★सोबत★ (४) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा …… सोबत
★सोबत★ (४) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
रात्रीचे बारा वाजले तरी रमणीला झोप येत नव्हती. खरं तर मन आणि शरीर दोन्हीही थकलं होतं पण मनाच्या थकवा झोप डोळ्यापर्यंत येऊच देत नव्हता. उठून तांब्यातलं पाणी ती प्यायली आणि आर्याला फोन लावला. आर्याने उचलायच्या आतच परत बंद केला. परत कॉटवर आडवी झाली. हे असं रात्र रात्र तलमळणं, गेलं वर्षभर तिचं चाललं होतं. प्रद्युम्न आजारी असल्यापासून!तिने डोळ्यावर हात ठेवला. डोळ्यांवर अंधार करून तरी झोप येतेय का वाट बघायला लागली. पण त्या अंधारात तिचा हसरा,लख्ख,प्रसन्न संसार,अचानक नियतीने आखलेली वजाबाकी आणि त्या प्रसन्नतेचं मावळतं रूप तिला दिसायला लागलं.
**
दाराची बेल वाजली आणि रमणी दार उघडायला गेली. दारात प्रद्युम्नचा ऑफिसमधला मित्र सोहम प्रद्युम्नला आधार देत आत आला. रमणी गोंधळली.
“वहिनी,नथिंग सिरीयस! प्रद्युम्नला आज थोडी चक्कर आली. तो म्हणतोय की मी शुगर पेशंट आहे,असं होऊ शकतं.”
रमणीने प्रद्युम्नचा हात धरून त्याला आत कॉटवर झोपवलं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. प्रद्युम्न तिच्याकडे बघत म्हणाला,
“रिलॅक्स रमा! ह्या महिन्यात धावपळ जरा जास्तच झाली ना,त्यामुळे असेल. आर्याचा व्हिजा, जायची तयारी ती धावपळ बाहेर पडली असेल.”
प्रद्युम्नचा मित्र गेला आणि रमणीने प्रद्युम्नची शुगर चेक केली. ३०० पर्यंत गेली होती. ती घाबरली.
“प्रद्युम्न,शुगर किती वाढलीय तुझी! आजपासून तुझं गोड अजिबात बंद! साखरेचा ‘सा’ जरी तू उच्चारलास तरी बघ!”
“लहान मुलांना धाक दाखवतात तसं तुझं चाललंय.” प्रद्युम्न हसत म्हणाला.
“हसू नकोस रे! जरा सिरियसली घे ना! मी डॉक्टरांना फोन करते.”
“नको करुस! झालंय माझं बोलणं! गोळीचा डोस वाढवलाय. आणि मी व्यायामाच्या बाबतीत किती पर्टीक्युलर आहे तुला माहितीय.”
प्रद्युम्नशी त्यावेळी वाद घालण्यात अर्थ नव्हता. त्या दिवसापासून प्रद्युम्नशी शुगर नॉर्मल होतच नव्हती. वाढलेल्या डोसमूळे तो शरीराने पण अशक्त होत चालला. त्याला ऑफिसमध्ये जाणं झेपेना! व्हीआरस साठी अर्ज केला. रमणी त्याची काळजी घेतच होती पण प्रद्युम्नची वाढलेली शुगर आणि त्यात त्याला पायाच्या अंगठ्याला नखुर्ड झालं. ती जखम इतकी चिघळली की गॅंगरीन झालं. रमा शारीरिक धावपळ आणि मानसिक ताण ह्यात दमून गेली. तिने देखील व्हीआरस साठी अर्ज केला.
आठ दिवस प्रद्युम्न दवाखान्यात होता पण तो औषधाला प्रतिसाद देईना. डॉक्टरांनी पाय कापायचा निर्णय घेतला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मनावर दगड ठेवून निर्णय घेतला कारण प्रद्युम्नचा जीव महत्वाचा होता. आर्या रोज फोनवर रडायची. “ममा,मी भारतात परत येते. मला इथे चैन पडत नाहीय. दोन वर्षांच्या प्रोजेक्टसाठी मी आले होते पण पपाची तब्येत अशी आणि तुझ्यावर सगळा भार पडतोय. माझं लक्ष लागत नाही ग ममा!”
