दुर्गाशक्तीमंथन (विचार)

एक चष्मा — मनासाठी – संध्या घोलप #SandhyaGWrites

एक चष्मा — मनासाठी

सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांचा “वेलकम होम” हा सिनेमा पाहत होते. तसा आधीही खूप वेळा बघितला होता. पण अतिशय संयत अभिनय, नैसर्गिक घरगुती वातावरण (अगदी रात्री उशिरा पर्यंत आई एकटीच, स्वयंपाकघरात वाल सोलत बसली आहे, किंवा हॉल मध्ये खाली गाद्या टाकून मंडळी झोपली आहेत, हे घराघरात दिसणारं चित्र) आणि परिपक्व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी – एवढ्या गोष्टी मला पुरतात. यात कोणीही खलनायक नाही, मारामारी नाही, मेलोड्रामा नाही!

या सिनेमात शेवटची पाच मिनिटं, सुबोध भावे आहे. आणि त्याच्या संवादांसाठी मी हा सिनेमा पुन्हा पाहिला. संवाद लेखक – अर्थातच भावे आणि सुखठणकर.

नवऱ्याला सोडून, आपली मुलगी आणि सासू यांना घेऊन, माहेरी परत आलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला, अमेरिकेत राहणारा हा भाऊ आश्वस्त करतो आहे की तुला या निर्णयाने बरं वाटणार आहे ना? मग झालं तर! तो तिला म्हणतो,
” जेमतेम शंभर वर्षाचं आयुष्य. त्यातली पन्नास वर्ष झोपेत जातात. राहिलेली पंचवीस वर्ष झगडण्यात गेली तर मग आनंदासाठी कधी जगायचं? ”
मला हे खूपच पटलं आणि आवडलं. आलेल्या परिस्थितीवर किंवा अडचणींवर मात करून, मार्ग काढून आनंदाने जगणं हे आपल्याच हातात असतं.
वयोमानानुसार डोळ्याला चष्मा लागतो, कानाला मशीन लागतं, knee caps, heart problems — सगळ्या अवयवांची डागडुजी केली जाते. पण मनाची डागडुजी करतो का आपण? मानसिक आजार असणाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये. त्यांच्यासाठी व्यावसायिक सेवा उपलब्ध आहेत. सर्वसामान्य माणूस असा शोध घेतो का?

खरं तर प्रत्येकाने, मनालाही एक चष्मा लावावा आणि आपणच आपल्याला लख्ख पाहावं.

कुरकुऱ्या, दुख्खी, मख्ख, आक्रस्ताळा, हटवादी, घुम्या, दुसऱ्याला लागेल असं बोलणारा, मनमानी कारभार करणारा, दुसऱ्याची अजिबात सोय न पाहणारा, आत्मकेंद्री, अप्पलपोटा — काय दिसतंय मनाच्या चष्म्यातून ? स्वतःशी खरं बोला आणि ठरवा.

स्वतः आनंदाने जगणं आणि आनंद पसरवणं – दोन्ही यायला हवं. नाहीतर माझा मी आनंदी राहतो, तुम्ही बसा बोंबलत! असं नको व्हायला.

या सिनेमात दीपा लागू म्हणतात, ” आपल्याला तरी एकमेकांकडून काय हवं असतं? थोडीशी “समजूत”, दुसरं काय?”
किती खरं आहे हे. निदान कुटुंबातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यावं, नाहीतर त्यांना “आपलं” का म्हणावं? बघा चष्म्यातून, आपण समजून घेतो आहोत का ते. नाहीतर एका घरात राहूनही आपण परकेच की!

– संध्या घोलप
#SandhyaGWrites

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}