांगितले?”

” कुणी सांगायला कशाला पाहिजे, हा बघ MMS आलाय what’s app वर.” गौतमीने त्याला तो खाकी पाकिट हातात धरून गंगा- जमनाच्या गेटवर उभा आहे इथपासून ते हिरव्या टिशर्ट मधील माणसाने पाकिटाची केलेली अदलाबदल करेपर्यंतची क्लिप दाखवली.

निरंजन ते पाहून डोके धरून मटकन खालीच बसला.
” काळजी करू नकोस माझ्या माणसांनी त्याला उचललाय.”
” आता त्याच्याबरोबर अजून दोन ठिकाणी आमची टीम जाईल आणि तुझ्याप्रमाणे त्या गिर्‍हाईकांना उचलेल.”

” कोण आहेस तू?” निरंजनने घाबरून विचारले
“मायसेल्फ इंटेलिजन्स ऑफिसर फ्राॅम NCB अरे तुझा फोन मी दोन दिवसापूर्वीच क्लोन केला होता.”
“तुझ्या आईनेच क्लोनिंगला मदत केली. तू बाथ घ्यायला गेला तेव्हा तिनेच मला तूझा फोन अनलाॅक करून दिला.”

” तेव्हापासून वाट बघत होते तू कधी जाळ्यात येतोस याची.” गौतमी नजरेला नजर देत म्हणाली.
” तू शौकतला सकाळी फोन लावलास तेव्हा तुझा निरोप आणि त्याचा नंबर कळला. मग त्याचा फोन टॅप केला तेव्हा कळले की तो तुझ्याकडून बॅण्डस्टॅण्डला अजून दोघांना डिलिव्हर करायला जाणार होता.”

“याचा अर्थ तू मला आणि माझ्या आईला खोटी आयडेंटिटी सांगितलीस?”
” तुझ्या आईला नाही फक्त तुला!”
” म्हणजे ?”

” तुझे वडील हार्ट ॲटॅकने वारले, त्यानंतर तुझी आई नेहलला भेटली. तुझ्या आई – वडीलांना तू गे असल्याचा संशय होता. तुझ्या आईने हीच गोष्ट नेहलला विचारली. नेहलला आश्चर्य वाटले. ती समजत होती की त्याना तुझ्या ॲडिक्शनची माहिती असणार. तिने कन्फर्म केले की तू गे नाहीस, पण तू ड्रग्ज करतोस आणि ते तिला तुझ्याबरोबर संसार करण्यासाठी धोकादायक वाटले, म्हणून ती ह्या लग्नातून बाहेर पडली.”
” त्यानंतर तुझी आई एका NGO मधे मदतीसाठी गेली. त्यांनी आमच्या डिपार्टमेंटला काॅन्टॅक्ट केला. मग माझी ह्या केसवर नेमणूक झाली.”
” ऑफिसमधे मी तुझ्या आईकडे एक स्टॅण्डर्ड चेकलीस्ट दिली.
” पहायची आहे ? ” म्हणून गौतमीने तिच्या सुटकेस मधून एक कागद त्याला दिला. ती मुळ कागदाची झेरॉक्स असल्याचे त्याच्या लक्षात आले.
निरंजन ती लिस्ट वाचू लागला..

==================================

1. Frequent Mood swing.

2. Erratic sleep patterns.

3. Change in appetite and/or weight.

4. Finding of unexplained medications and or pills.

5. Withdrawal from friend and family.

6. Increased secrecy and time spent online.

7. Lack of interest in recreational activities.

8. Financial strain.

9. Potential legal and criminal entanglement.

10. Going to multiple doctors for prescription shopping (to get more quantity of controlled drugs.)

11. Increased pain sensitivity.

12. Lack of motivation.

13. Difficulty in concentration and issues with short term memory functions.

14. Decline in personal hygiene & care over personal appearance.

15. Drop in work attendance.

16. Inattention to normal obligations.

17. Appear emotionally depressed.

18. Get easily irritated shows craving for drugs.

==================================

निरंजनने लिस्ट वाचून संपवली. आईने त्यातल्या ६ पाॅइंटस् वर टिक् केलेली दिसली. खाली आईची सही होती.
त्याला आता ब्रम्हांड आठवले. तो लहान मुलासारखे हमसून हमसून रडू लागला.
गौतमी त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाली, ” तुझा चेकलीस्ट प्रमाणे स्कोर फक्त ३३ टक्के आहे. तू जास्ती जास्त तीन महिन्यांच्या रिहॅबने यातून बाहेर येशील.”