“वेडी आहेस का? आता तुझं करिअर महत्वाचं आहे. कंपनीत ह्या प्रोजेक्टसाठी तू सिलेक्ट झालीस हा तुझा सन्मान आहे. तू घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. पपा एकदम ओके होईल. तू काळजी करू नकोस. अग, हल्ली नोकरी मिळणं किती अवघड झालंय. आहे तीच टिकवायला हवी बेटा! आणि शिक्षणाचा उपयोग तरी काय मग? फार विचार करू नकोस,मी आहे.”
रमणीने वरवर धीर दाखवला तरी ती हतबल झाली होती. कोणाचा तरी आधार हवा वाटत होता. पण असं कोण येऊन राहणार? प्रत्येकाला आपला संसार असतोच.
प्रद्युम्नचा पाय कापला त्यादिवशी घरात रमणी हमसून रडली. भविष्याची भीती वाटायला लागली. वर्तमान जगण्याची हिम्मत नव्हती आणि सुंदर भूतकाळ डोळ्यासमोर नको वाटत होता…!
***
पक्षांची किलबिल ऐकू आली आणि रमणीला जाग आली. तिने घडाळ्यात बघितलं. नऊ वाजले होते. इतका वेळ झोप लागली? तिने मोबाईल बघितला. आर्यांचे सहा मिस्ड कॉल होते. तिचा मेसेज दिसला…
—ममा,तू फोन केला तेव्हा मिटिंगमध्ये होते. नंतर केला पण तुला झोप लागली असावी. उद्या बोलू. काळजी घे!
तिने परत मोबाईल बघितला. विलासचे दोन मिस्ड कॉल दिसले. तिने कॉल बॅक करायचं टाळलं. कालच्या विचारांनी डोकं जड झालं होतं. आज सुधाताई पण येणार नव्हत्या. स्वयंपाकाचं पण बघायला हवं होतं. ती फ्रेश झाली आणि चहा ठेवला. इतक्यात बेल वाजली. सुधाताई तर येणार नव्हत्या. तिने दरवाजा उघडला. समोर विलास हातात पोह्याची डिश घेऊन उभा होता. अगदी भरपूर कोथिंबीर, खोबरं घातलेली!
“तुला दोनदा फोन केला पण उत्तर नाही,तेव्हाच कळलं की इतका वेळ झोपलीस म्हणजे बरं नसावं. गरम पोहे खाऊन घे. आणि आराम कर.”
विलास जायला निघाला…
“विलास..”
“बोलू नंतर! तुझे डोळेच सांगताहेत तू रात्री नीट झोपली नाहीस. तुझा मूड आला की कॉल कर मला! अगदी उद्या केलास तरी चालेल. ओके? गुड गर्ल!”
कसं करू ह्याला माझ्यापासून दूर? इतका निर्व्याज मनाने मैत्री निभावतोय. कशी सांगू? मला एकटं सोड…! रमणीने दार लावलं आणि डोळ्यातला बाहेर आलेला एक थेंब पुसला…..!
**
विलासने दिलेल्या पोह्याच्या डिशमध्ये रमणीने घरच्या अळूची केलेली वडी ठेवली आणि तिने विलासला फोन केला, “घरी आहात का? सकाळची डिश परत करायची होती.”
“वेळेत फोन केलास, कंटाळा आला म्हणून जरा बाहेर पडणार होतो. ये तू!”
विलास सहज एकेरीवर आला होता पण तिला जमत नव्हतं. त्या दिवशी तो जे बोलला की निखळ मनाने मैत्री स्वीकार. मैत्रीत हक्काची,अधिकाराची भावना रुजते. आणि तो खरंच हक्काने बोलत होता. सगळा संकोच दूर करून! ती मात्र अंतर ठेवून होती.
