मंथन (विचार)

थेंबुटला इती लेखनसीमा ~ महाराजकन्या नयना

|| जय श्रीराम || 🙏🏻

थेंबुटला

“ए, शुक, शुक!
सरक की जरा.. मला दिसत नाहीयेत श्रीमहाराज! ”
मी दचकून मागे वळून पाहिलं! समाधी मंदिराच्या शांततेत, एवढा आवाज कोणी केला म्हणून जराशी दचकलेच!
तशी अगदी तुरळक लोक होती दुपारच्या वेळी.
मागच्या ८-१० दिवसांपूर्वी गोंदवले इथे पाऊस झाला ना… चांगला तासभर तरी भरपूर कोसळला! त्या दिवशीची गोष्ट.

वातावरणातला उकाडा चांगलाच वाढला होता. जीवाची तगमग सुरु होती. दुपारी चार साडेचारची वेळ. समाधी मंदिरात विष्णुसहस्रनामाची वेळ होत आली होती.. लोक येत होते. बाहेर आभाळ भरून आलं. वारं सुटलं,आकाशात ढगांची दाटी झाली. हळूहळू मोठाले थेम्ब येऊ लागले.
अचानक वातावरण गारेगार झाले. आणि समाधी मंदिराच्या शिखरावरून खाली ओघळणारे पाणी पागोळ्यामधून वाहू लागले. आत बसलेल्यांना बाहेर किती पाऊस कोसळतोय याचा अंदाज येतच होता.
पावसाचे काही थेंब पागोळ्यांना लटकलेले दिसत होते. छान वाऱ्याच्या हेलकाव्याबरोबर झुलत होते. एकसारखी जणू मोत्याची माळच. फार सुंदर दृश्य होते ते.
सहज त्यांना प्रश्न केला, ” काय बघताय रे?”
सगळे एका सुरात उत्तरले, “महाराजांचे दर्शन घेतोय”

मजाच वाटली मला तर. तिथे लटकलेले थेंब खाली मातीत मिसळत होते… त्यांची जागा दुसरे थेंब घेत होते.. जणू एक दुसऱ्याला ‘ खो ‘ च देत होते. एकापाठोपाठ एकेक माळ तयार होत होती.
त्यातलेच काही चुकार थेंब, वाऱ्याच्या झोताने.. मी बसले होते त्या खिडकीच्या गजावर येऊन आदळले. तोंड वेडेवाकडे करत , जरा सावरून एका हाताने गज घट्ट धरून ठेवत एक थेंबुटला मला वरचे वाक्य विचारत होता.
गंमतच वाटली मला. “तुला रे काय करायचंय महाराजांचे दर्शन घेऊन! ” हसत हसत त्याला विचारले.
कसाबसा लटकत तो म्हणाला, अग तुला काय माहित किती लाखो मैलांचा प्रवास करून आम्ही फक्त एक क्षण श्रींच्या दर्शनाला येतो ते. इथे येण्यासाठी युगानुयुगे प्रतीक्षा करतो आम्ही.
“काय सांगतोस?’ माझी उत्सुकता चाळवली गेली.
“तर काय! ज्ञानोबा म्हणतात ना.. ” देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी…” अगदी क्षणभर आयुष्य असते बघ आमचे. शिंपल्यात पडलो तर मोती होऊ. पण ते काय खरे नाही, शेवटी निर्जीवच ना. मातीत पडलो तर मातिमोलच आमचे आयुष्य, पण त्या आधी इथे समाधी मंदिरावर उतरलो तर महाराजांच्या नुसत्या दर्शनाने उद्धरून तरी जाऊ. या ‘एका क्षणाच्या’ दर्शनासाठी आम्ही किती आटापिटा करतो माहीत आहे का?

“आणि एवढा आटापिटा कशासाठी तो? ” मी विचारले

“अग , आमचा इवल्याश्या जीवाचा उद्धार होण्यासाठी ! ~ इति थेंबुटला

“तुमचा उद्धार? तो कसा काय बुवा होतो?” माझी उत्सुकता ताणली गेली.

