#सोहळा_स्त्रीत्वाचा © अश्विनी रितेश बच्चूवार
#सोहळा_स्त्रीत्वाचा
सानवी जरा घाईतच घराकडे निघाली होती. आज ऑफिस मधून निघायला खूपच उशीर झाला होता. तसे तिने तिच्या सासूबाईंना अरुंधतीबाईंना कळवले होते पण तरीही रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आजचा स्वयंपाकही आईंनाच करायला लागला असेल, ती हळहळली. तिला बऱ्याचदा उशीरच व्हायचा पण जराही कुरकुर न करता किंवा नाराजी न दाखवता अरुंधती बाई रात्रीचा स्वयंपाक करायच्या. सकाळचा अर्धा स्वयंपाक सानवी करून जायची मग फक्त कुकर लावायचे काम अरुंधतीबाईंना असायचे. त्यात परत सानवीची तीन वर्षाची अतिशय खोडकर लेक स्वरा त्यांच्याच अंगावर असायची तिला सांभाळणे हा एक मोठा टास्क असायचा पण कुठल्याच गोष्टीची त्यांनी कधी तक्रार केली नव्हती. सगळ्या गोष्टी त्या अगदी आनंदाने करायच्या.विचारांच्या ओघात घर आले. घाईनेच सानवी घरात शिरली. “काय ग हे, किती हा उशीर” अरुंधतीबाई तडतडल्या. “आई अहो ते काम….” सानवी त्यांना सांगू लागली. “बस झालं ग…काम काय तुलाच असतात का?” त्या एकदम रागात येऊन म्हणाल्या. त्यांचा हा अविर्भाव नवीन नसला तरी अनपेक्षित होता. सानवीने त्यांना सांगितले होते उशीर होणार आहे म्हणून तरीसुद्धा….. विचारांना झटकत ती अरुंधतीबाईंना sorry म्हणाली. फ्रेश होऊन तिने अन्न गरम केले आणि पानं वाढायला घेतली, स्वरालाही भरवले सगळी झाकपाक केली नी झोपायला गेली.दिवसभरच्या दगदगीनंतरही तिला झोप येईना. मगाशी ज्या रागात अरुंधती बाई तिला बोलल्या होत्या ते तिच्या डोक्यातून जाईना, पण रागापेक्षा तिला त्यांची काळजी वाटू लागली. हा असा प्रकार या दोन महिन्यात बऱ्याचदा घडला होता.तिच्या काळजीचे कारणही तसेच होते. मुळात अरुंधती बाई खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या, समजूतदार होत्या. कधी साधा आवाज चढवूनही त्या कोणाशी बोलल्या नव्हत्या. कधीच कोणाबद्दल तक्रार केली नव्हती. आपल्या आवडी निवडी बाजूला सारून घर आणि घरातील माणसे यांचाच विचार केला होता. सानवीवर तर त्यांचा खूप जीव होता. सासू सूने पेक्षा माय लेकीचे नाते होते त्यांचे. सानवी त्यांच्या घरात जरी पाच वर्षापूर्वी लग्न होऊन आली असली तरी अगदी लहानपणापासून ती अरुंधती बाईंना ओळखत होती. तिचा नवरा शार्दुल हा तिचा अगदी बालपणापासूनचा मित्र. त्यामुळे तिचे त्यांच्या घरी नेहेमीच येणे जाणे होते. पुढे शार्दुल व तिच्या प्रेमाचे घरी समजल्यावर कोणी आक्षेप घ्यायचा प्रश्नच नव्हता. दोन्ही घरच्या संमतीने त्यांचे लग्न अगदी धूमधडाक्यात झाले होते. तिची लाडकी अरुंधती काकू तिची सासू झाली होती.अरुंधतीबाईंना ती चांगलेच ओळखत होती. नेहमी आनंदी असणाऱ्या, समाधानी वृत्तीच्या आपल्या सासूला अचानक काय होत आहे हेच तिला समजेना. आत्ता काही दिवसांपूर्वीची गोष्ट होती, लहानग्या स्वराला त्या भरवत होत्या. तिला असे खेळवत खेळवत भरवणे आवडायचे त्यांना. खरतर स्वरा खूप दंगा करायची, खूप त्रास द्यायची पण त्या कधीच तिला ओरडत नसत किंवा कंटाळून जात नसत. पण त्या दिवशी मात्र स्वराला भरवताना त्रासून जाऊन त्यांनी तिला जोरात धपाटा दिला होता आणि वर तिला ओरडू लागल्या. सुट्टी असल्याने सानवी घरी होती, त्यांचा आवाज ऐकून ती बाहेर आली. स्वरा घाबरून तिला चिटकली आणि रडू लागली. तिचे रडणे ऐकून अरुंधती बाई एकदम ओशाळल्या होत्या आणि तिला जवळ घेत म्हणाल्या होत्या “आजकाल हे काय होतंय मला हे माझे मलाही समजत नाहीये. अचानक मला राग येतो. काही गोष्टी मी विसरते, सहनशक्ती खूप कमी झाली आहे, उगाच रडावेसे वाटते, दमल्यासारखे वाटते. काहीच कळेनासे झाले आहे बघ.” हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.