भाग एक च्या सुपर हिट यशानंतर राजेश सहस्रबुद्धे यांनी लिहिलेली उत्कंठा वर्धक भयकथा – गोटा शेठ चा भाग 2

गोटाशेठ भाग 1
तायडीनी गोटा घासला…….
“अरे यार काय कटकट आहे, कोण मला बोलवतय” झोपेतच बडबडत भावड्यानी कानात बोट घालून परत झोपी गेला. काही वेळा नंतर त्याला जाग आली तस त्यानी रेशीमबंध वरचा msg पहिला. त्याच्या अक्काचे म्हणजेच तायडीचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तायडी सहसा असा फोन करत,कारण गोटा घासला की अक्राळ विक्राळ काळानिळा भावड्या प्रकट व्हायचा, काही तरी अर्जंट असावे म्हणून मग भावड्या डोळे चोळत गोट्यातून पटकन बाहेर आला आणि त्याला कळले की त्याचा पॅक च संपलाय(पेग नव्हे). भावड्याच्या बाबतीत नेहमी असच घडायचं, राजा आणि मंदारला उत्तर द्यायचं म्हणल की संपला त्याचा पॅक. गोट्यातून बाहेर येऊन त्यानी तायडीला विचारलं, “बोल मेरी अक्का क्या हुकूम है”. तायडी म्हणाली,“भावड्या लवकर नागपूर रेल्वे स्टेशन वर एक संत्रा बर्फी घेऊन ये,सिमरन तुझी वाट बघतीये, मास्क लावून आलीये पण मी ओळखलं तिला बरोबर, तुमचा तो 350 वर्ष जुना लग्नाचा अल्बम सापडला त्यात पाहिलं तुमच्या जोडीचा फोटो”. सिमरन नाव ऐकून भावड्याच्या शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणीक भीती निर्माण झाली.
तुम्हाला वाटेल सिमरनचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे. पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ग्रुप वर ऐकायला मिळत होत त्यावरून त्याला भीती वाटणं साहजिक होत. काही महिन्यांपासून त्या सिमरन मुळे बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाच्या मुठीत कबुतरांना टाकायला दाणे असायचे आणि त्यांची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदय काढून रुबीच्या लॅब मध्ये जमा केलेले असायचे. ही हृदय कोण आणि कशा साठी काढून रुबीला जमा करतय हे अजूनही कळले नव्हत. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक दिल की डॉक्टर आणि तिची मैत्रीण आहे,आणि त्या रोज मेट्रोनी ये जा करतात, तर त्या मैत्रिणीला भूत खूप आवडतात तिला मनापासून वाटत आपण पण भूत व्हावं,ती एकदा रुबीत राजाला भेटायला गेली होती,तो चौथ्या मजल्यावर ऍडमिट होता, ती तिथे बसून ग्राउंड फ्लोर वरच्या पाण्याच्या टाकीत पाय सोडून बसली होती.तर अशा ह्या डॉक्टरच्या मैत्रिणीला हृदयाची चटक लागलेली असते. आणि तीच मैत्रीण हे सगळं करतेय. पण भावड्या सारख्या निष्णात इंजिनियरला या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्यच होते म्हणून तो ही अफवा समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना तसच काहीसं होत होत…..कारण 350 वर्षा नंतर सिमरन नागपूर स्टेशन वर तायडीला दिसते.
भावड्या पटकन कसाबसा तयार होऊन स्टेशन वर पोहोचलो. त्याची अक्का त्याची वाट पाहत थांबली होती,त्यानी तिच्या हातात संत्रा बर्फीचा बॉक्स दिला आणि रेल्वेच्या तारेवरून पळत पळत तडक रुबी गाठल,प्रतिकूल परिस्थितीत टॉवर उभे करण्याचे कसब असल्यामुळे तो असा पटकन तारेवरून कुठूनही कुठेही जायचा.
===================
गोटाशेठ भाग 2
आपण नागपूर रेल्वे स्टेशन वरून तारेवर कसरत करत रुबीला का आलोय हे भावड्याला कळत न्हवत, दुसऱ्या तारेवर,तायडीची नजर चुकवून, सिमरन पण त्याच्या बरोबर रुबी कडे निघाली होती,तिथे पोहोचल्यावर त्याने सिमरनला हळूच बाजूला नेऊन विचारलं, तिने सांगितले की आत्ताच मी अजून एकाच हृदय आसाम वरून रुबीला पाठवलय,हृदय काढल्यामुळे अजून तो शुद्धीवर आला नाहीये. भावड्याचे लक्ष समोर गेले, तो तोच शेतकरी होता जो टॉवर उभे करायला परवानगी देत न्हवता कारण टॉवरचे खड्डे त्याच शेत खराब करत होते, त्या तरुण शेतकऱ्याचे आई वडील तिथेच बसून खूप रडत होते. भावड्या त्यांना धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत होता. दिवसभर तो तिथेच थांबला,साडे तीनशे वर्षांनंतर सुद्धा सिमरन तशीच वागतीये हे पाहून मनातल्या मनात तो खुश झाला होता, संध्याकाळ होत आली होती. त्यानी त्या शेतकऱ्याच्या आई वडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आराम करा मी आणि सिमरन इथेच थांबतो(सिमरन भावड्या सोडून कुणालाच दिसत न्हवती,तेव्हा त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली की ही नेमकी तायडीला कशी दिसली) दिवसभराच्या धावपळीमुळे ते ही थकले होते पण भावड्या थांबतो म्हणल्यावर त्यांना जरा हायसे वाटले.