“अग मनुष्य देह मिळावा त्यासाठी काय काय करावं लागत!”
“म्हणजे असं बघ.. या महापुरुषाने अगणित जणांना नामाला लावले. आता इथे गोंदवल्यात इतके नाम भरले आहे. इथल्या कणाकणात नाम आहे. तुम्ही जे नाम घेता, ते वाया जात नाही, असेच म्हणालेत ना महाराज. त्याने तुमचे तर कल्याण होतेच, पण तुमच्या आजूबाजूला जे जीव आहेत, त्यांच्याही कानावर पडून त्यांचे सुद्धा ते नाम कल्याणच करतच असते, याची कल्पना आहे का तुला? या मंदिराच्या समोरच्या झाडावरच्या चिमण्या दिसतात तुला? यांना पुढचा जन्म मानवाचा आहे.

“अरेच्चा, ते कसे काय बुवा? ” माझी उत्सुकता शिगेला पोहचली.

“आज कश्या पावसाने आडोश्याला खोपट्यात बसल्या आहेत ना! यांचे आयुष्य ते किती, उण्यापुऱ्या ७-८ वर्षांचे. पण रोज संध्याकाळी थव्याने मंदिराच्या शिखराला प्रदक्षिणा घालतात. आणि दिवसरात्र इथले नाम त्यांच्या कानावर पडते ते. यांना नक्कीच पुढचा जन्म मानवाचा आहे, हे मी खात्रीने सांगतो.”
एवढासा थेंबुटला, गजाला चिकटून हळूच गिरकी घेत मला समजावत होता.

“अगदी हेच नाम कानावर पडावे म्हणून आम्ही आसुसलेले असतो ग!
इथल्या आसमंतात भरलेल्या या नामाला चिकटून … नामाची छत्री घेऊनच आम्हीसुद्धा या पवित्र धरतीवर उतरतो. आणि असे समाधीमंदिरावरून ओघळताना जाता जाता महाराजांचे दर्शन झाले तर आम्ही कृतकृत्य होतो. आमचा इथून पुढचा प्रवास अगदी उत्तमरीतीने होतो. त्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक जन्मात मग महाराज सोबत करतात.

“तुमचा पुढचा प्रवास म्हणजे? तुम्हीत तर इथून पुढे, ओहोळ, पाट, नदी, असे करत समुद्रालाच मिळणार ना?” मी विचारले.

“इतके सोपे नाहीये ग ते!” थेंबुटला कळवळून उत्तरला.
“असं बघ, आता इथून पुढे आम्ही खाली जे पाण्याचे पाट वाहात आहेत तिथून वाहत जाऊन ध्यानमंदिराजवळील सांडव्याला जाऊन मिळतो. तिथून पुढे माणगंगेला.
माणगंगा पुढे पंढरपूरच्या पुढे भीमा नदीला मिळते. भीमा नदी दक्षिणेत वाहत जाऊन पुढे कृष्णेला मिळते. आणि नंतर कृष्णा नदी पुढे कुठेतरी बंगालच्या उपसागराला मिळते. इथे मिळालेल्या या नामाला चिकटूनच आम्ही पुढे वाहत जातो. पुढे बंगालचा उपसागर अरेबियन समुद्राला मिळतो. तिथून जर पुढे आम्ही महासागरात गेलो तर भरकटत राहतो. दगडावर पडलो तर ते सुप्त चैतन्य, झाडाने शोषून घेतले तर त्यातले अर्ध विकसित चैतन्य आणि मनुष्यरूपातील पूर्ण विकसित चैतन्य अश्या सगळ्या रूपांमध्ये महाराज आपल्याला सोबत करतात.
तिथेही आम्ही फक्त या नामामुळे… नामाला चिकटून राहिल्याने तग धरून राहतो. समुद्रातल्या एखादी जिवाच्या शरीरात प्रवेश मिळाला तर ठीक नाहीतर समुद्राच्या तळाशी जाऊन बसावे लागते. तिथेही महाराज आमच्या बरोबर असतातच. कारण “जिथे नाम तिथे मी ” असे महाराजच सांगून गेलेत.
बरं, जूनमध्ये तुमचे नैऋत्य मोसमी वारे सुरु झाले की , समुद्राच्या पाण्याची वाफ, मग ढग आम्हाला वाहवत नेत केरळकडून आम्हाला भारतात प्रवेश मिळतो, खरे. पण खूपच कमी जणांना या गोंदवल्याच्या भूमीपर्यंत पोहचता येते. म्हणूनच आमचा आटापिटा असतो की इथे येऊन एकदा तरी महाराजांची दृष्टी आपल्यावर पडावी! पण तसा गोंदवल्यात पाऊस कमी पडतो ना.. इथे येण्यासाठी पूर्वसुकृतच असावे लागते !