आत्ता रात्री पडल्यापडल्या सानवीला हे आठवत होते. आईंचा मेनोपॉज सुरू झाला आहे, म्हणून तर हे असे होत नसेल ना? आईंना एखाद्या चांगल्या डॉक्टरांची गरज आहे तिला वाटून गेले. या आठवड्यात त्यांना एका चांगल्या डॉक्टरांकडे न्यायचेच हा विचार करत ती झोपली.पुढचा आठवडा संपता संपता तिने एका चांगल्या स्त्रीरोगतज्ञांची अपॉइंटमेंट घेतली आणि अरुंधती बाई नको म्हणत असतानाही तिने त्यांना डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी लक्षणे विचारताच अरुंधती बाई म्हणाल्या” उगाचच रडवेसे वाटते, निराश वाटते, रात्री मध्येच घाबरून जाग येते, आपली कोणालाच गरज उरली नाही असे वाटत राहते, चिडचिड होते, कधी अंगातून गरम वाफा निघत आहेत असे वाटते, उत्साही आनंदी वाटत नाही.”सगळी लक्षणे ऐकून डॉक्टरांनी हे सगळे मेनोपॉज सिम्प्टम्स आहेत असे सांगितले. औषधांसोबत नेहमी आनंदी राहणे, सकारात्मक विचार करणे, स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे असेही सांगितले.घरी आल्यावर सानवीचे मन कश्यातच लागत नव्हते. नेहमी सगळ्यांसाठी सगळं आनंदाने करणाऱ्या तिच्या सासूला तिला आनंदी बघायचे होते. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते. विचार करता करता तिला एक अभिनव कल्पना सुचली. तिने उत्साहाने तिच्या आईला फोन लावला आणि तिला जे सुचले होते ते आईला सांगितले.” अग पण असे कुठे असते का? कोणी असे काही केल्याचे ऐकिवात नाही.” तिची आई तिला सांगत होती. “हो ग आई माहित आहे मला. असे पूर्वी कधीच कोणी केले नाही पण काय हरकत आहे असे करायला आणि कोणताही नवीन विचार रुजवायला कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे की” सानवी आईला समजावत म्हणाली. सानवीच्या आईला आपल्या लेकीचे कौतुक वाटले. कौतुकाने त्या म्हणाल्या “बरं बाई तू म्हणतेस तसेच करू पण या सगळ्याची कल्पना अगोदर तुझ्या सासऱ्यांना आणि शार्दुलरावांना सुद्धा दे आणि मी तुझी काय मदत करू ते सुद्धा सांग.”आनंदाने सानवी म्हणाली तू फक्त त्यादिवशी लवकर माझ्या घरी ये मी सांगेन तुला काय करायचे ते. फोन ठेवताच ती घाईने तिच्या सासऱ्यांना व शार्दुलला तिच्या या कल्पनेबद्दल सांगायला गेली. त्यांचा होकार मिळताच तिने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली. आठ दिवसानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन तिने ठरवले होते. अरुंधतीबाई ना काही सांगायचे नव्हते. त्यांच्या नकळत तिने या कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांच्या मैत्रिणींना आणि काही जवळच्या नातेवाईकांना दिले. कार्यक्रम कशाबद्दल आहे हे ऐकताच काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी असे कुठे असते का, नको ते उद्योग म्हणून नाकही मुरडले होते. पण कोणी काही का म्हणेना तिला हा कार्यक्रम करायचा होता.आठ दिवस तिने खूप जय्यत तयारी केली. अरुंधतीबाईंच्या नकळत हे सुरू होते. तिने त्यांच्यासाठी त्यांची आवड लक्षात घेऊन सुंदर डाळिंबी रंगाची पैठणी घेतली त्यावरचे ब्लाउजही शिवून आणले. आईला सांगून त्यांच्या आवडीची कोथिंबीर वडी, आळू वडी करवून घेतली. काही फराळाची ऑर्डर बाहेर दिली.तो दिवस उजाडला. ती पहाटेच उठली होती. हॉल मध्ये शार्दुलच्या मदतीने फुलांच्या माळा सोडल्या. बागेतली छोटी बंगई तिने घरात आणली तिलाही फुलाने सजवली. घराबाहेर आणि बंगईभोवती सुंदर रांगोळ्या काढल्या. हॉलमधील भिंतींवर अरुंधती बाईंचे सगळ्यांसोबत असलेले फोटो लावले. तोवर तिची आई सुद्धा आली. दोघींनी मिळून स्वयंपाकाला सुरुवात केली. अरुंधती बाई उठल्या. सकाळी सकाळी आलेल्या विहीण बाईंना बघून त्यांना आश्चर्य वाटले. हॉलमधील सजावट पाहून त्या गोंधळून गेल्या. आज कोणाचा वाढदिवस आहे का त्या आठवू लागल्या पण नाही. कोणाचा लग्नाचा वाढदिवस असावा, तर तोही नाही. “सानवी आज काय आहे ग? न समजून त्यांनी सानवीला विचारले.” ” आई अहो संध्याकाळी कळेलच” मंद हसत सानवी म्हणाली.