© छोट्याशा कथा By Sandip…… दिवाळी
दिवाळी ♥️ ♦️♥️
विश्वासराव : अगं गोळी घे तुझी रात्रीची, आधीच उशीर झालाय. काय बघतीयेस त्या खिडकीतून रात्रीचं? विमान बघत असशील ना?
शालिनीताई : (ओशाळून) …. होय ओ.
विश्वासराव : अगं असं विमानाला बघितल्याने मुलं येत असतात का कधी?
शालिनीताई : नाही येत, माहितीये ओ मला. पण मनाला आपली वेडी आशा लागून राहते त्याचं काय? उद्यापासून दिवाळी सुरु होणार, सगळीकडे आनंदाचे वातावरण असणार आणि आपल्या घरात मात्र….
विश्वासराव : अगं आपल्या घरातही असणारच आहे की दिवाळी. आपण छान छान नवीन कपडे घालणार, आकाशकंदील, पणत्या लावणार आणि तू म्हणत असशील तर मी फटाकेही आणतो उडवायला. आणि अनिकेत म्हणालाय ना फोनवर की मी फराळाचं ऑर्डर केलंय तुमच्यासाठी, ते येईल उद्या. आता एवढं सगळं असल्यावर अजून काय हवं तुला?
शालिनीताई : अहो हे सगळं म्हणजेच फक्त दिवाळी असते का? घरात मुलगा, सून, नातवंडं पाहिजेत निदान या दिवाळीचे चार दिवस तरी. घरात किलबिलाट पाहिजे, हे सगळं असेल तर ती दिवाळी नाहीतर नुसतं आपण दोघंच फक्त एकमेकांची तोंड बघत बसायची याला दिवाळी म्हणतात का?
विश्वासराव : तू म्हणतेयस ते बरोबर आहे शालिनी, पण हे जसं आपल्याला वाटतं तसं ते मुलांनाही वाटायला हवं ना? चल जाऊ दे, झोप आता गोळी घेऊन. खूप उशीर झालाय. उद्या अभ्यंगस्नानाला लवकर उठायचं आहे ना?
शालिनीताई : कुणी असो वा नसो तुम्ही तुमची दिवाळी साजरी करणारच. अगदी सगळं साग्रसंगीत पद्धतीने करणार. (असं म्हणून शालिनीताई हसतात.)
विश्वासराव : हो, मग करणारच. आपला आनंद हा आपणच शोधायचा असतो, त्यासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहायचं नसतं. (असं म्हणून विश्वासराव शालिनीताईंना घेऊन झोपायला जातात.)
———————————————————————-
दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठून विश्वासराव आणि शालिनीताई अभ्यंगस्नान करतात. नंतर विश्वासराव देवपूजा करून मग दोघे हॉलमध्ये नाष्टा करायला बसतात. नाष्टा करत असतांनाच दारावरची बेल वाजते. शालिनीताई जाऊन दार उघडतात तर अनिकेतने ऑर्डर केलेलं फराळाचं पार्सल आलेलं असतं.
पण त्या पार्सलमधली फराळाची क्वांटिटी बघून शालिनीताई त्या डिलिव्हरी बॉयला म्हणतात, “अरे हे आमचं पार्सल नाही आहे रे. आम्ही घरात दोघंचजण राहतो, आम्ही एवढं फराळाचं खाणार आहोत का? पण तो डिलिव्हरी बॉय म्हणतो यावर तुमचाच पत्ता आहे म्हणजे हे पार्सल तुमचंच आहे. दोघांचं हे बोलणं चालू असतानाच शालिनीताईंच्या मोबाईलवर अनिकेतचा फोन येतो.
अनिकेत : हॅलो आई, पार्सल आलं का फराळाचं?
शालिनीताई : हो आलंय रे. पण क्वांटिटी खूप जास्त आहे. बहुतेक दुसऱ्या कुणाचंतरी पार्सल आपलं नावं टाकून पाठवेलेलं दिसतंय.
अनिकेत : आई नाही, आपलंच पार्सल आहे ते. तू कलेक्ट कर ते.(अनिकेतने असं सांगितल्यावर शालिनीताई ते पार्सल त्या मुलाला हॉलमध्ये ठेवायला सांगतात.)
शालिनीताई : अहो बघा ना, अनिकेतने केवढं फराळाचं मागवलंय. आपण दोघं काय एवढं खाणार आहोत का?
विश्वासराव : जाऊ दे गं, आता मागवलंय ना त्याने तर राहू दे. आपल्याला हवं तेवढं ठेवू आणि बाकीचं वाटून येऊ त्या नाक्यावरच्या गरिबांना, म्हणजे त्यांचीही दिवाळी छान साजरी होईल.
शालिनीताई : तुम्ही कसं हो इतक्या शांतपणे सगळं स्वीकार करतात? चिडचिड करत नाही, उलट आपल्या बरोबर दुसराही व्यक्ती कसा आनंदी होईल याकडेच तुमचं जास्त लक्ष असतं.
विश्वासराव : अगं दिवाळी हा आनंद वाटण्याचाच सण आहे. एक छोटीशी पणती लावल्याने कुणाचंतरी घर जर उजळून निघत असेल तर काय हरकत आहे ती दुःखाचा अंध:कार दूर करून सुखाचा प्रकाश देणारी पणती व्हायला?
शालिनीताई : ग्रेट आहात तुम्ही विश्वासराव, साष्टांग दंडवत तुम्हाला.