” मला एक कळत नाही, लहानपणीच मी आईला मुकले, चार वर्षांपूर्वी भावाने संबंध तोडले, एक वर्षापूर्वी नवरा अपघातात गेला तरी मला कधी ड्रग्ज करावेसे वाटले नाहीत आणि तुला खातापिता असला उद्योग का करावासा वाटला?” गौतमीच्या आवाजातला राग त्याला जाणवला.

” हैदराबादला काॅलेज हाॅस्टेलच्या पार्टीत पहिल्यांदा गंमत म्हणून स्नाॅर्ट केले. दर रविवारी पार्टी असे….पुढे पुढे हे वावगे वाटेनासे झाले.इन फॅक्ट तिथले सर्व टाॅपर्स अभ्यासावर चांगल्या रितीने कान्सनट्रेट करता याव म्हणुन ड्रग्ज करायचे.”
“मग तू लग्न केलेसच का?” गौतमीने चिडून विचारले.

“आई – बाबांच्या आग्रहाखातर. मला वाटल बायकोलाही एकतर ह्याची संवय लागेल किंवा संवय होईल.पण दोन्हीही झालं नाही. संपल आता सार!” गौतम हताशपणे म्हणाला.

” हे बघ संपल वगैरे काही नाही. तुझी बॅग भर. आता अर्ध्या तासात ‘Truecare Trust Rehab Centre’ ची व्हॅन तुला न्यायला येइल.”

” जायच्या आधी मला आईला भेटून माफी मागायचीय.”
” नको, त्यांना तुला नेताना बघून खूप त्रास होईल. तू बरा होऊन येशील तो दिवस त्यांच्या साठी खर्या आनंदाचा असेल.”

***

संध्याकाळी सहा वाजता विभावरी घरी आली. गौतमी तिची वाटच पहात होती. तिने विभावरीला जबरदस्तीने नाटकाला पाठवले होते. विभावरीचे डोळे रडून सुजले आहेत हे गौतमीच्या लक्षात आले. तिने दोघींसाठी चहा केला.

सकाळी ते “काॅपर चिमणी”त असतानाच निरंजनने शौकतला केलेला फोन तिने ऐकला. मग ती विभावरीला शिवाजी मंदिरला सोडून तडक परत आली होती.

“मला काही सल्ले घ्यायचेत आणि काही प्रश्न विचारायचेत.” विभावरी डोळ्यातले पाणी रोखायचा प्रयत्न करत म्हणाली.

“अहो विचाराना काकू!” गौतमी म्हणाली.
” मी निरंजनला किती दिवसांनी भेटायला जावू ? ”
” खर म्हणाल तर एकदाही नाही. कारण पेशंट इमोशनला ड्रामा करतात. तुम्हाला ते जड जाईल. असं समजा की तुमचा मुलगा तीन चार महिने परदेशी गेलाय.” गौतमीने सांगितले.

” फोन केला तर चालेल ?”
” मला वाटत तुम्ही आपला नंबरही बंद ठेवावा आणि दुसरा नंबर वापरावा जो निरंजनला माहित नाही. मी तुम्हाला दर आठवड्याला अपडेट्स देत जाईन, शक्यतो video क्लिपस् पाठविन.”
“निघू मी आता काकू?”

” थोडे पर्सनल प्रश्न विचारू?” विभावरीने साशंकतेने विचारले.
” विचारा ना, आपण आता इतके काही परके राहिलो नाही.”
” तुझ्या ऑफिसमधे चर्चा करताना तू आमच्या घरात मॅट्रीमोनियल साईट थ्रू यायचे हे ठरले होते. पण तू साईट साठी तुझी माहिती कशी मॅनेज केलीस ?”

गौतमी मनापासून हंसली. “माझं नांव, वय, आईचे नसणे, पतीनिधन खरे आहे. माझे बाबा स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. आमचा खारला फ्लॅट आहे. दिलेला गिरगावातील पत्ता एका लांबच्या नातेवाईकाचा आहे. तसेच मी UPSC ची टाॅपर होते याचा उल्लेख केलेला नव्हता. सध्या मी NCB मधे इंटेलिजन्स ऑफिसर आहे.”

” आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलं आहेस?” विभावरीच्या डोळ्यात आशा दाटून आली.

” काकू, मला तुमचा प्रश्न कळला. मला विचार करायला वेळ हवा.” गौतमी आपली सुटकेस उचलत म्हणाली. ” आता अपडेट्स द्यायच्या निमित्ताने भेटी होतीलच. Till then, bye.”

गौतमी दरवाजा उघडून बाहेर पडली. जाताना तिच्या हातून दरवाजा उघडा राहिला.

( समाप्त )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}