त्यांचे यजमान मनोहरराव व शार्दुल यांचीही लगबग चालू होती. त्यांना विचारले तर त्यांनीही हेच सांगितले. काय चालले आहे त्यांना कळेचना. स्वयंपाक घरातून विविध पदार्थांचे सुगंध येत होते. कोणी पाहुणे येणार आहेत का? असा विचार मनात यायला आणि त्यांची बहीण यायला एकच वेळ झाली. “अग बाई नलू तू?” आनंदाने त्यांनी त्यांच्या बहिणीला मिठी मारली. अग किती वर्षांनी भेटत आहोत आपण अत्यानंदाने त्या नलूला बोलत होत्या. नलूच्या पाठोपाठ त्यांनी वहिनी, नणंदही आल्या. घर भरून गेले.दुपारच्या जेवणात सगळे पदार्थ अरुंधतीबाईंच्या आवडीचे होते. त्यांच्या पानाभोवती रांगोळी घातली होती. हे सगळे काय चालू आहे हेच त्यांना समजत नव्हते. संध्याकाळी त्यांच्या काही मैत्रिणी सुद्धा आल्या. सानवीने त्यांच्या हातात तिने आणलेली डाळिंबी रंगाची पैठणी ठेवली. ती नेसून त्या बाहेर आल्या. त्यांच्या डोक्यात तिने मोगर्याचा गजरा माळला. मोगर्याच्या सुगंधाने त्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. त्यांच्या हाताला धरून तिने त्यांना त्या सजवलेल्या बंगईवर बसवले.त्या लाजल्या. फुलांनी सजविलेली बंगई, त्यापुढे त्यांना आवडणारे विविध पदार्थ, रांगोळी. त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने सानवीकडे पाहिले. “सांगते आई तुम्ही बसा.” असे म्हणत तिने त्यांना बंगईवर बसवले. त्यांना हसूच आले. त्या १२-१३ वर्षाच्या असताना त्यांच्या आईने असाच सोहळा केला होता. त्यांना प्रथम ऋतूप्राप्ती आली होती तेंव्हा. या अश्याच फुलांच्या माळा, रांगोळ्या, आवडीचे पदार्थ. सगळे असेच. पण आत्ता हे.त्यांचे विचार चालूच होते तोवर एकेक बायका येऊन त्यांची ओटी भरु लागल्या. त्यांनी एकवार तिरप्या नजरेने मनोहर रावांकडे पाहिले. ते कौतुकाने बायकोकडे बघत होते तशी त्यांनी लाजून नजर खाली झुकवली. सर्वात शेवटी सानवीने ओटी भरली आणि ती बोलू लागली.” आई हे सगळे काय आहे तुम्हाला प्रश्न पडला आहे ना? आता सांगते मी. हा तुमच्यातल्या स्त्रीत्वाचा सन्मान आहे. एखाद्या मुलीला जेंव्हा ऋतूप्राप्ती होते तेंव्हा तिचे हे सोहळे आपण करतो ना. कोणत्या तरी गोष्टीची ती सुरुवात असते, तिच्यातील सृजनशीलतेचा तो सन्मान असतो. तसेच हे सुद्धा. तुम्हाला रजोनिवृत्ती आली. हा शेवट नसून ही सुद्धा एक नवी सुरुवात आहे. तुमच्यातल्या “स्व” ला ओळखण्याची. कित्येक स्त्रियांना या काळात त्रास होतो. खूप शारीरिक, मानसिक स्थित्यंतरं होत असतात. जीवनात खूप विस्कळीतपणा जाणवायला लागतो. या स्थित्यंतरामुळे स्त्री विश्वात फार मोठी उलथापालथ होत असते अशा वेळी आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत हा दिलासाही खूप मोठा असतो. त्यादिवशी डॉक्टरांशी बोलताना तुम्ही म्हणालात कोणाला माझी गरज उरली नाही असे मला वाटत आहे. पण तसे नाही आई. आम्हाला तुमची खूप गरज आहे. जसे ऋतूप्राप्ती नंतर स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान करतात तसा सन्मान रजोनिवृत्ती नंतर सुद्धा करावा असे मला वाटते. या काळात तिचं स्त्रीत्व खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला आलेले असते. एक प्रेमळ आई, एक बायको, सासू, आजी या साऱ्या भूमिका ती मनापासून जगत असते. या साऱ्या गोष्टींसाठी तिचा सन्मान व्हावा असे मला वाटते. म्हणून हे सगळं.
रजोनिवृत्ती हा काही शेवट नाही तो निसर्ग चक्राचा भाग आहे आणि तो सकारात्मकतेने स्वीकारायला हवा. कारण त्रासदायक काळ हा तात्पुरता असतो त्यानंतर अधिक आत्मविश्वासाने जगण्याची नवी खिडकी उघडायची असते. मी काय करू शकते, मला काय आवडते हे शोधायचे असते. इतक्या वर्षात जे करायला जमले नाही किंवा आले नाही ते करून बघायचे असते. आजपर्यंत अव्यक्त राहिलेल्या, मागे पडलेल्या गोष्टी पूर्ण करणे रजोविरमानंतर सहज शक्य असते.आयुष्याच्या आनंदाचा एकदा का शोध लागला की शारीरिक, मानसिक अनेक तक्रारी कमी होतील. खरतर हे सगळे आपण बाहेर शोधायला बघतो पण ते आपल्याच अंतरंगात आहे जे आपण कधी शोधलेच नसते.”अरुंधती बाई आश्चर्याने सानवीचे बोलणे ऐकत होत्या. त्यांनीच काय तेथील उपस्थितांपैकी कोणीच रजोनिवृत्तीची इतकी सुंदर व्याख्या ऐकली नव्हती. रजोनिवृत्ती म्हणजे शेवट असे सर्वांना वाटायचे पण हा शेवट नसून सुरुवात आहे आयुष्य नव्याने जगण्याची. हे आज पहिल्यांदा सर्वांना समजले होते. या नव्या प्रवासासाठी स्त्रीला सक्षम बनवणे, तिच्यासोबत आम्ही सगळे आहोत हे सांगणे म्हणजे आजचा हा सोहळा होता.अरुंधती बाईंच्या डोळ्यात पाणी होते. तितक्यात सानवी म्हणाली आई तुम्हाला कविता आवडतात ना. आज तुमच्यासाठी एक कविता मी सादर करणार आहे. तुमच्या वयाच्या असंख्य स्त्रियांसाठी ही कविता मला महत्वाची वाटते.हिंदी कवयित्री ‘चित्रा देसाई’ यांनी रजोनिवृत्तीबद्दल हृदयगत विचार मांडले आहे आहेत.
आज कल मैं मन का करती हूँ l
हाथो को गरम कॉफी से l और रूह को फैज की नजमो से सेंकती हूँ l
आज कल मैं मन का करती हूँ l
हर सुबह पेपर मे छपी खबरों पर इत्मीनान से बहस करती हूँ l सरसों का साग बथुये की रोटी कभी गुड, कभी हरी मिर्च से कुतरती हूँ l
अपनी खिडकी पर गमलो मे बसी खेती को पानी से सिंचती हूँ l शाम को आवारगी से घुमती पेडो की कलगी पर चिडियों का कलरव सूनती हूँ|
दोपहर को दोस्तो का हाथ पकड गली मुहल्लों की बातो से निपटती हूँ l बचे खुचे पेडो पर पंछी नीड बना पाए ऐसी कोशिश मे शामिल होती हूँ l
सांज ढले दूर से ही अपने खेतो को ऑ॑खो से सहलाती हूँ l मेरे दोस्त कहते है आजकाल मैं कुछ नही करती क्योंकी आजकल मे मन का करती हूँ l
कविता ऐकून अरुंधती बाई समवेत सर्वजणच विचारात पडले होते. भारावले होते. सानवी म्हणाली आनंदी राहायचा हक्क प्रत्येकाला असतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आनंदीच राहिले पाहिजे. अरुंधती बाईंनाही हे पटले होते. त्यांच्या सुनेने आनंदी राहायचा एक विचार त्यांना दिला होता. आनंदाचे एक रोपटे त्यांना दिले होते आता ते रोपटे त्यांना बहरत न्यायचे होते आणि ते त्या करणार होत्या. यापुढे त्यांच्या जीवनात आनंदीआनंदच असणार होता.
धन्यवाद.
© अश्विनी रितेश बच्चूवार