———————————————————————-
दुपारचं जेवण करून दोघेही झोपलेले असतात, तेवढ्यात दारावरची बेल वाजते. “आत्ता कोण आलं आता?” असं म्हणून शालिनीताई जरा रागातच दार उघडायला जातात. त्या दार उघडतात आणि समोरचं दृश्य बघून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. त्या आनंदाने ओरडतात “अहो पाहिलंत का कोण आलंय, अनिकेत, सुनबाई आणि नातवंड आली आहेत आपली…या लवकर बाहेर. शालिनीताईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रु वाहायला लागतात.
विश्वासराव हॉलमध्ये येऊन बघतात तर खरंच अनिकेत, सुनबाई आकांक्षा, नातू अभिषेक आणि नात अर्पिता आलेली असते.
अनिकेत, आकांक्षा, अभिषेक आणि अर्पिता चौघेही विश्वासराव आणि शालिनीताईंच्या पाया पडतात. शालिनीताईंचा आनंद तर गगनात मावत नसतो.
शालिनीताई : तुम्ही असे अचानक काहीही न सांगता कसे आलात पण? आधी सांगितलं असतं तर मी छान गोडधोड जेवण बनवून ठेवलं असतं.
अनिकेत : आई आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आणि जेवणाचं म्हणशील तर आता रोजच मला तुझ्या हातचंच जेवण जेवायचं आहे.
शालिनीताई : रोजच? म्हणजे…? मी समजले नाही.
अनिकेत : म्हणजे…आता अमेरिका कायमचं सोडून भारतात सेटल व्हायचं ठरवलंय आम्ही.
शालिनीताई : काय सांगतोयस… अहो ऐकलं का अनिकेत काय म्हणतोय ते. (शालिनीताईंच्या डोळ्यांतून पुन्हा आनंदाश्रु वाहू लागतात.)
विश्वासराव : मी तर ऐकलं, तूच बघ आता.
शालिनीताई : म्हणजे तुम्हाला हे माहित होतं?
विश्वासराव : हो, अनिकेतने मला मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं.
शालिनीताई : आणि तुम्ही मला एका शब्दाने बोलला नाहीत?
विश्वासराव : अगं अनिकेत म्हणाला ना आत्ता सरप्राईज द्यायचं होतं त्याला, म्हणून नाही सांगितलं.
शालिनीताई : तरीच तुम्ही इतकं मोठ्ठ फराळाचं पार्सल आलेलं बघूनसुद्धा काही बोलला नाहीत. (शालिनीताईंचे हे वाक्य ऐकून सगळे हसायला लागतात.)
(चहाचे कप घेऊन सगळे हॉलमधल्या सोफ्यावर बसतात.)
शालिनीताई : अनिकेत मला सांग हा इतका मोठा निर्णय तू इतक्या अचानक कसाकाय घेतलास?
अनिकेत : आई आम्ही एक मराठी नाटक पाहायला गेलो होतो दोन महिन्यांपूर्वी. त्या नाटकात हेच दाखवलं होतं की मुलं पैसे कमावण्यासाठी परदेशात गेल्यावर आईवडीलांचे कसे हाल होतात आणि परदेशात राहिल्यावर कसे लहान मुलांवर काहीच संस्कार होत नाही, लहान मुलांना नाती, प्रेम, माया हे काहीच तिथे कळत नाही आणि इंडिपेंडंट राहून ते वाईट वळणाला लागायची शक्यता वाढते. ते नाटक पाहिल्यापासून आकांक्षा आणि माझ्या डोक्यात भारतात पुन्हा यायचे विचार सुरु झाले आणि एक दिवस आकांक्षाच मला म्हणाली की, “माझे आईवडील तर मी लहानपणीच गमावले अनिकेत.
मला त्यांचं प्रेम कधीच मिळालं नाही, निदान तुझ्या आईवडीलांना तरी आता आपण असं गमवायला नको. खरंतर तू परदेशात यायचं ठरवल्यावरच मला यायचं नव्हतं पण तुझी स्वप्नं आणि त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती पाहून मी परदेशात जायचा निर्णय घेतला पण आता आपण भारतात पुन्हा जायला हवं.
पैसा तर आता आपण भरपूर कमावला आहे, आता अभिषेक आणि अर्पिताला त्यांच्या आज्जी आजोबांचं आणि मला माझ्या आईवडीलांचं न मिळालेलं प्रेम मिळवायचं आहे तर प्लीज आपण पुन्हा भारतात जाऊया.” आकांक्षाचे हे म्हणणे मलाही पटले आणि मी पण भारतात पुन्हा यायचा निर्णय घेतला.
(शालिनीताई आकांक्षाला घट्ट मिठी मारतात. दोघींच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो.)
विश्वासराव : चला चला आता ह्या आनंदाश्रुंच्या पुराला बांध घाला आणि दिवाळीच्या तयारीला लागा आता.
शालिनीताई : हो, चला चला. आता खूप वर्षांनी पुन्हा या घरात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. चला पटकन पणत्या लावा, आकाशकंदील लावा, फटाके फोडा, फराळ करा…!!!
– © छोट्याशा कथा By Sandip.
तुम्हांला जर ही माझी “छोटीशी कथा” आवडली असेल तर माझे फेसबुक पेज “छोट्याशा कथा By Sandip” लाईक आणि शेअर करायला विसरू नका.