★सोबत★ (१) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा .. सोबत
★सोबत★ (१) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
रमणीने लतावहिनीला निरोप दिला आणि दार लावून घेतलं. खरं तर वहिनीला सोडायला तिला बसस्टॅन्डवर जावंसं वाटत होतं पण लताच नको म्हणाली,”तिथे तू आलीस की बस सुटल्यावर तुझा रडवेला चेहरा मला बघवणार नाही. इथूनच निरोप दे. अगदी रिक्षेपर्यंत सुद्धा येऊ नकोस.”
वहिनीचं हे बोलणं ऐकूनच रमणीच्या घशात आवंढा आला. गिळला तो तिने! आता असे सतत येणारे आवंढे तिला गिळायलाच हवे होते. दुःख पचवणारे! जगावेगळं दुःख नसलं तरी ते दुःखच होतं आणि ज्याच्या वाट्याला ते येतं त्याला “मीच का?” हा प्रश्न सतत आयुष्यभर छळत राहतो.
दार लावून ती जरा आडवी झाली. पंधरा दिवसांची दगदग बाहेर यायला लागली. इतके दिवस दुर्लक्षित असलेलं शरीर, सगळे अवयव बोलू लागले. पायात प्रचंड गोळे येत होते. तिने वॉशरूममधून सोलरचं पाणी बादलीत आणलं,त्यात मीठ घालून तळपाय बुडवले. प्रद्युम्नची आठवण आली. तो कित्येकदा असा गरम पाण्यात पाय बुडवून बसायचा आणि दरवेळी म्हणायचा “रमा, तू मला हे बादलीत मीठ घालून गरम पाणी माझ्यासमोर आणून ठेवतेस ना,त्यासाठी तुला आज माझ्याकडून आईस्क्रीम!”
“पतीराजांची सेवा नको का करायला? बॅडमिंटन खेळून पाय दुखतात ना तुझे! किती वेळा सांगून झालंय तुला,आता खेळणं बंद कर. वयाप्रमाणे जोर कमी पडतो रे! आता ह्या वयात कोणावर इम्प्रेशन मारायचं आहे तुला? पंचवीस वर्षांपूर्वी झाली की तुझ्या खेळण्यावर एक मुलगी फिदा!” रमणी हसत म्हणाली.
“म्हणजे? तुला मी म्हातारा वाटलो का? अग अजूनही तरुण मुली वळून बघतात माझ्याकडे! अभी तो मै जवान हूं!”
प्रद्युम्न होताच देखणा! गोरापान, दाट केस,कमावलेलं सुदृढ शरीर! रमणीच त्यांच्यापुढे जरा कमी होती. ती त्याला कित्येकदा म्हणायची,”काय बघितलं रे माझ्यात? कॉलेजमधल्या इतक्या सुंदर मुली तुला दिसल्या नाही का?”
“रमा, तुम्हा बायकांचा हाच मोठा गैरसमज आहे की पुरुष फक्त सौंदर्य बघतो. तसं नाहीय ग! एका स्त्रीमध्ये अनेक गोष्टी आकर्षित करणाऱ्या असतात. कधी केस,कधी डोळे,कधी तिचा आवाज,तिचा आत्मविश्वास, तिची हुशारी, तिची मॅच्युरिटी… अनेक! तुझा स्वभाव आवडला मला! काही भेटीतच तुझी मॅच्युरिटी, तुझा पेशन्स अनुभवला आणि असं वाटलं की यू आर माय परफेक्ट लाईफ पार्टनर! तूच मला सांभाळून घेशील.”
“हं! सांभाळतेच आहे की ह्या हट्टी नवऱ्याला!” रमणी हसली.
दारावरची बेल वाजली तसं रमणी विचारातून भानावर आली. आता ह्यावेळी कोण? कोणालाही भेटावसं वाटत नव्हतं. तेच प्रश्न,तीच उत्तरं.. थकली होती ती! तिला काही दिवस एकटीला प्रद्युम्नच्या आठवणीत रमायचं होतं. आता त्याच्या आठवणींशिवाय तिच्याजवळ होतच काय? शेवटच्या काही दिवसात तो सतत रमणीला सांगायचा,”माझी एकही वस्तू घरात ठेवायची नाही. तू सतत रडत बसशील. आहे ते स्वीकार अँड लिव्ह युअर लाईफ!”
