★सोबत★ (३) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा ….. सोबत
★सोबत★ (३) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
विलासने व्हेज सँडविच ग्रील करायला ओटीजीत ठेवले आणि नॅपकीनला हात पुसत बाहेर आला. एक कॉल येऊन गेला होता. त्याने मोबाईल बघितला. वेदचा व्हाट्स अपवर व्हीडिओ कॉल येऊन गेला होता. त्याने कॉल बॅक केलं.
“हाय पॉप्स! सगळं ओके आहे ना? आधी फोन घेतला नाहीस!”
“एव्हरीथिंग ओके बेटा! इन फॅक्ट आज मी खुष आहे. इथे नवीन फ्लॅटच्या शेजारी मिसेस रमणी देसाई राहतात. त्या काल आपल्या घरी येऊन गेल्या. बऱ्याच गप्पा मारल्या. त्यांना पण संगीताची खूप आवड आहे. सिम्पल वूमन! बरं,रिया कशी आहे?”
“रिया एकदम मजेत! आज भारतीय सम्मेलन आहे त्यांचं,तिकडे गेली आहे. बाबा,तू स्वतःची काळजी घेतोय ना?” वेदचा आवाज कातर झाला.
“ओह,कमॉन माय सन! माझी काळजी करू नकोस! आईला मी वचन दिलंय, आनंदी राहण्याचं आणि ते पाळतोय. आता पन्नाशी नंतर शुगर,बीपी हे राहणारच. तुम्ही दोघेही निर्धास्त रहा.”
“त्या शेजारच्या काकू आल्या की मला व्हीडिओ कॉल करा कधीतरी! बघू तरी तुमची नवी मैत्रीण!”
“ओके,डन!”
धरा गेल्यापासून वेद फार काळजी करत होता. विलासचंही मन भरून आलं. कालच रमणीशी बोलताना दोघेही बोललो की हल्लीची पिढी खूप प्रॅक्टिकल झाली आहे. तसं नाहीय खरं तर! त्या मुलांना बिचाऱ्यांना करिअरचं टेन्शन,नोकरी टिकवायचं टेन्शन,आईवडिलांपासून दूर रहावं लागतं ती पोकळी..कितीतरी आव्हानं ती मुलं पेलत असतात. आपण एकदम जजमेंटल होऊन त्यांना प्रॅक्टिकल म्हणून लेबल लावतो. धराला लग्नानंतर पाच वर्षांनी प्रेग्नन्सी राहिली. शेवटचे तीन महिने पूर्ण बेडरेस्ट होती तरीही वेद प्रीमचुअर होता. सुरवातीचे दोन महिने त्याची फार काळजी घ्यावी लागली. अशक्त असल्यामुळे जरा रडका होता. पण दोघांनीही त्याला फुलासारखं जपलं. मोठा होत गेला तसं त्याला त्याच्या तब्येतीचा न्यूनगंड होता,त्यामुळे तो अबोल झाला. पण विलासने त्याला टफ केलं. जिम जॉईन करायला लावली. सोशल कम्युनिकेशनचे काही सेमिनार अटेंड करायला लावले आणि त्याच्या व्यक्तिमत्वात प्रचंड फरक पडला. सोशल व्हॅल्यूज त्याच्याकडे होत्याच पण विलास आणि धरा त्याचा विक पॉईंट होते. धराला कॅन्सर आहे हे कळल्यावर तो भयंकर खचला. पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जायची तयारी सुरू होती. धरानेच त्याला सकारात्मक नजर दिली.
“वेद, आता तुझं वय पूर्णपणे करिअरवर फोकस करायचं आहे. आणि मला काहीही होणार नाही. नातवंड बघितल्याशिवाय मी काही जात नाही.” वेद रडता रडता हसला.
अत्यंत वेदनादायी अशी किमो थेरपी धराने प्रचंड सहन केली. वर्षभरात ती नॉर्मल झाली होती. दोन वर्षे छान गेली. नियमित चाचण्या, औषधं सगळं सुरू होतं पण रोगच घातक! वेदच्या लग्नानंतर परत बाहेर आला.
विलासने नकळत भरून आलेले डोळे पुसले.
***
” सुधाताई,ही भाजी तेवढी शेजारी नेऊन देता का? मी दिलीय म्हणून सांगा.”
सुधाताईंनी पीठ पेरून मेथीची भाजी रमणीने डब्यात दिली.
“ताई,तुम्हीच द्या की! मी कुठं ओळखते त्यांना!”
“नको,माझी सगळी कामं राहिली आहेत. त्यांना बोलायला फार आवडतं. मी गेले की सगळी कामं राहून जातील.”
“बरं, नेऊन देते!”
पंधरा मिनिटांनी मेसेजचा बीप वाजला म्हणून रमणीने बघितलं.
विलासचा व्हाट्स अपवर मेसेज होता.
