दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
माहिती संकलक .... योगिता गुर्जर
श्री गणेशाय नम:!
आज गणेशोत्सवातील पहिला दिवस. आपणा सर्वांना गणरायाच्या आगमनाच्या खूप शुभेच्छा आणि निर्विघ्न गणेशोत्सवाच्या सदिच्छा 🙏🏻
गणपती प्रथम पूजेचा मान आणि लहान थोर सर्वांच्या मनात विशेष स्थान असलेला हा बाप्पा.. भारतभर आणि बाहेरही याची अनेक स्वरूपात पूजा होते. अर्थातच त्याच्या मंदिरांची संख्या देखील लाखोच्या घरात.
अनेक मोठी मंदिरे.. मानाचे गणपती हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहेत..पण पुण्यात आणि बाहेरही अनेक वैशिष्ठ्यपूर्ण मंदिरे आहेत जी कालौघात थोडी विसरली गेली आहेत.किंवा त्यांच्यात काही वेगळेपण आहे जे तुमच्यापर्यंत पोचावे असे वाटते..म्हणून आजपासून ही एक छोटीशी लेखमाला…दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
——————————————————————————————–
त्रिशुंड गणपती मंदिर
आज पहिले मंदिर आपल्या पुण्यातील. अनेकांना माहीत असेल पण पहिला मान मिळावा अशी अनेक वैशिष्ट्ये असलेले त्रिशुंड गणपती मंदिर
नागझरी अर्थात आजची सोमवार पेठ इथे असलेले हे मंदिर शिल्पकला व स्थापत्यकला यांचा देखणा संगम आहे..
मंदिरात प्रवेश करताना द्वारपाल, व्याल, अनेक पौराणिक कथा, लक्ष्मी, विष्णू ,यक्ष अशा अनेक कोरीव प्रतिमा दिसतात..आजही त्यातील अनेक ओळखण्या इतपत सुस्थितीत आहेत.
मंदिरावर एक शिलालेख आहे जो संस्कृत, फारसी आणि मराठी या तिन्ही भाषांत आहे.
इथली मूर्ती ही त्रिशुंड अर्थात डावी,उजवी व मध्य अशा तीन सोंडा असलेली आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रात इतरत्र कुठेही असल्याचे ऐकिवात व पाहण्यात नाही ..पुण्यात मात्र अशा दोन मूर्ती आहेत.
इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी असून ज्या आसनावर हे विराजमान आहेत ते आसन मोराच्या पाठीवर आहे..अर्थात हा त्रिशुंड मयुरेश आहे. खालच्या बाजूस गण कोरलेले आहेत तर मूर्तीच्या मागे डोक्यावर शेषशायी विष्णू कोरलेला आहे. त्याच्यावरती श्रीगणेश यंत्र कोरलेले आहे.
प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल रखुमाई, नटेश्वर आणि शंकराची लिंगोद्भव प्रतिमा आहे, म्हणजे लिंग रूपी शंकराची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला हंस व खालच्या बाजूला वराह या विष्णू आणि ब्रह्मदेव यांची प्रतीकात्मक आकृती आहे.
इथले सर्वात चमत्कृतीपूर्ण शिल्प म्हणजे प्रवेशद्वाराजवळ असलेले साखळदंडात जखडलेले गेंडा व त्यासमोर काही टोपीवाले बंदूकधारी सैनिक…गेंडा हा प्राणी महाराष्ट्रात ते ही मंदिर शिल्पाचा भाग म्हणून असणे हे आश्चर्य जनकच..ब्रिटिश सैन्याच्या प्लासी वरील विजयाचे हे चित्र असावे का? आपल्या समूहातील इतिहासाचे अभ्यासक कदाचित यावर प्रकाश टाकू शकतील
या मंदिराचा सर्वात उल्लेखनीय पैलू म्हणजे अर्थातच दर्शनी भाग असला तरी प्रदक्षिणा मार्गासह
मंदिराच्या मागील बाजूस देखील आणखी बरेच कोरीवकाम आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे इथे भेट दिली तर आवर्जून हे काम पहा..
मंदिराच्या वास्तूमध्ये राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतीय शैलीचे मिश्रण आहे.
या मंदिराचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे याच्या गाभारा व सभामंडप यांच्या खाली तेव्हढ्याच आकारमानाचे एक तळघर आहे ज्यात गोसावी समाधी आहे…दर वर्षी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे तळघर उघडतात आणि त्यातील गुढघाभर पाण्यातून या समाधीचे दर्शन घेता येते…हा अनुभव देखील एकदा तरी घ्यावा असाच.
आज हे सुंदर मंदिर केवळ एक चौथरा आणि बाजूची काही फूट जागा वगळता अनेक घरे, दुकाने आणि टपऱ्या यांनी वेढले गेले आहे. अगदी मंदिरासमोर दोन फूट अंतरावर मांसाहारी भोजनालय सुरू झाल्याचे खेदजनक दृश्य विषण्ण करणारे आहे..
अप्रतिम शिल्पकलेचा नमूना असलेले काळया पाषाणातील हे सुंदर मंदिर, त्यातील देव देवतांच्या मूर्ती हे सारे दुर्लक्ष, अनास्था आणि वाढते अतिक्रमण यामुळे लवकरच नष्ट होईल की काय अशी भीती वाटते..तसे होवू नये व हा ऐतिहासिक वारसा जतन करून पुढील पिढ्यांना अनुभवता यावा या प्रार्थनेसह हे पहिले पुष्प आज विघ्नहर्त्या गणेश चरणी अर्पण 🙏🏻
माहिती संकलक …. योगिता गुर्जर