दुर्गाशक्तीमनोरंजनवैद्यकीय

सुप्रसिद्ध लेखिका मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा (कुठेही पोस्ट न झालेली) , प्रकाशित होत आहे आपल्या युनिटी एक्स्प्रेशन वेब चॅनेल वर

सुप्रसिद्ध लेखिका मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा (कुठेही पोस्ट न झालेली) , प्रकाशित होत आहे आपल्या युनिटी एक्स्प्रेशन वेब चॅनेल वर

★निर्णय★  सौ मधुर कुलकर्णी, पुणे

सायलीने सॅक पाठीवर घेतली आणि चप्पल पायात सरकवत ओरडली,”आई,मी निघतेय.”

“सायली थांब जरा!” गीता हातात नॅपकिन घेऊन तशीच बाहेर आली. “किती वाजता परत येणार आहेस.”

“अग आई, असं काय करतेस! काल बोलले की मी तुला! आर्याची बर्थडे पार्टी झाली तिच्या घरी मी आणि संजना नाईट आऊट करणार आहे.”

“पार्टीत मुलं पण असतीलच!”

“अर्थात आई! आमचे क्लासमेट्स आहेत काही!आणि त्यातल्या काही जणांना तू पण ओळखतेस.आई,आता हे सगळं किती कॉमन झालंय ग! तुझ्या डोक्यातले ते जुने विचार काढून टाक आणि माझ्यावर विश्वास ठेव.निघते मी,बाय!” सायली गीताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

सायली आर्याकडे पोहोचली तर सगळे मित्र-मैत्रिणी आलेले होते. फक्त सुदीप यायचा होता.
“तो आला तरी काय! आपली ॲटीट्युड घेऊन कोपऱ्यात बसेल.” संजना नाक मुरडत म्हणाली.

“असं काही ग! तो जरा अबोल आहे इतकंच!” सायलीचं वाक्य पूर्ण होत नाही तर सुदीप आला.

“हाय सुदीप! तुझ्याचबद्दल बोलत होतो.” आर्याने त्याचं स्वागत केलं.

“चांगलं का वाईट?” सुदीपने हसत विचारलं.

इंजिनिअरिंग हे शेवटचं सेमिस्टर झालं की सगळे आपापल्या मार्गाला लागणार होते. आर्या, सायली आणि सुदीपचं एमबीए करायचं ठरलं होतं. फारसा न बोलणारा सुदीप त्या दिवशी मात्र सायलीशी खूप वेळ एमबीए विषयी चर्चा करत होता. सुदीपच्या बोलण्यावरून सायलीला जाणवलं की तो खूप बुद्धिमान होता.

सायली आणि सुदीपने एमबीए साठी एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. पुण्यात ऍडमिशन झाली तरी सुदीप आणि सायलीला होस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. दोघांचे विषय वेगळे असले तरी कॉलेज कॅम्पस एकच असल्यामुळे दोघे सतत भेटत. सुदीपचा शांत,अभ्यासू स्वभाव सायलीला आवडायला लागला. ती त्याच्याकडे आकर्षित झाली. प्रेझेंटेशन, सबमिशन ह्याबाबतीत दोघे चर्चा करायचे. सुदीप देखील नकळत सायलीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला लग्नाचं विचारलंच!
“सायली,मला तू आवडायला लागली आहेस. तुझे आणि माझे विचारही बरेच जुळतात. तू माझी लाईफ पार्टनर झालीस तर आय विल बी हॅपी!”

सायलीने काही न बोलता सुदीपचा हात हातात घेऊन मूक संमती दिली. दोघेही अभ्यास,प्रोजेक्ट, सबमिशनमध्ये व्यस्त होते.
कधीही वाद न करणारा सुदीप एकदा मात्र फार विचित्र वागला. सायलीला ते चांगलंच खटकलं. सायलीच्या क्लासमधल्या राहुलशी पण सायलीची छान मैत्री झाली होती. एकदा रात्री अकरा वाजता होस्टेलच्या बाहेर कट्ट्यावर सायली आणि राहुल प्रोजेक्टविषयी बोलत असताना सुदीपने बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सायलीला रागातच बोलला,
“सायली,त्या राहुलशी रात्री अकरा वाजता तुझं काय काम होतं? तो फ्लर्ट आहे. जरा जपून!”

