मनोरंजन

★फुलले रे क्षण माझे★ (४)   कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★फुलले रे क्षण माझे★ (४-अंतिम)

सायलीला उठल्यावर खूपच ताजेतवाने वाटले. आज तापही नव्हता आणि थकवा कमी जाणवत होता. पण आज स्वराजची सतार ऐकू आली नाही. इतकी गाढ झोप लागली? घड्याळात सात वाजले होते. सायली लगेच उठली. फ्रेश होऊन ती डायनिंग टेबलजवळ आली. काका आणि स्वराज दोघांचीही चाहूल लागत नव्हती. सायलीने सुमाताईंना विचारलं,”सुमाताई, काका आणि स्वराज घरात नाहीत का?”

“आज सोमवार ना? दादांच्या फॅक्टरीला सुट्टी असते. मग दोघेही बाजारात जाऊन आठवड्याची भाजी,काही वाण सामान हवं असेल तर घेऊन येतात. येतीलच तासाभरात. तुमच्यासाठी चहा करते.”

सायलीने चहाचा कप हातात घेतला आणि मोबाईलची रिंग वाजली.

“सायली,आम्ही दुपारी बारा वाजता निघतोय. पाच वाजेपर्यंत पोहोचू. तासभर बसून लगेच आपण पुण्यासाठी निघू. बाबांना उद्या ऑफिस आहे ना!”

“हो चालेल, आत्ता काका घरी नाहीत. आले की त्यांना सांगते.”

“सुमाताई,आईचा फोन होता. आज संध्याकाळी निघतेय मी.”

“रहावा की ताई,चार दिवस. बरं वाटतंय तुम्ही आहात तर! बाईमाणूस घरात असलं की किती फरक पडतो.”

“येईलच की आता काही दिवसात स्वराजची बायको.”

“हो,दादांनी मुली बघायला सुरवात केलीय बहुतेक!”

सुमाताईंचं ते बोलणं ऐकलं आणि सायलीला आतून काहीतरी जाणवलं. ह्या दोन दिवसात स्वराज जो काही कळला होता त्यावरून ह्या घरात येणारी मुलगी भाग्यशालीच म्हणायला हवी. सायलीने चहाचा कप विसळला आणि तिच्या खोलीत गेली. तिने बॅग भरायला सुरवात केली. घरी जायचं होतं पण उदासच वाटत होतं. पुण्यात गेल्यावर परत आर्यनचे विचार,ती आपली चिडचिड,नकोच वाटलं तिला!

दारावर टकटक झाली म्हणून सायलीने वळून बघितलं. दारात स्वराज होता.

“ये की आत.”

“झाली बॅग भरून? माझी काही मदत हवीय तुला?”

“नो थँक्स,स्वराज!”

“सुमाताई म्हणाल्या,काकांचा फोन आला होता. छान वाटलं,तू दोन दिवस होतीस तर!”

“मी काय अर्धा वेळ झोपूनच तर होते.” सायली हसत म्हणाली.

“परत ये आमच्या घरी! आता तुला हे घर परकं नाही. बाबा तुला बोलावताहेत. ये बाहेर.”

स्वराज गेला आणि सायलीला आतून उमासे यायला लागले. दोन दिवसात परकी माणसं इतकी आपलीशी वाटू शकतात? काय होतंय कळत नव्हतं.

सायली बैठकीच्या खोलीत आली. दिलीप आणि स्वराज तिच्यासाठी ब्रेकफास्टला थांबले होते.

“सायली,प्रशांतला मी म्हटलं,एक दिवस रहावा इथं,पण त्याला रजा मिळत नाहीय. निमित्त चांगलं नव्हतं,पण तू आमच्या घरी त्या निमित्ताने राहिलीस. परत निवांत ये.”

“स्वराजच्या लग्नाला येईन. बोलवशील ना स्वराज?” सायली स्वराजकडे बघून मिस्कील हसली.

“म्हणजे काय? पुणेकरांना तर खास घरी येऊन आमंत्रण द्यावं लागेल.”

स्वराज सायलीकडे बघत म्हणाला. स्वराजची ती नजर सायलीला रोमांचित करून गेली.

प्रशांत,वर्षा आल्यावर तासभर गप्पा, खाणं झालं आणि तिघे पुण्याला परत जायला निघाले.

“काका,ह्यावेळी आजारी होते त्यामुळे अंबाबाईचं दर्शन राहून गेलं. पुढच्या वेळी!”

“आता कंपनीच्या कामासाठी येणार असशील तर इथेच ये. इथून कागल जवळ आहे.”

“हो काका!”

“दिलीप,धन्यवाद काही म्हणत नाही. माझा तुझ्यावर हक्क आहेच.” प्रशांतने दिलीपला मिठी मारली.

सायली गाडीत बसली. स्वराजला हात करताना तिला काहीतरी तिच्यापासून दूर दूर जातंय असं वाटलं.

पुण्यात परतल्यावर सायलीने दोन दिवसांची रजा टाकून विश्रांती घेतली. चार दिवसांचा गोळ्यांचा डोस गेला होता त्यामुळे थकवा जरा कमी झाला होता. सकाळी उठल्यावर मात्र रोज तिला स्वराजची सतार आठवायची,ते मंजुळ स्वर कानात घुमायचे. स्वराजला फोन करावा असं अनेकदा मनात येई पण ती करत नव्हती. पोहोचल्यावर दिलीपकाका आणि स्वराजशी बोलली तेवढंच!

रोजच्या रुटीनमध्ये सायली व्यस्त झाली. पण एक दिवस स्वराजचाच फोन आला.

“हॅलो! सायली,काय ग? पुण्याची झालीस आणि विसरलीस का?”

“तसं नाही रे!”

“मग कसं? रिलॅक्स,जरा तुझी गम्मत! तब्येत कशी आहे? औषध घेतेस ना वेळेवर?”

“तब्येत अगदी छान आहे, थकवा कमी झालाय. मी कोल्हापूरच्या डॉक्टरांशी फोनवर बोलले.”

“अच्छा! म्हणजे डॉक्टरांशी बोललीस पण ज्याने डॉक्टरांकडे नेलं त्याला विसरलीस.” स्वराज हसत म्हणाला.

“बरं बाबा,चुकले! आत्ता नक्की करते.”

व्हाट्स अप वर सायली आणि स्वराजचं चॅटिंग सुरू झालं. दोघांच्या आवडी बऱ्याचश्या सारख्या होत्या. सायलीनेच एक दिवस स्वतःहून आर्यनबद्दल स्वराजला सांगितलं. स्वराजला सगळं माहिती होतंच पण त्याने तसं अजिबात दर्शवलं नाही.

 

—सायली,ते तुझ्या आयुष्यातलं वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा.

 

—- स्वराज,असं इतकं लगेच विसरू शकते मी? माझी काहीही चूक नसताना माझं लग्न मोडलं हे माझ्या माथी चिकटलं आहे.

 

—–पुसून टाक ते. तुझ्याच हातात आहे. तुझी चूक नाही हे तुझ्या वागण्यातून लोकांना कळायला हवं. बी ब्रेव्ह अँड कॉन्फिडन्ट.

 

—-तुझे सतार वादनाचे ऑडिओ मला पाठवतोस? रोज रात्री झोपताना ऐकत जाईन.

 

—-नक्की,लगेच पाठवतो.

स्वराजचं सायलीला असं सतत समजून घेणं, समजावणं,तिला आवडायला लागलं. त्याच्या मेसेजची ती रोज वाट बघायला लागली. त्याच्याशी बोलून तिला मानसिक आधार मिळत होता.

काही कामानिमित्त स्वराज पुण्याला येतोय हे त्याने सायलीला सांगितलं आणि तिचा आनंद तिलाच जाणवला. स्वराजच्या भेटीसाठी ती आतुर झाली होती. स्वराजने सायलीला फोन केला,”सायली माझं काम चार वाजता संपेल. तुला आज घरी लवकर येता येईल का? तुम्हा तिघांची भेट घेऊन मी लगेच कोल्हापूरला निघणार. माझा उद्या संध्याकाळी सतारवादनाचा कार्यक्रम आहे,त्यामुळे मला आज रात्री कोल्हापूरला पोहोचायला हवं.”

“तुझा प्रोग्राम?”

“हो,येतेस?”

“नाही रे,रजा मिळणं शक्य नाही पण माझ्या तुला खूप शुभेच्छा.”

स्वराज भेटायला आला आणि त्याच्या सहवासात तास कसा संपला सायलीला कळलंच नाही. वर्षाला तिच्यातील बदल जाणवला. स्वराज कोल्हापूरला गेल्यावर ती प्रशांतला न राहवून म्हणालीच,   “सायली,स्वराजशी बोलताना किती खुश असते हे तू बघितलं का प्रशांत? मला वाटतं, सायलीला आता विचारावं का स्वराजबद्दल?”

“विचारायला हरकत नाही,पण तिच्या मनात तसं काही नसलं तर?” प्रशांतने शंका काढली.

“आज रात्री जेवताना मी विषय काढते. जे काही तिचं उत्तर असेल ते कळेल तरी!”

रात्री टेबलवर जेवताना वर्षाने विषय काढलाच,”सायली,तुझ्याशी कसं बोलायचं हे इतके दिवस कळत नव्हतं कारण तू धक्क्यातून बाहेर यायला वेळ लागला. आता तू बरीच नॉर्मल झाली आहेस म्हणून सांगते,

“दिलीपकाकांनी तुला स्वराजसाठी मागणी घातली होती. पण त्यावेळी आपण एका मानसिक विवंचनेतून जात होतो म्हणून बाबांनी तुझ्याजवळ विषय काढला नाही. तुझं काय मत आहे ते स्पष्ट सांग. हे बघ बेटा, जे घडलं ते घडलं. ते मागे टाकून आता तुला पुढे जायला हवं.”

वर्षांचं ते बोलणं ऐकलं आणि सायलीची धडधड वाढली,”पण स्वराज तयार आहे का?”

“अर्थात सायली! त्याची संमती असल्याशिवाय दिलीप कसा विचारेल?”

“आई-बाबा,मला थोडा वेळ द्या. मी विचार करून निर्णय घेते.”

सायलीला रात्री झोपच येईना. सारखा स्वराज डोळ्यासमोर येत होता. म्हणजे स्वराजला माझं लग्न मोडलं हे माहिती असून सुद्धा तो लग्नाला तयार होता? इतकं सगळं माहिती असूनही कोल्हापूरला दोघांनी कधीच जाणवू दिलं नाही. पहाटे सायलीचा डोळा लागला. सुट्टी होती म्हणून उठायची घाई नव्हती. ती परत पांघरूण घेऊन झोपायला लागली,इतक्यात मोबाईलचा मेसेज टोन आला. तिने बघितलं तर स्वराजचा मेसेज होता.

—-काल रात्री उशीरा पोहोचलो म्हणून मेसेज किंवा फोन केला नाही. आज संध्याकाळच्या प्रोग्रामचे व्हीडिओ तुला नंतर फॉरवर्ड करतो.

 

सायलीने मेसेज टाकला.

 

—-स्वराज,माझी किमती वस्तू कोल्हापूरला राहिलीय रे!

 

—कुठली? पण तुझी खोली सुमाताईंनी आवरली तेव्हा काही दिसलं नाही.

 

—-चोरीला तर नसेल गेली ना?

 

—-काहीतरीच काय सायली? काय आहे इतकं महत्वाचं?

 

—-माझं हृदय! तुझ्याजवळ तर नाही ना राहिलं?

 

—-हं! वाटत तर आहे राहिल्यासारखं,बघतो एकदा!

स्वराजने खुशीत मेसेज टाकला.

 

—बघ तरी! जपून ठेव, मी येतेय घ्यायला.

 

—आता ते परत मिळणं जरा मुश्किलच आहे. आता ते माझं झालं आहे.

 

—स्वराज,बोलला नाहीस काही,तुला सगळं माहिती होतं ना? आर्यनबद्दल!

 

—-सायली,आता तो विषय नको. तुझी वाट बघतोय. लवकर ये माझ्या आयुष्यात! सनई,बँडबाजा घेऊन तय्यार राहतो.

 

—-आलेच,तुझ्या नावाचा साजशृंगार करूनच येईन.

 

—-सायली, तुझं अंबाबाईचं दर्शन राहिलं होतं ना! अंबाबाई आपली जोडीने दर्शनाला यायची वाट बघतेय….!

सायलीने सुखाने डोळे मिटले. डोळ्यात पाणी होतं पण गालावर लाली चढली होती……

///समाप्त///

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}