मनात आलं तर करून टाकावं..- ©®संध्या बेडेकर, वारजे, पुणे, 7507340231.
🚩अधिक जेष्ठ आमावस्या/ निज ज्येष्ठ शके 1948🚩
शुभ सकाळ. राष्ट्र सर्वोपरी. जय हिंद।
‘अब पछतायें क्या होत जब चिडिया चुग गई खेत.’ अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. पण, ‘कळतं पण वळत नाही’ ही मराठी म्हणच आपल्याकडे जास्त वापरली जाते. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती न करण्याचे हजार बहाने आपोआप उभे रहातात व हजारांपुढे एकाचा निभाव लागत नाही आणि योजलेले फसलेल्यात रुपांतरीत होते. पण जेव्हा त्याचे परिणाम सामोरे येतात तेव्हा ती हिंदीची म्हण आठवते. त्यामुळे नंतर पस्तावण्यापेक्षा प्रस्तावणा वाचून तरी आजच्या कथेचे मर्म समजावे.
‘खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटतं. गोष्ट काही खूप मोठी असते असं नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातं. आणि मग आता तर ‘ती गोष्ट जूनी झाली’ या विचाराने राहून जातं. याचा सरळ साधा उपाय म्हणजे ‘मनात आलं की लगेच करून टाकावं’ हाच आहे.’ -आजच्या लघुकथेतून.
‘विचार केल्यावर सुचतं, आणि शोधल्यावर मिळतं हेच बरोबर आहे.’ – हे ही आजच्या लघुकथेतून.
-मेघःशाम सोनवणे 9325927222.
–🌼–
मनात आलं तर करून टाकावं..-
लेखिका – संध्या बेडेकर.
आमची नागपुर ची ट्रीप ठरली. माझ्या दिरांकडे सोळा सोमवार च्या उद्यापनाचा मोठा कार्यक्रम होता. एवढं कठीण व्रत मी तर काही करू शकत नाही. कमीत कमी अशा कार्यक्रमाला उपस्थित रहावं, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्या जावेचं कौतुक, अभिनंदन करावं म्हणून आम्ही जायचं ठरवलं.
खरंतर आमचे सर्व नातेवाईक या कार्यक्रमात भेटणार होतेच. तरी मनात आलं, आपल्यापेक्षा जेष्ठ मंडळीला यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटावं. जून्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचे आयुष्यातील किस्से ऐकावे. आपल्याच घराण्याबद्दल अनेक गोष्टी कळतील. मुख्य म्हणजे थोडा आनंद घ्यावा आणि द्यावाही. अनुभवाच्या शाळेत थोडं शिकून यावं.
आता आम्हीच जेष्ठ नागरिक वर्गात आलो आहोत, त्यामुळे काही बंधनं वाढत्या वयामुळे तर काही सध्याच्या इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून मनात घर करून बसली आहेत. थोडी हिम्मत ही कमी झाली आहे. आणि नागपूरचे आमचे जेष्ठ तर ‘अति जेष्ठ’ वर्गातलेच आहेत. काही तर नव्वदी पार, शतकाच्या जवळपास.
यावेळेस भेटून यावं, असं आमचं बोलणं झालं.
सहजच मी माझी मैत्रीण रमाला आमचा नागपुर कार्यक्रम सांगितला.
रमा म्हणाली, “अरे व्वा ! छान. मनात आलय नं तर नक्की जाऊन या. अगं! नंतर पश्चाताप व्हायला नको.”
आज आमचे हे आरक्षण करायचं म्हणून सकाळी आठ वाजताच लॅपटाॅप घेऊन बसले. मला म्हणाले, “करू ना नक्की reservation ? काढू ना तिकिट ? नाहीतर कँसल करण्यात उगीचच पैसे वाया जातात.
सहज माझ्या मनात आलं, हा एप्रिल महिना, नागपुर ची गर्मी. आज तर गर्मीचा कहरच होता. आपण ठरवतो तर आहे, पण झेपणार आहे का आपल्याला ? तिथे जाऊन आजारी पडलो तर. तशी पुण्याची गर्मी पण काही कमी नाही, पण इथे आपण घरातच असतो ना. सध्याकाळी वातावरण छान थंड होतं येथे. जमेल का आपल्याला ?
मी म्हंटलं, “अहो ! थांबा जरा. आज राहू द्या. उद्या बघू.”
यांची चिडचिड, बडबड मला ऐकू येत होती. पण काय करू ? एक मन म्हणत होतं ‘हो’ तर लगेच दुसरं मन अनेक कारणं सांगून नागपूरला या सीझन मध्ये जाणं कसं चूक आहे, हे पटवून देत होतं. दोघांच्या वादविवादात माझा गोंधळ उडाला होता. मला निर्णय घेणं जमत नव्हतं.
संध्याकाळी रमाकडे चैत्र गौरीचे हळदीकुंकू म्हणून तिच्या घरी गेले, तर तिने सहज विचारले, “काय गं ! झाले का reservation?”