त्यानी त्या दोघांना बाहेरून जेवण आणले. जेवण करून ते आराम करायला गेले. सिमरन आणि गोटाशेठ(भावड्या) 350 वर्षा पूर्वीच्या गप्पा मारत बसले होते. साधारण रात्रीचे बारा वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होत होतं. पण रुबीमध्ये रुग्णांच्या खोकण्याच्या, कुजबुज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. भावड्या एवढया जुन्या गप्पा मारून कंटाळून गेला होता,म्हणून तो सिमरनला म्हणाला की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. रुबीच्या बाहेर पडला तर रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. त्यानी कॅम्पच्या दिशेला चालायला सुरुवात केली आणि वाडिया कॉलेजचा पूल ओलांडल्या वर अचानक रस्त्याच्या कडेच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. तो दचकला आणि जागेवरच थांबला. तिथे घडत असलेल्या प्रकाराची अंदाज आला आणि त्याच्या सापळ्यावर सुद्धा सर्रकन काटा येऊन गेला. तो कसलाही विचार न करता मागे वळला आणि रुबी मध्ये आला.
तो आणि सिमरन च्या शेतकऱ्याच्या शेजारी बसून होते. बोलता बोलता सिमरन झोपली पण झालेल्या प्रकारामुळे भावड्याची झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती सिमरन तर नसेल? या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायलाच हवा असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानी घडाळ्यात पाहिले, तर एक वाजून गेला होता. तो रुबी च्या वॉचमन ला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी गेला. त्यानी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणाला की “हे बघा हेच ते झाड, इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती.. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे”. इतके बोलून तो मागे वळाला तर मागे कोणीही नव्हते. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर तो एकटाच होता. तो वॉचमनला शोधू लागला आणि शोधत शोधत नेमका त्याच झाडाखाली आला. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून त्यानी वर पाहिले आणि त्याची बोबडीच वळली. भीतीने त्याचे हातपाय थंडगार पडले, तोंडातून एक शब्द ही फुटत नव्हता. त्या झाडावर सिमरन बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती, संपूर्ण चेहरा फाटला होता, शरीर जळालेलं आणि जागोजागी कापलेलं. हातांची नख लांबलचक एखाद्या धारधार सुरीसारखी भासत होती. ती त्या झाडाच्या फांदीवर त्या वॉचमनच्या छातीवर बसली होती, आणि काही तरी खात होती, कदाचित त्या वॉचमनच हृदय… भावड्या दबक्या पावलांनी मागे सरकला जेणेकरून त्याची चाहूल तिला लागू नये. वाडियाचा पूलावरून तो सरळ धावत सुटला. समोर रुबीचे गेट दिसत होते पण तितक्यात त्याच्या बुटाच्या लेस मध्ये त्याचाच पाय अडकला आणि तो खाली पडला.
तोपर्यंत सिमरनला त्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत त्याच्या दिशेने येऊ लागली. पाय अडकून पडल्यामुळे तो वेदनेने कळवळत होतो पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करू लागला. पण शेवटी त्याची धडपड व्यर्थ ठरली आणि तो तिच्या तावडीत सापडला. तिने त्याच्या पायाला धरून खेचले आणि त्याच्या छातीवर बसून म्हणाली “तायडी होती म्हणून नागपूर स्टेशनवर वाचलास, त्या शेकाऱ्याचे आई वडील होते म्हणून रुबीत वाचलास,मगाशी वॉचमन बरोबर आलास म्हणून वाचलास, पण आता नाही”..
भीतीमुळे त्याच्या शरीरातील सगळा शक्ती संपली होती. तायडी मुळे गोट्या मध्ये त्याला सुरक्षा कवच होत ते पण गेलं होत, 350 वर्षाचा इतिहास त्याच्या डोळ्या समोर दिसत होता. राजा,मंदार रेशिमबंध वरचे सगळे मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले, तो मनातून देवाचा(देशपांडे) धावा करू लागला. तोच तिने त्याच्या छातीत तिची नख खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात त्याला आवाज आला “भावड्या काय झालं, असा का पडला आहेस, चक्कर वैगरे आली का”.. तायडी काळजीने विचारत होती. तो भानावर आला आणि समोर पाहिले. सिमरन कुठेच दिसत नव्हती. तो प्रचंड घाबरला होता म्हणून त्याला धीर देत तायडी आत घेऊन गेली. मनात विचार आला की आज माझी तायडी देवासारखी धावून आली. पण हे प्रत्यक्षात घडले की फक्त भास हे त्याला समजत नव्हते. विचार करतच त्याला गाढ झोप लागली. सकाळी उठला तेव्हा छातीत दुखत होत, त्यानी शर्ट काढून पाहिले तर त्याच्या छातीवर नख खुपसण्याच्या खुणा होत्या….
त्याला कळेना नक्की कोणामुळे हे सगळ घडलं?कारण शेजारी सिमरनचा स्टोल आणि तायडीला दिलेला बर्फीचा बॉक्स तसाच होता.
राजेश सहस्रबुद्धे