सुदीपचं ते बोलणं ऐकून सायली चमकली.,” सुदीप,तो माझा अतिशय चांगला मित्र आहे. आणि कोण कसा आहे हे ओळखण्याइतकी मी नक्कीच प्रगल्भ आहे.”

सायलीचा चिडलेला चेहरा बघून सुदीप अस्वस्थ झाला. “तसं नव्हे ग! तुझ्यावर माझा विश्वास आहे पण…!”

“पण काय? लाईफ पार्टनरवर विश्वास नसेल तर अवघड होतं रे सगळं!” सायलीचा चेहरा उतरला.

“सॉरी सायली! मी थोडा जेलस झालो ग! फरगेट ईट!” सायलीच्या खांद्यावर हात ठेवत सुदीपने तिला हलकेच जवळ घेतलं.

एमबीएचा निकाल लागला. सुदीप आणि सायली दोघांनाही उत्तम यश मिळालं. जॉबची प्लेसमेंट दोघांचीही झाली होती. पुण्यातच दोघांना आय टी कंपनीत नोकरी मिळाली.
नोकरीत सहा महिने स्थिरावल्यावर सायलीने सुदीपबद्दल घरी सांगितले,”आई-बाबा,मला सुदीप आवडतो. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.”

“तुझी आणि त्याची मैत्री,सतत भेटी बघून माझ्या आणि बाबांच्या मनात संशय आलाच होता.”
गीता अजयकडे बघत बोलली.

“सायली,सुदीप चांगला मुलगा आहे पण थोडा अबोल आहे. तू अशी बोलघेवडी,मनमोकळ्या स्वभावाची,पटकन मैत्री करणारी!”

“त्याचा आमचा लग्न करण्याशी काय संबंध बाबा? मी करेन त्याला बोलकं!” सायली हसत म्हणाली.

“बघ बाई! उलटं व्हायला नको.”
गीता चेष्टा करत म्हणाली.

सुदीपच्या आईवडिलांना भेटून गीता आणि अजय लग्नाची तारीख पक्की करून आले. सुदीपला खूप भपका, अमाप खर्च नको होता. सायली त्याच्या मनाप्रमाणे वागली. ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी स्त्री काहीही करू शकते. लग्न झाल्यावर सुदीपबरोबर राहायला लागल्यावर सायलीला काही गोष्टी जाणवायला लागल्या. सुदीप जरा हट्टी,आग्रही होता. त्याचा संशयी स्वभाव पण मधेच डोकवायचा. सायलीला त्याचा त्रास व्हायचा पण रात्री बेडरूममध्ये तो सायलीवर प्रेमाचा वर्षाव करायचा. त्याच्या उत्कट प्रीतीने सायली अगदी मोहरून जायची. आणि मग दुसऱ्या दिवशी तिची सगळी नाराजी पळून जायची.

सायलीच्या हुषारीमुळे स्मार्टनेसमुळे तिला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या संधी मिळत होत्या. पण सुदीप मात्र आहे तिथेच होता. आपली बायको करिअरमध्ये आपल्यापेक्षा वरचढ होतेय हे त्याला दिसत होतं. घरात सुदीपची चिडचिड सुरू झाली. कुठल्याही कारणावरून तो सायलीवर ओरडू लागला. कामावरून थकून आलेली सायली पण कधीतरी उलट बोलू लागली. त्याला प्रत्युत्तर देऊ लागली.
“उद्या मी रजा घेतोय सायली! तू पण रजा टाक. माझ्या मित्राचा तीन बेडरूमचा नवा कोरा फ्लॅट तो विकतोय. आपण बघायला जातोय.”

“जातोय म्हणजे? मी नाही येऊ शकत! उद्या महत्वाची मिटिंग आहे.”

“तू कंपनीची सीईओ नाहीस,की तू नाही गेलीस तर मिटिंग कॅन्सल होईल.” सुदीप चिडून म्हणाला.

“काय बोलतोस हे सुदीप? तू स्वतः एका नावाजलेल्या कंपनीत काम करतोस. कामाचं लोड किती असतं हे तुला देखील ठाऊक आहे. आणि फ्लॅट रात्री पण बघता येऊ शकतो ना? रजा घ्यायची काय आवश्यकता आहे? तू पण रजा घेऊ नकोस.आणि सुदीप काय गरज आहे इतक्या मोठ्या फ्लॅटची?”

“आता तू मला शिकवणार का? मी काय करायचं ते?”

सुदीपचा तो अविर्भाव बघून सायली गप्प बसली. तिला शब्दाने शब्द वाढायला नको होता. पण तिने ठामपणे सांगितलं, “मी रजा घेणार नाही.” ती आत निघून गेली.

सायलीला आज सुदीपचं वागणं विचित्र वाटलं. वाद झाले तरी रात्री दोघेही विसरायचे. एका क्षणी सायलीला वाटलं,आपण पुढाकार घ्यावा. तिने सुदीपच्या छातीवर डोकं टेकलं आणि त्याच्या दंडावरून हात फिरवू लागली. सुदीपने तिचा हात दूर केला आणि कुशीवर वळला. सायलीचे डोळे भरून आले. लग्नाला जेमतेम दीड वर्ष झालं होतं आणि दोघांमधला हा वाढता बेबनाव! तिने डोळे पुसले. उद्याच्या मिटिंगवर ह्याचा परिणाम व्हायला नको.

मीटिंगमध्ये सायलीचे प्रेझेन्टेशन खूप छान झाले. तिचे बॉस मिस्टर समीर वाघ ह्यांनी तिचे मनापासून कौतुक केले. “सायली,तुझं नाव प्रमोशनसाठी मी नक्की रेकमेंड करेन. वेल डन!”

“थॅंक्यु सो मच सर!” सायलीने अत्यानंदाने सुदीपला फोन लावला. पण त्याने कट केला. ती अस्वस्थ झाली. सायली घरी आली तर सुदीप ड्रिंक्स घेत होता. कधीतरी पार्टीत सुदीप ड्रिंक्स घेत असे पण घरी कधीच नाही.” सायलीला धस्स झालं.
“सुदीप,काय झालं? आजपर्यंत तू घरी कधी ड्रिंक्स घेतले नाहीस.”

“आजपर्यंत अनेक गोष्टी झाल्या नाहीत ज्या अलीकडे होताहेत.” सुदीप सिप घेत म्हणाला,”तुझ्या माझ्यातल्या वादाचा शेवट अबोल्यात कधीच झाला नाही,जो काल झाला.”

“मी आले होते तुझ्या जवळ पण तूच मला दूर केलंस.”

“इच्छाच नव्हती होत तुझ्याशी बोलायची. तू तुझं करिअर,नोकरी ह्यातच इतकी रमली आहेस. आणि तुझा तो बॉस मिस्टर समीर!”

सायलीने सुदीपकडे चमकून बघितलं. तिला धडधडायला लागलं. ह्याचे कान कोणी भरले?
“सुदीप! कसला हा संशय? मी तुला लग्नाच्या आधी एकदा बोलले होते विश्वास नसेल तर कारण नसताना मन कलुषित होतं. मिस्टर समीर माझे फक्त बॉस आहेत. त्यांच्याबरोबर मला कम्युनिकेट करणं भाग आहे. हे विकृत विचार तुझ्या मनात भरवणारा आहे तरी कोण?”

“संदेशला ओळखते ना?”

“संदेश त्रिपाठी?तो मित्र आहे तुझा? अत्यंत फालतू माणूस आहे तो! ऑफिसमधल्या प्रत्येक स्त्रीशी जवळीक साधणारा! परव्हरटेड फेलो!”

“संदेश माझा बालमित्र आहे. गेली काही वर्षे तो पुण्यात नव्हता. सहा महिन्यांपूर्वी पुण्यात आला. तुझ्या कम्पनीत जॉब लागला म्हणून!तो कशाला खोटं सांगेल मला?” सुदीपची जीभ जड व्हायला लागली.

“बायकोपेक्षा बालमित्रावर विश्वास आहे तुझा?आणि ते देखील इतक्या वर्षांनी भेटल्यावर?” सायली दुखावली. “मला भूक नाहीय. मी जरा पडते. तुझं झालं की सांग,तुला वाढते.”