—-मी खूप बोअर करतो का? नाही म्हणजे भाजी बाईच्या हातून पाठवली. भाजी कशी झाली ते जेवण झाल्यावर मेसेज टाकतो.
हसण्याची ईमोजी होती.
रमणी मनात हसली. विलास भेटल्यापासून निदान हसावं असं तरी वाटायला लागलं होतं. निखळ मनाचा वाटला. एका भेटीत माणूस कसा आहे ते कळतं.
जेवण झाल्यावर रमणी जरा आडवी व्हायला कॉटवर गेली तर पायाला काहीतरी लागलं म्हणून ती वाकली. कॉटच्या खाली प्रद्युम्नचा जयपूर फूट दिसला. ते बघून रमणीला अचानक गरगरलं. ती कॉटचा आधार घेत त्यावर बसली आणि हुंदके देऊन रडू लागली. डोळ्यांसमोर प्रद्युम्नचा गॅंगरीन झालेला पाय,त्याच्या वेदना, आणि शेवटी शरीरापासून त्या अवयवाला दूर करणं! एका बॅडमिंटन चॅम्पियनचा पाय कायमचा जाणं,ह्याचं दुःख त्यादिवशी प्रद्युम्नच्या चेहऱ्यावर दिसलं. वरकरणी धीर दाखवणारा प्रद्युम्न आतून हलला होता. त्याला सावरताना रमणीने तिचे अश्रू पापणीवरच अडवले. इतकी वर्ष ज्याच्या मानेवर,छातीवर डोकं ठेवून तिला आधार मिळाला होता,त्यालाच आता तिला आधार द्यायचा होता.
त्याची आई होऊन…!
***
विलासची आणि रमणीची घरातून बाहेर पडायला एकच गाठ पडली. विलासने हसतच म्हटलं,”मी म्हणालो ना,कुठेतरी भेटूच! बॅड मॅनर्स पण विचारतोच,कुठे निघाला? म्हणजे तुम्ही रिक्षा,कॅब वगैरे करणार असाल तर आय कॅन ड्रॉप यू!”
लिफ्टमध्ये शिरताना रमणी म्हणाली,”आज बऱ्याच दिवसांनी एका मैत्रिणीकडे आम्ही ऑफिसमधल्या मैत्रिणी भेटतोय. दोघींनी व्हीआरस घेतलीय. दोघींनी सुट्टी घेतलीय.”
“तुम्ही व्हीआरस का सुट्टी?”
“व्हीआरस,घ्यावी लागली!” रमणी बोलून तर गेली पण ह्यापुढे अनेक प्रश्न येणार हे तिला माहिती होतं. का? कशासाठी? कशाला?
लिफ्टमधून बाहेर पडल्यावर विलासने तिला विचारलं,”तुमची हरकत नसेल तर मी ड्रॉप करू का?”
“पण मी कुठल्या दिशेला चाललीय हे तुम्हाला कुठे माहिती आहे? तुमची दिशा विरुद्ध असली तर?”
“वकील होता का?” विलास हसला.
“विरुद्ध दिशा असेल तर मी सरळ शक्य नाही म्हणून सांगेन. व्हेरी सिम्पल!”
“खराडी बायपासला चाललेय. कॅब करून जाईन.”
“मी ड्रॉप करू? हरकत नसेल तर?” तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत विलास म्हणाला,” मी विरुद्ध दिशेला नाही,त्याच दिशेला चाललोय. वाघोलीला एक फंक्शन आहे. हा योग म्हणा किंवा अजून काही पण बहुतेक उपरवाले का प्लॅन आहे.”
“मला पत्ता शोधावा लागणार आहे,मी पहिल्यांदा जातेय तिच्या घरी! तुम्हाला उशीर होईल.” रमणीला संकोच वाटला.
“डोन्ट वरी! ते काही लग्न नाही मुहूर्त साधायला! चला, सोडतो! एक विनंती करू?”
रमणीने त्याच्याकडे बघितलं.
“मित्र म्हणून माझा निखळ मनाने स्वीकार करा. आपण शेजारी आहोतच पण त्याआधी मैत्री व्हावी असं मला वाटतं. मैत्री झाली की संकोच दूर होतो. हक्क,अधिकाराची भावना रुजते.”
“थोडा वेळ द्या!” रमणी नजर चुकवत म्हणाली.
“ओके! टेक युअर टाईम!”
रमणी गाडीत बसली. विलासने त्याचं ब्लुटूथ ऑन केलं. लताचं गाणं सुरू झालं.
“मै तुम्ही से पुछती हूं, मुझे तुमसे तुमसे प्यार क्यूँ है….”
“धराचं आवडतं गाणं! तिला ह्या गाण्याचे शब्द फार आवडायचे आणि काय गायलीय लता! सुरवातीला रफीच्या चारच ओळी आहेत पण कमाल!”
