★★सांगू कशी कुणाला★★ (८) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (८) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग आठवा
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (८)
पंकज…
आय एम सो हॅपी टुडे. इतके दिवस माझे प्रयत्न सुरू होते ,ते काम झालंय. यु एस च्या एका मोठ्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे. आता माझं ध्येय पूर्ण होणार. मला काही दिवस भारतात जावंच लागेल. जुन्या कंपनीच्या सगळ्या फॉर्मलीटीज पूर्ण कराव्या लागतील. पंधरा दिवसांनी मला नवीन कंपनीत जॉईन व्हायचं आहे. आठवडाभर तिकडे जाऊन होतील तेवढी तिथली कामं करून येतो. बॉस माझ्यावर नाराजच आहे. पण इट्स ओके!
रागिणीला फोन करून कळवतो.
“हाय रागिणी! होप यु आर फाईन! तुला एक गुड न्युज द्यायची आहे. मला इथे जॉब मिळाला आहे. पंधरा दिवसांनी जॉईन व्हायचं आहे. आठ दिवसांसाठी मी भारतात येतोय. आय थिंक तुला तुझा कोर्स मधेच बंद करावा लागेल, कारण तुझं व्हिसाचं काम लवकर झालं तर तू लगेच यु एसला येऊ शकते. बट डोन्ट वरी! इथे तुला छान कोर्सेस जॉईन करता येतील. यु विल फ्लरीश! आईला मी फोन करून कळवतोच आहे. माझं फ्लाईट बुक झालं की तुला कळवतो. सी यु देन, बाय!”
रागिणी….
पुढच्या सिटिंगसाठी राजसकडे निघाले,इतक्यात पंकजचा फोन आला. त्याचं बोलणं ऐकून,आतल्या आत उमासे यायला लागले. धडधड वाढली. मला आता काही दिवसांनी यु इसला जायचं होतं, माझ्या नवऱ्यासाठी! त्याच्याबरोबर मी सप्तपदी घालून आयुष्यभर साथ देईन असं वचन दिलं होतं. त्याने पण तर नातीचरामी म्हणत मला वचन दिलं होतं. पण तो हे विसरला होता. मला तो कशातच सामील करून घेत नव्हता. खोलीचं दार बंद करून मला जोरजोरात रडावंसं वाटलं. मला नक्की काय हवं होतं? पंकजच्या नावाचं मंगळसूत्र मी दूर करत नव्हते पण मला राजस हवा होता. वॉशरूममध्ये जाऊन मी मनसोक्त रडून घेतलं. मोबाईलची रिंग वाजली म्हणून बाहेर आले. राजसचा कॉल होता.
“हॅलो रागिणी! आज किती वाजता येते आहेस?”
“येते तासाभरात. ”
“गुड! आज जरा जास्त वेळ काढून ये. आज मॅक्सिमम पोर्ट्रेट पूर्ण करायचा प्रयत्न करतो.”
राजसचा आवाज ऐकून डोळे भरून आले. माझं आणि राजसचं असं काय नातं आहे की त्याचा विचार जरी आला तरी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. हे कसले लागेबांधे आहेत?
मी राजसकडे पोहोचले. माझा चेहरा बघून राजसने विचारले,
“रागिणी, काय झालं? चेहरा का असा रडवेला दिसतोय? आर यु ओके? बरं वाटत नसेल तर दोन दिवसांनी करू. नो प्रॉब्लेम!”
राजस,कसं सांगू तुला? मला तुझ्यापासून दूर व्हायचं नाही पण व्हावं लागणार आहे.
“मी ठीक आहे राजस. तू सुरू कर.”
राजसने पोर्ट्रेट काढायला सुरवात केली. पंधरा मिनिटांनी मला म्हणाला,
“रागिणी,कालच्यासारखे आज डोळे हसरे दिसत नाहीत. गढूळलेले वाटताहेत. डोळ्यात काही गेलं होतं का?”
राजसचं बोलणं ऐकलं आणि मी हातात चेहरा झाकून हुंदके देऊन रडायला लागले. राजस बावरला. माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “रागिणी, काय झालं?”
मी रडत रडतच राजसला मिठी मारली आणि माझं रडू आणखी अनावर झालं. राजस माझ्या पाठीवरून फक्त हात फिरवत होता.
हाच..हाच स्पर्श मला पंकजकडून हवा होता. वासनारहित! ज्यात फक्त प्रेम, ओलावा,काळजी होती. ह्याच स्पर्शासाठी मी आसुसले होते. मी राजसला अजूनच बिलगले. किती वेळ डोळे मिटून मी त्याच्या कुशीत होते,माझंच मला कळलं नाही.
राजसने मला बाजूला केलं. ग्लासमध्ये माझ्यासाठी सरबत करून आणलं.
“रागिणी,आता बोल! काय झालं? तू इतकी का हळवी झालीस?”
“राजस,पंकजचा फोन आला होता. त्याला यु एसला जॉब मिळाला आहे. काही दिवसांनी मला पण जावं लागेल.” मी परत गदगदून रडायला लागले.
माझं रडणं थांबतच नव्हतं. इतक्या दिवसांचं साठलेलं बाहेर पडत होतं. काय निर्णय घ्यायचा ह्या संभ्रमात होते. उध्वस्त झाल्यासारखं वाटलं.
राजसने मला थोपटलं.
“रागिणी,आज तुझा मूड नाही. आपण दोन दिवसांनी बोलू.”
“नको राजस,तू हे पोर्ट्रेट लवकरात लवकर पूर्ण कर. अर्धवट ठेवू नकोस.”
“रिलॅक्स रागिणी! मी पूर्ण करणारच आहे पण तुझा असा चेहरा डोळ्यासमोर ठेवून नाही.”
राजस,माझं हसूच माझ्यापासून सारखं लांब पळतय रे! प्रखर उन्हात पावसाचा शिडकावा यावा तसा तू मला भेटलास. राजस,तू का आलास माझ्या आयुष्यात? नको होतंस यायला,खरंच नको होतं!…..
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (८) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे