उगवतीचे रंग.. © विश्वास देशपांडे, चाळीसगाव प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
उगवतीचे रंग
संक्रांत, मुले आणि केशव काका
( माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आनंदनिधान या पुस्तकातून )
संक्रांतीचा दिवस आणि संध्याकाळची वेळ आहे. आपल्या घरी केशव काका एक पुस्तक वाचत बसले आहेत. केशव काका गोरे, उंच, चेहऱ्यावर तेज आणि भारदस्त आवाज लाभलेले असे बहुआयामी व्यक्तिमत्व. केशव काका आजूबाजूच्या परिसरात काका म्हणूनच प्रसिद्ध आहेत आणि बालगोपाळांशी तर त्यांची नेहमीच गट्टी जमते. आताही काकांकडे चिंगी, वैशाली आणि सुहास ही तीन मुले आलेली आहेत. ही तिघेही मुलं साधारणपणे दहा ते बारा वर्षांची आहेत. मुले मोठमोठ्याने हसत आणि आरडाओरडा करत काकांच्या घरात प्रवेश करतात.
काका – अरे सुहास, चिंगी, वैशाली जरा हळू. आणि काय झालं ते जरा मलाही कळू देत की.
चिंगी – काका, अहो आज आम्ही तिळगुळ द्यायला निघालो ना, तर या सुहासने माझा तिळगुळ खाली सांडला. मी त्याला म्हटलं की ‘ माझा तिळगुळ सांडू नको, माझ्याशी भांडू नको. ‘ तर बघा ना हसतोय माझ्यावर आणि म्हणतो की चल काही नाही होत तिळगुळ सांडल्यानं .
सुहास – काका, तुम्हीच सांगा काय होतं असं थोडा तिळगुळ सांडला तर ? पुष्कळ तर आहे तिच्याकडे.
काका – अरे सुहास, चिंगी म्हणते ते खरं आहे. तिळगुळ सांडायचा नसतो. त्याच्यामागे प्रेम असतं, चांगल्या भावना असतात. तुम्ही तिळगुळ सांडला म्हणजे एक प्रकारे त्या भावनांचा अनादर नाही का होत ?
वैशाली – अगदी बरोबर आहे काका तुमचं.
सुहास – काका, संक्रांत म्हणजे असा काय विशेष दिवस असतो ? मस्त सुटीचा दिवस असतो. तिळगुळ वाटायचं. गुळाची पोळी वगैरे खायची आणि मजा करायची. मला तर एवढंच माहित आहे.
वैशाली – काका, मी बाबांना विचारलं की संक्रांत म्हणजे काय तर मला म्हणाले, ‘ जा बाहेर खेळ जरा. माझं डोकं नको खाऊस. ‘ त्यांना त्यांचं काम आणि मोबाईलमधून डोकं बाहेर काढायला सवडच नाहीये.
चिंगी – काका, आम्हाला काही प्रश्न पडलेत. तुम्ही सांगाल का त्यांची उत्तरं ?
काका – अरे, नक्कीच. मग मी आहे कशासाठी ? तुम्हाला जे जे प्रश्न पडले असतील ते मला बिनधास्त विचारत जा, काय ?
चिंगी – काका, संक्रांत म्हणजे नेमकं काय हो ? आणि तिला मकर संक्रांत का म्हणतात ?
काका – बाळांनो, संक्रांत म्हणजे संक्रमण. तुम्हाला बारा राशी माहिती असतील ना ?
वैशाली – काका, ते दर रविवारी पेपरमध्ये राशी भविष्य येतं त्यातील मेष, वृषभ वगैरे त्याच ना ?
काका – हो हो, बरोबर. तर चिंगी, सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्याला संक्रमण असं म्हणतात. तो ज्या दिवशी एखाद्या विशिष्ट राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाच्या तिथीला संक्रांत म्हणतात.
सुहास – काका, मग दर महिन्यात संक्रांत येत असेल.
काका – बरोबर आहे, सुहास. पण ही पौष महिन्यातील संक्रांतच आपण एक मोठा सण म्हणून साजरी करतो. या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून आपण तिला मकर संक्रांत म्हणतो. आणि हा दिवस खूप विशेष आहे, बरं का !
तिघेही – कसा काय ? काय विशेष असतं या दिवशी ?
काका – अरे, संक्रांतीपासून आपल्या सूर्य महाराजांचं उत्तरायण सुरु होतं म्हणजे सूर्य किंचित उत्तरेकडे झुकू लागतो. तुम्ही भूगोल शिकताय ना ? पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलनामुळे या सगळ्या गोष्टी घडून येतात.
चिंगी – काका, आजी म्हणत होती की आता उद्यापासून दिवस हळूहळू मोठा आणि रात्र लहान होत जाईल. हे खरं आहे का ? मला तर काही कळत नाही. रात्री झोपलं की सकाळीच जाग येते. ती पण आई हलवून हलवून शाळेसाठी उठवते म्हणून.
( सुहास आणि वैशाली हसतात. )
सुहास – काका, ही चिंगी तसलीच आहे. अगदी आळशी. काही वेळेवर करत नाही.
काका – अरे, असं भांडू नका. तुम्हाला माहिती आहे ना की आज तरी भांडायचं नसतं. गोड बोलायचं असतं,
वैशाली – काका, फक्त आजच्या दिवस गोड बोलून आणि न भांडून काय होणार आहे ? उद्यापासून पुन्हा तर तेच करणार ना ?
काका – बाळांनो, असं नाही. आज या निमित्तानं जरी आपण असं म्हणत असलो तरी आजपासून ती सवय लावून घ्यायला हवी. आपल्याला आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. पण ते सांगताना दुसरे दुखावले जातील अशा पद्धतीनं आपण बोलता कामा नये. आपली जीभ दोन कामं करते. कोणती ? खाणं आणि बोलणं. दोन्हीही सांभाळायला हवं, नाही का ? अति खाल्लं तर ते शरीराला इजा करतं आणि दुसऱ्याला लागेल असं बोललं तर दुसऱ्याच्या मनाला इजा करतं. एकवेळ शरीरावरची जखम बरी होते पण मनावर दुसऱ्याच्या कटू बोलण्यानं झालेली जखम लवकर भरून येत नाही.
तिघेही – काका, अगदी खरंय तुमचं बोलणं.
चिंगी – काका, एक प्रश्न आहे. सगळे म्हणतात की संक्रात १४ जानेवारीलाच येते मग आज कशी काय ? आज तर १५ जानेवारी आहे ?
काका – चिंगी, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश हा दर वर्षी किंचित उशिराने होत असतो. त्यामुळे दर काही वर्षांनी ही तिथी पुढे पुढे जात असते. तुम्हाला गंमत सांगतो. महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह युद्धात जखमी होऊन शरपंजरी म्हणजे बाणांच्या शय्येवर पडले होते तेव्हा ही संक्रांत डिसेंबर महिन्यात आली होती असं म्हणतात. आणि हो, पितामह भीष्म याच दिवसाची वाट पाहत होते. त्यांना इच्छामरणाचं वरदान प्राप्त होतं. संक्रांतीपासून उत्तरायण सुरु होतं आणि या कालावधीत जर मृत्यू आला तर ती अतिशय भाग्याची गोष्ट मानली जाते म्हणून भीष्मांनी उत्तरायणात देहत्याग केला.
तिघेही – काका, किती छान माहिती सांगताय तुम्ही ! यातलं काहीच आम्हाला माहिती नव्हतं.
काका – म्हणूनच तर सांगतोय. आणि आणखी गंमत म्हणजे सहाव्या शतकातील सम्राट हर्षवर्धन याच्या काळात हा सण २४ डिसेंबर या दिवशी आला होता तर मुघल सम्राट अकबराच्या काळात १० जानेवारीला. तर छ. शिवाजी महाराजांच्या काळात संक्रांत ११ जानेवारीला होती असा उल्लेख आढळतो. आहे की नाही सगळं मजेशीर ?
चिंगी – हो काका, खूप नवीन माहिती कळली आम्हाला. पण या दिवसाचं काही धार्मिक महत्व आहे का ?
काका – हो तर. अग चिंगे, आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक सण हा त्यांनी बदलत्या ऋतूंशी, आरोग्याशी जोडला आहे. त्याला धार्मिक अधिष्ठान तर असतंच. असं म्हणतात की देवीनं या दिवशी संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणूनही या दिवसाला संक्रांत म्हटले जाते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून त्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. त्या दिवसाला आपण कर म्हणतो. संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा करतात.
मकर ही शनिदेवांची रास आहे. या दिवशी सूर्याचा प्रवेश या राशीत होतो. शनिदेव म्हणजे सूर्यपुत्र. या दिवशी गंगास्नान, जपतप, दान यांचे मोठे महत्व आहे. या दिवशी त्यांचे पुण्यफल अनेक पटींनी मिळते म्हणून या गोष्टी करायच्या असतात असा भाविकांचा विश्वास आहे. संगमावर गंगेच्या काठी स्नानासाठी भाविक लोक गर्दी करतात. असं म्हणतात की याच म्हणजे आजच्या दिवशीच गंगा नदी भागीरथाच्या पाठोपाठ जाऊन कपिल मुनींच्या आश्रमाजवळून जात सागराला मिळाली. म्हणूनही गंगास्नानाचे महत्व आहे. याच दिवशी देवतांचा दिवस सुरु होतो असे मानले जाते.
सुहास – पण काका, लहान मुलांसाठी सुद्धा या दिवसाचे काही महत्व आहे का ? की फक्त मोठ्यांसाठी ?
काका – ( मोठ्याने हसत ) अरे, खरं सांगू ? आपले सण सगळ्यांसाठी असतात. सगळ्यांना आनंद देतात. आता तुम्ही तिळगुळ घेऊन आलातच की नाही माझ्याकडे ? मुलांची तर किती मजा असते ? खायला मस्तपैकी गुळाची पोळी, बाजरीची खिचडी, तिळाच्या पाण्याने अंघोळ, वांगी, पावटा, वाटाणा, वाल आदी भाज्यांची केलेली मिश्र भाजी. आजपासूनच पतंग महोत्सवाला सुरुवात होते. मुले पतंग उडवण्याचा आनंद घेतात. गुजरातमध्ये तर हा पतंग महोत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो. तो पाहण्यासाठी देशविदेशातील लोक येतात.
सुहास – पण काका, पतंग उडवण्याचा आणि या सणाचा काय संबंध ?
काका – छान प्रश्न विचारलास. अरे, मी मघाशीच म्हणालो ना की आता यापुढे दिवस मोठे आणि रात्र लहान होत जाणार. सूर्याचं तेज वाढत जातं. एक प्रकारे ही उन्हाळ्याची सुरुवातच ! आपलंही तेज नको का वाढायला ? तुम्ही मुलं अलीकडे मोकळ्या हवेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात फार कमी जातात. या पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपण मोकळ्या मैदानात मोकळ्या हवेत जातो. स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो. सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी असते हे तर तुम्ही शिकलाच आहात. नुसत्याच मेडिकलच्या दुकानात जाऊन व्हिटॅमिनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या ते मिळवणे हे चांगलं नाही का ? शिवाय खेळातून मनाची एकाग्रता वाढते. शरीर बलवान होण्यास मदत मिळते. इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती म्हणतात ती अशीच वाढवायची असते. पतंग या खेळाची आणखी एक वेगळी बाजू सांगू ?
सुहास – काका, सांगा ना.
काका – बाळांनो, तसे तुम्ही अजून लहान आहात पण तरीही तुम्हाला समजेल असे सांगतो. पतंग आकाशात उंच जातो की नाही ? तो जणू सांगतो की तुमच्या इच्छा, महत्वाकांक्षा, ध्येय असेच उंच ठेवा. स्काय इज द लिमिट. पण त्याचबरोबर पंतंगाची दोरी आपल्या हातात असते. त्यातून आपण पतंगावर नियंत्रण ठेवत असतो. तसेच आपल्या इच्छा, भावनांवर सुद्धा नियंत्रण ठेवता आले पाहिजे. ते आपल्याच हाती असते. पतंगाचा आनंद घेता तसा जीवनाचा आनंद घ्या. आपली पतंग कटली म्हणजे कोणी कापली तर आपण ते सहजपणे स्वीकारतो नाही का ? तशीच जीवनातील दुःखे, अप्रिय गोष्टी सहजपणे खिलाडू वृत्तीने स्वीकारा आणि पुढची वाटचाल सुरु ठेवा हेच हा खेळ आपल्याला सांगत नाही का ?
तिघेही – काका, खरंच, इतकं छान या खेळाचं महत्व आम्ही पहिल्यांदाच ऐकलं.
चिंगी – काका, आणि स्त्रियांसाठी या दिवसाचं काही विशेष महत्व आहे का ? आई तर काल काळ्या रंगाची साडी शोधत होती. त्याचं काय विशेष ?
काका – स्त्रिया, हे मातृशक्तीचं, सृजनाचं आणि पृथ्वीतत्वाचं प्रतीक. एकमेकांना त्या वाण देतात. या काळात निसर्ग बहरून आलेला असतो. शेतकऱ्याच्या घरात धनधान्याची समृद्धी आलेली असते. स्त्रिया वाण देताना ते मातीच्या सुगड्यात देतात. त्यात आवळे, बोरं, हरभरे, वाटाणे, उसाच्या गंडोऱ्या आदी गोष्टी असतात. या गोष्टी आरोग्यदायी, पौष्टिक असतात. त्या निमित्ताने खाव्यात. ही समृद्धी अशीच राहावी अशीही भावना यामागे असते. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. नेहमी काय खायचं असा प्रश्न असेल तर तीन शब्द लक्षात ठेवा. रिजनल, सिझनल आणि ओरिजिनल. म्हणजे ज्या ऋतूत जी फळं, भाज्या आपल्याकडे मिळतात ती भरपूर खा. ती आरोग्यदायी असतात. जाहिरातींच्या मागे लागून उगीचच नसत्या गोष्टींना बळी पडू नका.
आणि हो, काळ्या साडीबद्दल सांगायचं राहिलंच, नाही का ? तर मघाशीच मी तुम्हाला सांगितलं की देवीनं युद्ध करून राक्षसांचा नाश केला. त्या दिवशी देवीनं सुद्धा काळं वस्त्र परिधान केलं होतं असं म्हणतात. तिनं राक्षसांचा म्हणजेच काळ्या, दुष्ट शक्तीचा विनाश करून जणू चांगल्या गोष्टींचे शीतल चांदणे वरदान रूपात या सृष्टीला बहाल केले. त्याचं प्रतीक म्हणून स्त्रिया या दिवशी काळी साडी नेसतात आणि चांगल्या गोष्टी, शीतल अशा चांदण्यांचं प्रतीक म्हणून या साडीवर रुपेरी नक्षी किंवा चांदण्याची नक्षी असते.
वैशाली – काका, किती छान माहिती दिलीत. उद्या आम्ही आमच्या शाळेत ही माहिती सांगू.
काका – बाळांनो, तिळगुळाचे पण महत्व लक्षात घ्या. तिळगूळाने या दिवसात आपल्या शरीरातील शक्ती, उष्णता वाढते. त्याची आपल्या शरीराला या काळात गरज असते. तिळातील स्नेह आणि गुळातील गोडी आपल्या वागण्यात येऊ द्यायची असते. तिळासारखं लहान व्हायचं असतं म्हणजे वृथा अभिमान, अहंकार टाकून द्यायचा असतो. तीळ आणि गूळ कसे एकजीव होतात तसं एकजीव व्हायचं असतं आपल्या माणसांशी, निसर्गाशी नातं जोडायचं असतं. हा माझ्याकडून तिळगुळ घ्या. तो खाऊन टाका. डब्यात ठेवू नका. आणि यानिमित्ताने तुम्ही बलवान व्हा, सूर्यासारखे तेज:पुंज व्हा आणि आपल्याला, आपल्या घराला, आपल्या देशाला प्रगतीपथावर न्या असा आशीर्वाद तुम्हाला देतो.
( तिघेही काकांना वाकून नमस्कार करतात आणि पुढे तिळगुळ वाटण्यासाठी निघून जातात. )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२