विलासचं दार उघडच होतं. रमणी आत आली.
“ठीक आहेस ना ग? अळूची वडी? फार आवडते मला! धराला अजिबात आवडत नव्हती. तेलकट तिला काही आवडायचं नाही.”
विलासने रमणीकडे बघितलं,
“ओह सॉरी! मी सतत धराबद्दल बोलतो ते चुकीचं आहे. तू बोल रमणी!”
“सॉरी कशाला? किती साहजिक आहे ते! आपला लाईफ पार्टनर असा अर्ध्यावर सोडून जातो ते दुःख मी अनुभवतेय. पदोपदी आठवण होते.”
“रमणी..!”
“विलास,माझे पती प्रद्युम्न ह्यांना जाऊन आता जेमतेम वीस,बावीस दिवस झाले. पंधरा दिवस कोणीतरी घरात होतं म्हणून जाणवलं नाही. मला आईवडील नाहीत. सासरे पण नाहीत. सासूबाई लहान दिराकडे असतात. त्यांना म्हटलं,आता माझ्याजवळ रहा, पण जावेचं मूल लहान,तिची नोकरी! केली मी शेवटी तडजोड! एकटं आयुष्य कढई आहे हे स्वीकारलं!”
“होल्ड ऑन रमणी! आता मात्र मी तुझ्यावर रागावलोय.”
“का? काय चुकलं माझं?”
“चुकलं? फार मोठी चूक! एकटं आयुष्य काढायचं म्हणालीस. मला अजून मित्र मानत नाहीस का तू?”
“तसं नव्हतं म्हणायचं मला!”
“तुला सांगू? देवाने सगळं आखून ठेवलं असतं. मी इथेच फ्लॅट घ्यावा,तुझ्याच शेजारी! कदाचित आपल्या दोघांची मैत्री होऊन आपला एकटेपणा जावा हा त्याचा प्लॅन दिसतोय.”
“देव पण प्लॅन आखतो का?” रमणी हसत म्हणाली.
“छान वाटलं तुला असं हसताना बघून! हे बघ रमणी,तुझं दुःख मी घेऊ शकत नाही आणि माझं तू! ते आपलंच आपल्याला भोगावं लागतं पण आपण मैत्री तर एन्जॉय करू शकतो ना एकमेकांची! आणि देव प्लॅन आखतोच ग! सगळं ठरलेलं असतं. तू माझ्याशी मोकळेपणाने बोल. मला माझ्याबरोबर मॉर्निंग वॉकला चल. कधी आईस्क्रीम, कधी पाणीपुरी!”
“किती सहज बोलताय! एक विधवा स्त्री,जिचा नवरा जाऊन अजून महिना पण झाला नाही,ती एका परपुरुषाबरोबर अशी मजा करेल? आपण भारतात राहतो.”
“बरोबर आहे तुझं! स्त्री आणि पुरुषाच्या विचारांमध्ये फरक असतो. स्त्री ही केवळ लोकं काय म्हणतील ह्या कल्पनेवरच अर्ध आयुष्य जगते. लोक काय ग,चार दिवस बोलतात,मग त्यांना सवय होऊन जाते. मग दुसरा विषय मिळतो. रमणी, तुला कुठल्याही गोष्टीची मी सक्ती करणार नाही. तू आनंदी रहावं इतकीच माझी इच्छा आहे. तुला जेव्हा तुझं मन हलकं करायचं असेल तर तेव्हा कधीही माझ्या घरी ये.”
अळूवडी,चहा घेताना परत दोघांच्या गप्पा रंगल्या. रमणीला एक जाणवलं की तिला विलासची कंपनी आवडतेय. म्हणजे त्याच्या बोलण्याचा राग येत नाहीय. तिला वाटलं होतं,आज विलास तिला विचारेल, तुझ्या मिस्टर कसे गेले? पण तो विषय विलास टाळत होता.
“रमणी,तुझी हरकत नसेल तर मी माझ्या मुलाला वेदला व्हीडिओ कॉल करू? त्याला तुला बघायचं आहे!”
“मला?”
“हो,मी सांगितलं ना तुझ्याबद्दल! त्याला इच्छा आहे तुला बघायची! माझी सून पण छान आहे. अगदी माझ्यासारखी बडबडी!”
“ठीक आहे!”
विलासने वेदला व्हीडिओ कॉल लावला. वेद फोनवर आल्यावर विलास म्हणाला,”वेद, मीट माय फ्रेंड रमणी!” रमणीने वेदला हात केला.
“काकू,कशा आहात तुम्ही? बरं झालं,बाबाला बोलायला कंपनी मिळाली. तो बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.” वेदने हसतच विलासकडे बघितलं.
“कर चेष्टा बापाची! आज रमणीने अळूवडी आणली होती. अमेझिंग झाली होती. रियाला बोलाव ना!”
“रिया फोनवर आली आणि तिच्या आणि विलासच्या गप्पा रंगल्या. सासरा-सून हे नातं वाटतच नव्हतं. इतका मोकळेपणा दोघांच्या बोलण्यात होता.”
“बाबा,काकू कुठे आहेत,मला बघायचं आहे.” रिया म्हणाली तस रमणीने तिला हाय केलं.
“काकू, बाबा पक्के खवय्ये आहेत पण त्यांना गोड पदार्थ फार देत जाऊ नका. शुगर आहे त्यांना! पण गोड फार आवडतं.”
वेद आणि रियाने विलासला अनेक सूचना केल्या. आईवडिलांचं वय होत आलं की मुलं त्यांचे आईवडील व्हायला लागतात. आर्या अशीच सारखी सूचना देत असते.
“आपल्या आईवडिलांना काही कळत नाही,असं ह्या मुलांना वाटतं. आपल्या गाठीशी इतका अनुभव असतो,त्यांना कळतच नाही.”
“त्या सांगण्यात काळजी असते.” रमणी म्हणाली.
“कबूल पण असं एकटं जगताना,पथ्यपाणी कशासाठी असं वाटतं. आता कोणासाठी तग धरायची?”
“विलास,तुम्ही इतकं नकारात्मक बोलताय?”
“ओह सॉरी! शेवटी मी पण माणूसच आहे ग! तू रडून मोकळी होतेस. मी बडबड करून दुःख लपवतो. बरं, ते जाऊ दे! मी उद्या रसमलाई आणतोय. इथे जवळच छान मिळते असं कळलं. तुझ्यासाठी पण घेऊन येतो.”
“नको,मी वर्षभर रसमलाई सोडली आहे. प्रद्युम्नला पण फार आवडायची. आणि तू पण नको खाऊस. आत्ताच वेद म्हणाला ना गोड जास्त नको म्हणून!”
“छान वाटलं,मला ‘तू’ म्हणून हाक मारलीस.”
“चुकलंच!”
“नाही ग! काही काही चुका छान असतात. आता तू मला खरा मित्र मानायला लागली आहेस. संकोच करू नकोस.”
“नकळत निघून गेलं, पण ठीक आहे,ए विलासच म्हणेन. निघू मी?”
“ओके! रमणी,अजून एक गोष्ट! रात्री, अपरात्री कधीही भीती वाटली,घाबरलीस तर मला फोन कर! तेवढा विश्वास तू माझ्यावर ठेवावा ही माझी अपेक्षा आहे तुझ्याकडून!”
“ओके” रमणी हलकंसं हसली.
रमणी गेली आणि विलासच्या मनात तिच्याबद्दल माया दाटून आली. एखाद्या स्त्रीवर हा प्रसंग येतो तेव्हा तिला किती धैर्य गोळा करून जगावं लागतं. रमणी खचली होती पण तिला ह्यातून बाहेर काढायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मित्र म्हणून माझं ते मी कर्तव्यच समजतो….!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
