“लिव्हींग वील” दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित लेख…
सध्याच्या काळात प्रत्येकाने वाचावा व अनुसरावा असा एक वेगळा पण फारच आवश्यक विषय: वाचा व लोकांना प्रेरीत करा… “लिव्हींग वील” दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित लेख…
लिव्हींग वील
काकांच्या आजाराची तीव्रता वाढली त्या दिवशी मित्राचा मला फोन आला. तो मला म्हणाला, यार पैश्याची गरज आहे. माझ्याजवळचे सारे पैसे संपले. प्रचंड खर्च होतो आहे परंतू हवे तसे यश मिळत नाहीये. शिवाय बाबांना देखील फारच त्रास होतो आहे. त्यांचा त्रास बघवत नाही. पण काही इलाज नाही. डॉक्टर देखील नक्की काही सांगू शकत नाही. रोज नवनविन कॉम्प्लीकेशन्स होत आहेत. काय करु काही कळत नाही. तू पैसे पाठवू शकतोस का? किमान पाच लाख तरी पाठव. मित्राला मी पैसे पाठवतो असे सांगितले. पैश्याची जुळवाजुळव करायला दोन दिवस लागतील असे देखील सांगितले. काकांच्या आजाराचा विचार करत असताना मला माझे मार्गदर्शक व अमरावतीच्या श्री. ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सत्यनारायण लोहीया यांनी बनविलेले लिव्हींग वील आठवले. त्यांनी बनविलेले लिव्हींग वील हा एक अत्यंत क्रांतीकारी प्रकार आहे. या मागचा त्यांनी मला सांगितलेला क्रांतीकारी विचार देखील मला आठवला. मित्राच्या वडीलांच्या आजाराच्या पार्श्वभुमीवर मला ते लिव्हींग वील काळाची गरज वाटून गेले. याचे कारण मित्राच्या वडीलांच्या तब्येतीची स्थिती व त्यामधून उद्भवलेली परीस्थिती मी प्रत्यक्ष पैसे घेऊन गेल्यावर मला कळली.
मित्राच्या वडीलांचे वय ७८ आहे. आतापर्यंत त्यांची अगदी व्यवस्थित तब्येत होती. परंतू सहा महिन्यापूर्वी ते रस्त्यावर चालताना पडले व त्यांचे माकडहाड तुटले. त्याचे एक मोठे ऑपरेशन करावे लागले. दुर्दैवाने त्या ऑपरेशनमुळे ते बरे झाले परंतू त्यांचे चालणे बंद झाले. कुठेही बाहेर जाता येत नसल्याने सुरुवातीला त्यांचे मित्र मंडळी भेटायला यायचे. नंतर ते देखील बंद झाले व त्यामुळे काका डीप्रेशन मधे गेले. त्याचा परीणाम त्यांच्या प्रकृतीवर फार वाईट पद्धतीने होऊ लागला. त्यांच्या किडनीवर परीणाम झाला. पुन्हा पुन्हा डायलेसीस करावे लागले. आता नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे दवाखान्यात भरती केले. डॉक्टर गेले १५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्याचे पूर्ण प्रयत्न करीत होते. परंतू या सर्व प्रकारात त्यांची तब्येत अजून जास्त खालावली. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवावे लागत होते. एका मोठ्या रुग्णालयात काकांवर उपचार सुरु होते. मित्राने मला सांगितले की गेल्या पंधरा दिवसात त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या शस्त्रक्रिया, आयसीयू, व्हेंटीलेटर, औषधे या सर्व बाबींमुळे त्याच्या जवळचे जवळपास पंचेवीस लाख रुपये खर्च झाले होते. आता पैसे उभे करणे शक्य नसल्याने त्याने मला पैसे मागितले होते. सर्वात वाईट व दुर्दैवी बाब म्हणजे, एवढा प्रचंड खर्च केल्यानंतरही काकांची तब्येत सुधारण्याची चिन्हे दिसत नव्हती.
त्या दिवशी सायंकाळी त्या आयसीयुच्या बाहेर मी व माझा मित्र दोघेच बसलो होतो. त्यावेळी तो जे बोलला ते कुणाला पटेल की नाही ही खात्री नाही. परंतू तो मनापासून बोलला. कदाचित बाहेर तो ते बोलू शकला नसता. त्याच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढल्या गेले असते. परंतू मी त्याचा जीवलग मित्र असल्याने तो ते बोलला. मी नेलेल्या पाच लाख रुपयांचे पाकीट हातात घेऊन तो म्हणाला, यार हे पैसे मी तुला कधी परत करु शकेन ते सांगता येत नाही. बाबांच्या या आजारामुळे मी पार संपून गेलोय असे वाटतेय. माझ्या जवळची सर्व जमा पुंजी संपली. माझी सगळी गुतवणूक मी मोडली. एवढेच काय तर बायकोचे काही दागीने देखील मोडले. माझी नोकरी जेमतेमच आहे तुला ठाऊक आहे. माझी बायको देखील तिला जमेल तशी कामे करून मदत करते. मेहनत करून आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लावून ठेवले होते. खरे सांगतो, सारे काही मी मोडले. आता काही शिल्लक नाही. एवढे करुनही मला घरी परवा आई म्हणाली, तू तुझ्या बाबांना वाचवू शकत नाही का? त्यांना अजून मोठ्या गावच्या दवाखान्यात नेऊ शकत नाही का? तुझे वडील आहेत ते… त्यांच्याकरीता तू एवढे तर केले पाहिजे. खरे सांगतो, मला रडायला आले. माझ्या जवळची सारी पुंजी खर्च झाली. मुलांच्या शिक्षणाकरीता ठेवलेले सारे पैसे संपले. पुढे मी त्यांना गरज पडली तर काय करु हा विचारही मनात आला तर मला घाबरायला होते. यार, मी खरोखरीच कमी पडतोय का मुलगा म्हणून? पण मी यापलीकडे खर्च नाही करु शकत. माझ्या बाबांकडे देखील पैसे नव्हते. बहिणींच्या लग्नाकरीता होते नव्हेत ते सारे त्यांनी खर्च केले. सर्वात वाईट म्हणजे एवढे करूनही, बाबा अजून बरे होते नाहीत व आई त्याबद्दल मला दोषी मानतेय. मी काय करु? असे वाटते की स्वतःला संपवून… पुढचे वाक्य मी त्याला बोलू दिले नाही. समस्या खरोखरीच गंभीर होती. भावनिक देखील होती. यावर तोडगा काढणे मुलगा म्हणून त्यांस शक्य नव्हते. उपचार थांबवा असे जर त्याने सूचितही केले असते तर बाकीचे तर नातेवाईक सोडा परंतू त्याच्या आईने देखील त्याला एक अत्यंत नालायक मुलगा ठरविले असते. यावर तोडगा माझ्या मित्राचे बाबाच काढू शकले असते जर ते ७० वर्षांचे झाल्यावर त्यांना डॉ. सत्यनारायणजी लोहीया यांच्या लिव्हींग वील बद्दल माहिती मिळाली असती.
लिव्हींग वील म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास जगण्यासंबंधीचे इच्छापत्र. अमेरीकेमधे असे लिव्हींग वील अनेक लोक जे वयाची सत्तर वर्षे पूर्ण करतात ते करून ठेवतात. जागतिक परीमाणानुसार साधारणपणे वयाची ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर असे वील केले जावे असे मानले गेले आहे. यामधे विशेषत्वेकरून तीन चार गोष्टी ठळकपणे लक्षात घेणे गरजेचे आहे. वयाच्या सत्तरीनंतर जर एखाद्या दुर्धर आजाराची बाधा झाली की ज्यामधून बरे होणे शक्य नाही व ज्या आजाराचा उपचार अत्यंत खर्चिक व केवळ पेशंटला त्रासदायक ठरणारा आहे अश्यावेळी कोणत्या मेडीकल सुविधा नाकारायच्या याबद्दलच्या अधिकारांबाबत या वील मधे लिहीले जाते. जसे व्हेंटीलेटर लावणे, किंवा ट्युब टाकून द्रवस्वरुपी जेवण देणे, अवयव प्रत्यारोपण करणे, डायलेसीस करणे किंवा अतिरीक्त रक्तपुरवठा करणे इत्यादी बाबी करण्यास नकार देणे हे समाविष्ट होते. हा जगण्याच्या अधिकारांतर्गत येणारा भाग मानल्या गेला आहे. या वील मधे साधारणपणे सत्तरीनंतर आजारी पडल्यास कश्या प्रकारची वैद्यकीय प्रक्रीया करावी याबाबतचे मार्गदर्शन केलेले असते. कारण साधारण या वयातील आजार लवकर बरे होत नाहीत. प्रचंड खर्च होतो व शेवटी हाती काही लागत नाही. परंतू आजारी व्यक्तीच्या सभोवतालच्या लोकांना असले निर्णय करता येत नाहीत व म्हणून सत्तरी गाठलेल्या प्रत्येकाने असे वील करून ठेवणे आवश्यक आहे असे डॉ. सत्यनारायण लोहीया सांगतात. कोणतीही अशी प्रक्रीया जी खर्चिक व वेदनादायी असेल ती करु नये असे या लिव्हींग वीलमधेस्पष्टपणे लिहीलेले आहे. जर आजारादरम्यान घरीच रहावे लागले तर व दुर्दैवाने अंथरुणाला खिळल्यास स्वच्छता व प्रथमोपचार यावर खर्च करावा. सोबतच कमीत कमी त्रास व्हावा या करीता लागणारी औषधी केवळ देण्यात यावी असे लिहीले आहे. परंतू कोणत्याही प्रकारची कृत्रीम व्यवस्था, नाका तोंडात नळ्या टाकणे, मोठाल्या शस्रक्रीया करणे किंवा व्हेंटीलेटर लावून जगविणे यास मनाई करण्यात आली आहे. याऊलट शांतपणे व वेदनारहीत मृत्यू यावा याकरीताची औषधे जरुर देण्यात यावी असे देखील लिहीले आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण डॉ. लोहीया असे सांगतात की बरेचवेळा सत्तरीनंतर आपण दुर्धर आजाराने ग्रासतो, काही बोलता येत नाही, परावलंबीत्व सहन होत नाही व अश्यावेळी आपल्या नातेवाईकांवर उगाचच सामाजिक दडपण यायला लागते ज्यामुळे त्यांना लागेल तेवढा पैसा खर्च करणे क्रमप्राप्त होते. याशिवाय, अश्यावेळी सल्ले देणारे अनेक जण उपस्थित होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथी वापरून बघायला सांगतात. अगदी कुठल्याश्या बाबाकडे जाऊन धूपारे वगैरे घ्यायला देखील सांगतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून तरुण पिढी हे सारे सल्ले निमूटपणे मानत राहते. अंतीमतः काहीच होत नाही व जिवनाचे परमेश्वराने दिलेले तास संपतात. या पेक्षा डॉ. सत्यनारायण लोहीया यांनी केलेल्या वीलनुसार ती स्वतः ठरवून दिलेली प्रक्रीया असल्याने सोबतच्या नातेवाईकांच्या मनामधे देखील स्पष्टता राहते. डॉ. लोहीया यांनी यामधे आणखी दोन गोष्टी लिहील्या आहेत ज्याबद्दल व्यक्तिशः विचार बदलू