नर्मम् ददाति सा नर्मदा…अर्थात नित्य आनंद देणारी अशी ही नर्मदा –रूपा अक्षीकर
नर्मम् ददाति सा नर्मदा…अर्थात नित्य आनंद देणारी अशी ही नर्मदा
——— रूपा अक्षीकर
🙏🏻 ।। नर्मदे हर ।।🙏🏻
गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती। ग्रामे वा यदि वा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा।।🙏🏻
‘नर्मदा ददाति सा नर्मदा’..
——प्रस्तावना
सौ रूपा अक्षीकर ह्यांना नर्मदा परिक्रमा करताना आलेले अनुभव ‘नर्मदा ददाति सा नर्मदा’ ह्या डिजिटल पुस्तक स्वरुपात वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.💐
नर्मदामैय्याची खडतर परिक्रमा करण्याचं अनेक जणांचं स्वप्न असेल,अनेकजण इच्छा असूनही करू शकणार नाही. अशी ही पवित्र, खडतर,क्षणाक्षणाला नवीन नवीन आव्हाने देणारी,परिक्षा घेणारी परिक्रमा रूपाताईंनी निढळ श्रद्धा, आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर सगळ्या आव्हानांना तोंड देत चार महिन्यात पूर्ण केली. प्रत्यक्ष नर्मदामैय्याला आता प्रिय असलेली तिची ही भक्त सौ रूपा अक्षीकर म्हणजेच रूपामैय्या! पहिल्या परिक्रमेचा काही भाग त्यांना पायाच्या दुखण्यामुळे बसने आणि ट्रेनने करावा लागला. त्याचवेळी दुसरी परिक्रमा पूर्ण पायी
करायची हा संकल्प त्यांनी केला होता. अमरकंटक हे नर्मदामैय्याचे उगमस्थान आहे. तिथेच रूपाताईंनी संकल्प सोडला आणि हातात कमंडलू घेऊन ही पवित्र परिक्रमा सुरू केली.
‘माई की बगिया’ मधला माकडांचा मजेशीर अनुभव! दिवाळीत रुपाताईंना घरच्या फराळाची आणि मिठाईची आठवण येताच बाईकवरून दोन व्यक्ती त्यांच्या हातावर मिठाईचा बॉक्स देऊन, त्यांना थक्क करून गेले सुद्धा! आणि त्यापुढे काय घडले हे वाचताना आश्चर्यचकित व्हायला होतं. बैरागीबाबांचा सेवाभाव हा नतमस्तक करणारा असाच! मध्यप्रदेशचे बाबाजी, योगेश चव्हाण, राघव ह्यांचे रुपाताईंना मिळालेले अनमोल सहकार्य, हे माणुसकीचे दर्शन घडवते.
एका ठिकाणी रूपाताई भुकेने व्याकुळ झालेल्या असताना त्यांना नर्मदामैय्याने कशी मदत मिळाली हे वाचनीय! परिक्रमा करताना रूपाताईंचा चिखलात पाय रुतल्याचा प्रसंग अंगावर काटा आणतो. भीतीने गलितगात्र होऊन पुढच्याच क्षणी धैर्य गोळा करून एकट्याने वाटचाल करणाऱ्या रुपाताईंना नर्मदामैय्यानेच बळ दिलं असेल. अनोळखी मालतीचा पूर्ण परिक्रमा होईपर्यंत रूपाताईंना येणारा फोन म्हणजेच नर्मदामाई त्यांची आईसारखी काळजी घेत होती. नदी पार करताना वाळूत पाय फसत असताना किनाऱ्यावरचा माणूस मदतीला येणं म्हणजे
नर्मदामैय्याचंच रूप होतं. कितीतरी अनुभव! पायी नर्मदा परिक्रमा करताना अश्वत्थामा कुठल्या तरी रुपात दिसतो असं म्हणतात. रुपाताईंना काय अनुभव आला हे वाचताना कळेलच.
परिक्रमेची सांगता रूपाताईंनी अमरकंटकला संकल्पपूर्ती करून केली. रूपाताईंच्याच शब्दात सांगायचं तर नर्मदामाईची परिक्रमा करताना अहंकार, माया, लोभ,आसक्ती सगळं गळून पडतं. आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगण्याची सवय होते. भुकेवर नियंत्रण येतं. मन शांत,तृप्त,पवित्र होतं. अर्धी परिक्रमा झाल्यावर पायाच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या रूपाताईंनी सहनशीलतेने पुढील वाटचाल सुरू ठेवली.
शेवट वाचताना जणू इतका वेळ आपणही मनाने रूपाताईंबरोबर होतो असा भास होतो. इतकी अवघड परिक्रमा पायी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यास शब्द नाहीत.🙏🏻
नर्मदामैय्या तर त्यांच्या पाठीशी आहेतच आणि सर्व वाचकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!💐
।। नर्मदे हर ।।
प्रस्तावना ———- सौ मधुर कुलकर्णी, पुणे
—————————————————————————-
नर्मदा !!!
फारच सुंदर आहे नर्मदा !
त्रिभुवनातील सगळे सौंदर्य नाजूक हातांनी गोळा करून या शिवकन्येच्या दोन्ही तटांवर अत्यंत व्यवस्थितपणे रचलेलं आहे आणि सौंदर्याच्या अपूर्व परिमलाने दरवळून निघालेला हा परिसर असाच मुग्ध करतो, नर्मदेचं हे स्वरूपवैचित्र्य इथेच संपत नाही दरवर्षी ,गेल्यावर्षीच्या स्थिती पेक्षा वेगळं, काही कमी तर काही जास्त आणि गेल्या वर्षी असलेला काही मागमूसही नाही अशी दोन्ही रूपं , नर्मदा मैया ची, आपल्याला दिसत असतात
नर्मदेच्या परिक्रमेत चालत असताना भेटणारा प्रत्येक यात्रेकरू हा तुम्हाला “नर्मदे हर” असा घोष करून नमस्कार करतोच. नर्मदा किनारी वातावरणच भक्तीरसाने ओथंबलेले आहे. असा भक्तिरस की ज्याच्यात कोणीही विरघळून जावे आणि कधी त्यात मिसळून जावे ,कधी पटकन रडावे तर दुसऱ्या क्षणी हसावे , कधी स्तब्ध तर कधी अत्यानंदाने नाचावे अश्या सात्विक क्षणांची अनुभूतीच जणू.
तपश्चर्येला ज्यांना एकांत हवा अशा प्रकारची कठोरता आणि चित्त एकाग्र करण्यासाठी तपोभूमी ही सुद्धा नर्मदाच , निग्रहशील ,तेजस्वी तपोबल निर्माण करण्याचे सामर्थ्य या नर्मदा मैय्या मध्ये आहे.आपल्यापैकी बहुतेकांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक व्यक्तिमत्त्वांमध्ये दुहेरीपणा दिसत असतोच.. नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला आपल्या स्वतःची खरी आठवण येते आणि जाणीवही होते , ओळख ही होते
स्वतःचे व्यक्तिमत्व ओळखून आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना योग्य पद्धतीने कसं हाताळायचं हे सुद्धा आपल्याला याच परिक्रमेमध्ये चांगल्या पद्धतीने समजत जाते ,उमजत जाते. आपली शिकवण आणि रोजच्या जगात वापरण्याचे मार्ग याचा उत्तम मिलाप म्हणजे ही यात्रा. आयुष्य बदलणाऱ्या साध्या पण खऱ्या सत्याच्या शोधात असणाऱ्या सगळ्यांसाठी, रूपामय्याने केलेली ही यात्रा, अत्यंत उपयुक्त अनुभव ठरेल. आयुष्यासाठी enriching life या उक्तीप्रमाणे अत्यंत उपयुक्त असे हे लेखन.
यासाठी आणि अशाच अनेक अनुभूतीकारक यात्रा , प्रवास व अंतरी च्या शोधासाठी आणि आयुष्य बदलणाऱ्या समृद्धी मार्गावर रूपामैयाला आमच्या खूप खूप शुभेच्छा………. प्रस्तावना ———- नर्मदा सेवक …. उपेंद्र पेंडसे
—————————————
रूपा मैय्या चे मनोगत
नर्मम् ददाति सा नर्मदा…अर्थात नित्य आनंद देणारी अशी ही नर्मदा
गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती , ग्रामे वा यदि वा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा
अर्थात गंगा ही फक्त कनखल (ऋषिकेश, हरिद्वार) येथे तर कुरुक्षेत्रावर सरस्वती पुण्यदायिनी आहे. मात्र नर्मदा ही गावात, अरण्यात व तीर्थस्थळ सर्वत्र पुण्यप्रद आहे. नर्मदा सातही कल्पात वहात आहे. प्रलयात समुद्र व इतर नद्याही लय पावतात पण ‘ न मृता ‘ म्हणजेच न मरणारी, न क्षीण होणारी अशी ही नर्मदा.
नर्मदा माईचे दोन्ही तट पवित्र आहेत. तिच्या दोन्ही तटावर मिळून ६० कोटी ६० लक्ष तीर्थे आहेत. मार्कंडेय ऋषींनी प्रथम तिची परिक्रमा केली. नुसती तिचीच नाही तर तिला मिळणाऱ्या प्रत्येक नदीच्या उगमापर्यंत जाऊन त्यांनी परिक्रमा केली.
आपल्याला मिळालेला नरदेह दुर्लभ असल्याने काहीतरी पुण्यकर्म घडणे आवश्यक आहे. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे देहाचे ममत्व नाहीसे होणे महत्वाचे आहे. आपल्यासारख्या संसारी लोकांचे सर्व लक्ष प्रपंचात असल्याने सद्गुरुंचे सांगणे आपल्याला कळत नाही. पण परिक्रमा आपल्याला अंतर्मुख करते, काही काळासाठी का होईना प्रपंचाचा विसर पडतो.
अशा या नर्मदा माईची परिक्रमा दोनदा करण्याचे भाग्य मला लाभले. पहिली परिक्रमा ही टाचेच्या दुखण्यामुळे अर्धी बस, ट्रेन ने करावी लागली होती. त्यामुळे दुसरी पूर्ण चालत करायची हे ठरवलेच होते. माईच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने दुसरी परिक्रमा अतिशय छान पार पडली
रूपा अक्षीकर
—————————————–
ह्या लिंक वर Heyzine फ्लिप बुक प्रकारात आपल्याला मिळेल पूर्ण परिक्रमेचे वर्णन
—————————————–
https://drive.google.com/file/d/1b2ZQkB92fAJV3rtM6Y_diy8ZqQgHHUt_/view?usp=drive_link
ह्या लिंक वर पीडीएफ प्रकारात वाचन करायला मिळेल
———————————-
अशा रीतीने परिक्रमा पूर्ण झाली…नव्हे, माईने अगदी हाताला धरून करवून घेतली. परिक्रमेने काय दिले…खूप काही. माईच्या शाळेतले शिक्षण खूप काही शिकवून जाते. प्रत्येक आईला वाटते की माझे लेकरू शहाणे व्हावे, त्याने चांगले शिकावे. तेच माईला पण वाटत असते म्हणून ती खूप गोष्टी शिकवते. फक्त तिच्या शाळेत आधी परीक्षा होते आणि नंतर शिक्षण मिळते. सर्वात प्रथम घाला पडतो तो आपल्या अहंकारावर. आपण आपल्या जगात कितीही हुशार, श्रीमंत असलो तरी तिकडे आपली ओळख ही एक परिक्रमावासी इतकीच असते. आपला पोशाख बघूनच लोक आपल्याला ओळखतात आणि मान देतात. जेवणे राहणे हे सर्वसामान्य परिक्रमावासीसारखेच करावे लागते. लोकांचा सेवाभाव बघून आपलाही सेवाभाव जागृत होतो.
आपल्याला कितीही वाटले की मी परिक्रमा केली तरी ती केवळ माईची इच्छा असते म्हणूनच पूर्ण होते. तिच्या इच्छेविरुद्ध तिथे पानही हलत नाही. जितका आपण कुठल्या गोष्टीचा अभिमान धरतो तो अभिमान माई कुठल्या कुठे भिरकावून देते. परिक्रमा करत असताना सतत जाणवत असते की पुढे काय होणार हे फक्त आणि फक्त माईच्या हातात आहे. कुठे जेवायचे राहायचे सर्व तीच ठरवते. आपण कितीही प्लॅनिंग केले तरी तिथे तिचाच अधिकार चालतो. तेच जर आपण तिला पूर्ण शरण गेलो तर ती खूप लाड करते, सुंदर अनुभूती देते. माईला वाटते की आपल्या प्रत्येक लेकराने आयुष्यातले महत्वाचे पाठ जाणून घ्यावेत आणि आपली अध्यात्मिक प्रगती करून घ्यावी. अध्यात्मिक ज्ञान फार मोलाचे आहे, अध्यात्मात झालेली प्रगती आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे नेते. माई प्रत्येक परिक्रमावासीवर आपली ममतेची छाया धरत असते. आपल्याकडून काही चूक झाली तर शिक्षा पण देते पण क्षमा देखील करते. तिथे प्रसंगी होणारे अपमान देखील पचवावे लागतात. सगळ्यात महत्वाचा धडा जो परिक्रमेत मिळतो तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेऊन आनंदी राहणे. काही ठिकाणी सलग दोन तीन दिवस चांगला आश्रम किंवा एखाद्या घरी मुक्काम असायचा. खूप छान वाटायचे. पण लगेच तिसऱ्या दिवशी माई जमिनीवर आणायची आणि कठीण परिस्थितीत रहायला लागायचे. एक रात की तो बात हैं असे म्हणत कित्येक ठिकाणी कठीण परिस्थितीत राहावे लागायचे. पण माईच्या किनारी, रेवा खंडात जो आनंद मिळाला त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही
सर्व लोक, साधुसंत म्हणतात त्याप्रमाणे ही खरंच आनंदयात्रा, अंतर्यात्रा आहे. माणूस अंतर्बाह्य बदलतो. नर्मदा परिक्रमा हे तप आहे, उपासना आहे. अशी ही मेकलसुता, महादेवांची कन्या, तीरावरच्या असंख्य लेकरांची आणि भक्तांची माई…घरी परत आले तरी ती सतत मनात आहे. असंख्य आठवणी, भेटलेली माणसे मनाच्या कोपऱ्यात जपून रोजचे जीवन सुरू आहे.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मम् ददाति सा नर्मदा…
अर्थात नित्य आनंद देणारी अशी ही नर्मदा —
रूपा अक्षीकर


