सप्तपदी नीलिमा काश्यप
सप्तपदी नीलिमा काश्यप
चौपाटीवर मुलं खेळत होती. काहीजण वाळूतून गडकिल्ला बनवत होती. काही किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटांमध्ये दंगामस्ती करतहोती. सरिता शांतपणे बघत बसली होती. सूर्य खालीखाली चालला होता. धूसर संध्याप्रकाश आणि आकाशात रंगांची रांगोळी पसरतहोती. तिने भराभरा ते क्षण फोनच्या कॅमेऱ्यात टिपले. एक सुखसमाधानाची तृप्ती होती तिच्या चेहेऱ्यावर. कालच तिला मराठी चित्रपटसृष्टीतल्या तिच्या योगदानासाठी प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता. सोहळा दिवाळीच्या सुमारास होणार असे जाहीर केले होते.
आता सुद्धा शूटिंगच्या निमित्ताने ती दापोलीत आली होती. ते संपल्यावर तिने गाडी काढली आणि स्वतः ड्राईव्ह करत आपल्या गावातआली. जुने वाडे, काही मोडकळीस आलेले, काहींच्या जागी आधुनिक घरं झालेली. पन्नास वर्षांपूर्वीच्या तिच्या आठवणीतअसलेल्या खुणा शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. गाव बदलले होते. बाजारात मोठी दुकानं दिसत होती. त्यांचा घराचा पत्तातिला शोधावा लागला. त्यांचं मोडकळीस आलेलं घर बंदच होतं आणि शेजारचे घर सुद्धा. कोणालातरी विचारूया का इथेराहणारी लोकं कुठे गेली ते? पण नकोच ते. तिच्या कानांत सरू, सरू असा आवाज घुमला. छे, आता कोण मला अशी हाकमारणार? तिने मनात येणारे विचार झटकून टाकले. गाडी सुरु करून ती किनाऱ्यावर जायच्या रस्त्याला लागली. जरा चांगल्यादिसणाऱ्या हॉटेलमधून गाडीत बसूनच बटाटावडा बांधून द्यायला सांगितला आणि तिच्या थरमॉस मध्ये चहा भरून घेतला. तिला तिथेउतरून लोकांच्या नजरेला सामोरं जायचं नव्हतं. तिने गाडी सुरु केली आणि थोड्याच वेळात ती चौपाटीवर येऊन पोचली.
उन्हं उतरायला लागली होती. संथ वारा होता. सावली बघून ती एका झाडाखाली बाकावर बसली. लाटा पाहात तिने गरम वडाखाल्ला, चहा घेतला. आता तिला तरतरी आली. वाळूत मुलांचे खेळ आणि दंगामस्ती चालू होती. सूर्य भराभरा अस्ताला जात होता. आकाशात रंगांची रांगोळी तयार झाली होती. तिने पटकन फोन काढून खूपसे फोटो काढले.
किती छान दृश्य होते ते. हे सगळं लहानपणी अनुभवले होते. किती वर्षांचा काळ सरला होता. लहानपणी सर्व मुलं अशीच वाळूतखेळायची. किल्ले बनवायची. पाण्यात दंगामस्ती करायची. दिपू, त्यांच्या शेजारीच राहणारा दीपक, पण असायचा. लहानपणापासून त्यांची मैत्री. सख्ख्या भावंडांशी नाही जमणार एवढी गट्टी होती त्यांची. आवळे, कैरी, जांभूळ, पेरू असं त्याला काहीमिळालं कि लगेच तिला आणून द्यायचा, घे सरू, तुला आवडतात ना म्हणून. लहानपण सरलं. मॅट्रिकच्या परीक्षा झाल्या. आता खूपछान सुट्टी होती. पुढे कॉलेज कुठे करायचं ह्याच्या चर्चा व्हायच्या. पण दोघांनाही एकमेकाला सोडून जायचे नव्हते. प्रेमाची भावना हळूहळू दोघांच्याही मनात उमलली होती. चोरून चिट्ठ्या पाठविल्या जायच्या. आपण कायम बरोबरच राहायचं हे त्यांनी जणू गृहीतचधरलं होतं.
पण इतकं छान स्वप्नमय जीवन बहुतेक नियतीला मंजूर नव्हते. सरिताच्या वडिलांचे अचानक हार्ट अटॅकने निधन झाले. ध्यानीमनीनसताना घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. सरिता सर्वात मोठी. दुसरी भावंडं, लहान भाऊ अमेय आणि मधली बहीण आशाअजून शाळेत शिकत होती. सरिता एका रात्रीत एकदम प्रौढ होऊन गेली. तिने स्वतःला सावरले. दिपू तिला साथ देत होता. पणकाही निर्णय तिला स्वतःलाच घ्यायचे होते. कुटुंब चालवायला आणि भावंडांची शिक्षणं पार पाडायला तिने नोकरी करण्याचा निर्णयघेतला. पण ते तरी इतकं सोपं थोडीच होतं. गावात काय नोकरी मिळणार ? नोकरीसाठी तिला मुंबई गाठायला हवी होती. शिक्षण तर अर्धवटच सोडून द्यावे लागले. डिग्री नाही त्यामुळे शहरात सुद्धा तिला मेहेनत करावी लागणार होती. गावांत नाटकमंडळीहोती. तिथे तिने रोजंदारीवर काम सुरु केले. नाटकांची आवड होती. नाटकाचा प्रयोग असला कि तेवढे पैसे मिळायचे. निदानत्यामुळे घरात चूल पेटू लागली. वडील पोस्टात होते म्हणून आईला थोडेफार पेन्शन मिळू लागले. नाटककंपनीच्या गोळेमास्तरनातिची परिस्थिती माहिती होती. तिच्यासाठी त्यांनी मुंबईपुण्यात प्रसिद्ध असलेल्या नाट्यमंडळीत शब्द टाकून तिला काम मिळवूनदिले. आपली बॅग भरून ती हिमतीने पुण्यात आली. गाव सोडताना तिने दिपूची भेट घेतली. “माझ्यात गुंतून राहू नकोस. माझे हातअडकले आहेत जवाबदारीमुळे, पण तू शिक आणि मोठा हो” असे सांगून त्याचा निरोप घेतला.