इतकं सोपं आहे का रे ते प्रद्युम्न?
तुझ्या वस्तू सगळ्या नजरेसमोरून दूर केल्या तरी ह्या नजरेत तू बसला आहेस त्याचं काय करू?
परत बेल वाजली तसं रमणी उठली. तिने दरवाजा उघडला. दारात एक मध्यमवयीन पुरुष होता. ती भांबावली.
“नमस्कार,मी विलास फडके!
सॉरी टू डिस्टर्ब यू! थोडं प्यायचं पाणी हवं होतं. मी काल रात्रीच तुमच्या शेजारी शिफ्ट झालोय. जरावेळाने जाऊन बिसलेरी आणतो. माझ्या जवळचं पाणी संपलंय.”
“आत या ना! चहा ठेवते.”
“नको नको,नो फॉर्मलिटीज! आपण आता सख्खे शेजारी आहोत. बोलूया नंतर सावकाश!”
रमणी किचनमध्ये आली. सुधाताई तिला म्हणाल्याहोत्या,”ताई,शेजारचा फ्लॅट कुणीतरी विकत घेतलाय. येतील दोन दिवसात रहायला!”
सध्याच्या मनस्थितीत कोण काय बोलतंय ह्याकडे लक्ष होतंच कुठे? रमणीने पाण्याचे दोन तांबे आणि एक ग्लास घेत ती बाहेर आली. विलासच्या हातात देत म्हणाली,
“अजून काही हवं असेल तर निःसंकोचपणे सांगा! भाजी पोळी करून पाठवू का? माझ्या बाई थोड्या वेळात येतीलच!”
“थँक्स! पण मी टिफिन मागवला आहे. सी यू!”
रमणीने दरवाजा लोटला. कोणीतरी राहायला आलंय हे बघून तिला बरं वाटलं. प्रत्येक मजल्यावर दोनच फ्लॅट होते. आता कोणीतरी आलंय म्हणजे तेवढीच जाग,तेवढीच सोबत…..!
***
खिडकीशी भारद्वाज पक्षाचा आवाज आला तशी रमणीला जाग आली. रात्री कितीतरी वेळ झोपच आली नव्हती तिला! एकटं झोपायची तशी तिला सवय होती पण कालच्या रात्रीचा एकटेपणा जीवघेणा होता. उठून ती खिडकीजवळ आली. आंब्याच्या झाडावर असा भारद्वाज बसलेला दिसला की ती प्रद्युम्नला लगेच बोलवायची.
“प्रद्युम्न,लवकर ये, भारद्वाज आलाय बघ. तो दिसला की शुभशकुन असतो.”
“रमा,ह्या सगळ्या कल्पना आहेत,तसं काहीही नसतं.”
पावलोपावली प्रद्युम्न असा आठवणीत येतोय आणि “मला विसर” हे सहज सांगून कायमचा निघून गेला. रमणीने मोबाईल बघितला. आर्याचे चार मिस्ड कॉल दिसले. तिने आर्याला व्हाट्स अप कॉल लावला.
“हॅलो शोना,झोपले होते ग! आज उशीराच जाग आली.”
“ममा,आय एम वरीड अबाऊट यू! तू माझी मनस्थिती समजून घे ना ग! पप्पांना मी शेवटचं बघू पण शकले नाही. सध्या यू एस मधली कंडिशन तुला माहितीय ना! मला जॉब टिकवायचा आहे. निदान फोनवर तुझ्याशी बोललं की बरं वाटतं ग!” आर्या रडवेल्या आवाजात बोलत होती.
“मला समजतंय ग राणी! पण आर्या, थोडे दिवस तू पण तुझ्या ममाला समजून घे ना! इतकी उतावीळ होऊ नकोस. मी ठीक आहे,स्वतःची काळजी घेतेय. तू कशी आहेस? हेळसांड करू नकोस. पपा जाताना सांगून गेलाय मला,”माझ्या चिमणीला कधीही रागावू नकोस. तिला समजून घे.”