बेडरूममध्ये आल्यावर सायलीला रडू अनावर झालं. पलंगावर आडवी झाली तर तिचा डोळा लागला. गाढ झोपलेल्या सायलीला दचकून जाग आली. तिने घड्याळ बघितलं. पहाटेचे चार वाजले होते. माय गॉड, इतकी गाढ झोप लागली? तिने शेजारी बघितलं. सुदीप शांत झोपला होता. त्याचा तो देखणा चेहरा बघून ती मोहरली. आईचे शब्द आठवले,”बायकोने जसं भोजनषू माता असावं तसंच शयनेषू रंभा देखील असावं. तो पण सुखी संसाराचा पाया आहे.” सायली उठली,तिने हळूच सुदीपच्या कपाळावर ओठ टेकले. तिने तिचं बोट हळुवार सुदीपच्या नाकावरून फिरवत ओठांवर आणलं. त्याच्या ओठांवर बोट फिरवत असताना अचानक सुदीप जागा झाला. सायलीचं हे रूप बघून तो उत्तेजित झाला. त्याचं भान हरपलं. त्याने सायलीला घट्ट जवळ ओढलं. सायली बेधुंद होऊन सुदीपच्या मिठीत शिरली. पहाटेची ती प्रसन्न वेळ आणि दोन प्रेमिकांचे उत्कट मीलन! तृप्त होऊन दोघेही निद्राधीन झाले.

सकाळी सात वाजता सायलीला जाग आली. काल रडता रडता झोप लागली आणि ती अलार्म लावायचा विसरली. सुदीपच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव बघून सायलीने त्याच्या केसातून हात फिरवला. सुदीपने चुळबुळ करत डोळे उघडले. सायली दिसताच त्याने तिला जवळ ओढलं,”सायली,आज नको जाऊ ऑफिसमध्ये! आय नीड यू टुडे!”

सायलीने सुदीपच्या गालावर थोपटत म्हणाली,”आज मला जायलाच हवं. दोन तीन महत्वाचे कॉल्स येणार आहेत.”

“ओह! कमॉन सायली,तुझं हे रोजचंच आहे.”

“मी हाफ डे करून येते. प्रॉमिस! पण तुला जायचं नाही का आज?”

“डोकं जड झालंय कालच्या ड्रिंक्सने! आणि त्यात तुझी नशा! मला त्याच नशेत आज रहायचं आहे. तू हाफ डे घे, संध्याकाळी बाहेरच जेवू,मग सिनेमा आणि रात्री…!” सुदीप हसत म्हणाला.

सायली लाजतच कॉटवरून उठली. पटपट आवरून ऑफिसमध्ये गेली. आज कामं करताना सायलीला सतत पहाटेची धुंदी आठवत होती आणि नकळत ती मनात हसत होती.
हाफ डे करून सायली निघणार इतक्यात उदयचा फोन आला, “हाय सायली! कशी आहेस?”

“मी मजेत पण तुला कशी आठवण झाली आज? किती दिवसात घरी पण आला नाहीस. सुदीप कालपासून रजा एन्जॉय करतोय. तू मध्ये महिनाभर यू एसला होतास ना?

“हो,आठवडा झाला मला येऊन! सायली आय हॅव टु टेल यू समथींग! सुदीपला कंपनीतून टर्मिनेट केलंय!”

“काय बोलतोय तू उदय? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? इतक्या हुशार माणसाला कोणी टर्मिनेट करेल का?”

“सायली,नोकरीत फक्त हुशार असून चालत नाही. बाकीच्या क्वालिटीज पण लागतात. सुदीपचं कम्युनिकेशन स्कील कमी पडतं. नोकरीत बॉससमोर कधी कधी नमतं घ्यावं लागतं.”

“म्हणून दोन दिवस झाले तो घरी आहे का? ओह गॉड!”

“सायली,तुला दुखवायचा उद्देश नव्हता माझा! मला माहिती होतं, सुदीपला इतक्यात तुला सांगायची हिम्मत झाली नसती. पण तुम्ही दोघांनी लवकरात लवकर पुढची पावलं उचलावी म्हणून मी तुला कळवलं. टेक केअर! आय एम देअर फॉर बोथ ऑफ यू! बाय!”

सायलीचा हताश होऊन खुर्चीत बसली. सुदीप डोळ्यांसमोर आला. त्याची चिडचिड आठवली. तिला घरी जावंसंच वाटेना! बराच वेळ सायली तशीच खुर्चीवर बसून राहिली. घरी गेल्यावर मला काहीच माहिती नाही हे नाटक तरी कसं करायचं? अर्धा तास ती डोळे मिटून तशीच बसली पण घरी जाणं भागच होतं.

