कथा – “ज्वाळाच्या पलीकडे” ©निरती सौ आरती नितीन सिन्नरकर
“((सती प्रथा ह्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थान मध्ये फिरताना ..काही जागा पाहताना जे भयानक स्वरूप जाणवलं त्यावर लिहिण्याचा प्रयत्न))”
कथा – “ज्वाळाच्या पलीकडे” ©निरती सौ आरती नितीन सिन्नरकर
राजस्थानचा सूर्य मावळतीकडे झुकत होता.
सोन्याच्या वाळूवर लालसर छटा पसरल्या होत्या.
चित्तोडगडाच्या विशाल किल्ल्यात फिरताना रमा आणि तिची कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी साधना दोघीही इतिहासाच्या गर्भात हरवत चालल्या होत्या.
गाईडचा आवाज दगडी भिंतींवर घुमत होता.
“इथे राणी पद्मिनी आणि हजारो स्त्रियांनी जौहर केला… शत्रूच्या हातून अब्रू लुटली जाण्यापेक्षा त्यांनी स्वतःला अग्नीत झोकून दिलं…”
क्षणभर शांतता पसरली.
साधनाने आईचा हात घट्ट पकडला.
“आई… त्या स्त्रिया खरंच आगीत उड्या मारत होत्या?”
रमाने खोल श्वास घेतला.
“हो ग… परिस्थिती इतकी भयानक होती की मृत्यू त्यांना जगण्यापेक्षा सुरक्षित वाटला.”
साधनाच्या डोळ्यांत प्रश्न होते.
“मग त्या काळात स्त्रिया असुरक्षित होत्या… पण आता तरी सगळं बदललंय ना?”
आता मात्र रमा क्षणभर थबकली.
किल्ल्याच्या भिंतींकडे पाहताना तिच्या डोळ्यांसमोर वर्तमानपत्रांच्या मथळ्यांचे चेहरे तरळू लागले —
अत्याचार… छेडछाड… घरगुती हिंसा… अॅसिड हल्ले… ऑनलाइन ब्लॅकमेल…
ती मंद हसली खरी; पण त्या हास्यात एक वेदना होती.
“बदललंयही… आणि नाहीही.”
“म्हणजे काय ?”
“त्या काळी स्त्रीला स्वतःचं शील वाचवण्यासाठी आगीत जावं लागायचं…
आज स्त्री जिवंत राहते, शिकते, कमावते… पण अजूनही कित्येक वेळा भीतीच्या त्या आगीत होरपळत जगते.”
साधना गप्प झाली.
समोर जौहर कुंड होता.
आज थंड होता …पण त्या राखेत हजारो किंकाळ्या दडल्या असाव्यात असं वाटत होतं.
रमा पुढे म्हणाली,
“पूर्वी शत्रू तलवारी घेऊन यायचे…
आता तलवारी नाहीत पण काही नजरां तलवारी असतात.
पूर्वी स्त्रीला कैद केलं जायचं…अमानुष छळ केला जायचा पण आता….
आता तिच्या कपड्यांवर, वेळांवर, हसण्यावर, बोलण्यावर सतत सतत प्रश्न उभे केले जातात.
आता मात्र साधना विचारात पडली.
आई… म्हणजे आजची स्त्री स्वतंत्र नाही?”
“आहे ग… नक्कीच आहे.
ती उंच भरारी घेतेय. अंतराळात जातेय, सैन्यात उभी राहते, घरही उत्तम सांभाळते.
पण खरी स्वतंत्रता फक्त बाहेर फिरण्यात नसते..स्वतंत्रता असते ती बाहेर च्या जगात मोकळी फिरण्याची
भीतीशिवाय जगण्याची
साधनाच्या चेहऱ्यावर आता एक गंभीर छटा उमटली होती
आई अगं त्या स्त्रियांनी स्वतःला जाळलं..
आजच्या स्त्रिया काय करतात मग?
रमाने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली
“आजची स्त्री जळत नाही बाळा साधना…ती लढते ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. शिक्षण घेते. स्वतःच्या पायांवर उभी राहते.
फरक फक्त एवढाच आहे
त्या काळी स्त्री अग्नीत स्वतःला संपवत होती…किंवा संपत होती म्हण…आणि आज आज ती त्याच अग्नीदिव्यातून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा जन्म घेते.
क्षणभर माय लेक दोघीही शांत उभ्या राहिल्या…संवादाशिवाय बराच काही दोघींना समजलं
सूर्य आता पूर्ण मावळतीला टेकला होता.
साधनाने पुन्हा प्रश्न विचारला —
“आई… मग खरंच स्त्री सुरक्षित होईल का ग कधी ?”
आता रमाच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
“ज्या दिवशी मुलीला ‘जप’ असं सांगण्यापेक्षा मुलाला ‘संस्कार’ शिकवले जातीला ना…
ज्या दिवशी स्त्रीच्या चारित्र्यापेक्षा पुरुषाच्या विचारांची परीक्षा घेतली जाईल ना..
त्या दिवशी फक्त त्याच दिवशी सगळ बदलेल बघ बाळा आणि मग त्यानंतर कदाचित कोणत्याही स्त्रीला जौहर, सती किंवा भीतीची गरजच उरणार नाही.”
किल्ल्याच्या तटावरून खाली पाहताना साधनाला त्या राखेतून उगवणाऱ्या असंख्य स्त्रियांचे चेहरे दिसल्यासारखे वाटले..
काही जळालेल्या…
काही लढणाऱ्या…
आणि काही ..काही नव्या जगाची स्वप्नं पाहणाऱ्या.
©निरती
सौ आरती नितीन सिन्नरकर
वारजे पुणे