तू त्याला भेटायला येऊ शकली नाहीस हे त्याला काहीच कळत नव्हतं ग! त्याच्या सगळ्या संवेदना संपल्या होत्या. फक्त हृदय सुरू होतं. पण मी तुला समजून घेतलं ना? दुरून का होईना पण आता आपणच एकमेकींचा आधार आहोत. तू तुझ्या कामात लक्ष दे. आणि तुला सांगायचं म्हणजे आपल्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलंय. त्यामुळे मी थोडी रिलॅक्स झाले बघ! आपल्या मजल्यावर आता जरा जाग राहिल.”
“छान ग ममा! मी पण रिलॅक्स झाले. कोण आले आहेत? म्हणजे मराठी का अदर ? तसा तुला काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन बी फ्रेंडली विथ एनीवन! गुड नाईट ममा! बोलू उद्या परत,टेक केअर!”
रमणीने मोबाईल टेबलवर ठेवला आणि ती फ्रेश व्हायला गेली. आजपासून तिला तिचं रुटीन ठरवायचं होतं. गेले वर्षभर रुटीन नव्हतंच. शरीराचं आणि मनाचंही! दवाखान्याची धावपळ आणि मनात सतत भय! कुठलीही गोष्ट अटळ आहे कळलं तरीही ती स्वीकारणं फार कठीण असतं. आशा माणसाचा पिच्छा सोडत नाही.
उद्यापासून वॉक सुरू करायचा असं रमणीने ठरवलं. चहाचा कप घेऊन ती बाल्कनीत आली. झाडं थोडी सुकली होती. कदाचित ती देखील प्रद्युम्नच्या आठवणीत सुकली असतील. प्रद्युम्नला झाडांची,फुलांची प्रचंड आवड होती. त्या बाल्कनीत मावतील तेवढया कुंड्या त्याने ठेवल्या होत्या. गुलाब,शेवंती,झेंडू,मोगरा! कढीपत्ता, गवती चहा,हिरवी मिरची! तुळस तर बहरली होती. कृष्णाचा वरदहस्त असल्यासारखी!
झाडांना रोज पाणी घालणं, खत घालणं,त्यांची मशागत करणं ह्यात तो रमून जायचा. रमणी कधीतरी गमतीत त्याला ‘माळीबुवा’ म्हणायची.
“रमा,तू सायन्स शिकलीय ना? झाडांना जीव असतो हे माहितीय ना तुला? त्यांना माणसांसारखच जपायला हवं,काळजी घ्यायला हवं. त्यांच्याशी बोलायला हवं.”
आणि तो खरंच बोलायचा. एकदा ब्रम्हकमळ फुलणार म्हणून दोघेही रात्री बारापर्यंत जागे होते. ते फुलल्यावर म्हणाला,”या या,स्वागत आहे तुमचं आमच्या घरात! आता तुमच्याबरोबर एक सेल्फी काढतो. लगेच सेल्फी काढून स्टेट्सवर ठेवला. उत्साहाचा झरा होता प्रद्युम्न!
लॅच उघडल्याचा आवाज आला म्हणून रमणी बाहेर आली. सुधाताई आल्या होत्या. “ताई,लॅचची किल्ली आता तुम्हाला परत देते.”
“असू द्या सुधाताई! मी कुठे गेले तर तुमचा खोळंबा नको.”
“ताई,आता शेजार आलाय की! तिथं ठेवत जा.”
“अहो माझी अजून पुरती ओळख सुद्धा झाली नाहीय. काल ते पाणी मागायला आले होते तेवढंच!”
“होईल हळूहळू! त्यांच्या बायकोशी चांगली ओळख करून घ्या,मैत्रीण मिळेल तुम्हाला!आणि ताई,त्यांना विचारा स्वयंपाकाला बाई हवीय का! मला एक काम मिळेल.”
“नक्की विचारते!” रमणी म्हणाली.
खरंच मी काल त्या माणसाची काही चौकशी पण केली नाही. फार तुटक वागले का मी?”
आज जाऊन विचारते, काही मदत हवीय का? शेजारधर्म पाळायलाच हवा….!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे


