Classified

★सोबत★ (2)   ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा .. सोबत

 

★सोबत★ (2)   ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

घरातूनबाहेर पडल्याशिवाय विचारांची मालिका थांबणार नाहीच हे रमणीला जाणवलं. आज जरा राउंड मारून यावा म्हणून ती तयार झाली. ट्रॅक पॅन्ट टी शर्ट ,शूज घातले आणि वॉकचा पहिला दिवस आठवला. आर्याच्या जन्मानंतर तिचं वजन जरा वाढलंच होतं. ऑफिसची धावपळ,आर्याला पाळणाघरात सोडणं ही सगळी धावपळ होतीच पण व्यायाम असा काहीच होत नव्हता. प्रद्युम्नने एक दिवस तिला मॉलमध्ये नेऊन सगळी खरेदी करायला लावली आणि तिला संध्याकाळी वॉकला न्यायला सुरू केलं. तेवढ्यासाठी आर्याला सांभाळायला संध्याकाळी तीन तासांची बाई ठेवली. प्रद्युम्नला शुगर होती त्यामुळे त्याचा वॉक नियमित होता. रमणीने सुरवात केली आणि मग ती सवय होऊन गेली.

लॅच ओढून ती वॉकला निघाली. बागेत चार राउंड मारले आणि तिला धाप लागली. बऱ्याच दिवसांची गॅप पडली होती. एका बेंचवर ती निवांत बसली. समोर हास्यक्लबचे मेम्बर्स हसण्याचा व्यायाम करत होते. ती आणि प्रद्युम्न बागेत यायचे तेव्हा तिला ह्या लोकांचं हसणं ऐकूनच हसू यायचं. आज चेहऱ्यावर स्मित सुद्धा येत नव्हतं. ह्या औदासिन्यातून बाहेर पडायला अनेक दिवस लागणार हे रमणीला जाणवलं. ती डोळे मिटून प्राणायाम करू लागली. त्यातही लक्ष लागेना! चित्त एकाग्र होत नव्हतं. डोळे बंद केले की शेवटच्या दिवसातला असहाय, तिची आणि आर्याची काळजी वाटणारा, वेदना सहन करणारा, प्रद्युम्न डोळ्यासमोर यायला लागला. तिने डोळे उघडले आणि रुमालाने पुसले. बेंचवरून उठणार इतक्यात तिला ऐकू आलं.

“हाय!”

रमणीने वळून बघितलं. शेजारी नुकतेच राहायला आलेले विलास फडके होते.
“हॅलो!” रमणी हसत म्हणाली.

“रोज इथेच येता का वॉकला? छान आहे हा पार्क! मॉर्निंग वॉकसाठी वेगळा ट्रॅक केला आहे. मी मुंबईहून पुण्यात शिफ्ट झालोय. मुंबईची गजबज,कोंदट हवा हल्ली त्रास द्यायला लागली होती. ठाण्यात होतो. तिथला फ्लॅट विकून इथे स्थायिक व्हायचं ठरवलं. मुलगा ऑस्ट्रेलियात असतो. त्याचं मागच्या वर्षी लग्न झालं. सॉरी! मी माझ्याचबद्दल बोलतोय! स्वभावाला औषध नाही. समोरची व्यक्ती बोलकी असेल तर ठीक नाहीतर माझा त्रासच होतो. तुम्हाला झालेला तुमच्या चेहऱ्यावरून दिसतोय.” विलास जोरात हसत म्हणाला.

“नाही,तसं अजिबात नाही! निघुया? आज बऱ्याच दिवसांनी फिरायला आले त्यामुळे जरा दमलेय.” रमणी उठत म्हणाली.

“आज तुम्ही आणि तुमचे मिस्टर माझ्याकडे दुपारच्या चहाला या. घरात अजून कोणी असेल तर त्यांचेही स्वागत!”

“बघते!” रमणी चालायला लागली. मला काही दिवस एकटं राहावंसं वाटतंय आणि हा माणूस जरा जास्तच बोलतोय. ह्याची बायको नक्कीच अबोल असेल. माझे मिस्टर ह्या जगात नाहीत हे सांगायची सुद्धा रमणीला इच्छा झाली नाही.

“मी वाट बघतोय दुपारी!” विलासने तिला बाय केलं आणि तो चालायला लागला.
रमणी घरी आली लॅच उघडताना तिला शेजारच्या दारासमोर तुळस दिसली. नकळत तिने हात जोडले. पण दरवाजाला कुलूप कसं काय? ह्याची बायको घरात नसावी का ती बागेतच होती? माझ्यासारखी थकून कुठल्यातरी बेंचवर बसली असेल.

रमणीने चहा केला आणि गॅलरीत येऊन बसली. गेल्या वर्षभरात ती गॅलरीत अशी निवांत चहा पीत बसलीच नव्हती. प्रद्युम्न बॅडमिंटन खेळायला सकाळी सात वाजता जायचा. खेळायच्या आधी अर्धा तास पोटात काही नको म्हणून तो साडे पाचलाच चहा घ्यायचा. रमणी झोपलेलीच असायची. ती उठल्यावर ती चहा घेत असताना तिच्याबरोबर एक घोट तरी घ्यायचाच! अत्यंत शिस्तप्रिय असणारा माणूस इतक्या अकाली जावा? बेलचा आवाज आला तसं रमणीने दार उघडलं. दारात विलास होता.
“भेळेचं साहित्य घेऊन आलोय. दुपारचा चहा माझ्याकडे!आणि नाही आलात तर मीच चहा आणि भेळ घेऊन तुमच्या घरी येतो.”

रमणीला हसू आलं. पिच्छा पुरवणं म्हणतात ते हेच!
“येते चार वाजता!” रमणी हलकं स्मित करत म्हणाली.

“गुड! मी छान भेळ करतो. आवडेल तुम्हाला.”

रमणीने दार लावलं. इतक्या आग्रहाने बोलावतो आहे,जायलाच हवं! आणि शेजाऱ्यांशी चांगलेच संबंध हवे. अडीअडचणीला सगळ्यात आधी तेच उपयोगी पडतात….!
***
बरोबर ४ वाजता रमणीने शेजारच्या दाराची बेल वाजवली. पाच मिनिटं ती तशीच उभी होती.दार उघडताच समोर लाल डोळे असलेला विलास तिला दिसला. ती घाबरली! हा ड्रिंक्स तर नाही ना घेतले? ती वळणार इतक्यात तो म्हणाला,
“हे काय? आलात काय,चालला काय! सॉरी! भेळेसाठी कांदा चिरत होतो,हात धुतले आणि दार उघडलं. बसा ना! थोडा पसारा आहे,अजून नीट लागलं नाहीय. आलोच!”

कांदा चिरत होता? म्हणजे हा एकटा राहतो? अशी ओळख नसताना मी इथे एकटी येणं…! रमणी अस्वस्थ झाली.

“हो,मी एकटाच राहतो. तुमच्या मनात हा प्रश्न आला हे तुमच्या चेहऱ्यावरून मला कळलं. आय लॉस्ट माय वाईफ! सहा महिने झाले. कॅन्सरने गेली. चार वर्षे त्या रोगाशी लढली. शी वॉज अ फाईटर! आनंदाची गोष्ट इतकीच की मुलाचं लग्न मनसोक्त एन्जॉय करून गेली. ती जाताना समाधानाने गेली. मीच तुटून गेलो होतो. त्यातून बाहेर पडायला मन तयारच होत नव्हतं. पण एकदा स्वप्नात आली आणि सांगून गेली की विलास,तुला जगायचं तर आहेच,मग असा कुढत बसू नकोस. मी ज्या आनंदी,उत्साही विलासवर प्रेम केलं तो हा नव्हे. इतरांना आनंद देणारा तू,असा उदास? मला वचन दे,तू आनंदाने जगशील. मी नाही येणार स्वप्नात! त्या दिवसापासून ठरवलं,आनंदी रहायचं, धरासाठी! वसुंधरा नाव होतं तिचं! चिडवायचो मी तिला, जुनं नाव म्हणून! मग म्हणायची वसू म्हण! पण मी धरा म्हणालो आणि तिला ते आवडलं. तिने देखील तिचं वचन पाळलं. परत नाही आली स्वप्नात!ओह! परत माझीच बडबड! तुम्ही एकट्या का आला? मिस्टर? आज तर रविवार आहे.”

“सो सॉरी! तुमचं दुःख मी समजू शकते. मी पण एकटीच राहते.”

“ओके! आपण ते सगळं नंतर बोलू.
आधी भेळ की आधी चहा?”

“काहीही चालेल.”

“काहीही हा पदार्थ मी केला नाहीय.”

रमणी मनापासून हसली.

विलासने तयार भेळची प्लेट तिच्या हातात दिली.”तुम्ही सुरू करा,मी चहा ठेवतो.”

“मी करू का चहा?” रमणी उठत म्हणाली.

“नो नो! आज तुम्ही माझ्या गेस्ट आहात.”

विलास किचनमध्ये गेला आणि रमणीच्या मनात आलं,किती सहज त्याने विषय बदलवला. पंधरा दिवस जणू काही वाट बघत होते असे सल्ले तिला काही जण द्यायला लागले. कंपॅनियन हवा,दुसरं लग्न कर,आर्या पण इथे नाही,एकटी आयुष्य कसं काढणार? प्रद्युम्नसाठी जॉब सुद्धा सोडून बसलीस. अनेक सल्ले! तिला ह्या क्षणाला फक्त चार आधाराचे शब्द हवे होते हे खूप कमी जणांना कळत होतं. बाईने एकटं राहणं म्हणजे जणू काही आभाळ कोसळणं! तिच्यावर आभाळ कोसळलंच होतं पण त्या आभाळाचा निचरा करून तिचं मन हलकं कोण करणार?

“चाय गरम!” विलासने चहाचे मग आणले. “बशी हवीय? काही जणांना लागते असं धरा नेहमी म्हणायची त्यामुळे आमच्या घरी असते.”

“नको,मला गरमच चहा आवडतो.”.

“भेळ कशी झाली आहे? धरा फार सुंदर करायची. कांदा तर इतका बारीक चिरायची की ती चिरताना मी टक लावून बघायचो.”

“मस्त टेस्टी झालीय.” रमणीने घास घेत म्हटलं.

“तुमचं नाव रमणी आहे हे नेमप्लेटवरून कळलं. छान नाव आहे. तुमच्याविषयी मी आज काही विचारणार नाही. तुम्हाला ज्या वेळी योग्य वाटेल तेव्हा तुम्ही सांगा. तूर्त आपण भेळ आणि चहा एन्जॉय करू.”

सिनेमा,गाणी,हल्लीची पिढी ह्या विषयावर दोघांच्या गप्पा रंगल्या. अंधार पडत आला तसा रमणी उठली,”निघते,देवाजवळ दिवा लावायची वेळ झाली आहे.”

“ओके,भेटू उद्या पार्कमध्ये, लिफ्टमध्ये…कुठेतरी!” विलास हसत म्हणाला.

रमणी दार उघडून घरात आली. देवाजवळ दिवा लावला. उदबत्ती ओवाळून नमस्कार केला आणि तिचं लक्ष प्रद्युम्नच्या फोटोकडे गेलं. काहीतरी वेगळा दिसत होता आज! त्याचे डोळे हसत होते….!

क्रमशः!

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}