सायली घराचं लॅच उघडून आत आली तर सुदीपने लंचसाठी बाहेरून मागवलं होतं. त्याच्या प्रत्येक हालचालीतून त्याचा उत्साह दिसत होता. आत्ता विषय काढायला नकोच. सायलीला नाटक करणं भागच होतं. पण सुदीपची नोकरी गेलीय आणि हा आज इतका नॉर्मल कसा? मी बायको असून माझ्याशी काहीही शेअर केलं नाही. डोक्यात विचारांचा कल्लोळ बाजूला करून सायली सुदीपजवळ गेली.
“हाय डिअर! आलीस तू? फ्रेश हो! आज मी लंच मागवलं आहे. संध्याकाळी पाचचा सिनेमाचा शो आहे. येताना पण बाहेरूनच खाऊन येऊ. ये पटकन फ्रेश होऊन!”

मनावर ताबा ठेवत सायली सुदीपला प्रतिसाद देत होती. पण रात्री कॉटवर पडल्यावर तिला अस्वस्थ व्हायला झालं. सुदीप जसा जवळ आला तसं तिला सगळं नकोसं झालं. पण निग्रह करत ती बायकोचं कर्तव्य निभावत होती.
“सायली,व्हाट्स राँग विथ यू? इतकी उदासीन का आहेस आज? काल स्वतः पुढाकार घेणारी सायली हीच का?”

“तसं नाही रे,बहुतेक सिनेमा बघून डोकं ठणकतंय! मी झोपते.”
सुदीप काय बोलेल ह्याची वाट न बघता सायली पांघरूण घेऊन झोपली.

दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी चहा घेताना सायलीने विषय काढला. “सुदीप,काल उदयचा फोन आला होता.”

“ओह! कळलं तर तुला! म्हणून तुझा मूड नव्हता.”

“तू का नाही मला सांगितलं?”

“सांगणारच होतो. आणि इतकं काही आभाळ कोसळलं नाहीय. मिळेल दुसरा जॉब!” सुदीप बेफिकीरपणे बोलला.

“नक्कीच मिळेल. तुझ्यासारख्या ब्रीलियंट व्यक्तीला कोणीही ऑफर देईल.” सायली त्याला कौतुकाने म्हणाली.

“आर यू टीझिंग मी? ब्रिलीयंट असून मला टर्मिनेट केलंय.”सुदीप आता चिडला.

“सुदीप,शांत हो! मिळेल जॉब! थोडा वेळ देऊ! उदय पण मदत करतो म्हणाला.”

“स्टॉप इट! मला कोणाचीही मदत नको. आणि त्या उदयची तर अजिबात नको.” सुदीप रागात तिथून उठून गेला.

त्या दिवसापासून सुदीप आणि सायलीत एक विचित्र तणाव सुरू झाला. कामापुरतं बोलणं,इतकाच संवाद राहिला होता. सुदीपचे प्रयत्न सुरू होते पण यश मिळत नव्हतं. सायलीला शारीरिक आणि मानसिक तणाव यायला लागला. ऑफिसमध्ये देखील कामाचं लोड जास्तच वाढलं होतं.

एक दिवस रात्री उशीरापर्यंत काम करताना सायलीला चक्कर आली आणि उलटी झाली. प्रचंड थकवा आला. प्रज्ञा देखील तिच्याबरोबर कामासाठी थांबलीच होती.
“सायली,बरं वाटत नाहीय का? मी सरांना सांगते. तू घरी जाऊ शकशील ना? नाहीतर मी सोडते कॅबमधून!”

प्रज्ञाने समीर सरांना सांगितलं आणि ते स्वतः सायलीशी बोलायला आले,”सायली, आय विल ड्रॉप यू! डोन्ट वरी! उद्या डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित चेकअप करून मगच कामावर ये.”

“सर थँक्स! पण मी जाईन एकटी!”

“नो! धिस इज माय ऑर्डर!”

समीर सरांनी सायलीला घरापर्यंत सोडलं. नको ती गोष्ट घडलीच! सुदीपने सायलीला खिडकीतून समीरच्या गाडीतून उतरताना बघितले. त्याचा संताप अनावर झाला. रिकामं डोकं,नोकरी नाही! चिडलेल्या सुदीपने सायली घरात आल्यावर तिच्यावर नको ते आरोप केले.

“सुदीप! काय बोलतो आहेस? भान आहे का तुला? मला चक्कर आली म्हणून सर म्हणाले की मी घरी सोडतो.”

