हळद संग्रहक: भूषण जोशी BA ९८३४४२३५०७
हळद
आपल्या घरांत, रोजच्या जेवण्यात, परीसरात काही औषधी बनस्पती असतात. मात्र आपल्याला त्याची कल्पना नसते. कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांच्या घरगुती औषधे या पुस्तकातील काही नेहमीच्या भाज्या, फळे, वनस्पती यांचे औषधी उपयोग शेअर करत आहे. हे पुस्तक १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२२ साली प्रथम प्रकाशित झाले आहे. ज्यांना त्रास आहेत त्यांनी वापर करून अनुभव जरूर कळवावेत.
हळद
हळद फार औषधी आहे. हळदीच्या अंगी रक्त शुद्ध करण्याचा उत्तम गुण आहे. पोटातून आणि वरून रक्तशुद्धीसाठी हिचा उपयोग करतात. ओली हळद आणून वाळवावी व हिचा उपयोग औषधात करावा. बाजारातील हळद शिजलेली असते, म्हणून ती औषधाच्या उपयोगी नाही. अंगावर खरूज उठली, कंड फार सुटली आहे अशावेळी हळद कडुनिंबाबरोबर पोटात घेतात. १ ग्रॅम हळद, वीस कडुनिंबाची पाने घालून बारीक वाटावी व गोळी करून दोन घोट पाण्याबरोबर रोज सकाळी एकवेळ घ्यावी, आणि वरून कडुनिंब व हळद वाटून अंगास लावावी. असे एक सप्तक केले असता सर्व प्रकारची खरूज, कंड नाहीशी होते असा अनुभव आहे. पोटात जंत झाले तर हळद व गूळ याच्या हरभऱ्याएवढ्या लहान गोळ्या करून त्या लहान मुलास तीन-चार देऊन वर वायडिंगाचा काढा पिण्यास द्यावा, दोन-चार दिवसात जंत कमी होतात. लघ्वीस फार होत असेल, तर चांगली हळद १ ग्रॅम, तीळ १ ग्रॅम व त्याच्या बरोबरीने म्हणजे २ ग्रॅम गूळ घालून दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळी दोन घोट ऊन (कोमट) पाण्याबरोबर घ्यावी, कसल्याही प्रकारची जास्त झालेली लघ्वी थांवते. कावीळीवर १ ग्रॅम हळद, २० ग्रॅम दह्याबरोबर घेतात. चार-पाच दिवसांत फायदा होतो. पडसे व कफ झाला असता कढ़त दुधातून हळद घालून घेण्याचा प्रघात आहे. फायदा होतो. कोणत्याही प्रकारची विषाची बाधा झाली असता १ ग्रॅम हळद गाईच्या तुपाबरोबर खाण्याची वहिवाट आहे. दोन सप्तकात विषाचे परिणाम कमी होतात. हळद ही वरून फार वापरतात. पडले, लागले, गाठाळले वगैरे जागेवर हळकुंड पाण्यात उगाळून ऊन करून जाड लेप देण्याची वहिवाट आहे. लेपाने रक्त थांबून गाठाळलेले बरे होते असा अनुभव आहे. डोळे आले, अतिशय खूपु व दुखू लागले, भयंकर आग होऊ लागली तर आम्ही वैद्यलोक हळदीच्या काढ्यात फडकी भिजवून डोळ्यांवर ठेवतो, फार फायदा होतो. ५० ग्रॅम हळद घेऊन, अर्धा लिटर पाण्यात निम्मा काढा करावा व त्या काढ्यात स्वच्छ फडकी भिजवून आलेल्या डोळ्यांवर वरचेवर ठेवावी; आग, खुपणे बंद होते. मूळव्याधीस हळकुंड, कांदा, आणि तीळ एकत्र घालून शिजवून त्या पोटिसाने शेकावे. मूळव्याधीचा ठणका राहतो (कमी होतो). कोणी कोणी नुसते हळकुंड लोण्यात उगाळून मूळव्याधीचे मोडास लेप करतात, मोड नरम पडतो व फायदा होतो. देवीवर व कांजिण्यावर डाग लवकर भरून येण्यासाठी कात व हळद ही लावतात. देवीचे व्रण लवकर भरून येतात. हळद बाळंतपणात फार वापरतात. याने बाळंतिणीस होणारे सगळे विकार दूर होतात. कलकत्याचे सुप्रसिद्ध ‘स्त्री- रोग चिकित्सक डॉक्टर दास व्याख्यानात असे म्हणाले की, अत्यंत गरीब लोकांची शहरातील गलिच्छ राहणी, बाळंतीण होताना गरीबांच्या बायकांची होत असलेली दैना या गोष्टीचा विचार केला असता बाळंतपणात गरिबांच्या बायका बाळंतरोग झाल्याशिवाय कशा वाचतात हे आश्चर्य आहे. परंतु मी जेव्हा बारकाईने तपास केला, तेव्हा गरिबांच्या बायका अंगाला लावण्यात सर्वत्र ठिकाणी हळद वापरतात. हळद जंतुघ्न (Disinfectant) आहे म्हणून ही स्त्रियांना बाळंतपणात उपयोगी पडते. बाळंतपणात कोणताही रोग होऊ देत नाही. हळदीचा वज्रदेही म्हणजे सतत निरोगी आणि बलवान राहण्यास चांगला उपयोग होतो. १ ग्रॅम हळद रोज रात्री ऊन पाण्याच्या घोटाबरोबर झोपतेवेळी घ्यावी; याप्रमाणे सतत सारखी १५ महिने खावी म्हणजे मनुष्य वज्रदेही बनतो.
संदर्भ: घरगुती औषधे
लेखक: कै. वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे.
संग्रहक: भूषण जोशी BA
९८३४४२३५०७
टीप: आपल्याकडे फोडणीत हळद घालण्याची पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत पाडून समाजाचे हित चिंतलेले आहे आपण जेव्हा कॉन्टिनेन्टल फूड चवीने खातो त्यामध्ये इतकी रक्त शुद्धी करणारी उपयुक्त हळद असते का याचा विचार करावा.