हां, आता एखाद्या तृषार्त जीवाने प्राशन केलं अन् त्याच्या शरीरात प्रवेश झाला कि तिथून आम्हाला देह मिळतो मग अगदी एकपेशीय असो की बहुपेशीय.. चतुष्पाद, द्विपाद करत किडा मुंगी पासून, सरपटणारे प्राणी, मोठे प्राणी या सर्वांमध्ये फिरत फिरत ८४ लक्ष योनी पार केल्या की मनुष्य जन्म मिळतो.. ते ही काही पूर्व सुकृत असेल तर!!

या सर्व रूपांमध्ये, जन्मांमध्ये महाराज आपल्याला सोबत करतात….नव्हे नव्हे एकेक जन्म उद्धाराकडे नेत असतात आपला! अगदी बखोटीला धरून ओढतच आणतात म्हण ना!
एकेक जन्म टाकत जेव्हा शेवटी मनुष्य जन्म मिळतो तेव्हा ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात ठेवावे त्याचा आकार धारण करते त्याप्रमाणे त्या व्यक्तीची सगळी कर्मबंधने आपल्याला लागू होतात. इथसुद्धा आपण गप्प बसत नसतो. पुन्हा पुढच्या जन्माची तयारी करत असतो.
आता नाम घेऊन सद्गती प्राप्त करायची की पुन्हा दुर्गतीकडे जायचं, हे मात्र आपल्या हातात असतं. हा एकच जन्म असा आहे की यात वाणी दिलीय आपल्याला. मुखाने नाम घेऊ शकतो. चांगले वाईटाची जाण असते.

मी चांगलीच हादरले. आता माझ्या डोळ्यासमोर मागच्या पन्नास वर्षांचा भूतकाळ नाचू लागला. सगळे हिशोबाचे आकडे दिसू लागले. किती विकारांच्या मागे लागलो, मायेत कितीदा गुरफटलो, कितीदा भरकटलो.. याची गणतीच नाही.
डोकं सुन्न झाले. डोळ्यात पाणी आले. कळवळून महाराजांना विनंती केली,” नाही महाराज नाही, आता तुम्ही दिलेले नाम फक्त.. इतर विषय नकोत. पुन्हा ते लाखो जन्म नको. आणि इतक्या जन्मांची प्रतीक्षा ही नको. फक्त आपल्या पायाशी विसावा द्या आता.”

समाधी मंदिरात आता विष्णुसहस्त्रनाम समाप्त होण्याच्या मार्गावर होते.. श्लोक सुरु होता, ” आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति।। श्री गोपालकृष्ण भगवान कि जय! 🙏🏼

… समाधीवर असलेल्या मंदिराच्या काचेच्या दरवाजाआडचा ‘केशव’ मिश्कीलपणे हसत होता.
जय श्रीराम!🙏🏻

~ इती लेखनसीमा🙏🏻
~ महाराजकन्या नयना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}