मी म्हंटलं, “नाही गं. अगं!नागपूरची गर्मी बघून हिम्मत होत नाहिये.”
हळदी कुंकवाला आलेल्या बायकांनी तर हा विषय उचलूनच धरला. पुन्हा तसेच ‘हो’ आणि ‘नाही’ चे दोन पक्ष तयार झाले.
रमा म्हणाली, “अगं! लोक राहतात ना तिथे. अगं! AC taxi ही मिळते. तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, तिथे रात्री राहणं शक्य असल्यास रहा तिथे.”
रमा आमच्याच बिल्डिंग मध्ये येवढ्यातच रहायला आलेली. Morning walk ला भेट होत गेली आणि आम्ही मैत्रीणी झालो.
रमा म्हणाली, “अगं ! मी माझा अनुभव सांगते. मी नागपूरला आणि माझा भाऊ रवी वर्धा येथे, म्हणजे जवळच रहात होता. रवी मला सारखं म्हणायचा, ‘ताई ! ये ना. माझं नवीन घर, दवाखाना बघायला ये.’
खरंतर कोणत्याही शनिवार-रविवारी मी सहज जाऊ शकले असते. पण या शनीवारी हे काम, तर पूढच्या रवीवारी ते काम, असं होत गेलं, आणि माझं जाणं झालं नाही. अशाच एका शुक्रवारी फोन वाजला.
रमेश म्हणाले, ‘आला तुझ्या भावाचा फोन. अगं ! या शनिवार-रविवारी जाऊन ये. कामं काय, होतच राहतील. आता फोनवरच तसं सांग त्याला.’
मी फोन घेतला आणि बोलणारच, तेवढ्यात वहीनीने रडत रडतच रवी गेल्याची बातमी सांगितली. म्हणाली, ‘ताई तुमची खूप वाट बघत होते हो हे.’
या वाक्याने तर मी पार कोलमडूनच पडले.. मला माझीच लाज वाटू लागली. जी कारणं सांगून मी एवढ्या जवळ असून गेले नाही, त्यातील एक तरी कारण वाजवी होतं का ? खूप महत्वाचं होतं का ? ते काम नंतरही करता आलं असतं ना.
मी का नाही गेले? आजही राहून राहून हा विचार मला बधीर करतो. म्हणतात ना, Dead people receive more flowers than Living ones, because Regret is stronger than gratitude. (जिवित व्यक्तींपेक्षा दिवंगत व्यक्तींना जास्त फुलं दिली जातात, कारण कृतज्ञतेपेक्षा पश्चात्ताप अधिक प्रबळ असतो.)
आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकले नाही. कितीही काम असू दे. अगं! कितीही ऊन असू दे, मी केलेली चूक कोणीच करू नये. नंतर फक्त पश्चाताप होतो.”
रमा बरोबरच बोलत होती. खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटतं. गोष्ट काही खूप मोठी असते असं नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातं. आणि मग आता तर ‘ती गोष्ट जूनी झाली’ या विचाराने राहून जातं. याचा सरळ साधा उपाय म्हणजे ‘मनात आलं की लगेच करून टाकावं’ हाच आहे.
आज घरी आल्यावर विचारांची दिशाच बदलली. गर्मी असली तरी आपल्याला कशी आपली काळजी घेऊन नागपूर ट्रीप साध्य करता येईल या प्रश्नाची दहा उत्तरं मिळाली.
विचार केल्यावर सुचतं, आणि शोधल्यावर मिळतं हेच बरोबर आहे. फक्त रमा सारखी मैत्रीण हवी जी विचारांची दिशा बदलू शकेल..
आम्ही नागपूर ट्रीप करून आलो. विशेष असा त्रास काही झाला नाही. आनंद, समाधान मात्र खूप मिळालं. आपल्याच घराण्यातल्या अनेक गोष्टी, सणवार पद्धती, पूर्वजांच्या अनेक गोष्टी कळाल्या. मनापासून दिलेले भरपूर आशिर्वाद मिळाले.
लक्षात आलं, अडचणी मनात असतात. अति विचार करून आपण त्यात भर घालतो.
म्हणतात ना… Whether it is a machine, house or relationship, maintenance is always easier, cheaper than repairing. You need not have to regret later. (यंत्र, घर वा नातं असो, देखभाल ही कधीही दुरुस्ती पेक्षा स्वस्त असते. नंतर पस्तावण्यापेक्षा.)
©®संध्या बेडेकर,
वारजे, पुणे, 7507340231.
(आवडल्यास सामायिक करतांना लघुकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा, लेख वाचण्यासाठी माझ्या 9325927222 या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा- मेघःशाम सोनवणे.)
आजची ही लघुकथा स्वतः लेखिका सौ. संध्या बेडेकर, वारजे, पुणे यांच्या सौजन्याने.
C/P.