तू नीट जा, राहायची नीट सोय कर. मी येईन तुला भेटायला. दोघेही खूप वेळ हातात हात घालून समुद्रावर बसले होते सूर्यास्तबघत.
सरिता हळूहळू रुळली नाटकमंडळीत. अभिनयाच्या छटा ती भराभरा शिकली. मुंबईपुण्याचे लोक नाटकाचे खूप शौकीन होते. सामाजिक जाणिवा दाखवणारी, कौटुंबिक आणि संगीत नाटकं खूप चालत होती. तिचे नांव पण आता पहिल्या क्रमांकाच्या यादीतअसायचे. पेपरमध्ये तिचे नांव छापून यायचे. गावांत पण ती प्रसिद्ध झाली होती. पैसे चांगला मिळू लागल्याने तिची भावंडं चांगलेशिक्षण घेऊ शकत होती. अमेय आता मेडिकलला होता आणि आशा MSc करत होती त्याचे तिला खूप समाधान होते. दिपूचीआठवण यायची. तो आता बँकेत ऑफिसर होता. सुरुवातीला दोन तीनदा पत्र आली त्याची पण तिने उत्तर पाठविले नाही. तिनेआपल्या हृदयातला हा कप्पा नेटाने बंद करून टाकला. तिचे क्षेत्र असे होते कि तेव्हां नटीशी कोण लग्न करेल असे तिला वाटायचेकारण सुरुवातीचा काळ तसाच होता. आई थकली होती. तिला अमेय सांभाळत होता.
भूतकाळातल्या ह्या आठवणीत ती रमून गेली असताना अचानक हाक ऐकू आली, सरु!!! तिने चमकून पहिले तर समोर एक व्यक्तीउभी होती. Bनिरखून पाहिल्यावर ओळख पटून एकदम ती उद्गारली, दिपू !!! तू इथे कसा?
हा प्रश्न मीच तुला विचारतोय कि तू अचानक इथे कशी?
बस ना इथे, मग सगळं सांगते. मग तिने आपल्या शूटिंग बद्दल आणि ते संपल्यावर वेळ मोकळा असल्यामुळे तिने इथे चक्कर मारायचेकसे ठरविले हे सर्व सांगितले. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याने तिचे अभिनंदन केले.
तुमच्या बद्दलच्या सगळ्या बातम्या मी नेहमीच वाचतो बरं का मॅडम!!! तो नेहमीच्या लकबीने हसत म्हणाला हे पाहून सरिताला हसूआले.
दोघेही खूप वेळ गप्पा मारत होती. त्याचे पण आई बाबा वारले होते. तो सारस्वत बँकेत आता ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत होतादापोलीतच.
मग तुझी फॅमिली काय म्हणते?
कुठची फॅमिली? मी एकटाच राहतो.
मला तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करायचे नव्हते. आईबाबांचा विरोध होता तरी.
सरिता आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली.
त्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. मी रोजच इथे येतो काम संपल्यावर आणि वाळूत शांत बसतो सूर्यास्त बघत. अंधारपडल्यावर एक चांदणी लुकलुकते. तीच माझी सरु आहे अशी मी माझ्या मनाची समजूत घालतो.
सरूच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने अलगद त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. अंधार पडायला लागला होता. समोर लांबवर दिवे दिसूलागले होते आणि आकाशात चांदणी. स्वप्नवत दुनियेतून हलकेच बाहेर येत दोघे उठले आणि एकमेकांचे हात धरून चालू लागले. वाळूत त्यांची पावलं उमटत होती सप्तपदीसारखी!!!
रस्त्याजवळ आल्यावर तिने कारचा दरवाजा उघडून त्याला बसायला सांगितले.
हे बघ मी तुला सोडते पण माझे कार्यक्रम, शूटिंग सर्वांच्या तारखा लागलेल्या आहेत त्यामुळे मला थांबता येणार नाही. पण आपण भेटूपुन्हा असेच.
ओके मॅडम, दिपूने नेहमीच्या स्टाईलने निरोप घेतला. कार पुढे गेली तरी बराचवेळ तो भारलेल्या स्थितीत उभा होता हात हलवत!!!
नीलिमा काश्यप
04-11-2024