शकतो. यात त्यांनी मृत्यूपश्चात उपयोगी अवयव जसे डोळे, ह्रदय, किडनी इत्यादी गरज असलेल्या रुग्णाला देण्याबाबत स्पष्ट लिहीले आहे व अंत्यसंस्कार लवकरात लवकर करून कोणताही धार्मिक विधी किंवा प्रक्रीया करु नये असेही लिहीले आहे. पाप, पुण्य आणि मोक्ष या संकल्पना मानणाऱ्यांना कदाचित हे लिहीणे कठीण राहू शकते. परंतू इतर सर्व कलमांना अत्यंत आवश्यक असेच आपल्याला संबोधता येईल. असे वील करण्याची प्रक्रीया देखील सोपी व सुलभ आहे. याकरीता कुठेही वकीलाकडे जाऊन किंवा कोर्टात जाऊन वेळ घालविण्याची गरज नाही. या सर्व बाबी आपल्या हस्ताक्षरात एका कागदावर लिहून काढता येऊ शकतात. त्यावर आपल्या परीचयाच्या दोन लोकांच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घ्यायच्या व शेवटी आपल्या नियमित डॉक्टरचे योग्य शरीर व मानसिक स्वास्थ्याबाबत प्रमाणपत्र त्यावरच लिहून डॉक्टरांची स्वाक्षरी घ्यायची. डॉ. लोहीया हे देखील सांगतात की असे लिव्हींग वील तयार केल्यानंतर परीवारातील सर्व सदस्यांना ते वाचून दाखवावे व त्याच्या प्रती जवळच्या नातेवाईकांना द्याव्यात. याचा फायदा असा की नंतर कधी कधी नातेवाईकांमधेच उपचार सुरु ठेवायचे की नाही याबाबत वाद होण्याची शक्यता असते. म्हणजे भावाने वडीलांच्या आजारपणाकरीता पैसा लावावा म्हणून बहिण भावनिक होऊन त्याला आग्रह करते व बहिणीचा नवरा मात्र त्यामधे आर्थिक योगदान देण्यास तयार नसतो. असले भावनिक वाद टाळण्यापेक्षा असे लिव्हींग वील लिहून सर्वांना वाचून दाखवून हीच माझी इच्छा राहील व ती इच्छा पूर्ण करणे हे सर्वांचे कर्तव्य असेल असे भावनिक आवाहन आपणच करून टाकावे असा सल्ला डॉ. लोहीया देतात.
हे सारे बरोबर व आवश्यक वाटत असले तरी असे सारे लिहीणे या करीता मात्र धैर्याची गरज आहे हे तितकेच खरे. कारण मृत्यू ही एक अशी घटना आहे की ज्याचा एवढ्या तार्किक पद्धतीने स्विकार करणे फारच कठीण आहे. माझे माझे करता करता जिवनच नव्हे तर संपर्कातील माणसांपासून तर अनेक वर्षे सांभाळलेल्या लोखंडी पेटीतील बसच्या जुन्या तिकीटांपर्यंत सारेच आपल्याला अत्यंत प्रीय असते. त्याचे महत्वाचे कारण त्या सर्व गोष्टींसोबत जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आपल्याला या जगाशी घट्ट बांधून ठेवतात. त्यामुळे मोहाची ही घट्ट वीण सोडून तटस्थपणे असे लिव्हींग वील बनविणे अत्यंत कठीण आहे परंतू तेवढेच ते आवश्यक देखील आहे. आपल्या पश्चात आपल्यावर प्रेम करणारे आपले आप्त जर आपल्या सुधारणा न होणाऱ्या व्याधीमुळे त्यांच्या जीवनाची गुंतवणूक गमावणार असतील तर ती बाब निश्चितच आपल्याकरीता सुखावह राहू शकणार नाही. भावनिक आधारावर जीवन जगणारे आपण भारतीय लोक असल्याने स्वतःच्या मृत्यूचा असा तटस्थ व व्यवहारिकदृष्टीने विचार करणे ही गोष्ट आपल्याकरीता कठीण असली तरी असाध्य अजिबात नाही. म्हणूनच सध्याच्या मल्टीस्पेशीॲलीटी उपचारांच्या जगात वयाच्या सत्तरीनंतर लिव्हींग वील हा एक उत्तम व सर्वांना समाधानी ठेवणारा मार्ग ठरु शकतो. हे असे लिव्हींग वील बनविण्याची प्रक्रीया देखील सुलभ आहे. त्यामुळे निदान याबद्दल सकारात्मकतेने विचार करण्यास सुरुवात करायला हरकत नसावी असे वाटते.
– डॉ. अविनाश भास्कर मोहरील
फारच छान आहे हा लेख!!