सौ. निशिगंधा उपासनी – निंबाळकर व माझे वडील श्री. संजय उपासनी सहभाग “साहित्य वारसा” ही स्वरचित कविता

सौ. निशिगंधा उपासनी – निंबाळकर व माझे वडील श्री. संजय उपासनी सहभाग “साहित्य वारसा” ही स्वरचित कविता
अभिमानाची बाब अशी की या खास मैफिलीत कविता सादर करण्यासाठी निवडली गेलेली आमची एकमेव जोडी होती.


: दिनांक २० जून २०२६ रोजी फादर्स डे निमित्त पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे “धरोहर, वारसा सुरांचा” ही डॉ. सलील कुलकर्णी व त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी यांची खास मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत नेहमीच नवोदित कवी – कवयित्रींसाठी एक छोटासा वेळ राखीव असतो त्यात निवडलेल्या कवी/ कवयित्री यांना आपली कविता त्या मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळते.
अर्थात सर्व कविता पारखून स्वतः डॉ. सलील कुलकर्णी त्यांची निवड करतात. वर नमूद केल्याप्रमाणे फादर्स डे निमित्त खास मैफिल असल्याने गाणे किंवा कविता सादर करण्यासाठी वडील – मुलगा किंवा वडील – मुलगी अशा जोड्यांना आवाहन करण्यात आले होते.
यात मी सौ. निशिगंधा उपासनी – निंबाळकर व माझे वडील श्री. संजय उपासनी आम्ही आमचा सहभाग नोंदवला.
आधी आम्ही आमची “साहित्य वारसा” ही स्वरचित कविता पाठवली. त्यानंतर आम्हाला कळवण्यात आले की आमची कविता निवडली गेली आहे आणि आम्हाला आमंत्रित केले गेले कविता सादर करण्यासाठी. संपूर्ण पुण्यातून ३ अशा जोड्या निवडण्यात आल्या होत्या ज्यात आमची निवड झाली. अभिमानाची बाब अशी की या खास मैफिलीत कविता सादर करण्यासाठी निवडली गेलेली आमची एकमेव जोडी होती. यात कार्यक्रमाआधी बरेच दिवस डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी संवाद झाला. कार्यक्रमावेळी थोडे आधी बोलावून आमची एक रंगीत तालीम झाली आणि मग मुख्य कार्यक्रमात मोठ्या दिमाखात संवादात्मक पद्धतीने आम्ही कविता सादर केली. ही गोष्ट म्हणजे आमच्या साहित्याचा आणि आमच्या साहित्य वारस्याचा गौरवच आहे.
त्यानंतर आम्ही सलील कुलकर्णी व शुभंकर कुलकर्णी यांच्यासोबत छायाचित्रे घेऊन एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप घेतला. मागील पुण्याईचे फळ असेल किंवा अजून काही पण इतक्या मोठ्या व्यक्तीला खूप जवळून अनुभवण्याची आणि त्यांच्यासोबत व्यासपीठावर सहभागी होण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच. ही आनंदाची बातमी आहे आणि ब्राम्हण युनिटी बद्दल थोडी आत्मियता आहे म्हणून प्रकाशित करण्यासाठी देत आहे.
सोबतच आमची सादर केलेली कविता सुद्धा देत आहे, वाचून आनंद घ्यावा व अभिप्राय नोंदवावा.
शीर्षक : साहित्य वारसा
मुलगी –
बाबा, शब्दांचे हे देणे,
आले कुठून सांगा ना?,
ओठांवरी काव्य माझ्या,
कुणी ठेवले सांगा ना?
वडील –
मुली शब्दांचा वारसा
तीन पिढ्यांचा लाभला.
अक्षरांचा दिवा असे,
पूर्वजांनी लावलेला.
मुलगी –
आजोबांची जुनी वही,
त्यात शब्द दडलेले.
जीर्ण झाल्या पानांमध्ये,
काव्य होते गुंफलेले.
वडील –
आजोबांचे शब्द जणू,
पर्णावरी दवबिंदू.
एक एक शब्द भासे,
प्रवाहाचा मध्य बिंदू.
मुलगी –
आजी आजोबांची नात,
अशी गेली बहरून
आई बाबांची लाडकी,
ठेवी वारसा जपून.
वडील –
जप संस्काराचा ठेवा.
फुलो तुझा शब्द झरा.
सुख लाभो सकलांना,
तोची काव्य मंत्र खरा.
…लख्ख पडला प्रकाश,
आजोबांच्या पुण्याईने.
नवा इतिहास लिहू,
लेखणीच्या ताकदीने.
माझ्या आजोबांनी १५१ कवींच्या १५१ कविता असा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला होता त्यातील त्यांच्या ओळी –
हे रसिका, तुजला काव्याचा जर छंद,
किती गूढ जीवनी मिळवियला आनंद.
रवी बघू शकेना, बघे कवी ते जलद,
मी “पवन” विश्वरंगात लूटे स्वानंद.
©️ संजय उपासनी व निशिगंधा उपासनी – निंबाळकर.


