कथा – माझीच सोबत ©निरती सौ आरती नितीन सिन्नरकर
कथा – माझीच सोबत
आरशासमोर उभी राहून ती स्वतःकडे न्याहाळत होती. केसांत डोकावलेले काही पांढरे केस, डोळ्यांभोवती उमटलेल्या सुरकुत्या आणि चेहऱ्यावरचा थकवा… काळाने उमटवलेल्या प्रत्येक खुणेकडे तिची नजर जात होती.
क्षणभर तिला वाटले, आरसा तिचा चेहरा नव्हे तर तिचे संपूर्ण आयुष्यच दाखवत होता.
आयुष्यभर ती अनेक नाती जपत आली होती. कधी मुलगी म्हणून, कधी पत्नी म्हणून, कधी आई म्हणून, तर कधी मैत्रीण म्हणून. प्रत्येक नात्याला तिने वेळ दिला, प्रेम दिले, समजून घेतले. कुणाला काही हवे असेल तर ती धावत जायची. कुणी दुःखी असेल तर त्याच्या अश्रूंना आधार द्यायची.
पण आज अचानक तिच्या मनात एक प्रश्न उभा राहिला…
“या सगळ्यात मी कुठे आहे?”
प्रश्न साधा होता, पण उत्तर मात्र तिच्याकडे नव्हते.
तिने डोळे मिटले आणि भूतकाळाच्या वाटेवरून चालू लागली.
लहानपणी तिला चित्र काढायला आवडायचे. गाणी ऐकायला, कविता लिहायला आवडायचे. पावसाच्या सरींमध्ये भिजत आकाशाकडे पाहताना ती रंगीबेरंगी स्वप्ने विणायची. पण नंतर संसार आला, जबाबदाऱ्या आल्या, कर्तव्यांची गर्दी वाढली… आणि तिच्या आवडी-निवडी कुठेतरी मागे पडल्या.
आरशातील तिचेच प्रतिबिंब जणू हळूच बोलू लागले.
“तू सगळ्यांसाठी जगलीस, पण स्वतःसाठी कधी जगलीस का?”
तो प्रश्न तिच्या मनाला चटका लावून गेला.
मुलांचे हट्ट, त्यांच्या यशासाठी केलेली धडपड, कुटुंबाची काळजी, नात्यांची वीण, संघर्षाचे दिवस, आनंदाचे क्षण… सगळं काही तिच्या डोळ्यांसमोरून सरकत होतं. प्रत्येक आठवणीत ती होती, पण स्वतःसाठी मात्र कुठेच नव्हती.
तिच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले.
“खरंच… मी स्वतःलाच विसरले.”
आरशातील प्रतिबिंब हसले.
“अजून उशीर झालेला नाही. स्वतःवर प्रेम करायला शिक. तुझ्या मनातल्या स्वप्नांना पुन्हा हात दे. तुला आनंद देणाऱ्या गोष्टी पुन्हा जग.”
तिने अलगद अश्रू पुसले.
त्या दिवशी तिने कपाटाच्या तळाशी ठेवलेली जुनी वही बाहेर काढली. पानांवर धूळ साचली होती, पण त्यात जपलेली स्वप्ने अजूनही जिवंत होती. अनेक वर्षांनी तिने पुन्हा लेखणी हातात घेतली.
पहिले पान उघडताच तिला एक अपूर्ण कविता दिसली. शब्द फिके झाले होते, पण भावना अजूनही ताज्याच होत्या.
तिने लेखणी उचलली आणि त्या कवितेखाली लिहिले—
“आज पुन्हा सुरुवात करते आहे… स्वतःसाठी.”
खिडकीबाहेर पावसाची एक हलकी सर बरसत होती. जणू निसर्गही तिच्या नव्या प्रवासाचा साक्षीदार झाला होता.
तिने पुन्हा आरशात पाहिले.
यावेळी तिला सुरकुत्या दिसल्या नाहीत, थकवा जाणवला नाही. दिसत होती एक स्त्री—जिने अनेक नाती मनापासून जगली, अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि आता स्वतःलाही जपण्याचा निर्णय घेतला होता.
तिच्या चेहऱ्यावर एक शांत, समाधानी स्मित उमटले.
कारण आज तिने स्वतःला पुन्हा शोधले होते.
आणि मनाच्या गाभाऱ्यातून एक हळवा, पण ठाम स्वर उमटला—
“सगळ्यांसाठी जगताना मी स्वतःला हरवले होते. पण आता नाही. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक नव्या पानावर सर्वप्रथम नाव असेल ते माझे.
माझ्या स्वप्नांसाठी…
माझ्या आनंदासाठी…
माझ्या अस्तित्वासाठी…
मला तूच हवीस…
माझी मी.”
कथा लिहिताना एक आवर्जुन सांगावा वाटत
*स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नाही स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान आहे. *
©निरती
सौ आरती नितीन सिन्नरकर

