मंथन (विचार)मनोरंजन

डोळस अनोळखी विषयावर सुंदर वाचनीय लेख. लेखक : सुनील गोबुरे

डोळस
अनोळखी विषयावर सुंदर वाचनीय लेख.

लेखक : सुनील गोबुरे

तो अंध तरुण रोज काॅर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.

मी ज्या वारजेमाळ वाडी बसमधे चढतो, तोही त्याच बसमधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात, ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी.’ गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टाॅप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाऊन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते.

त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॅपला एका सीटवर बसतो. ब-याच दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..
‘तुम्ही रोज बसला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?’
अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो.
‘सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो..’
‘ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?’ मी विचारतो.
तो हसतो..मग उत्तरतो, ’नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती मुले ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कॉम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील. ’

माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. ‘अरे वा! म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?’

पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो,
‘नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टसवर काम करतो.’

मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो ‘म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?’

पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत तो म्हणातो, ‘आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..
तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल.’

आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर आलेली असते.
‘माय गाॅड.. पण एथिकल हॅकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?’
‘आमच्याकडे आहेत..’ तो पटकन म्हणतो, ‘आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहते..ते काम देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्सना कसा प्रतिबंध करता येईल यासाठी नॅशनल इन्फाॅर्मेटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो, कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..’ तो हसत म्हणतो.

तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय. टी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,
‘फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?’

‘नाही सर..!’ तो उत्तरतो, ‘आम्ही ब्रेल काॅम्प्युटींग व एथिकल हॅकींगसाठी काही ‘अल्गोरिधम’वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोहचवता येईल. आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड ऑफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.’

तो हसतो व म्हणतो, ‘बाय द वे तुमचा स्टाॅप आलाय..’

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॅप आलेला असतो.
‘अरेच्चा..!’ मी विचारतो.. ‘तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॅप आलाय?’

‘सर तुम्ही तिकीट घेतले तेंव्हा मी तुमचा स्टाॅप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!’
तो मला हसत म्हणतो.

मी बसमधूनन उतरतो व स्तंभित होऊन ती नाहीशी होईपर्यंत फक्त पहात राहतो.

खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.

Related Articles

One Comment

  1. या B Unity चॅनेल वरील सर्वच कथा / लेख उत्कृष्ट, वाचनीय, उत्कंठावर्धक असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}