“त्याला पण फार आवडायचं! मला म्हणायचा,मै तुम्हीसे पुछता हूं, मुझे तुमसे प्यार क्यूँ है? कभी तुम दगा न दोगे,मुझे ऐतबार क्यूँ है…! पण तोच मला दगा देऊन गेला.” रमणी शून्यात बघत म्हणाली.
“रमणी,आर यू ओके?”
विलासने विचारल्यावर ती भानावर आली.”मी काही बोलले का आत्ता?”
“छे छे,तुम्ही लताबरोबर गात होता. लता कुठली आणि तुमचा आवाज कुठला मला कळलंच नाही.” विलासला थोडी कल्पना यायला लागली.
“थट्टा पुरे वि..”
“चालेल,विलासच म्हणा! आपण साधारण एकाच वयाचे असू! फॉर्मलिटीज आता नकोच! मी फक्त रमणी म्हटलं तर चालेल ना?”
“हो चालेल!”
“गुड गर्ल!”
“गर्ल?” रमणी हसली.
एका मित्रासाठी त्याची मैत्रीण ही कायम एक गर्लच असते. वय कितीही वाढलं तरी मैत्रीची भावना कायम तरुण असते.”
गाणी ऐकत,गप्पा मारत दोघांनाही खराडी कधी आलं कळलं पण नाही. पत्ता शोधून,रमणीला त्या सोसायटीत सोडून विलास वाघोलीला निघाला.
मुग्धाने दरवाजा उघडला आणि दारातच रमणीला मिठी मारली. दोघींनी मनसोक्त रडून घेतलं. राधा,सविता, दीपा पण वाट बघतच होत्या.
“रमणी,किती बरं वाटलं तुला बघून! मुख्य घरातून बाहेर पडलीस. हे न संपणारं दुःख आहे ग! तुलाच हळूहळू ह्यातून बाहेर यावं लागेल.” दीपाने रमणीचा हात धरत तिला सोफ्यावर बसवले.
“कॅब करून आलीस का?” राधाने विचारलं.
“नाही ग! आमच्या शेजारी एक गृहस्थ आले आहेत राहायला! त्यांना वाघोलीला जायचं होतच. त्यांच्याबरोबरच आले. घरापर्यंत सोडलं.”
“शेजारच्या फ्लॅटमध्ये आले म्हणजे चांगलंच ग! तेवढीच तुला सोबत!” सविताने रमणीच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
“आज आपण चौघीही जनरल गप्पा मारणार आहोत. कोणाच्याही वैयक्तिक सुख दुःखाबद्दल नाही. रमणी,रव्याचे लाडू आणले ना?” मुग्धा प्लेट्स टेबलवर ठेवत म्हणाली.
“रमणीने बॅगमधून डबा काढला आणि म्हणाली,”प्रद्युम्न वेड्यासारखे रव्याचे लाडू खायचा. दोन दिवसात संपवायचा. गोड खाऊन खाऊन स्वतःचा घात करून घेतला. रमणीच्या डोळे भरायला लागले.
“रमणी..!” मुग्धा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
“सॉरी! नाही रडणार! ए,मला ऑफिसच्या गमती जमती सांगा ना! तो पेंडके अजूनही लाईन मारतो का ग त्या डिसूझावर?” रमणी डोळे पुसत हसली.
“डिसूझाने नोकरी सोडली.”
“बिच्चारा!”
“कसला बिचारा? दुसरं सावज शोधतोय!” राधा चिडून बोलली.
ऑफिसच्या गप्पा,गाणी, पुण्याची गर्दी ह्यावर पाच जणींच्या गप्पा रंगल्या. दुपारचा चहा घेऊन रमणीने कॅब बुक केली. मैत्रीणींचा निरोप घेताना पाय जडावले होते.
कॅबमध्ये रमणीला झोप लागली. मोबाईलची रिंग वाजली. विलासचा फोन होता,”घ्यायला येऊ का? मी निघालोय.”
“नको मी कॅबमध्ये आहे. पोहोचेन थोड्या वेळात!”
“ओके!”
का हा इतकी आत्मियता दाखवतोय? मी लोकांपासून आता लांब जायचं ठरवतेय आणि हा! कसं सांगू त्याला ते पण कळत नाहीय. त्याचं बोलणं,त्याचा केअरिंग स्वभाव सगळं ठीक आहे पण मला नको आहे आता कोणी जवळ! एकटं राहायचं आहे मला प्रद्युम्नच्या आठवणीत! कोणी कितीही म्हटलं की त्याला हळूहळू विसर,तुझं आयुष्य जग! नाही,मी प्रद्युम्नला विसरणार नाही आणि मला विसरायचं पण नाही. उद्याच त्या विलासला सांगते,माझ्याशी जास्त जवळीक करू नका. मला कोणीही नकोय. जो हवा होता तो खूप लांब गेलाय माझ्यापासून….!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे


