दुर्गाशक्तीमंथन (विचार)वैद्यकीय

जानकी  ………………………@मनाली पेंडसे 

जानकी  ………………………@मनाली पेंडसे 

 

“जानकी” एका सधन कुटुंबात वाढलेली मुलगी, दिसायला गोरी, नाकीडोळी सुरेख, आणि अंगाने बारीक, शिक्षण बी.ए पर्यंत झालेलं. घरची परिस्थिती हलाखीची नव्हती पण, बेताची होती. नोकरी करून स्वतःच्या पायावर ती उभी होती.
वडील शिक्षक असून टायपिंगचे क्लासेस घेत आणि आई गृहिणी होती. जानकीला पाच बहिणी आणि एक भाऊ होता.
मोठ्या दोन बहिणींची लग्न झाली होती, बाकी भावंडं शिकत होती.. घरात खाणारी तोंडं जास्त त्यामुळे जानकी नोकरी करून वडिलांना घरखर्चात मदत करायची.

पूर्वी लग्न लवकर व्हायची. त्यामुळे आई वडील तिच्यासाठी स्थळ बघत होते. एक दिवस जानकीला उत्तम स्थळ चालून आलं, “दत्ता” चांगला शिकलेला, एम.एस. सी झालेला होता, चांगल्या औषधाच्या कंपनीत नोकरीला होता. त्याला एक भाऊ व एक बहीण होती. दोघांचीही लग्नं झालेली होती.
वडील सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि आई गृहिणी होती. जानकी व दत्ताने एकमेकांना पसंती दर्शवल्यानंतर
पुढे रीतसर पद्धतीने बोलणी झाली. आणि लग्नाची तारीख ठरली. जानकीच्या घरची परिस्थिती बेताची असली तरी तिच्या आई वडिलांनी व्यवस्थित पणे लग्न लावून दिले. लग्न चांगल्या रीतीने पार पडले.
त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. लग्नानंतर नोकरी करतच होती जानकी.

पुढे काही दिवसांनी तिने दत्ताला एक गोड बातमी दिली ती बातमी ऐकून दत्ताबरोबरच दोन्ही कुटुंबांना खूप आनंद झाला. बघता बघता नऊ महिने सरले. जानकीला मुलगा झाला त्यांनी त्याचे नावं ‘ अवधूत ‘ ठेवले. पुढे तीन वर्षांनी त्यांना मुलगी झाली. तिच नावं त्यांनी ‘ यशोदा ‘ ठेवलं, त्याचसुमारास दत्ताला एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. जानकी मुलाचं संगोपन करण्यात व्यस्त झाली.
मुलांच्या शाळा, त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यात घरी येणारे पाहुणे, त्यांची ऊठबस करण्यात पार थकून जायची. पण कधी तक्रारीचा सूर नसायचा. ती हे सगळं मनापासून करायची आणि आपुलकीने करायची. मुलांना वाढवण्यासाठी तिने चांगली नोकरी सोडली. ती घरी आलेल्या प्रत्येकाचं हसत मुखाने स्वागत, आदरातिथ्य करायची. बाहेरच्या जबाबदाऱ्या पेलण्यास ती सक्षम होती.
अवधूतचं आपल्या लहान बहिणीवर जिवापाड प्रेम होतं तो तिला नेहेमी जपत असे. तिची काळजी घेत असे. दोन्ही मुलांवर जानकीने खूप चांगले संस्कार केले होते. त्या चौघांचं छान चौकोनी कुटुंब होतं. आजूबाजूची लोकं, नातेवाईक, नेहमी या कुटुंबाचं उदाहरण द्यायचे आणि यांना आदर्श मानायचे. जानकी , नातेवाई, मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्यांना प्रिय होती .

काळ कोणासाठी थांबत नसतो पुढे सरकतच असतो. अवधूत शिक्षण संपवून नोकरीला लागला. त्याच्या पाठोपाठ यशोदा कॉलेज संपवून तीही नोकरीला लागली. तशी जानकीवरची जबाबदारी कमी होऊ लागली. दत्ताही नोकरीमधून निवृत्त होण्याच्या मार्गावर होता. पण अजून एक मोठी जबाबदारी पार पडायची होती ती म्हणजे दोन्ही मुलांची लग्नं.
चला तोही योग लवकर आला आधी यशोदेचं लग्नं आणि पुढे वर्षभरात अवधूतचं लग्नं झालं. आता मात्र सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते दत्ता व जानकी. दत्ताही नोकरीतून निवृत्त झाला. मुलंही आपल्या आपल्या संसारात सुखी होती.
दोघेही जण आता आजी आजोबा झाले होते. दोन्ही मुलांच्या मुलांबरोबर त्यांचा वेळ छान जाऊ लागला. दोन्ही नाती म्हणजे त्यांच्यासाठी ‘ दुधावरची साय ‘ होत्या. सगळं कसं आलबेल चालू होतं.

पण अचानक एक दिवस जानकीची तब्येत ढासळली. औषधांनी सुद्धा काही फरक पडत नव्हता सगळ्यांना जरा काळजी वाटू लागली. डॉक्टरांनी तिला काही वैद्यकीय चाचण्या करून घ्यायला सांगितल्या. ते रिपोर्ट बघून सगळ्यांना धक्काच बसला. पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. कॅन्सरचं निदान झालं होतं. जानकीचे तर रडून रडून डोळे सुजले होते. तिला अन्न पण गोड लागेना. काय करायचं काहींच सुचतचं नव्हतं.
आजवर जानकीने सगळ्यांसाठी सगळ केलं पण तिच्या नशिबात असं का ? याचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं.
आपल्या आईला कॅन्सर झालाय हा धक्का तिची मुलं आणि दत्ता पचवू शकले नाहीत.
पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायची असं ठरलं.

हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या. एकच प्रश्न सतवायचा जानकीला की माझ्याच नशिबात असं का ?? म्हणतात ना, की नशिबापुढे कोणाचं काही चालत नसतं हेच खरं.
तिला मुलं आणि दत्ता धीर देत असले तरी वेदना या तिच्या तिलाच सहन कराव्या लागणार होत्या. यशोदा म्हणायची, आई ! सगळं ठीक होईल. तुझा देवावर विश्वास आहे. तू इतकं देवाचं करतेस मग तुला यातून तोच बाहेर काढेल. तो आपली परीक्षा बघतो आहे. आपल्या पदरी सुखाचे दिवस पुन्हा येतील नको काळजी करू.
किमो आणि रेडिएशन यात दोन वर्ष गेली त्यानंतर बरी झाली जानकी सगळं काही सुरळीत चालू झालं .

काळाच्या मनात काय होतं हे माहित नव्हतं. पुन्हा कॅन्सरने ग्रासले जानकीला. परत हॉस्पिटलच्या वाऱ्या,
कीमोची चक्रं सुरू झाली. या सगळ्याचा परिणाम तिच्या शरीरावर आणि मनावर दिसायला लागला. आता मात्र ती खचली होती. पण ती स्वतःला सावरत होती. पहिल्या काही किमो तिने न बोलत, न तक्रार करता घेतल्या. पण पुढच्या कीमो साठी ती तयार नव्हती.
जानकी आजारी आहे हे कळल्यावर, तिची बालवाडीपासूनची
मैत्रीण शीला तिला भेटायला घरी आली. शीलाला बघितल्यावर जानकी तिच्या गळ्यात पडली.
शीला आणि जानकी शाळेपासूनच्या जिवलग मैत्रिणी होत्या.
आतापर्यंत जानकीने तिच्यावर झालेले उपचार, औषध, किमो, लाईट यांच्याबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून शीलाने तिला धीर देत म्हटलं, “जानकी ठीक आहे तू किमो घे, औषधं आहेत ती चालू ठेव पण तुझी हरकत नसेल तर एक उपाय आहे तो करून बघतेस का? माझ्या ओळखीच्या एक ‘हिलर’ आहेत. त्या मेडिटेशन कसं करायचं, ते तुला सांगतील. पण रोज न चुकता करायचं. आतापर्यंत त्यांनी खूप पेशंट बरे केले आहेत. आणि तू देवाची भक्ती करतेस, विश्वास ठेव लवकर बरी होशील. हे शीलाचे धीराचे शब्द ऐकल्यावर जानकीला एक प्रकारची एनर्जी आल्यासारखं वाटलं.

त्या ‘ हिलर ‘ ताईंची शीलाने भेट घडवून आणली. जानकीला त्या ताईंनी बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या .
जानकीला जरा हुरूप आल्यासारखं वाटलं.
जानकी म्हणाली, “चला ! हे ही करून बघते” असं म्हणून तिने घरी सगळ्यांना सांगितले की मी आता मेडिटेशन करणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये घरच्यांचा तिला पूर्ण पाठिंबा होता.
‘ मेडिटेशन ‘ जानकी दिवसातून वेळ मिळेल तशी अगदी मन लावून करत असे. त्याच बरोबर तिची नेहमीची औषधं, किमो या सर्वांचा परिणाम दिवसेंदिवस तिला जाणवू लागला होता. जरा फ्रेश वाटायला लागलं होतं. जानकीच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागलं आणि सहा महिन्यात तिच्यात चांगलाच फरक दिसू लागला.म्हणतात ना, ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती”. तसं, काहीसं जानकीच्या बाबतीत घडलं होतं.

जानकी दत्ताबरोबर रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला गेली असता, डॉक्टरांनी तिला चेक केल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, “जानकी तुझे रिपोर्ट्स तर नॉर्मल आलेत.” ती म्हणाली डॉक्टर ! तुम्ही दिलेली औषधं, घरच्यांचं प्रेम, काळजी, माझी स्वतःची विलपॉवर आणि मेडिटेशन आणि देवावर असलेली श्रद्धा यामुळे असेल कदाचित .
डॉक्टर तिचं कौतुक करतात आणि सांगतात की आता तुझा आहार, व्यायाम, असंच नियमित चालू ठेव.   जानकी आता तुला आता हॉस्पिटलची पायरी चढायची गरज नाहीये. फक्त रूटीन चेकअपला यायचं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
लगेच जानकीने शीलाला फोन करून ती बरी झाल्याचे सांगितले. शीलालाही खूप आनंद झाला.

माणसाची इच्छा शक्ती प्रबळ असेल तर तो असाध्य अशा रोगातून बाहेर येऊन बरा होऊ शकतो.

@मनाली पेंडसे
21/03/2025


मनाली पेंडसे यांची कथा कथा दर्पण या कथा संग्रहात प्रसिद्ध झाली आहे आणि त्यांना त्या कथेसाठी सन्मानपत्र देण्यात आले आहे

       

युनिटी एक्स्प्रेशन तर्फे त्यांचे मनापासून अभिनंदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}