“कुठपर्यंत गेलं आहे तुमचं प्रकरण? नवरा घरात बसलाय म्हणून तुला मोकळीक!”

“जस्ट शट अप सुदीप! इतक्या खालच्या थराला जाऊन तू बोलशील हे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. तू आत्ता रागात आहेस. उद्या बोलू.” सायली रडतच आत गेली. फ्रेश होऊन तिने ताटं वाढली. विचित्र शांततेत दोघेही जेवले.

दुसऱ्या दिवशी सायली डॉक्टरकडे गेली. डॉक्टर सीमा हसत म्हणाल्या,”सायली,आय थिंक यू आर प्रेग्नंट! पाच मिनिटात कन्फर्म होईल. एक टेस्ट करून घे.”

सायलीने टेस्ट केली आणि डॉक्टर म्हणाल्या,”मनःपूर्वक अभिनंदन सायली! तुम्ही दोघे आई-बाबा होणार आहात.”

सायलीला आनंदाने काही सुचेना. कधी एकदा घरी जाऊन सुदीपला मिठी मारून ही गोड बातमी सांगते असं तिला झालं.
“थँक्स डॉक्टर!”

“आता तब्येतीची छान काळजी घे. बाळ सुदृढ,निकोप व्हायला हवं.आहार नीट घे.”

“हो डॉक्टर! मी नक्की काळजी घेईन!”

सायलीने लगेच गीताला फोन लावला,”आई,तू आजी होणार आहेस.”

“काय सांगतेस? उद्या घरी ये! दृष्ट काढते तुझी! बाबांना सांगते. आत्ता ते घरात नाही.” गीताला भरून आलं.

घरी आल्यावर आनंदाच्या भरात दारावरच्या बेलवर ठेवलेला सायलीचा हात निघेचना!

सुदीपने दार उघडलं आणि वैतागून ओरडला,”नवरा घरातच आहे हे माहित असताना,इतकी बेल वाजवायची काय गरज?”

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सायली आनंदाने ओरडली,”सुदीप तू बाबा होणार आहेस.”

क्षणभर सुदीपच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद होता पण दुसऱ्याच क्षणी संशयाचं जाळं पसरलं. तो काहीच बोलला नाही. दीड महिना झाला तो आणि सायली एकमेकांपासून दूर होते. त्याच्या डोक्यातला सैतान जागा झाला.

“सुदीप,तुला आठवतेय ना ती पहाट? आपण दोघे एकरूप झालो होतो ती! हे गोड गिफ्ट त्या प्रसन्न पहाटेने दिलंय आपल्याला!” सायली खुश होत म्हणाली.

“हे मूल माझं नाही. ते कोणाचं आहे हे तुलाच माहिती!” सुदीप थंडपणे बोलला.

“सुदीप!” सायली किंचाळली.
“शुद्धीवर आहेस का? वाटेल ते बोलतो आहेस.”

“खरं तेच बोलतोय!”

“सुदीप, तुझा सध्या मूड नाही म्हणून तू असं बोलतो आहेस. आपण उद्या सकाळी बोलू रे ह्यावर शांतपणे!”
सायली सुदीपला बिलगत म्हणाली.

तिला दूर करत सुदीप म्हणाला,”हे मूल माझं नाही. आणि ह्यावर मी ठाम आहे. इथे राहायचं की नाही हा निर्णय तुझा तू घेऊ शकतेस.” सुदीप आतल्या खोलीत निघून गेला.

थरथर कापत सायली सोफ्यावर कोसळली. दुसऱ्या दिवशी तिने बॅग भरली आणि माहेरी आली.

अशा अवस्थेत सायलीचा भकास चेहरा,हातात बॅग बघून गीता घाबरली.

“मी सगळं सोडून आलेय आई! सुदीपने माझ्यावर संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो म्हणाला.” सायलीला हुंदके अनावर झाले.

“सायली,सध्या सुदीपला जॉब नाही म्हणून नैराश्यात हे सगळं बोलला असेल. उद्या आपण तिघेही प्रत्यक्ष जाऊन परत त्याच्याशी बोलू.” गीता सायलीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

“नाही आई! माझा निर्णय झाला आहे. मी परत सुदीपकडे जाणार नाही. त्यानेच मला घर सोडायला सांगितलं. माझ्या बाळाला जन्म द्यायला, वाढवायला मी समर्थ आहे.”

“सायली,हे भावनेच्या भरात बोलणं झालं. इतकं सोपं नाहीय ते!”

“सोपं करेल माझी मुलगी! तिला शिकवलं कशासाठी? स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची अस्मिता जपून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ यायलाच ना? तिचा निर्णय तिला घेऊ दे. आपण दोघांनी तिला योग्य ती साथ द्यायची.” अजय सायलीला जवळ घेत म्हणाला.
बाबांच्या कुशीत सायलीने अश्रूंना वाट मोकळी केली.

महिनाभर सुदीप घ्यायला येईल ह्या वेड्या आशेत सायली होती. पण एक दिवस त्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि सायलीचे अश्रूच संपले. खंबीर होत तिने लढा द्यायचं ठरवलं.

घटस्फोट मिळाल्यावर महिन्यानेच सायलीने सुदृढ मुलाला जन्म दिला. तिच्या आवडीचं नाव तिने ठेवलं…’नील’! नीलचं संगोपन,त्याची योग्य काळजी,नोकरी सगळं सायली व्यवस्थित करत होती. आई-बाबांची भक्कम साथ होती. नीलची कस्टडी अर्थातच सायलीला मिळाली कारण सुदीपला तो नकोच होता. कालांतराने तिने नीलला माहेरचं नाव दिलं. नील देशपांडे!

सायलीचं सामंजस्य,हुशारी सगळं नीलमध्ये आलं होतं. तिने नीलला डॉक्टर केलं. हार्ट स्पेशालिस्ट! आई-बाबा थकले होते पण त्यांचं पाठबळ होतंच. नील सायलीला फुलासारखं जपत होता. तो जसा जाणता झाला तसा आपल्या आईने केलेला संघर्ष त्याने बघितला. सुदीपला त्यानंतर कधीही भेटण्याचा सायलीने प्रयत्न केला नाही. सायलीचा निर्णय चुकला नव्हता. नील वर्षाचा झाल्यावर सायलीला लग्नाचे अनेक प्रस्ताव आले पण तिचं मन तयार होत नव्हतं. नीलची आई म्हणूनच तिला पुढचं आयुष्य व्यतीत करायचं होतं.

——————————-

डॉ नील रूम नंबर सहा मध्ये राऊंडला आले. त्यांनी केस पेपरवर पेशंटचं नाव बघितलं.
सुदीप सरदेसाई! चेहरा तोच वाटत होता. सायलीने नीलला फोटो दाखवले होते. त्याच्यापासून काहीही लपवलं नव्हतं. हे आपले वडील हे नीलने ओळखलं.
त्याने पेशंटची नाडी हातात घेतली.
“हाऊ आर यू फीलिंग नाऊ?”

“डॉ,हार्ट बिट्स फार वाढलेत.”

“बी पी वाढलंय जरा! औषध वेळेवर घ्या! टेक रेस्ट! उद्या टेस्ट करू सगळ्या! ओके? टेक केअर.” पहिल्यांदाच आपल्या वडिलांना बघणाऱ्या नीलने त्यांना थोपटले.

घरी आल्यावर जेवताना नीलने विषय काढला,” ममा, काही बोलायचं होतं तुझ्याशी!”
“बोल की मग! परमिशन कसली हवी रे?” सायली हसत म्हणाली.
“ममा,सुदीप सरदेसाई माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. हार्ट प्रॉब्लेम! आय डोन्ट नो,ते मला ओळखतात का! तसं त्यांनी काही दर्शवलं नाही.”

क्षणभर सायलीच्या हृदयाचा ठोका चुकला पण ती लगेच सावरली.
“डू युअर बेस्ट! डॉक्टर म्हणून तू कुठेही कमी पडता कामा नये. आता त्यांच्याशी तुझं नातं माणुसकीचं आहे. डॉक्टर हा पेशंटसाठी देवासारखा असतो. तुझं कर्तव्य तू पूर्ण कर.” सायली नीलच्या डोक्यावर थोपटत म्हणाली.

रात्री बेडरूमच्या खिडकीत सायली उभी होती. आयुष्यातले निर्णय चूक की बरोबर हे सायलीला कळत नव्हतं. त्या त्या क्षणी ती निर्णय घेत आली पण नीलच्या रूपाने देवाने एक सुंदर दान पदरात घातलं होतं. सायली समाधानी आणि तृप्त होती.

—-समाप्त—

सौ मधुर कुलकर्णी, पुणे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}